धोनी जैसा कोई नही..

क्रिकेटमधील भारताचा आजपर्यंतचा सर्वाधिक यशस्वी कर्णधार म्हणून नावलौकिक मिळविलेल्या महेंद्रसिंग धोनीची कसोटी क्रिकेटमधील नवृत्ती धक्कादायक नसली तरी रहस्यमय नक्कीच आहे. अलीकडच्या काही वर्षांत देशाबाहेर एकापाठोपाठ एक होत असलेल्या पराभवामुळे टीकेचा धनी होत असलेला धोनी एवढय़ात कसोटी क्रिकेटला रामराम ठोकणार याचे संकेत मिळत होते. मात्र ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेतील एक सामना बाकी असताना अचानक नवृत्तीची घोषणा करणे हे अनपेक्षित होते. फलंदाजातील अफलातून टायमिंगसाठी विख्यात असलेल्या धोनीने नवृत्तीच्या घोषणेचं टायमिंग का चुकवलं, हा सगळ्यांना पडलेला प्रश्न आहे. 


धोनी हा असा अचानक धक्का देणारा खेळाडू नाहीय. असं काय घडलं की ज्यामुळे मालिका सुरू असताना धोनीने नवृत्तीची घोषणा केली, याबाबत धोनीने काही खुलासा केला नाही. भारतीय क्रिकेट नियामक मंडळही या विषयात मोकळेपणाने बोलायला तयार नाही. मात्र पडद्यामागे काहीतरी घडलं, हे निश्‍चित. भारतीय बोर्डाने संचालक म्हणून नियुक्त केलेल्या रवी शास्त्रींच्या निर्णय प्रक्रियेतील वाढत्या हस्तक्षेपाने धोनी नाराज होता. रवी शास्त्रींची आणि विराटची सलगी आणि त्यांनी धोनीपेक्षा विराटला अधिक महत्त्व देणे, यामुळे धोनी अस्वस्थ होता, अशी बातमी आली आहे. नेमकं सत्य काय आहे, हे यथावकाश बाहेर येईलच. २0१४ च्या उन्हाळ्यातील इंग्लंड दौर्‍यात भारतीय संघाने सपाटून मार खाल्ल्यानंतर धोनीने कसोटी संघाचं कर्णधारपद सोडावं, यासाठी त्याच्यावर दबाव वाढला होता. इयॉन चॅपेल, सौरभ गांगुलीसारख्या मातब्बर क्रिकेटपटूंनी विराट कोहलीकडे आता कसोटी संघाचं कर्णधारपद सोपविलं पाहिजे, असं बोलणं सुरु केलं होतं. गेल्या काही दिवसांत आयपीलएलमध्ये स्पॉट फिक्सिंगचे आरोपही त्याच्यावर झाले होते. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे वादग्रस्त निलंबित अध्यक्ष एन. श्रीनिवासन यांच्यासोबतचे त्याचे संबंध, टी-२0 क्रिकेटला तो देत असलेलं महत्त्व यामुळेही धोनीवर गेल्या काही महिन्यांत अनेकदा कठोर टीका झाली आहे. अशातच सतत होत असलेल्या पराभवामुळे धोनी नक्कीच काही वेगळा विचार करीत असावा. तरीही मालिका सुरू असताना त्याचं असं तडकाफडकी नवृत्त होणं निश्‍चितपणे शंका निर्माण करणारं आहे.

बाकी धोनीचं कसोटी क्रिकेटमधून नवृत्त होणं हे चटका लावणारं आहे. हुरहूर लावणारं आहे. धोनीचं भारतीय क्रिकेटमधील योगदान किंवा त्याची महानता आकड्यांमधून किंवा विक्रमातून कळत नाही. धोनीची कसोटी, एकदिवसीय किंवा टी-२0 क्रिकेटमधील आकडेवारी फार काही नेत्रदीपक नाही. त्याच्या नेतृत्वाखाली खेळणार्‍या अनेक खेळाडूंचे आकडे त्याच्यापेक्षा सरस आहेत. त्यामुळे आकड्यांमधून धोनी कळत नाही. धोनी फलंदाज म्हणून सवरेत्कृष्ट आहे का?…तर नाही. भारताचे आजपर्यंतच्या सवरेत्कृष्ट ५0 फलंदाजांची यादी काढली तर त्यात तो बसणार नाही. विकेटकीपर म्हणून तो अफलातून आहे का ?….तर तेही नाही. दिनेश कार्तिक, वृद्धीमान साहा अगदी पार्थिव पटेलसुद्धा धोनीपेक्षा उत्तम विकेटकीपिंग करतात. भारताच्या आजपर्यंतच्या ऑल टाईम बेस्ट विकेटकीपरच्या यादीत धोनीला पहिल्या वीसमध्ये स्थान मिळणं कठीणच आहे. (कर्णधार म्हणून मात्र तो नक्कीच ग्रेट आहे. त्याच्या नेतृत्वाखाली भारताने टी-२0 विश्‍वचषक, एकदिवसीय विश्‍वचषक, चॅम्पियन्स ट्रॉफी विजेतेपद जिंकले. कसोटी क्रिकेटमध्ये त्याच्याच नेतृत्वाखाली भारत काही काळ नंबर वन होता. कर्णधार म्हणून त्याला पहिल्या तिघात किंवा पहिलं स्थानही देता येईल. )असं असतानाही धोनी एवढा यशस्वी कसा ठरला? सचिन तेंडूलकर, राहुल द्रविड, वीरेंद्र सेहवाग, युवराज सिंग असे एकापेक्षा एक प्रतिभावंत खेळाडू संघात असताना धोनी यांच्यापेक्षा सरस का ठरला? या सर्वांचं नेतृत्व त्याला कसं लाभलं? या प्रश्नांच्या उत्तरात धोनीची महानता, धोनीचं मोठेपण दडलं आहे. अफाट आत्मविश्‍वास, कमालीचा शांतपणा आणि सांघिक वृत्ती हे गुण धोनीला इतरांपेक्षा वेगळं ठरवून जातात. भारतीय क्रिकेटच्या इतिहासात लाला अमरनाथपासून सुनील गावस्करपर्यंत, विजय हजारेपासून सचिन तेंडुलकरपर्यंत, कपिलदेवपासून राहुल द्रविडपर्यंत एकापेक्षा एक सरस खेळाडू होऊन गेलेत. क्रिकेटचे सारे रेकॉर्डबुक या भारतीय खेळाडूंच्या पराक्रमाने भरली आहेत. मात्र या सर्वांमध्ये एक कमतरता समान होती. आणीबाणीच्या परिस्थितीत हे सारे ढेप खात होते. सामना कमालीच्या उत्कंठावर्धक अवस्थेत असताना महान विशेषण लागणार्‍या खेळाडूंचे खांदे कसे पडत होते आणि हाताशी आलेला सामना ते कसे गमावत होते, याच्या असंख्य वेदनादायक आठवणी भारतीय क्रिकेटरसिकांजवळ आहे.

आत्मविश्‍वासाअभावी येणारी ही पडखाऊ व पराभूत वृत्ती पहिल्यांदा कोणी बदलविली असेल, तर ती महेंद्रसिंग धोनीने बदलविली. त्याच्याअगोदर कर्णधार असलेल्या सौरभ गांगुलीजवळ आक्रमकपणा होता, लढाऊपणा व जिंकण्याची खुन्नसही होती. अरे ला कारे म्हणण्यातही तो मागे नव्हता. मात्र आणीबाणीच्या परिस्थितीत त्याचेही खांदे पडायचे. चेहरा उतरायचा. मात्र धोनी कर्णधार झाला आणि भारतीय क्रिकेटचं हे चित्र बदललं. शेवटच्या क्षणापर्यंत लढायचं, जोपर्यंंत सामना संपत नाही, तोपर्यंत हार पत्करायची नाही, हे धोनीने सध्याच्या भारतीय टीमला शिकविलं. काहीजणांना अतिशयोक्ती वाटेल पण धोनीएवढा कुल टेम्परामेंट असलेला खेळाडू आजपर्यंंत भारतीय क्रिकेटला लाभला नाही. कोणत्याही परिस्थितीत मैदानावर तो ज्या शांतपणे वावरतो त्याला ‘स्थितप्रज्ञ’ हाच शब्द शोभतो. ‘किलर इन्स्टिंक्ट’ (शेवटच्या क्षणी निर्णायक घाव घालण्याची क्षमता) हा प्रकार दूरपर्यंंतही भारतीय खेळाडूंजवळ नव्हता. अँलन बॉर्डर, रिकी पाँटिंग, मायकेल बेव्हन, जावेद मियॉंदाद, शाहिद आफ्रिदी, हॅन्सी क्रोनिए, मायकेल हसी, अरविंद डीसिल्व्हा, सनथ जयसूर्या, वासिम अक्रम, ब्रायन लारा, ज्ॉक कॅलिस, ग्रॅहम स्मिथ, केविन पीटरसन, कुमार संगकारा असे इतर संघांतील अनेक खेळाडू अशक्यप्राय वाटणारे विजय खेचून आणत असताना भारताचे खेळाडू हाताशी आलेला सामना गमावायचे. धोनीने भारताला जिंकायची सवय लावली. एक दिवसीय व टी-२0 क्रिकेटमध्ये अनेक सामन्यांत धोनीने केवळ आत्मविश्‍वासाच्या जोरावर भारताला अनेक विजय मिळवून दिले. कारकिर्दीच्या सुरुवातीला २00६ च्या पाकिस्तान दौर्‍यात लाहोर व कराचीतील अनुक्रमे ७२ व ७७ धावांच्या खेळी, २00८ मध्ये कटकमध्ये इंग्लंडविरुद्ध ५0 धावांची मॅच विनिंग खेळी, २00८ मध्ये ऑस्टेलियाविरुद्ध दिल्लीतील ७१ धावा, २0१0 मध्ये ग्वाल्हेरमध्ये आफ्रिकेविरुद्धच्या ६८ धावा, २0१३ मध्ये वेस्टइंडीजमधील तिरंगी मालिकेत श्रीलंकेविरुद्ध नाबाद ४५ अशा अनेक अजरामर खेळ्या धोनी खेळला आहेत. सध्याच्या भारतीय संघातील विराट कोहली, राहुल शर्मा व अजिंक्य राहणे व इतर युवा खेळाडूंमध्ये जी जिगर व आत्मविश्‍वास आढळतो, त्याचं मूळ धोनीच्या पॉझिटिव्ह अँप्रोचमध्ये आहे. अफाट प्रयोग करणं आणि छोट्या खेळाडूंना आत्मविश्‍वास देणं हेही धोनीचं विशेष वैशिष्ट्य. पहिल्या टी-२0 विश्‍वचषक स्पर्धेत शेवटचं षटक जोगिंदर शर्माला देण्याचा त्याचा निर्णय आठवतो का? (तो जोगिंदर शर्मा आज कुठंच नाही.)२0११ च्या एक दिवसीय विश्‍वचषकाच्या अंतिम सामन्यात इशांत शर्माची जोरदार धुलाई सुरू असतानाही त्याच्यावर विश्‍वास टाकण्याचं काम धोनीनेच केलं. आज इशांत शर्मा भारतीय क्रिकेट संघात केवळ धोनीमुळे आहे. धोनीचं सर्वांंत मोठं वैशिष्ट्य म्हणजे विजय वा पराभवात तो सारखाच शांत राहायचा. अनेकदा पाहण्यात आलं आहे, मोठी स्पर्धा जिंकली की, सारा संघ जल्लोष करायचा, हा मात्र विजयी कप सहकार्‍यांच्या हाती देऊन पाठीमागे निघून जायचा. ही सांघिक वृत्ती, सहकार्‍यांमधून सवरेत्कृष्ट कामगिरी करून घेण्याची किमया, अफाट आत्मविश्‍वास आणि अनुकूल, प्रतिकूल परिस्थितीत डोक्यावर बर्फ ठेवणं, या गुणांमुळे धोनीने भारतीय क्रिकेटचा चेहरामोहरा बदलून टाकला आहे. त्यामुळे भारतीय क्रिकेटच्या इतिहासात धोनीचं एक वेगळं स्थान असणार आहे. कदाचित विश्‍वचषकानंतर तो सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून नवृत्ती घेईल. मात्र भारतीय क्रिकेट चाहते नेहमीच म्हणतील, धोनी जैसा दुसरा कोई नही…

(लेखक दैनिक पुण्यनगरीचे कार्यकारी संपादक आहेत.)

Previous articleनेते, अभिनेते, महाराजांच्या अनुयायांची अंधभक्ती धोकादायक
Next articleक्रिकेट आणि सिनेइंडस्ट्रीचे चुंबकीय नाते
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.