चिरतरुण जत्रेचा देव

  – सुभाषचंद्र सोनार

             जत्रा कधीपासून भरतात ठाऊक नाही. पण ती एक प्राचीन परंपरा असावी याविषयी दुमत नसावे. भारतीय श्रमण संस्कृतीचा जत्रा हा सुंदर आविष्कार होय!

             आपल्या देशात श्रमण संस्कृती आणि ब्राह्मण संस्कृती प्राचीन काळापासून नांदत आल्यात. श्रम हेच सत्य मानणा-या श्रमण संस्कृतीचे ‘श्रममेव जयते!’ हे ब्रीद. तर ‘ब्रह्म सत्य जगन्मिथ्या’ हा श्रमाला मोठ्या खुबीने नकार देण्या-या ब्राह्मणी संस्कृतीचा उद़्घोष होय! श्रमाची कास धरणारी सृजनशील अब्राह्मणी संस्कृती, तर श्रमापासून सुटका करुन घेणारी असृजनशील ब्राह्मणी संस्कृती.

             भूक ही नित्य आहे. ती अन्नानेच भागते. आणि अन्नादी सर्व सृजन श्रमानेच घडते. परिणामी श्रम हेच ब्रह्म. ही श्रमण संस्कृतीची ब्रह्मव्याख्या. जर भूक आणि नाना गरजा नित्य आहेत तर श्रमही नित्य केलेच पाहिजे, त्याला पर्याय नाही. हे श्रमण संस्कृतीचे मूलतंत्र! याउलट तंत्राने नव्हे, तर सर्वकाही मंत्राने घडते हा ब्राह्मणी संस्कृतीचा अट्टहास. असा हा तंत्र आणि मंत्राचा संघर्ष आजतागायत सुरु आहे.

             नित्य श्रम करणा-याला आराम व विरंगुळाही हवा असतो. उत्सवातून शरीराला आराम आणि मनाला विरंगुळा मिळत असतो. ब्राह्मणी संस्कृतीने वर्षभर अनेक सणवार उत्सवांची रेलचेल केलेली असली तरी, ही गोष्ट श्रमण संस्कृतीला परवडणारी नाही. म्हणून वर्षातून एकदा जत्रेचं आयोजन त्यांनी केले. ते करतानाही त्यांनी ते पंचांगानुसार नव्हे, तर उन्हाळ्यात शेतीचा हंगाम नसलेल्या काळात अत्यंत विचारपूर्वक केलेले आपण पाहतो. विरंगुळ्याच्या क्षणांचा विचार करतानाही त्यांनी श्रमालाच प्राधान्य दिले आहे.

             शेती जत्रेवर अवलंबून नसते, तर जत्रा शेतीवर अवलंबून असते. एका जत्रेने देव म्हातारा होत नसतो. पण एक हंगाम वाया गेल्याने जवान शेतकरीही म्हातारा होत असतो. हे त्या बळीराजालाच कळते.

             निदा फाजलींचा सुंदर शेर आहे…

             सातों दिन भगवान के क्या मंगल क्या पीर,
             जिस दिन सोये देर तक भूका रहे फकीर !

             केवळ स्वतःच्या पोटाची चिंता असलेल्या फकीरालाही साप्ताहिक सुटी परवडणारी नसते. तर जगाच्या पोटाची चिंता वाहणा-या शेतक-याला ती कशी परवडेल! एक हंगाम चुकला तरी जगाला उपाशी रहावे लागेल. म्हणून श्रमण संस्कृतीने श्रमातच देव पाहिला. कर्मण्येवाधिकारस्तेचा उपदेश गीतेला त्यावरुनच व त्यानंतर सुचला. आणि ज्याला सुचला तो कृष्णही ‘गोपाळ’ होता.

             श्रीकृष्णाचा यादव हा अराजक संघगण श्रमसंस्कृतीचा पुरस्कर्ता होता. त्यामुळे यादवांच्या या अराजक संघगणात क्षत्रिय व दासकम्मकर हे दोनच वर्ण होते. ब्राह्मण हा वर्णच नव्हता. म्हणून गोपाळकृष्ण हे श्रमण संस्कृतीचे दैवत, तर ‘गोपीकृष्ण’ हे श्रमणांच्या जीवावर ऐश करणा-या ब्राह्मणी संस्कृतीचे आराध्य!

             निसर्गचक्राप्रमाणे आपल्या कामाचं नियोजन करणारी श्रमण संस्कृती आणि पंचागाप्रमाणे सणवार, उत्सवांचं आयोजन करणारी ब्राह्मणी संस्कृती. ऋण काढून सण साजरे करायला सांगणा-या ब्राह्मणी संस्कृतीचे सणवार श्रमणांना न परवडणारे. म्हणून तर वर्षातून एकदा गावजत्रेचं आयोजन केले जाते.

             जत्रेच्या निमित्ताने शहरात नोकरी, कामधंद्याच्या निमित्ताने स्थायिक झालेली गावातली माणसं आपल्या मुलाबाळांसह ग्रामदैवताच्या दर्शनाला येतात. त्यामुळे गाठीभेटी होतात. कुटुंबाची नाळ आणि गावाशी नातं कायम राहतं. तथापि एखाद्या वर्षी अडचणीमुळे जत्रेला नाही जाता आलं, तरी त्याचा बाऊ न करता, ‘एका जत्रेने देव काही म्हातारा होत नाही.’ अशी मनाची समजूत घालून कामाला लागायचं.

             असा हा जत्रेतला चिरतरुण देव. न रुसणारा, न कोपणारा. भाजीभाकरीच्या नैवद्याने व एका नारळाने संतुष्ट होणारा, भक्ताशी थेट नाळ असणारा, पुजा-याविना पावणारा, भेदाभेदापलिकडचा, ‘शो मस्ट गो अॉन’चा संदेश देणारा. हेच त्याच्या चिरतारुण्याचं रहस्य आहे.

               – सुभाषचंद्र सोनार
                  राजगुरुनगर.

Leave a Comment