धर्माभिमान करितो धर्माचाची ऱ्हास

सौजन्य – दैनिक लोकसत्ता

(लेखक – मिलिंद मुरुगकर)

………………………………………………………………………………………………………………………………………………………………………………………………………………………………………………………………………………………………

हिंदू धर्म हा रूढार्थाने धर्म नाही. कारण तो कुराण किंवा बायबलसारखा एखाद्या धर्मग्रंथाने बांधलेला नाही

हिंदुत्वाच्या राजकारणामुळे हिंदू संस्कृतीचे वेगवेगळ्या पातळींवर नुकसान झाले आहे. पण याची फारशी खंत वाटू नये अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

यापुढील राज्याच्या आणि लोकसभेच्या निवडणुका विकासाच्या मुद्दय़ावर लढवल्या जातील की त्यात धार्मिक अस्मिता (हिंदुत्ववाद) हा मुख्य मुद्दा असेल? सुब्रमण्यम स्वामी म्हणतात ‘मी मोदींना हे पटवून दिले आहे की निवडणूक विकासाच्या मुद्दय़ावर जिंकता येत नसते. नरसिंहराव सरकारच्या काळात देशाचा आर्थिक वृद्धिदर हा ३ टक्क्यांवरून अभूतपूर्व अशा दहा टक्क्यांवर जाऊनसुद्धा नरसिंह राव सरकारचा पराभव झाला. त्यामुळे भावनात्मक मुद्दाच प्रमुख मुद्दा करावा लागेल. हिंदुत्वामुळे आम्ही १७ टक्के मतांवरून ३३ टक्के मतांवर गेलो. याच मुद्दय़ामुळे आमची टक्केवारी वाढवत नेऊ. ५० टक्के, ८० टक्क्यापर्यंतदेखील पोचवू.’ अशा धार्मिक अस्मितेच्या आधारावर मिळवलेली सत्ता हिंसेला जन्म देईल का या मुद्दय़ावर ते म्हणतात ‘भावनेचे हे राजकारण करताना परिस्थिती हाताबाहेर जाणार नाही याची मात्र खबरदारी घेतली गेली पाहिजे. १९२०-३० सालात जर्मनीत असे राजकारण हाताबाहेर गेले.’ (स्वामींचा निर्देश हिटलरकडे होता). स्वामींनी हे मोदींना खरेच पटवून दिले आहे का हा प्रश्न उपस्थित करता येऊ शकतो.

एखाद्या मुस्लीम बहुसंख्य असलेल्या देशातील, उदाहरणार्थ तुर्कस्तानातील सेक्युलर माणसाला धार्मिक अस्मितेचे तेथील राजकारण (म्हणजे इस्लामी मूलतत्त्ववादी राजकारण) जितके धोकादायक वाटत असते तितके हिंदुत्ववादी राजकारण आपल्याला धोकादायक न वाटण्याचे कारण हिंदू धर्म आणि इस्लाम यांच्यातील गुणात्मक वेगळेपणात आहे. इस्लामसारखा हिंदू धर्म हा धर्मग्रंथावर आधारित संघटित धर्म नसल्यामुळे हिंदू धर्मात लोकशाहीला आणि व्यक्तिस्वातंत्र्याला बळ देणारी जशी मूल्ये आहेत तशी इस्लाममध्ये नाहीत. त्यामुळे सेक्युलर राजकारण आणि इस्लाम यांचात जसा विरोधाभास आणि तीव्र संघर्ष आपल्याला दिसतो तसा संघर्ष आपल्याला हिंदू अस्मितेचे राजकारण आणि सेक्युल्यारिझममध्ये दिसणार नाही. पण हिंदू धर्मपरंपरेतील हे वैशिष्टय़ टिकून राहीलच असे आपण गृहीत धरून चालायचे का? की हिंदू धर्मातील त्या विधायकतेला छेद जातोय म्हणून सजग व्हायचे?

हिंदू धर्म हा रूढार्थाने धर्म नाही. कारण तो कुराण किंवा बायबलसारखा एखाद्या धर्मग्रंथाने बांधलेला नाहे. त्यात दैवी शक्तीचे समर्थन लाभलेला शरियासारखा कायदा किंवा राज्यव्यवस्था नाही. किंवा माणसाने काय करावे किंवा करू नये हे ठामपणे सांगणाऱ्या बायबलमधील दहा आज्ञा नाहीत. हिंदू धर्मातील काही विचारप्रवाह कमालीचे उदात्त आणि मुक्तीदायी आहेत तर काही कमालीच्या अंधश्रद्धेवर आधारलेल्या आणि मनुष्यत्वाचा संकोच करणाऱ्या अन्याय्य आणि हिंसक अशा जातप्रथेला जन्म देणारेही आहेत. हिंदू धर्मातील परस्परविरोधी मूल्य आणि विचारपरंपरेमुळे या धर्मात जन्मलेल्या लोकांना इतर धर्माच्या तुलनेने कमालीचे स्वातंत्र्य लाभले आहे.

शेकडो वर्षांपूर्वी लिहिलेल्या कुठल्या तरी पोथीची हुकमत माणसाचे विचार दडपण्यासाठी वापरायचा प्रयत्न इथे निष्फळ ठरतो. पोथीनिष्ठ कर्मठतेविरुद्ध पुकारलेल्या बंडात येथे बऱ्याच वेळा बंडखोरांचा विजय झाला. ज्ञानेश्वर आणि त्याच्या भावंडांवर वाळीत टाकणारे ब्राह्मण इतिहासजमा झाले. ज्ञानोबाची आळंदी तीर्थक्षेत्र झाले. आंबेडकरांच्या महाडच्या सत्याग्रहामुळे तळे पतित व्हायच्या ऐवजी पुनित झाले. त्याचे गोमूत्राने शुद्धी करणारे ब्राह्मण इतिहासांत केवळ हास्यास्पद ठरले. हिंदू परंपरेत खास वाखाणण्यासारखे काही असेल तर ते हेच आहे.

हिंदू धर्मातील खुलेपणाचा विलोभनीय आविष्कार पाहायचा असेल तर आपल्याला वारकऱ्यांच्या दिंडीत, चंद्रभागेच्या तीरी जावे लागेल. जातिभेद विसरून, श्रीमंत-गरीब हा भेद विसरून उन्हापावसाची पर्वा न करता मलोन्मैल चालत जाणारे वारकरी जेव्हा एकमेकाला वाकून नमस्कार करत, गळाभेट घेत, तल्लीन होऊन विठ्ठलभक्तीचे अभंग म्हणतात तेव्हा अगदी नास्तिकाच्या डोळ्यातदेखील पाणी येऊ शकते. कारण या भक्तीत मनाची विशालता असते. देवापाशी काही मागणे नसते. अहंकाराचा लोप असतो आणि अनंताचा शोध घेण्याचा प्रयत्न असतो. ही भावावस्था कोणालाही भिडणारी असते. यात कोणते कर्मकांड नसते. असते ती निरपेक्ष आस. हिंदू परंपरेत व्यक्तीला अनंताचा वेध घेण्यासाठी कोणत्याही उपासनापद्धतीचे स्वातंत्र्य आहे. या स्वातंत्र्यामुळेच हिंदू धर्मात कमालीचे वैविध्य, समृद्धी आहे.

‘वारीतील सामर्थ्य समता संगराला लाभावे’ या शीर्षकाच्या आपल्या एका लेखात डॉ. नरेंद्र दाभोलकर लिहितात : ‘वारीच्या काळात वारकरी रोज वीस-वीस किलोमीटर चालतात. मिळेल ती भोजन -निवास व्यवस्था स्वीकारतात. पावसाचे झोडपणे, चिखल तुडवणे आनंदाने स्वीकारतात. वारकरी माळ धारण करतात. एका अर्थाने व्रतस्थ होतात.. वारीच्या सोहळ्याचा मूलभूत संदेश प्रेम, भक्ती, शांतीची प्रस्थापना आणि मानवतेची समानता हा असतो.’

नरेंद्र दाभोलकरांना वारकरी संप्रदायाबद्दल प्रेम वाटणे हे स्वाभाविक होते. जो संघर्ष तुकाराम आणि इतर संतांनी सनातन्यांविरुद्ध केला तसाच संघर्ष दाभोलकरांना करावा लागला आणि त्यासाठी त्यांना बलिदानदेखील करावे लागले. अनेक हिंदुत्ववादी लोकांचादेखील सनातनवादी विचारांना विरोध असतो. पण एकदा का लोकांचे धार्मिक अस्मितेच्या मुद्दय़ांवर राजकीय ऐक्य साधायचे ध्येय बाळगले की सनातनवादी प्रवृत्तीबद्दलदेखील मौन बाळगावे लागते. कारण इतर हिंदुत्ववादी लोकांप्रमाणे ‘सनातन’वादी लोकांची रणनीतीदेखील हिंदू धर्मीयांवर फार मोठा अन्याय होतोय असे सातत्याने मांडून, इतर धर्मीयांतील कट्टरतेकडे बोट दाखवून हिंदूंना असुरक्षित करून त्यांचे राजकीय ऐक्य साधण्याचीच असते. सनातनी नसलेले हिंदुत्ववादी आणि सनातनी हिंदुत्ववादी यांच्यातील हा संबंध महत्त्वाचा आणि बळकट आहे. दाभोलकरांच्या खुनानंतर त्यांच्यावर ज्या अभद्र भाषेत ‘सनातन प्रभात’मध्ये गरळ ओकण्यात आली त्यावर हिंदुत्ववादी नाही तुटून पडले. ‘सनातन’वर टीका ज्यांना स्युडोसेक्युलर म्हणून हिणवले जाते अशा लोकांनीच केली .

हिंदुत्वाच्या राजकारणामुळे हिंदू संस्कृतीचे वेगवेगळ्या पातळीवर नुकसान झाले आहे. अडवाणींच्या रथयात्रेनंतर जे ‘साधू’, ‘संत’ देशाच्या राजकीय-सामाजिक क्षितिजावर उदयाला आले ते आणि भागवत धर्मातील खरे संत यांच्यात मुळातच मोठा विरोध आहे. खरे तर या लोकांना संत म्हणायला हिंदू समाजाने आक्षेप घेतला नाही हे दुर्दैव. एका अभंगात तुकाराम म्हणतात ‘मांडीना स्वतंत्र फड, म्हणे अंगा येईल अहंता वाड नाही शिष्यशाखा, सांगो अयाचित लोका’ अशी अहंकार वाढवणारी स्वतंत्र फड आणि शिष्यशाखा जमवणारी ‘आसाराम’ प्रवृती ही आज साधुसंत म्हणून मान्यता पावली आहे हा तुकारामाचा मोठा पराभव आहे. पण याची फारशी खंत हिंदू धर्मीयांना वाटतेय असे दिसत नाही. अटी ‘संतांना’ आज मंत्रिपदाचा दर्जा दिला जातोय. हिंदुत्वाच्या राजकारणात तुकारामाचा पराभव अपरिहार्य आहे. कारण हिंदुत्वाचे राजकारण व्यक्तीला ‘हिंदू’ नावाच्या समूहवादी अस्मितेत कोंडण्याचे आहे तर तुकारामाचे ध्येय व्यक्तीला अहंभावापासून मुक्त करण्याचे असल्याने तुकारामाची मांडणी अस्मितावादाला मुळातून छेद देणारी आहे. इस्लाम आणि सुफी परंपरा यात जे विळ्याभोपळ्याचे नाते आहे तेच नाते वैदिक परंपरा आणि संतांची भागवत परंपरा यांच्यात आहे. आणि आज हिंदुत्ववादी राजकारणाला जवळचे वाटणारे सर्व संत (?) हे कोणत्याही जातीतून आलेले असले तरीही ते वैदिक परंपरेशी नाते सांगतात यात आश्चर्य नाही.

एखाद्या कट्टर नास्तिक माणसाच्या डोळ्याच्या कडा ओलावण्याचे सामर्थ्य तुकारामाच्या अभंगात असते. याचे कारण त्या अभंगातील आर्तता ही अहंभावाच्या विलोपातून आलेली आहे आणि म्हणून कमालीच्या विशालतेशी जोडलेली आहे.

माझिया मीपणावर, पडो पाषाण, जळो हे भूषण, नाम माझे  (तुकाराम)

मनाची अशी विशालता आणि धार्मिक अस्मितेखाली लोकांचे संघटन करण्याची प्रेरणा यात एक मोठा ताण असतो. अशा विशालतेचा वारसा सांगणारी हिंदू संस्कृती आणि हिंदू धर्मीयांमध्ये असुरक्षितता आणि आक्रमकता निर्माण करू पाहाणारी हिंदुत्ववादी विचारसरणी या एकमेकांविरुद्ध उभ्या ठाकणाऱ्या गोष्टी आहेत.

आज भगव्या कपडय़ातील ‘योगी’ आणि राज्यसत्ता हातात हात घालत आहेत. तुकाराम म्हणायचे,

‘होउनी संन्यासी भगवी लुगडी, वासना न सोडी विषयांची,

लाम्बवूनी जटा नेसोनी कासोटा, अभिमान मोठा करिताती’

धर्माभिमान जागता ठेवणे ही हिंदुत्वाच्या राजकारणाची अपरिहार्यता आहे. आज अनेक हिंदू विज्ञान तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात मोठे योगदान करत आहेत. पण आज निर्माण होणाऱ्या ज्ञानावर कोणत्याही एका देशाची आणि धर्माची छाप नाही. म्हणून हिंदुत्ववाद्यांना वेदकाळात जावे लागते. परिणामी आज हिंदू अभिमान जागवण्यासाठी सत्तेतील लोकांनी केलेली अत्यंत मठ्ठपणाची विधाने सातत्याने आपल्यावर आदळत आहेत. ‘पूर्वी आपल्याकडे प्लास्टिक सर्जरीचे तंत्रज्ञान होते आणि गणपती हे त्याचेच उदाहरण आहे.’ या पंतप्रधानांच्या विधानाने या प्रक्रियेची सुरुवात झाली आणि ती प्रक्रिया थांबायचे नावच घेत नाहीये. तर्कावर न टिकणारी अशी हास्यास्पद विधाने करून आपण हिंदूंमध्ये न्यूनगंड निर्माण करत आहोत याचे भानदेखील हिंदुत्ववाद्यांना नाही.

मध्ययुगीन कालखंडात जेव्हा इस्लामी राजांची आक्रमणे होत होती तेव्हा हिंदू अस्मितेखाली हिंदूंचे राजकीय संघटन करणे हे समजण्यासारखे होते. पण आज ८० टक्क्यांहूनही जास्त हिंदू समाज असलेल्या देशात हिंदूमध्ये असुरक्षितता आणि त्यातून आक्रमकता निर्माण करण्याचे राजकारण म्हणजे हिंदूंमध्ये इस्लाममधील कट्टरता आणण्याचा प्रयत्न आहे. पण दुर्दैवाने हिंदू समाजाला याचे भान नाही. आपल्या समृद्ध वारशाला नख लावले जातेय हे त्यांच्या गावीही नाही.

(लेखक आर्थिक आणि सामाजिक प्रश्नांवर लेखन करतात.)

ईमेल :  [email protected]

सौजन्य – दैनिक लोकसत्ता

Previous articleलावणीतला शृंगार हरपला…
Next articleमोदी जिंकणारच!
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.