आपण अजूनही बहयाडबेलने त बहयाडबेलनेच !

#mediawatch.info

दरवर्षी अक्षयतृतीयेच्या दिवशी घरोघरी आपल्या पितरांना पिंडदान करण्याची लगबग पाहिली की गाडगेबाबांची ती आठवण हमखास येते . 

एकदा गाडगेबाबा पंढरपूरला चंद्रभागेच्या वाळवंटात साफसफाई करत असताना नदीच्या किनाऱ्यावर काही पुरोहित व भाविक काही धार्मिक विधी करताना त्यांना दिसले .

एका पत्रावळीवर अनेक पंचपक्वान्न सजवून ठेवण्यात आले होते . बाजूला कसली तरी पूजा मांडली होती . सुगंधी उदबत्तीचा घमघमाट सुटला होता .

ते सगळ पाहून बाबांनी उत्सुकतेने पुरोहिताला प्रश्न केला . ‘महाराजजी , कसली पूजा चालू आहे जी ?’

बाबांच्या गबाळ्या वेषाकडे तुच्छतेने पाहत पुरोहित बाबांना म्हणाला , ‘हे वेड्या तुला नाही हे कळणार. हा तर्पण आणि पिंडदान विधी आहे .’

बाबांनी पुन्हा प्रश्न केला , ‘काय असते जी ते ? ‘

पुरोहिताचा सहायक म्हणाला, ‘अरे, स्वर्गातल्या आपल्या पूर्वजांना अन्नदान करण्याचा विधी असतो हा .’

शांत राहतील तर बाबा कसले . त्यांनी पुन्हा प्रश्न केला , ‘महाराज , हा स्वर्ग कुठे असतो जी ?’

त्यावर पुन्हा तुच्छतेचा कटाक्ष टाकत तो पुरोहित म्हणाला , ‘खूप, खूप दूर असते .’

बाबा म्हणाले , ‘म्हणजे आपलं पुण – मुंबईएवढं?’

यावेळी पुरोहिताचा सहायकानेच उत्तर दिलं, ‘अरे नाही रे . खूप दूर असते . चंद्र , सूर्यापेक्षाही दूर’

बाबांनी पुन्हा प्रश्न केला , ‘पण एवढ्या दूर हे अन्न कसं पोहचते जी?’

आता मात्र पुरोहिताचा संयम संपला . ‘अरे मूर्खा, चल निघ इथून . ते अन्न नाही . पिंड आहे . तुझ्यासारख्या बेअक्कल माणसाला ते कळणार नाही . मंत्राच्या शक्तीने ते स्वर्गात पोहचते .’

हे ऐकून बाबा बाजूलाच चंद्रभागेच्या पात्रात उतरले . आणि तोंडाने काहीतरी बडबडत दोन्ही हातांनी नदीतील पाणी बाहेर उडवायला लागले .

तिथे उपस्थित सर्वांनी प्रारंभी वेडा म्हणून त्यांच्याकडे दुर्लक्ष केले . पण बाबा पाणी उडवितच राहिले .

ते पाणी पुरोहितांनी मांडलेल्या पूजेवर उडाले . आता सगळेच चिडले .

पुरोहित संतापून बाबांजवळ हात उगारत आला , ‘काय करतो आहे’ , त्याने दरडावून विचारले

बाबा नम्रपणे म्हणाले , ‘काही नाही जी . माया शेताले पाणी देवून रायलो. यावर्षी दुष्काळ आहे ना जी तिकडं वऱ्हाडात’

कुठं आहे तुय शेत ? पुरोहिताने विचारले

‘त्या तिकडे आहे जी . उमरावती जिल्ह्यात वलगावकड’

किती दूर आहे ते ?

‘काही नाही जी , असन ४००- ५०० मैल’

‘अरे मूर्खा , एवढ्या दूर पाणी कसं पोहोचण’, पुरोहिताने विचारले

‘म्या विचार केला . तुमचं पिंड चंद्र – सूर्याच्या पल्याड स्वर्गात पोहचते म्हणता . त माय शेत त ४००- ५०० मैलच आहे जी . तिथं पाणी नक्कीच पोहचण ना जी’

गाडगेबाबांचं हे उत्तर ऐकून तो पुरोहित आणि तिथे पिंडडान विधी करणाऱ्या साऱ्यांचे चेहरे काळेठिक्कर पडले.

रुढार्थाने निरक्षर असलेले गाडगेबाबा केवळ तर्कबुध्दीच्या जोरावर सो कॉल्ड सुशिक्षितांच्या डोळ्यात अंजन घालत होते .

हे असे पिंडदान , सत्यनारायण असे निरर्थक विधी करणाऱ्यांनाचा उल्लेख ते कायम ‘बहयाडबेलने’ असा करत .

दुर्दैवाची गोष्ट . बाबांना जावून आज ६२ वर्ष झालेत . पण आपण अजूनही बहयाडबेलने त बहयाडबेलनेच आहोत .

#Gadagebaba

One Comment

  1. Meena Tikhe says:

    Very practical…. Thoughtful article….indeed

Leave a Comment