आमदार प्रवीण पोटेंची ‘मुकुट संस्कृती’

केवळ नावापुरतं भारतीय जनता पक्षाचं कुंकू लावलेले आमदार प्रवीण पोटेंना सारं काही भव्यदिव्य आणि हटके करण्याची सवय आहे. बिल्डर म्हणून उभारलेल्या टाऊनशिप असो वा आधुनिक शिक्षणसम्राट म्हणून गुंफलेलं व्यावसायिक महाविद्यालयांचं जाळं, त्यांची एक वेगळी दृष्टी त्यातून दिसते. टाऊनशिप उभी करताना शे-दोनशे घरं उभे करुन ते स्वस्थ बसले नाहीत, अख्ख शहर नवीन वसविल्यासारखं डुप्लेक्स बंगल्यांची माळ त्यांनी उभी केली. तोच कित्ता शिक्षणसंस्थांची दुकानदारी उभी करतांना त्यांनी गिरविला. अनेक शिक्षणसंस्थाचालकांची एक इंजिनिअरिंग कॉलेज चालवितांना दमछाक होते. यांनी एका झटक्यात दोन कॉलेज आणले. एमबीए, डी.एड़, बी. एड हे बाकी वेगळंचं. कॉलेजही कशी चकाचक. एकेका वर्गात चार-चार एअर कन्डिनशर. कॉम्प्युटर लॅबमध्ये कॉम्प्युटरच कॉम्प्युटर.

 
 मुळात प्रवीणभाऊंची दृष्टीच व्यापक आहे. लहानसहान कामात ते हातच टाकत नाही. चार-पाच वर्षापूर्वी सामूहिक विवाह सोहळ्याचं त्यांनी आयोजन केलं होतं, त्यातही हजारेक लग्न त्यांनी लावले होते. जे काही करायचं ते डोळे दीपविणारं करायचं, हा त्यांचा निर्धार असतो. दुनिया झुकती है, और बिकती है, या मंत्रावर आणि पैसे पेरायचे आणि पैसे उगवायचे या नवीन लागवड तंत्रावर त्यांचा गजाननबाबांएवढाच ठाम विश्‍वास. बरं हे तत्वज्ञान अनुभवातून प्राप्त झालं असल्यानं डोक्यात कुठला गोंधळ नाही. गेल्या वर्षी झालेल्या विधानपरिषद निवडणुकीत तेच तत्वज्ञान डोक्यात ठेवून कोटीच्या कोटी उड्डाणाव्दारे त्यांनी आमदार होण्याचं आपलं स्वप्न पूर्ण केलं. आपलं स्वप्न आपण आपल्या कर्तबगारीने प्रत्यक्षात आणलं असल्याचा ठाम विश्‍वास असल्याने मी काही केवळ भारतीय जनता पक्षामुळे आमदार झालो नाही, असे ते तेवढय़ाच आत्मविश्‍वासाने सांगत असतात. (त्यांच्या सांगण्यात काही फार चूक आहे, अशातलाही भाग नाही.) त्यांचा आत्मविश्‍वास नेहमीच जबरदस्त राहिला आहे. त्यामुळेच भाजपाची सत्ता आली किंवा नाही आली तरी २0१४ च्या निवडणुकीनंतर आपल्या गाडीवर लाल दिवा असेल, हे ते अतिशय सहजपणे सांगून जातात.

भारतीय जनता पक्षाचे स्थानिक नेते व कार्यकर्ते मात्र त्यांचा हा आत्मविश्‍वास पाहून तोंडात बोट घालतात. आता परवाचीच गोष्ट घ्या. राष्ट्रीय स्वंयसेवक संघाच्या बैठकीसाठी अमरावतीत आलेले भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजनाथसिंह व प्रदेश अध्यक्ष देवेंद्र फडणवीसांना त्यांनी घरी आमंत्रित केलं आणि सोन्याचं पॉलीश चढविलेले चांदीचे मुकूट त्यांच्या डोक्यावर चढविले. प्रवीणभाऊंच्या चाहत्यांनी टाळ्यांचा कडकडाट केला. आपल्या प्रिय नेत्यांना असे मुकुट चढविणे हा प्रवीणभाऊंचा आवडता छंद आहे. दादासाहेब गवई पहिल्यांदा राज्यपाल झाले तेव्हा त्यांनी त्यांच्या डोक्यावर सोन्याचा मुकुट चढविला होता. त्यानंतर माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनाही त्यांनी असेच गौरवान्वित केले होते. नितीन गडकरींना त्यांनी मुकुट दिला की नाही, माहीत नाही. मात्र राजनाथसिंह व फडणवीसांच्या डोक्यावर तो चढला. आता प्रवीणभाऊंचे विरोधक काहीही बोलतात. गवई, राणेंना सोन्याचा मुकुट आणि ज्या भारतीय जनता पक्षाने त्यांना आमदारकी दिली त्यांच्या नेत्यांना चांदीचा मुकुट, हे कसं काय, असं ते विचारतात. पण या अशा लोकांकडे लक्ष द्यायचं नसतं. प्रवीणभाऊंच्या भावना लक्षात घ्यायचा असतात. मुकूट देऊन प्रवीणभाऊ बरंच काही काढून घेतात, असंही लोक बोलतात. आता लोकांचं काय, उचलली जीभ, लावली टाळ्याला असा प्रकार असतो. आणि शेवटी राजकारण हा देण्याघेण्याचाच खेळ आहे, हे प्रवीणभाऊंएवढं दुसर्‍या कोणाला माहीत असणार. आता त्या दिवशी प्रवीणभाऊ भाजपा नेत्यांना मुकुट परिधान करत होते, तेव्हा भाजपाचे जुने जाणते नेते अरुणभाऊ अडसड विषण्णपणे ते सारं पाहत होते. त्यांच्या डोळ्यासमोर जुने दिवस उभे झाले असतील. जेव्हा लोकांसमोर झोळी पसरुन एकेक रुपया जमा करुन त्यांनी निवडणुका लढविल्या होत्या. आता काही कोटी रुपये खर्च करुन दोन-चार महिन्यात माणसं आमदार होतात आणि मुकुटं घालून नेत्यांच्या जवळही जातात, हे पाहणं त्यांच्यासारख्या नेत्यांना, कार्यकर्त्यांना सुन्न करणारं असेल.

पण करणार काय? दिवसच आता बदलले आहे. सगळीकडे पैसा बोलता है….हीच कॅसेट ऐकू येतेय. अशा परिस्थितीत प्रवीणभाऊंसारखी व्यावहारिक विचार करणारी व मोठी स्वप्नं पाहणारी माणसंच राजकीय पक्षांना हवी असतात. खरं तर मुकुटांच्या बदल्यात भारतीय जनता पक्षाने अमरावती जिल्ह्याची धुरा प्रवीणभाऊंकडे द्यायला हवी. एवढय़ा कर्तबगार माणसाच्या अनुभवाचा पक्षाने फायदा करुन घ्यायला नको का? पण नाही. साधा अमरावती शहराचा अध्यक्ष सुद्धा प्रवीणभाऊंच्या मताने केला नाही. कुठल्या निर्णय प्रक्रियेतही त्यांचा सल्ला घेतला जात नाही. त्यांचं पक्षासाठी काय योगदान आहे, असा तिरपट प्रश्न उपस्थित केला जातो. आयुष्यभर दारिद्रयात राहणार्‍यांना श्रीमंताबद्दल आकस असतो. तसं भाजपाच्या जुन्या कार्यकर्त्यांचं प्रवीणभाऊंबद्दल झालं आहे. त्यांचं आयुष्य गेलं भगव्या झेंड्यासमोर राष्ट्राला मजबूत करण्याची शपथ घेत. प्रवीणभाऊंचं तसं थोडंच आहे. त्यांनी आपला व्यवसाय व संस्था मजबूत केल्या. त्यातून माणसं उभी केली आणि पुढे संधी मिळाली, तर ते राष्ट्रही मजबूत करतील. पण भाजपाच्या करंट्या कार्यकर्त्यांना याची जाण कुठे? राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे सारे शीर्षस्थ नेते अमरावतीत असताना प्रवीण पोटेंनी भाजपा नेत्यांना मुकुट चढवायला नको होते, संघाच्या नेत्यांना हा उथळपणा आवडला नसेल, त्यातून त्यांची संस्कृती संघाला कळली असेल, असेही बरंच काही ते बोलताहेत. पण प्रवीणभाऊंनी त्यांची चिंता का करावी? मागे दहिहंडीच्या कार्यक्रमात थिल्लर फिल्मी गाण्यावर ठुमके मारतांना कुठे त्यांनी चिंता केली होती. तसंही त्यांना कुठे संघ परिवार, त्यांचा साधेपणा, त्यांची मूल्यं, तत्वं माहीत आहेत? या मूल्य-तत्वावेक्षा हिरव्या नोटांनीच त्यांना आयुष्यभर जीवाभावाची साथ दिली आहे. मोठं केलं आहे. बरं याउपरही त्यांना कोणी सांगितले असतं की, संघाचे नेते या मुकुट प्रकरणामुळे नाराज होऊ शकतात, तर त्यांनी संघाच्या नेत्यांनाही नाही चांदीचे, तर किमान तांब्याचे मुकुट नक्कीच घातले असते.

(लेखक दैनिक पुण्यनगरीचे कार्यकारी संपादक आहेत.)

भ्रमणध्वनी – ८८८८७४४७९६

Previous articleसासू-सुनेची तीच कटू कहाणी
Next articleएक सज्जन खलनायक
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.