ई, सेक्स आणि सिनेमा!

सौजन्य -महाराष्ट्र टाइम्स

…………………………………………………………………….

हिनाकौसर खान-पिंजार

वो किसीं एक मर्द के साथ ज्यादा  दिन नही रह सकती,                                             

ये उसकी कमजोरी नही, सच्चाई है.

लेकिन जितने दिन वो जिसके साथ रहती है,

उसके साथ बेवफाई नही करती.

उसे लोग भलेही कुछ कहे मगर,

किसीं एक घर में जिंदगी भर झूठ बोलने से

लग अलग मकानो में सच्चाईयां बिखेरना ज्यादा  बेहतर हैं…

– निदा फाजली

स्त्रियांच्या मनमुराद ‘सच्चाई’ने जगण्याकडे अगदी खुलेपणाने निदा फाजली पाहतात. ती नजर आपल्या मातीत अजूनही रुजायची आहे. बायकांनी एकाहून अधिक घरोबा केला, की ती चवचाल, चरित्रहीन अशी भली मोठी विशेषणे तिच्या मागे सहज लावली जातात. नैतिकतेची फुटपट्टी जो तो हातात घेऊन उभा आहे तो जणू स्त्रियांच्या ‘चाली’वर लक्ष ठेवण्यासाठीच. मध्यंतरी शर्मिष्ठा भोसले या मैत्रिणीने तिच्या फेसबुकवर ‘समंजस पुरूष सर्वाधिक सेक्सी वाटतो,’ असे मत नोंदवले होते. यावरून ती आता फारच ‘बदलली’ आहे आणि ‘पूर्वीसारखी राहिलेली नाही,’ अशा आशयाच्या काही कमेंट आल्या. आजच्या काळातही स्त्रियांनी पुरुषांबाबत केवळ मत जाहीर केले, तरी किती गहजब होतो, हे याचे ताजे उदाहरण. अशा साध्या वक्तव्यांचा पितृसत्तेच्या मानसिकतेत वाढलेल्या स्त्री-पुरुषांना किती त्रास होतो, हे या एका साध्या उदाहरणावरून स्पष्ट होते.
बायका-मुली आपापसांत त्यांच्या शरीर, लैंगिक आयुष्याविषयी बोलू शकतात, त्यांना एकाचवेळी एकाहून अधिक पुरूष आवडू शकतात, एकाहून अधिक पुरुषांचे आकर्षणही वाटू शकते या मानवी प्रवृत्तीच्या गोष्टी आहेत. मात्र, बायका असे अजिबात करत नसणार, त्यांनी ते करू नये किंवा त्यांना तसे वाटणे हेच मुळी पाप आहे, अशी धारणाच खोल रुजली आहे. सेक्स ही प्रत्येक व्यक्तीची खासगी आणि तरीही अत्यंत गरजेची गोष्ट आहे, ही बाब आत्ता कुठे ध्यानात घेतली जात आहे. त्यातही पुरेसा मोकळेपणा नाही. या मूलभूत गोष्टींवर आत्ता कुठे आपण बोलू लागलो आहोत. अजून खुल्या चर्चा सुरू झालेल्या नाहीत; पण किमानपक्षी बाई आणि सेक्स या विषयावरचे मौन सुटू लागले आहे. मुख्यत्वेकरून माध्यमांच्या फळ्यावर. एका महत्त्वाच्या; मात्र आपणच गुंतागुंतीच्या करून ठेवलेल्या विषयावर फार मोठ्या प्रमाणात पोहोचण्याची ताकद सिनेमा-मालिका या माध्यमांमध्ये आहे. गंमत म्हणजे, प्रेम हा बहुतांश सिनेमांचा मध्यवर्ती भाग असतानाही शरीर आणि शरीराची गरज, त्यातले अनेकानेक पदर, गुंता हे नीटपणे अजूनही मांडले जात नाही. एकतर ते मुळातच ‘बीभत्स’ या पद्धतीत बसावे अशीच मांडणी केली जाते किंवा अती स्वप्नील जगात बाईला तिच्या शरीरावर अधिकार आहे, अशी रचना केली जाते; पण ही गरज आता केवळ मोठ्या पडद्याच्या काल्पनिक जगापुरती मर्यादित न राहता, आपल्या प्रत्येकाच्या घरातील आहे हे सांगण्याचे प्रयत्न होत आहेत, त्याची चर्चाही होत आहे.
सध्या एका वेबचॅनेलवरील चर्चेत आलेल्या ‘लस्ट स्टोरीज्’ या सिनेमातून स्त्रियांच्या कामभावनेविषयी मांडणी… अंहं, हे विधानच चुकीचे ठरेल. स्त्री-पुरुषांच्या कामभावनेविषयी मांडणी केली आहे. येथे फक्त आपल्या कामभावना आणि ती शमवण्याचा मार्ग स्त्री स्वत: शोधते आहे इतकेच आणि म्हणूनच अशा गोष्टींची चर्चा होते, कारण हे अजूनही आपल्याकडे सर्रासपणे घडत नाही. तिला तिच्या शरीराबाबत स्वत:चे निर्णय घेण्याची मुभा नाही. त्याकडे पाहण्याची नजर आपल्याकडे नाही.
म्हणून मग ‘लस्ट स्टोरीज्’ असो किंवा ‘वीरे दे वेडिंग’ या सिनेमातील स्वरा भास्करवर चित्रित हस्तमैथुनाचे दृश्य असो, यातून समोर येते. आणखी काही उदाहरणे द्यायची, तर गेल्या दोन वर्षांत प्रदर्शित झालेले ‘पार्च्ड’, ‘लिपस्टिक अंडर माय बुरखा’ हे सिनेमे. काही वर्षांपूर्वी आलेल्या ‘देव डी’ या सिनेमात पारोला तिच्या बालमित्राबरोबर (देव) शय्यासुख अनुभवायचे असते, त्याबाबत तिचा निर्धार फारच पक्का असतो. त्यासाठी ती स्वत: चटई घेऊन जाते. देवची वाट पाहत त्यावर पडून राहते. सेक्समधील तिचा आत्मविश्वास आणि त्यातील तिच्या वर्चस्वाने देवच्या अहंकाराला ठेच बसते. तिने हे सारे पूर्वी अनुभवले आहे असा अपमान करत तो तिथून निघून जातो. ही मानसिकता जिकडे-तिकडे रुजली आहे आणि ते प्रत्यक्ष मांडण्याचे प्रयत्न म्हणूनच महत्त्वाचे आहेत. ‘डर्टी पिक्चर्स’मध्ये तर सिल्क तिच्या ‘बाईपणाला’च साजरे करते. सेन्शुअॅलिटीवर उघड बोलते. बेधडक राहते. वर्षानुवर्षे चालत आलेल्या सिनेमांमधून अभिनेत्रीची सोज्वळ भूमिका हा साचा मोडण्याचा आणि नवा साचा मांडण्याचे प्रयत्न अशा सिनेमांमधून होत आहेत. आणखी एका वेबचॅनेलवर स्वरा भास्करचा ‘इट्स नॉट सिंपल’यातही नायिका, नवरा आणि तिचे दोन मित्र यामधला बाई, बाईपण आणि माणूसपण म्हणून असणारा तिचा संघर्ष मांडला आहे.
स्त्रियांच्या मुक्ततेबाबत बोलायचे म्हणजे, तिने सेक्सवर बोलावे वा आपले पार्टनर सतत बदलत राहावे असा अर्थ मुळीच नाही. तिच्या मुक्ततेच्या वाटेतील तो एक मोठा खडक आहे हे मात्र निश्चित. तिच्या पारतंत्र्याचे, अन्यायाचे मूळ बाईपणात आणि मग तिच्या योनीत दडवल्याने यावर उघड चर्चा ही आपल्या सर्वांची गरज आहे, ती माणूस म्हणून उन्नत होण्यासाठी. आजही कित्येक बायकांनाच हे पटायला अवघड असते, की लग्न झालेल्या एखाद्या स्त्रीला अन्य एखादा पुरूष आवडू शकतो. मैत्री करावीशी वाटू शकते. मित्रांसोबत आउटिंग किंवा सिनेमा पाहायला जावेसे वाटू शकते. प्रत्येकवेळी पुरुषाबरोबर बेड ‘शेअर’ करण्याचीच गरज नसते. जिची ती गरज असते आणि ती तसे पाऊल उचलते तेव्हाही आपण ‘काळे किंवा पांढरे’ अशी सरळसरळ विभागणी करायला जाऊच नये; कारण मधल्या अनेक ‘ग्रे शेड’ही तितक्याच महत्त्वाच्या असतात. ज्याकडे आपण सोयीस्कर दुर्लक्ष करतो.
बायकांचीच ही अवस्था आहे तिथे तर पुरुषांच्या भावनांचा चांगलाच मुरांबा झाला आहे. सेक्समधील आपल्या वर्चस्वाला तडा जाणे हे पुरुषांना दुखावणारे आणि त्यांच्या अहंकाराला  डिवचणारे आहे. त्यामुळेच सिनेमांमधून त्यांच्या अहंकारावर फुली मारण्याचा ट्रेंड येतोय. ‘शुभमंगल सावधान’ हा भूमी पेडणेकर आणि आयुषमान खुराणा यांचा सिनेमा चांगला धक्का देतो. नायकाची सेक्समधील ‘कमजोरी’ आपल्या बायकोच्या शरीराची गरज मिटवणार नाही आणि तेव्हा आपण लग्न मोडावे का असा विचार येणे हे किती महत्त्वाचे आहे. बदलणारी तरुण मानसिकता आणि पितृसत्ताकेतून बाहेर पडण्याची ही धडपड एकाचवेळी समूहाच्या गळी उतरवण्याची मोठी ताकद दृश्यमाध्यमात आहे.
अन्न, पाणी, वस्त्र, निवारा या मूलभूत गरजांमध्ये सेक्सचेही नाव धाडसाने समाविष्ट केले जाते. खरे तर ती गरज खूप आधीपासून आहे; पण मूलभूत यादीमध्ये त्याचा समावेश करण्याचे धाडस होतेय ही नवी गोष्ट. सेक्स ही कामक्रीडेची बाब असून, त्याचा भावनांशी काहीएक संबंध नाही अशीही मानसिकता तयार होत आहे. वाढते वय, कामाचा ताण, स्पर्धा, एकटेपणा या सगळ्याच्या रहाटगाड्यात शारीरअनुभवांना का मुकावे, असा विचार करणारी पिढी जन्माला येतेय. केवळ अनुभव, मजा, थ्रील म्हणून नव्हे, तर शरीराची उपेक्षा होऊ नये असा भाव त्यात दडलेला असतो. जशा इतर गरजा, तशीच हीसुद्धा महत्त्वाची गरज, असा साधा भाव या विचारसरणीमध्ये दिसून येतो.
एकंदरीतच, शरीराकडे, त्याच्या मागणीकडे सजगपणे पाहण्याचे आणि ते दाखवण्याचा ट्रेंड दिसतोय. हा ट्रेंड मुख्य प्रवाहातील सिनेमा-मालिकांमध्ये अजून दिसत नसला, तरीही वेबसीरिजमधून असे विषय मुक्तपणे हाताळले जात आहेत. सेन्सॉरच्या कात्र्यांचा विचार बाजूला सारून सिनेमा बनवणाऱ्यांसाठी हे खूप मोठे व्यासपीठ आहे. याला सेन्सॉरशिप नाही, पाहणारा वैयक्तिकरीत्या सिनेमा, मालिका पाहणार असतो, त्यामुळेच सेक्ससारखा विषय गांभीर्याने मांडण्याचा प्रयत्न वाखाणण्यासारखा आहे. हे सिनेमे कसे आहेत, त्यांची मांडणी कशी आहे, प्रेक्षक त्याचा स्वीकार-अस्वीकार करतील ही खूप सापेक्ष गोष्ट. मात्र, स्त्री ही माणूस आहे आणि म्हणून तिच्या भावभावना, गरजा या पुरुषांपेक्षा भिन्न नसतात हे अधोरेखित करण्याचे प्रयत्न दृश्य माध्यमात मोठ्या प्रमाणावर होत आहेत, हेही नसे थोडके.

सौजन्य -महाराष्ट्र टाइम्स

…………………………………………………………………….

हिनाकौसर खान-पिंजार

Leave a Comment