जाणतो मराठी, मानतो मराठी

प्रा.हरी नरके

(सौजन्य – दैनिक पुढारी, कोल्हापूर, रविवार, बहार, पुरवणी)

सर्व शासन व्यवहारात मराठी भाषेच्या सक्तीच्या वापरासंबंधी सरकारने परवा परिपत्रक काढल्याच्या बातम्या सर्वत्र झळकलेल्या आहेत.
काही वर्तमानपत्रांनी तो आदेश असल्याचं तर काहींनी ते परिपत्रक असल्याचा उल्लेख केलेला आहे.काहींनी ती ताकीद आहे असं छापलंय तर काहींनी तो शासन निर्णय असल्याचं नमूद केलंय.

आपण दक्षिण भारतात गेलो की तिथली सगळी माणसं त्यांच्या मातृभाषेबद्दल आग्रही असलेली दिसतात. तमीळ, तेलुगु, कन्नड, मल्याळम हे सगळेच लोक आपापल्या मातृभाषेचा अभिमान बाळगतात. या बहुतेक सर्व राज्यांनी शिक्षण, साहित्य, संस्कृती, कला आदी क्षेत्रात फार मोठी भरारी घेतलेली आहे.

मानव विकास निर्देशांकात ही राज्यं पुढं आहेत. हे सारे आपले शेजारी असूनही आपण त्यांच्याकडून मातृभाषाप्रेम मात्र शिकायला तयार नाही. तिथल्या सरकारांनी स्थानिक भाषेच्या सक्तीबाबत अतिशय कडक पावलं उचललेली आहेत. इंग्रजी आणि हिंदीच्या आक्रमणाचा प्रश्न त्यांनाही भेडसावतो आहे. पण त्यांनी त्यावर कशी मात केलीय हे आपण त्यांच्याकडून समजून घ्यायला हवं. तिथं भाषिक मतबॅंक [व्होटबॅंक] असल्यानं राज्यकर्त्यांना ठाम आणि कडक भुमिका घ्यावीच लागते.

आपल्याकडे मुदलात मराठी माणूसच जिथं मराठीबाबत उदासिन आहे तिथं नेत्यांना तरी काय पडलंय? सरकार काही का म्हणेना! आम्ही ऐकणार थोडेच आहोत? ते त्यांना सोयीचे आवाज काढतात, आम्ही सोयीस्कर आणि रितसर दुर्लक्ष करतो! जनता उदासिन म्हणून सरकार आणि सर्वपक्षीय नेते अतिउदासिन. मराठीचं हे दुर्दैव कधीच संपणार नाही का?

आज दररोज तीन मराठी शाळा बंद पडत आहेत. ग्रामीण भागातसुद्ध आता इंग्रजी शाळांचं पेव फु्टू लागलं आहे. मुलं मराठी शिकली नाहीत तर मराठी वाचू शकणार नाहीत. वाचकच नसला तर मराठी वर्तमानपत्रं, साहित्याची पुस्तकं यांचं काय होईल? आज मराठी अत्यवस्थ असताना आपण स्वस्थ बसलेलंच बरं. मरू द्या मेली तर. आपल्याला काय करायचंय?
एखादी भाषा मरते तेव्हा एक संस्कृती संपते. तिच्या निर्मिती आणि संवर्धनासाठी शेकडो वर्षे लाखो लोक राबलेले असतात.

मराठी शाळांचा दर्जा चांगला नसतो अशी टिका केली जाते. मराठी शाळांचा दर्जा वाढवायला हवा याबाबत दुमत नाही. परंतु काही मोजक्या ईंग्रजी शाळा सोडल्या तर उरलेल्या शाळांना दर्जा सुमार असतो. पण संस्कृतीकरणाचा सिद्धांत सांगतो, सामान्य लोक अभिजनांचं, महाजनांचं अनुकरण करीत असतात. महाराष्ट्रात ज्या दिवशी बुद्धीजिवी मध्यम आणि उच्च मध्यम वर्गानं मराठीचं बोट सोडलं, त्यादिवसापासून मराठीचा वनवास सुरू झाला. त्यांना मराठीची गरज वाटत नाही.

सावरकरांची क्षमा मागून सांगायचं झालं तर, ते जणू म्हणताहेत, “सागरा प्राण तळमळला, ने मजशी ने इंग्रजी शाळेला.”

आज सर्वपक्षीय नेत्यांची, प्रसिद्धीच्या झोतात असलेल्या वलयांकित महनीयांची म्हणजेच मराठीत ज्यांना आपण सेलीब्रिटी म्हणतो त्या सेलीब्रिटींची, मराठी लेखकांची, माध्यमकर्मींची मुलं, नातवंडं इंग्रजी माध्यमात शिकत आहेत.

दुसरीकडे आज परमादरणीय असलेले, ज्यांनी ज्ञाननिर्मिती केली, त्याच्या जोरावर देश बदलला असे बहुतेक सर्वजण मातृभाषेतून शिकलेले आहेत.

परम महा संगणक बनवणारे विजय भटकर, मोबाईलची क्रांती घडवून आणणारे सत्यनारायण गंगाराम पित्रोदा, महान शास्त्रज्ञ जयंत नारळीकर, रघुनाथ माशेलकर, वसंत गोवारीकर, माधव गाडगीळ, ज्ञानपीठ विजेते खांडेकर, कुसुमाग्रज, विंदा, नेमाडे, राष्ट्रीय पुरस्कार विजेते शिवाजी सावंत, तेंडूलकर, सुर्वे, एलकुंचवार, यशस्वी सनदी अधिकारी शरद जोशी, माधव गोडबोले, माधव चितळे, स.गो.बर्वे, राम प्रधान, ज्ञानेश्वर मुळे ते भूषण गगरानी हे सारेच मातृभाषेतून शिकलेले आहेत.

माणसाचं जीवसृष्ठीतील आगळंवेगळं वैशिष्ट्य म्हणजे माणूस हा विचार करणारा प्राणी आहे.

त्यानं साहित्य, संस्कृती, कला, तत्वज्ञान यांची निर्मिती केली. माणसं संस्कृतीची जनुकं एका पिढीकडून दुसर्‍या पिढीकडं पोचवत असतात.
माणूस मातृभाषेतून विचार करतो. मातृभाषा ही एकप्रकारे माणसाच्या अस्तित्वाला विचारांचा प्राणवायू पुरवत असते. ते त्याचे ओळखपत्र असते. मातृभाषा ही माणसाची अस्मिता आणि अस्तित्वखूण असते.

शहरी, महानगरी मराठी माणूस बहुभाषिक आहे. रोजगार, उद्योग, व्यापार, आर्थिक प्रगतीसाठी त्यानं बहुभाषिकतेची कास धरलेली आहे. पोटासाठी त्यानं इतर भाषा शिकायला कोणाचाच विरोध नाही. परंतु मराठी ही हलकी भाषा आहे, डाऊन मार्केट आहे म्हणुन त्याला तिची लाज वाटत असेल तर मात्र ती शरमेची बाब आहे. इंग्रजीतून, हिंदीतून बोलण्याला आज सार्वजनिक जीवनात विशेष प्रतिष्ठा आहे.

समोरच्या माणसाला मराठी येत नसेल तर त्याच्याशी त्याला समजेल अशा भाषेत बोलयला काहीच हरकत नाही. पण मराठी माणूस बोलायला सुरूवातच मुळात हिंदी किंवा इंग्रजीतून करतो. त्यामुळे अनेकदा बराच वेळ बोलल्यानंतर लक्षात येते की दोघेही मराठीच असूनही ते उगीचच हिंदी किंवा इंग्रजीतून बोलत होते.
मराठी माणसाला मराठीची लाज का वाटते?

1907 साली ग्रियरसनने भारतीय भाषांचे सखोल सर्व्हेक्षण केले. तो म्हणतो की जी भाषा रोजगार देते तीच जगते. जी भाषा रोजगारक्षम नसते ती मरते. नष्ट होते. इंग्रजी आणि हिंदीच्या तुलनेत मराठीची रोजगार देण्याची क्षमता कमी आहे असं मराठी माणसाला मनोमन वाटतं, त्यामुळं तो आपल्या मुलाला मराठी माध्यमात घालायला तयार नसतो.

मराठी मरणार अशी काळजी राजवाड्यांनी शतकापुर्वीच व्यक्त केली होती.

पण बोलीभाषांची विविधता हे मराठीचं खरं वैभव असून, त्याचा आपण अभिमान बाळगला पाहिजे. मराठीला ५२ बोलीभाषा आहेत. जिला जास्त ओढे ती नदी मोठी, याच न्यायाने मराठीला रसद पुरवणार्‍या या सर्व बोली महत्वाच्या आहेत.

या सर्वच बोलीभाषांतील साहित्य खूप सकस आहे. बहिणाबाई, उद्धव शेळके, भुजंग मेश्राम, सदानंद देशमुख, रंगनाथ पठारे, व्यंकटेश माडगूळकर, लक्ष्मण गायकवाड, लक्ष्मण माने, राम नगरकर, आनंद विंगकर, राजन गवस, मच्चिंद्र कांबळी, प्र. ई. सोनकांबळे, बा. भ. बोरकर, नामदेव ढसाळ आदींमुळेच मराठी समृद्ध झालेली आहे. दलित साहित्यानं मराठीला सामाजिक दस्तऎवज देऊन तिला खुप श्रीमंत केलेलं आहे.

“एक होता कावळा नी एक होती चिमणी…” ही प्रत्येक मराठी घरात आजही सांगितली जाणारी गोष्ट आहे. ती पहिल्यांदा ग्रंथात लिहिली गेली ८०० वर्षांपुर्वी. लिळाचरित्रात धानाई नावाच्या हट्टी मुलीला श्री चक्रधरांनी ती सांगितली असली तरी ती त्याआधी हजारबाराशे वर्षे मराठी लोकजीवनात सांगितली जात होती. ती विलक्षण लोकप्रिय होती.

तमिळ भाषेला अभिजात दर्जा मिळण्यात “संगम साहित्याचा” मोठा वाटा आहे. हे साहित्य २३०० वर्षे जुने आहे. कावेरी नदीवर धरण बांधले जात असल्याचा प्रसंग त्यात आला आहे. या धरणाच्या कामासाठी जगभरातून तज्ञ मागवण्यात आलेले होते. महाराष्ट्रातील मराठी गवंडी मोठे कुशल असल्याचे वर्णन त्यात आले आहे.

इसवी सनाच्या २ र्‍या शतकात वररूचीने “प्राकृतप्रकाश ” हा व्याकरण ग्रंथ लिहिला. त्यात त्याने शौरसेनी, मागधी, पैशाची व महाराष्ट्री या प्राकृत भाषांचे व्याकरण सिद्ध केले. आधीचे सगळे नियम सांगून झाल्यानंतर शेवटचा नियम सांगताना तो म्हणतो, ” शेषं महाराष्ट्रीवत.” यावरून देशाच्या वेगवेगळ्या भागात प्रचलित असलेल्या सगळ्या भाषांना मराठीचे नियम लागू पडत होते. यातून मराठीची प्रतिष्ठा, मान्यता आणि श्रेष्ठता स्पष्ट होते.

संस्कृत महाकवी कालिदास आणि शूद्रक यांच्या “शाकुंतल” आणि “मृच्छकटिक” या नाटकांमध्ये अनेक संवाद मराठीत आहेत. महाभारत या जगप्रसिद्ध महाकाव्यात अनेक मराठी शब्द आलेले आहेत. यज्ञाच्या वेळी पंडीतांना मराठीत बोलायला बंदी घालण्यात आल्याची नोंद भागवत यांनी दाखवून दिलेली आहे. संस्कृत ही धर्मभाषा असली तरी हे पंडीत खाजगीत मराठीत बोलत असत हे यातून उघड होते.

संत एकनाथांनी “संस्कृत वाणी देवे केली मग प्राकृत काय चोरापासोनी झाली?” असे संतप्त उद्गार काढले होते. “विंचू चावला…” ही एकनाथांची भारूडांची मराठी आजची अस्सल मराठी असूनही ते तिला प्राकृत म्हणतात कारण महाराष्ट्री प्राकृत हीच मराठी आहे. रघुनाथराव गोडबोले यांनी १८६३ साली प्रकाशित केलेल्या मराठी शब्दकोशाला “महाराष्ट्रीय भाषेचा” कोश म्हटले आहे, ते यामुळेच.

संत ज्ञानेश्वर मराठीची गोडी अमृताहूनही जास्त असल्याचे प्रतिपादन कोणाला उद्देशून करीत होते? याचा अर्थ तेव्हाही मराठी माणसाला मराठीचा न्यूनगंड होताच.

जुन्या काळात धर्मग्रंथांची भाषा होती संस्कृत. पण तिचा जन्म झाला वैदीक भाषेपासून आणि वैदीकची आई होती वैदीकपुर्व बोली भाषा. हार्वर्ड विद्यापिठाचे डॉ. मायकेल विट्झेल यांनी आपल्या “ट्रेसिंग दि वैदीक डायलेक्ट्स” या ग्रंथात हे दाखवून दिले आहे. तेव्हा संस्कृत ही सर्व भाषांची मूळ भाषा होती ही माहिती खरी नाही. पाणिनीने जेव्हा या भाषेचे व्याकरण लिहिले तेव्हा तो तिला “छंद” भाषा म्हणतो.

महाराष्ट्री प्राकृत किंवा महारठ्ठी या नावाने दोन-अडीच हजार वर्षांपुर्वी प्रचलित, लोकप्रिय व मान्यताप्राप्त असलेली भाषा ही संस्कृतपेक्षाही जुनी असल्याचे म.म. राजारामशास्त्री भागवत, विदुषी दुर्गा भागवत यांचे आजोबा, यांनी १८८५ सालीच दाखवून दिले होते. त्यांचा “मराठ्यासंबंधी चार उद्गार” हा ग्रंथ जिज्ञासूंनी अवश्य वाचावा. त्यांचा “मराठीची विचिकित्सा” हाही ग्रंथ महत्वाचा आहे. १९२७ साली ज्ञानकोशकार डॉ. श्रीधर व्यंकटेश केतकर यांनी प्राचीन महाराष्ट्राचा इतिहास दोन खंडात लिहिला. त्यात त्यांनी मराठीचे वय किमान अडीच हजार वर्षे असल्याचे पुराव्यानिशी दाखवून दिले आहे.

मुल लहान असताना, रांगत असताना पीएच.डी. करू शकेल का? नाही.
मग कोणतीही भाषा बालवयातच “ज्ञानेश्वरी, लिळाचरित्र आणि विवेकसिंधू” यांसारखे जागतिक दर्जाचे श्रेष्ठ ग्रंथ कसे प्रसवू शकेल? आठशे वर्षांपुर्वी मराठीत हे ग्रंथ लिहिले गेले तेव्हा मराठी बालभाषा नव्हती, तर ती एक परिपक्व झालेली समृद्ध भाषा होती.
ज्ञाननिर्मिती, साहित्य, विचार, तत्वज्ञान आणि संस्कृतीची त्याआधीची फार मोठी परंपरा मराठीला होती.

मग मराठीतला आद्यग्रंथ कोणता? आणि मराठीचं नेमकं वय किती?
मराठीतला आज उपलब्ध असलेला पहिला ग्रंथ आहे, ” गाहा सत्तसई ” { गाथा सप्तसती} गाथा म्हणजे कविता. सातशे लोककवितांचा संग्रह म्हणजे हा ग्रंथ होय. पैठणच्या हाल या सातवाहन राजाने सुमारे दोन हजार वर्षांपुर्वी पन्नास कवींच्या या कविता संकलित केल्या.

सातवाहनांची राजभाषा मराठी असल्याने त्यांचे जिथे जिथे राज्य होते, तिथे तिथे या ग्रंथाची हस्तलिखिते मिळालेली आहेत. सातवाहनांचे संपुर्ण भारतावर तर राज्य होतेच परंतु पार अफगाणिस्तानपर्यंत राजभाषा मराठीची पताका फडकत होती.

तिला अभिजात दर्जा अधिकृतपणे मिळणे म्हणजे मराठीच्या जागतिक प्रतिष्ठेवर शिक्कामोर्तब होणे. त्यामुळे मराठी माणसाचा न्यूनगंड कमी होईल. मराठी शिकवण्याची सोय देशातील 450 विद्यापीठांमध्ये होईल. मराठीच्या समग्र विकासासाठी केंद्र सरकारकडून दरवर्षी 500 कोटी रुपये मिळतील. मराठी शाळा, शिक्षण, शिक्षक यांची दर्जावाढ, वाचन संस्कृती वाढणे, ग्रंथालये संवर्धित केली जाणे, मराठी पुस्तके स्वस्तात मिळणे, मराठी मुलामुलींना अधिकाधिक रोजगार मिळणे यासाठी या दर्जामुळे खुप मदत होईल.

मराठीचे गोमटे व्हायला अभिजात दर्जा गती देईल.

गाथा सप्तसती, पादलिप्त, हरिभद्राची समरादित्याची कथा, उद्योतन सुरीची कुवलयमाला, चक्रधरांचे लीळाचरित्र, ज्ञानेश्वरी, तुकारामगाथा, एकनाथांची भारूडे, माझा प्रवास, गावगाडा, धग, कोसला, बनगरवाडी, बॅरिस्टर अनिरूद्ध धोपेश्वरकर, गोलपिठा, शांतता कोर्ट चालू आहे, हे ग्रंथ इतके चिरेबंदी आहेत की मराठीची श्रेष्ठता स्वयंस्पष्ट आहे. फुले-आंबेडकर, टिळक – आगरकर, राजवाडे-केतकर, राजारामशास्त्री भागवत, प्रबोधनकार ठाकरे यांचे वैचारिक लेखन श्रेष्ठ प्रतीचे आहे.

राजारामशास्त्री भागवतांच्या संशोधनाचा निष्कर्ष सांगताना दुर्गा भागवतांनी म्हटले आहे, की जुनी माहाराष्ट्री संस्कृतपेक्षा जुनी व खरी जिवंत भाषा आहे हे त्यांनी दाखवले आहे. मराठी संस्कृतोद्भव नाही. ती संस्कृतपेक्षा जुनी भाषा आहे. नात्याने ती संस्कृतची मावशी आहे.

गाथा सप्तसतीतील मराठी, जे महाराष्ट्री प्राकृत या नावाने ओळखले गेले, हरिभद्र, भद्रबाहू, उद्योतन सुरी आदींचे लेखन आणि चक्रधर, ज्ञानेश्वर, चोखा, चोंभा, सावतामहाराज, नामदेव, संत बहिणाबाई, एकनाथ, बखरी, ते फुले-आंबेडकर, अण्णाभाऊ, लोकहितवादी, आगरकर, रानडे, टिळक, विष्णुभट गोडशे, लक्ष्मीबाई टिळक, साने गुरूजी, बेडेकर, भाऊ पाध्ये, नेमाडॆ, ढसाळ, कोलटकर, चित्रे, यांच्या साहित्याची महत्ता आणि त्यांचे “जैविक नाते” महत्वाचे आहे.

अभिजात मराठी भाषा म्हणजे श्रेष्ठ मराठी भाषा. “इथे कुलेजातीवर्ण हे अवघेचि गा अकारण!”

अनेक जाती धर्माचे लोक मराठी बोलतात. अनेक पंथ, धर्म, प्रांत, संस्कृती यांना मराठीने पोटात सामावून घेतलेले आहे. त्यामुळे खांद्यावर मायमराठीची पताका घेतलेल्या साडेबारा कोटींची ती “भाषांमाजी भाषा साजिरी आहे.” संत एकनाथ म्हणतात, ती चोरांपासून जन्मलेली नाही. ती कष्टकर्‍यांची-ज्ञानवंतांची भाषा आहे. ही श्रमाची-घामाची, निर्मितीची भाषा आहे. मराठी ज्ञानभाषा आहे. धर्मभाषा आहे. अक्षरभाषा आहे. अजरामर भाषा आहे. जगातील सर्व भाषा मेल्या आणि अवघ्या चार जगल्या तरी मराठी जगणार आहे हे लक्षात ठेवा.

अमृतातेही पैजा जिंकणारी, स्वत:चे राज्य आणि श्रेष्ठ साहित्य असलेली मराठी ही जगातली चौथ्या क्रमांकाची राज्य भाषा आहे. मराठीतले कोश वांड्मय तर जगातले दुसर्‍या क्रमांकाचे कोश वांड्मय आहे.

नव्या शासन परिपत्रकात खरं काय आहे ?

आदेश म्हणजे order, परिपत्रक म्हणजे circular, ताकीद म्हणजे warning, शासन निर्णय म्हणजे Government Resolution. या प्रत्येक शब्दाचे अर्थ वेगळे आहेत; अर्थ वेगळे असल्यानं त्याच्या अंमलबजावणीच्या ‘त-हा’ही वेगळ्याच असणार हे ओघानं आलंच.
एकूण काय तर बातमी देणाऱ्या पत्रकारांना शासन व्यवहारात मराठी वापराच्या संदर्भात नेमकं काय झालंय याची खातरजमा करून घेण्याची गरज वाटलेली नाही.

मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याची आपली मागणी दहा वर्षे जुनी असताना हा आदेश आल्यानं एकुण उत्साहाचं वातावरण आहे.
हा संभ्रम दूर व्हावा म्हणून खातरजमा केली असता उत्तर मिळालं यात नविन काहीही नाही. जुन्याच परिपत्रकांची ती उजळणी आहे.
[This is compilation of all previous circulars.Nothing new.]

भटोबास हे तेराव्या शतकातले ख्यातनाम विद्वान, लेखक आणि धर्मचिंतक होते.
त्यांच्याशी बोलताना जर कोणी अन्य भाषेत बोलू लागला तर ते त्याला म्हणत, ” तुमचे अस्मात कस्मात मी नेणेगा. मज श्री चक्रधरे निरूपिली मर्‍हाठी. तियाचि पुसा.” मला तुमचे अस्मात कस्मात समजत नाही. माझ्याशी मराठीतच बोला.
आपण नेमके कोण आहोत? या भटोबासांचे वंशज की वैरी?

-प्रा.हरी नरके
[email protected]
[लेखक अभिजात मराठी भाषा समितीचे समन्वयक आहेत.]

Previous articleनेमका खिळा शोधला पाहिजे!
Next articleसोन्याची अंडी देणारा व्यवसाय
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.

Comments are closed.