दंगलीच्या हंगामात दिवस गेलेत मला…

सिस्टरीन बाई पोलिओ,गव्हार आणि धनुर्वातबरोबरच …
एक थेंब बुद्ध ,एक थेंब महावीर आणि जमलंच तर एक थेंब पैगंबरही द्या माझ्या पोराला.
कारण दंगलीच्या हंगामात दिवस गेलेत मला….
बाळंतपणाच्या आधीच मी माझ्या आईला बोलले ,पोराला पांढऱ्या रंगाच्या कापडात गुंडाळ,
बाकीच्या कुठल्याच रंगाचा आत्ता भरवसा नाय आपल्याला.
जातीच्या नावापेक्षा मातीशी नाळ जोडावी माझ्या पोराची,
म्हणून…नामदेवाच्या वटीतल तूप,तुकारामाच्या ऊसाचा रस,मौलवीच्या ईद ची खिरही पाजली बटाबटा…
तरीही वजन कमीच भरलं माझ्या पोराचं.बहुतेक वाजनाचं कारण भजनच असावं तुकोबाच.
संचारबंदी मुळं कीर्तन-भजनंच झाली नाहीत दंगलीच्या काळात.
चार ओव्या ,चार भारुड ऐकली असती ,तर मेंदवाच वजन वाढलं असतं थोडं.
पण काळजी करू नका सिस्टरीनबाई, फुल्यांच्या सावित्रीला सांगितलंय मी रोज तुझ्या हौदाच पाणी गरम करून चोळून जात जा माझ्या पोराला…
धर्माबिर्माचा विषाणू डसूच नये म्हणून हल्ली न चुकता सकाळचं पसायदान, दुपारचं दास कॅपिटल आणि लयच रडल पोरगं तर संविधानाच पान देते मी चघळायला.
जातीची गटार तुंबायला लागली की तापाची साथच येते आमच्या वस्तीत,तेव्हा कपाळावर पट्टीच ठेवते मी चवदार तळ्याच्या पाण्यात बुडवून…
सिस्टरीनबाई पोराच्या कपाळावर हात ठेवून सांगते,
गरोदरपणा परीस जातीच्या कळा लई वाईट बघा.
म्हणून निरोप द्या माझा ….जन्माचा दाखला लिवणाऱ्या साहिबला ,धर्म आणि जात यांचा रखाना रिकामाच सोड म्हणावं त्याला कारण,
दंगलीच्या हंगामात दिवस गेलेत मला…

कवी-उमेश बापूसाहेब सुतार (कोल्हापूर )
8888033421

Previous articleयोगी भांडवलदार (भाग ५)
Next articleयोगी भांडवलदार ( भाग ६)
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.