नमस्ते सदा वत्सले मोदीभूमी!

(सौजन्य -दैनिक पुण्यनगरी)

पंतप्रधान व त्यांचे कार्यालय (पीएमओ ऑफिस) हेच सर्व खात्यांचा कारभार पाहतात. देशातील लोकशाही प्रणालीला व कॅबिनेट पद्धतीला घरघर लागली आहे. नेहरू-गांधी घराण्याच्या लोकशाहीला भाजपाचा कडवा विरोध असतो, पण ते जिल्हावार घराणेशाही तयार करीत आहेत.
……………………………………………………………………………………..

डॉ. कुमार सप्तर्षी modi rss
नमस्ते सदा वत्सले मातृभूमी..’ ही संघाच्या शाखेवरील अतिपवित्र प्रार्थना! मातृभूमीची निष्ठा म्हणजे आपोआप राष्ट्रनिष्ठा नव्हे. भारतात राहणार्‍या सर्व जातीधर्माच्या लोकांना बंधू मानणे, त्यांचे कल्याण व्हावे असे सातत्याने चिंतन करणो याला राष्ट्रनिष्ठा म्हणतात. जे तर्काला पटते, जे सामान्य जनतेच्या हिताचे आहे ते रा.स्व. संघाला कधीच मान्य नव्हते. ते निगरुण, निराकार मातृभूमी मानतात. भारताला आपली मातृभूमी किंवा वतन मानणारे अन्य धर्मीय व तथाकथित खालच्या वर्गाचे असंख्य लोक आहेत, त्यांना बंधू मानणे म्हणजे ही राष्ट्रनिष्ठा. संघपरिवाराच्या विचारसरणीनुसार मातृभूमीची निष्ठा म्हणजे हिंदू राष्ट्राची निष्ठा! हिंदू समाज व्यापक व विस्कळीत आहे. त्यात वरिष्ठ-कनिष्ठता, भेदाभेद, अस्पृश्यता आहे. हजारो जातींची उतरंड आहे. शिखरावर ब्राह्मण, क्षत्रीय, वैश्य हे त्रिवर्ण म्हणजेच सवर्ण आहेत. कृष्णजन्माच्या दिवशी दहीहंडी फोडण्यासाठी गोविंदा उतरंड रचतात. शिखरावरचे लोक दहीहंडी फोडतात. तशीच हिंदू समाजाची रचना आहे. ८५ टक्केक्षुद्रातिक्षूद्र आहेत. त्यांच्या जीवनाचे कंपोस्ट खत करून, त्यांच्या श्रमाची चोरी करून, सवर्ण नावाचा मिनी अभिजन वर्ग निर्माण होतो. सवर्णांनी तथाकथित शूद्रांचे जीवन कंट्रोल करायचे. वेळप्रसंगी त्यांना शिक्षा द्यायची. याउलट इतरांनी मात्र सवर्णांचे दोष काढायचे नाहीत. त्यांच्या अन्यायाबद्दल इजा वा सजा करायची नाही, अशी ही जन्माधिष्ठित विषमतेवर आधारलेली अपरिवर्तनीय समाजरचना आहे. त्या समाजरचनेची पुनस्र्थापना करणे हा हिंदू राष्ट्रनिर्मितीमागचा मुख्य उद्देश! मातृभूमी म्हणजे आसेतू हिमाचल जमीन. त्यावर सवर्णांचा निर्विवाद मालकी हक्क प्रस्थापित करण्यासाठी हिंदू राष्ट्र हवे. त्यासाठी सवर्णांची अधिसत्ता हवी. ८५ टक्के जनतेला भूमीच्या मालकी हक्कापासून आणि सत्ता, संपत्ती, प्रतिष्ठा यांपासून वंचित ठेवायची हा मुख्य हेतू. या प्रवृत्तीला ‘ब्राह्मण्य’ असे नाव आहे. ब्राह्मण्य ही एक विशिष्ट प्रवृत्ती आहे. ब्राह्मण जातीसमूहाचा लेष करून या प्रवृत्तीचा बीमोड होणार नाही. ब्राह्मण्य म्हणजे विषमतेवर आधारलेल्या समाजरचनेला मान्यता देणे. ब्राह्मण्य ही प्रवृत्ती कोणत्याही जातिसमूहाच्या व्यक्तीमध्ये असू शकते. हिंदुत्ववाद हे ब्राह्मण्य प्रवृत्तीचे नवे रूप आहे. भाजपाची सत्ता स्थापन झाल्यापासून त्यांना आपले हात आकाशाला टेकले आहेत, अशा भ्रमाने घेरले आहे. चातुर्वण्र्य समाजरचनेच्या पोटात हुकूमशाही मूल्यांना मान्यता आहे. देशाचा पंतप्रधान म्हणून मोदींचा आदर करण्याची अनेकांची इच्छा आहे; परंतु ते स्वत: तशी संधी कोणाला, कधीही देत नाहीत.
वर्षभरात त्यांनी भेदाभेदाचे तत्त्वज्ञान सांगणार्‍यांना-घरवापसी, लव्ह जिहाद, म. गांधी ब्रिटिशांचे एजंट होते, गोडसे थोर देशभक्त होता, हिंदू कुटुंबांत पुरुषांची फलटण जन्माला घातली पाहिजे, साईबाबांच्या मूर्ती फोडून मंदिराबाहेर फेकून दिल्या पाहिजेत वगैरे-राष्ट्रीय एकात्मतेला बाधक असलेल्या वक्तव्यांची पं. मोदींनी कधी दखल घेतली नाही. त्यांच्यावर गुन्हेगारी स्वरूपाचे खटले दाखल केले नाहीत. त्यांच्याविरोधात जाहीररीत्या पंतप्रधानांनी कधी विरोधी मत व्यक्त केले नाही. ब्राह्मण्य प्रवृत्तीचा एक विशेष आहे. सवर्णातील कुणी दुबळ्या वर्गावर अत्याचार केले तर त्याला देवत्व बहाल करण्याची प्रथा आहे. २00२ साली अहमदाबादमध्ये झालेल्या मुस्लिमांच्या कत्तलीनंतर मोदींना या प्रवृत्तीने देवत्व बहाल केले. त्यांच्या अष्टभुजा मूर्ती बसवून नवरात्र महोत्सव साजरे केले. गुजरातमध्ये ‘ओम नमो नमाय!’ हा अभिवादनाचा मंत्र बनला. साहजिकच मोदींच्या डोक्यात अहंकाराची हवा शिरली. ते स्वत:ला ईश्‍वराचा अवतार मानू लागले. ब्राह्मण्याच्या मूळ संकल्पना जगभर प्रसारित करण्यासाठी ते काहीबाही बोलू लागले. एका जन्मात पाप केले तर त्याची फळे पुढच्या जन्मी निमूटपणे सोसावी लागतात, असा पूर्वजन्माचा एक भंपक सिद्धांत आहे. मोदी परदेशात अनिवासी भारतीयांच्या समोर म्हणाले, ‘पूर्वी (मोदी पंतप्रधान होण्याआधी) लोक म्हणत की, आपण गेल्याजन्मी कोणते पाप केले, त्यामुळे आपला जन्म भारतात झाला. अभिमान वाटावा असे भारतात काही नव्हते. म्हणून तुम्ही लोक आपला देश सोडून परदेशी आलात. आता मात्र देशात फक्त चांगल्या गोष्टी घडत आहेत. इथून पुढे तुम्हाला आपल्या मातृभूमीचा अभिमान वाटेल.’ यावर हजारो अनिवासी भारतीयांनी सोशल मीडियामधून तिखट प्रतिक्रिया व्यक्त केल्या. ‘आम्ही भारत सोडून फक्त अधिक पैसे कमवण्यासाठी परदेशात आलो. आमच्या मनात आपल्या जन्मभूमीबद्दल मात्र कायम प्रखर अभिमानच होता. मोदी पंतप्रधान झाल्यापासून आम्हाला भारताचा अभिमान वाटतो, हे विधान सर्वस्वी चुकीचे आहे,’ अशा त्या प्रतिक्रिया होत्या.
परदेश दौर्‍यावरून आल्याबरोबर मोदींनी आदेश काढला की, ‘सर्व मंत्र्यांनी प्रत्येकी २५ वार्ताहर परिषदा घेतल्या पाहिजेत, भाजपाने देशभर किमान अडीचशे मेळावे घेऊन माझ्या सरकारवर स्तुतिसुमने उधळली पाहिजेत.’ गेली ९0 वर्षे संघपरिवार सत्तेसाठी धडपडत होता. भाजपाचे राज्य येणे व मोदी पंतप्रधान होणे म्हणजे त्यांच्या वांझ कष्टाला फळ लागले. मोदींमुळे त्यांना अच्छे दिन आले, त्यामुळे ‘नमस्ते सदा वत्सले मोदीभूमी!’ असे म्हणण्यात त्यांना धन्यता वाटते. पंतप्रधानाने परदेशदौरे करणे म्हणजे एव्हरेस्ट शिखर जिंकणो नव्हे. तो त्याच्या जबाबदारीचा एक भाग आहे. पंतप्रधानांची अनेक कर्तव्ये असतात. त्यासाठी सम्यक् बुद्धी हवी. संसदेतील उपस्थिती, गरिबांकडे विशेष लक्ष, राष्ट्रीय एकात्मतेची पुष्टी याला त्यांच्या दृष्टीने काहीच महत्त्व नाही. एका वर्षात अनेक गोष्टींचा फक्त प्रारंभ होतो; परंतु भाजपा एक वर्षाच्या उपलब्धी सांगून जल्लोष करीत आहे. इव्हेंट मॅनेजमेंटच्या माध्यमातून देशवासीयांना गुंगीत ठेवण्याचा हा महाप्रय▪आहे. मोदी जगभर फिरून जागतिक भांडवलशाहीला भारतात येण्यासाठी निमंत्रणे देत आहेत. त्यांच्यासाठी त्यांना देशात अनुकूल वातावरण निर्माण करायचे आहे. शेतकर्‍यांच्या जमिनी घेऊन जगातील भांडवलदारांना द्यायच्या आहेत, धरणे बांधून पाणी द्यायचे आहे, स्वस्तात श्रमशक्तीचा पुरवठा करायचा आहे, अणुवीज निर्मिती करून स्वस्तात वीज द्यायची आहे. जागतिक भांडवलशाहीमुळे देशाला प्रगतीची रोगट सूज येईल, पण समाजात विषमता, भेदाभेद वाढतील. कामगारविरोधी कायदे संमत होत आहेत. पर्यावरणाचा नाश झाला तरी चालेल; पण बहुराष्ट्रीय कंपन्या भारतात आल्या पाहिजेत, असा त्यांचा आग्रह आहे. राजकीय दृष्टिकोनातून पाहिल्यास काय दिसते? मोदींनी नियोजन मंडळ रद्द केले. लोकशाहीमधील कॅबिनेट (मंत्रिमंडळ) पद्धती नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. जणू भारतात अध्यक्षीय राजवट अवतरली आहे. मोदींशिवाय एकाही केंद्रीय मंत्र्याला किंमत नाही. परदेश दौर्‍यांत परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज उपस्थित नसतात. त्या आजारी आहेत असा फुसका युक्तिवाद संघवाले करतात. आजारी माणसाला मंत्रिपदावर ठेवू नये हे ओघाने येते. शस्त्रास्त्र खरेदीमध्ये संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांना नगण्य स्थान असते. दिल्लीत काम नसल्याने ते आठवड्यातील तीन दिवस गोव्यात राहतात. पंतप्रधान व त्यांचे कार्यालय (पीएमओ ऑफिस) हेच सर्व खात्यांचा कारभार पाहतात. देशातील लोकशाहीप्रणालीला व कॅबिनेट पद्धतीला घरघर लागली आहे. नेहरू-गांधी घराण्याच्या लोकशाहीला भाजपाचा कडवा विरोध असतो. पण ते जिल्हावार घराणेशाही तयार करीत आहेत. भविष्यात गणराया, भवानी माता, खंडेराया यांच्या आरत्या लोकांच्या विस्मरणात जातील. ‘सुखकर्ता दु:खहर्ता मोदी रायाऽऽ’ एवढी एकच आरती शिल्लक राहील. केवळ काँग्रेसचा नव्हे, तर गेल्या वर्षापूर्वीचा भारताचा सर्व इतिहास पुसून टाकण्यात येईल. फक्त मोदींपासून नवा भारत जन्माला आला असे धादांत खोटे इतिहासलेखन होईल. भारतीय जनता पक्षाचे ‘मोदी पक्ष’ म्हणून नामांतर करण्यात येईल. ओम मोदी नमाय! म्हणजेच मोदींना नमो नमाय!

डॉ. कुमार सप्तर्षी
लेखक नामवंत सामाजिक कार्यकर्ते आहेत
९४२२५४९०४३

(सौजन्य -दैनिक पुण्यनगरी)

Previous articleआम्ही कवीच्या बाजूचे..
Next articleमोदींना आणखी वेळ दिला पाहिजे!
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.