नरेंद्र मोदी विरुद्ध ललित मोदी

डॉ. कुमार सप्तर्षी
राम-रावण युद्ध लोकांना ठाऊक आहे. कृष्ण-कंस यांचा संघर्ष ठाऊक आहे, पण भाजपाच्या lalit-modi-and-narendra-modiराज्यात रावण विरुद्ध रावण, कंस विरुद्ध कंस आणि मोदी विरुद्ध मोदी असा मुकाबला चालू आहे. सध्या भाजपाला ललित मोदीचे ग्रहण लागले आहे. नरेंद्र मोदी नावाचा सूर्य या ग्रहणाने झाकोळला आहे. मोदी सरकारमधल्या परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांचे मंत्रालय पं. मोदींनी कधीच पळवून लावले आहे. त्यांना काम करण्याची संधी शिल्लक राहिलेली नाही, मग रिकाम्या वेळात परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज काय करणार? पंतप्रधान मोदी हिंग लावून विचारत नाहीत म्हणून त्या दुसर्‍या ललित मोदींकडे वळल्या. ललित मोदी हा सतराशे कोटी रुपयांचा घोटाळा करून न्यायालयांना हुलकावणी देण्यासाठी देश सोडून गेला. लंडनमध्ये राहू लागला. त्याला फरारी घोषित करण्यात आले. हाच कुख्यात डावपेची माणूस मोदी सरकारच्या ‘गले में हड्डी’ बनला आहे. आयपीएलचा अध्यक्ष असताना ललित मोदी राजस्थान, मुंबई, दिल्ली, लंडन व दुबई येथे सारखा फिरत असे. सर्वत्र त्याची घरे होती. लंडनमध्ये त्याला फरारी अवस्थेत सुखाने राहता यावे म्हणून सर्वोच्च न्यायालयामधील न्यायमूर्ती बॅनर्जी त्याला मदत करत होते. त्याला पोतरुगालला जायचे होते. त्याची पत्नी हॉस्पिटलमध्ये होती. पत्नीच्या ऑपरेशनसाठी हॉस्पिटलच्या कागदपत्रावर सही करण्याचा बहाणा करून त्याने सुषमा स्वराज यांना थेट फोन केला. पं. मोदी काय आणि त्यांचे मंत्री काय, या सगळ्यांचे एकच वैशिष्ट्य आहे, ते बड्या कंपन्यांना, मालदार लोकांना डायरेक्ट फोनवर उपलब्ध असतात. गोरगरिबांना त्यांचे दर्शन फक्त टीव्हीवर होते. ल. मोदी भरधाव वेगाने अतिश्रीमंत झाला. श्रीमंत होण्याच्या वेगाचे सर्व विक्रम त्याने मोडले. हा ल. मोदी कोण या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी प्रसारमाध्यमांची स्पर्धा चालू आहे. हा गृहस्थ ग्वाल्हेर राजघराण्याच्या ओळखीचा होता. दिवाणजी, नोकर-चाकर राजघराण्याभोवती घुटमळत असतात. त्यापैकी हा एक. ग्वाल्हेरचे सिंधिया घराणे राजकारणात प्रभावी होते. राजमाता सिंधिया भाजपाच्या प्रमुख नेत्यांपैकी एक तर त्यांचा पुत्र माधवराव सिंधिया काँग्रेस पक्षाचा. काँग्रेस व भाजपा या पक्षांमध्ये राजघराण्याच्या प्रभावाची वाटणी झाली होती. माधवरावांची धाकटी बहीण राजकन्या वसुंधरा ही आपल्या आईबरोबर म्हणजे भाजपाबरोबर होती. तिचा विवाह राजस्थानच्या राजघराण्यात झाला. काही काळानंतर त्यांचा घटस्फोट झाला. तरी वसुंधरा राजे यांना राजस्थानने सून म्हणून स्वीकारले. २00३ मध्ये भाजपमार्फत त्या राजस्थानच्या मुख्यमंत्री बनल्या. त्या राजस्थानमध्ये महाराणी म्हणून ओळखल्या जाऊ लागल्या. ल. मोदी आणि वसुंधरा राजे यांची घट्ट गट्टी जमली. कारणे गूढ आहेत. महाराणी मुख्यमंत्री असल्या तरी ल. मोदी सुपर मुख्यमंत्री मानले जाऊ लागले. महादेवाच्या दर्शनाला जायचे असेल तर आधी नंदीचे दर्शन घ्यावे लागते. महादेवाला कोण भेटतो, त्याच्या मनात नवस काय या सर्वांवर नंदीबैलाची कडक नजर असते. तसेच हे होते. मोठी कामे, मोठे सौदे यासाठी महाराणींना थेट भेटता यायचे नाही. तिथून ल. मोदीचे विमान सुटले. २00५ साली महाराणींच्या मार्फत ललित मोदी आयपीएल या क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष बनले. मग त्यांच्या विमानाचे अवकाशयानात रूपांतर झाले. ते अंतराळवीर बनले. कागदावरच्या कंपन्या नमूद केलेल्या पत्त्यावर कधीच नव्हत्या. प्रॉपर्टी खरेदी-विक्री सुरू झाली. आता ते दावा करतात की, मी मूळचाच गर्भश्रीमंत आहे. तोंडात सोन्याचा चमचा घेऊन मी जन्माला आलो आहे. न. मोदी व ल. मोदी यांच्यातही दोस्ती आहे. मोदी सरकार आणि भाजपाचे अध्यक्ष अमित शहा एकदिलाने, एकमुखाने सुषमा स्वराज यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहिले. अचानक सुषमा स्वराज मोदी सरकारच्या लाडक्या बनल्या आहेत. इंग्लंडमध्ये वास्तव्य करत असताना भारत सरकारच्या यादीतील फरारी आरोपी म्हणून ललित मोदींकडून सर्व कागदपत्रे ब्रिटिश सरकारने जप्त करून ठेवली होती. ही घटना काँग्रेसच्या राजवटीतील. भाजपचे सरकार आल्याबरोबर ल. मोदीचे भाग्य उजळले. एका भ्रष्टाचार्‍याला, गुन्हेगाराला भारत सरकारकडून आशीर्वाद लाभला. काँग्रेसचे राज्य हैवानाचे राज्य होते असा भाजपाचा दावा आहे. भाजप ही सोवळ्यांची औलाद अन् काँग्रेस म्हणजे ओवळ्यांची औलाद असे भाजपच्या मंडळींचे एक अतिआवडते समीकरण आहे, त्यामुळे सुषमा स्वराज यांनी महान बनून, मानवतावादाच्या आध्यात्मिक दृष्टिकोनातून ब्रिटिश सरकारला कळवले की, तुम्ही ल. मोदींची जप्त केलेली कागदपत्रे त्यांना परत करावीत. तसे करायला भारत सरकारची कोणतीही हरकत नाही. आमच्या आरोपीला तुम्ही मोकळे सोडले, तर त्यामुळे ब्रिटन व भारत यांच्या संबंधांवर काही परिणाम होणार नाही. तुम्ही आनंदाने त्यांना मोकळे सोडू शकता. ब्रिटन सरकारने स्वत:च्या पुढाकाराने ल. मोदींचा पासपोर्ट व अन्य कागदपत्र जप्त केलेले नव्हते, केवळ भारताच्या हितसंबंधांचे रक्षण करण्यासाठी त्यांनी ही कृती केली होती. भारत सरकारने आपली हरकत नसल्याचे सांगितल्यानंतर प्रश्न तिथेच मिटला. ल. मोदी मुक्त झाले. जगभर फिरू लागले. पत्नीचे ऑपरेशन झाल्यावर ते ब्रिटनमध्ये परतले असे झाले नाही. ते जगभर दौरे करू लागले. पाटर्य़ांना जाऊ लागले. विविध देशांतील बायाबापड्यांच्या गळ्यात गळे घालून फोटो काढू लागले. अचानक प्रसारमाध्यमांना त्यांचे फोटो मिळाले. सारे भांडे फुटले. प्रथम ब्रिटिश प्रसारमाध्यमांमध्ये बातम्या झळकू लागल्या. ब्रिटिश सरकारचे प्रतिनिधी सुषमा स्वराज यांचे नाव घेऊ लागले. खरे म्हणजे भाजप आणि मोदी सरकार यांना हादरा बसला. बचावासाठी त्यांनी मानवतावादाच्या दृष्टिकोनातून अतिप्रशंसनीय असे हे कार्य सुषमा स्वराज यांनी केले आहे, असे भजन चालू केले. वारकरी मंडळी गावागावांत नामसप्ताह साजरा करतात, त्या वेळी ते अहोरात्र विठ्ठलऽ.., विठ्ठलऽऽ.. असे नामस्मरण करतात. याला भक्तिमार्ग म्हणतात. एक वारकरी थकला तर त्याच्या गळ्यातील तंबोरा दुसरा वारकरी घेतो. भाजपाचा प्रवक्ता मानवतावादाचा ठेका काही काळ चालवतो. तो थकला, की त्याच्या गळ्यातला तंबोरा भाजपाचा दुसरा प्रवक्ता आपल्या गळ्यात घालतो. मानवतावादाचे नामस्मरण अखंड चालू ठेवतो. हे असेच चालू राहिले तर भाजपा, संघ परिवार, मानवतावादी बनू शकतील असा सगळ्यांच्या मनात संशय उत्पन्न झालाय. ही मंडळी मानवतावादी झाली तर मुस्लिम, ख्रिश्‍चन, दलित, शेतकरी सर्वजण आपापल्या गल्लीत, बोळात, गावात गूळ वाटतील. संघ परिवार व भाजपा यांना मानवतावादाने घेरले तर भारताचे बहुतांश प्रश्न मार्गी लागतील. सुषमा स्वराज यांची गुन्हेगारांना मदत करण्यासाठी आपले पद वापरण्याची हातोटी विलक्षण आहे. दाऊद इब्राहिम हादेखील माणूस आहे, त्यामुळे त्यालाही मोदी सरकारच्या मानवतेचा कृपाप्रसाद लाभू शकतो. छगन भुजबळ, अजित पवार, सुनील तटकरे हे राक्षस आहेत असे भाजपाचे मत आहे. म्हणून त्यांना अपवाद केले जाते. त्यांना नेहमी अंतिम सत्याचे दर्शन होते. सर्वांसाठी एक कायदा असावा असे मानणारे गरीब पामर यांच्यापेक्षा बुद्धीने खुजे असतात. आमचा स्वभाव शंकेखोर आहे. स्वभावाला औषध नसते, म्हणून आम्हाला वाटते की, ल. मोदींची बुद्धी व अफाट पैसा न. मोदी व भाजप यांना निवडणुकीच्या प्रचारमोहिमेत मिळाला असावा. अंबानी, अदानी, ल. मोदी यांच्यासारखे अनेक असतील. मग त्यांना मोदी सरकारकडून अभय मिळणार हा अंदाज आम्ही घेतलेला आहे. पं. मोदी ज्या-ज्या राष्ट्रात गेले तिथे अंबानी, अदानी, मोदी यांना कारखाने काढण्याची सोय होते, हे तर शेंबड्या पोरालाही कळते. भारतात परदेशी भांडवलदारांनी यावे. त्यासाठी त्यांना शेतकर्‍यांच्या जमिनी देण्यात येतील. पाणी, वीज, रस्ते याकरिता विकास हवा म्हणून तर आम्ही विकासाच्या घोषणा केल्या आहेत. परदेशीयांनी आमच्या जमिनी घ्याव्यात आणि त्यांच्या देशात अंबानी, अदानी, ल. मोदी यांच्या कंपन्यांना जमिनी द्याव्यात असे हे साटेलोटे आहे. राष्ट्रभक्ती तोंडी लावायला आहेच. मानवतावाद ही पोट भरल्यानंतर खाण्याची स्वीट डिश आहे, हे तर सर्वांना कळते. या पार्श्‍वभूमीवर सुषमा स्वराजना पाठिंबा आणि राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांना मात्र नाही हे गौडबंगाल आहे. पंतप्रधानांचा संबंध असल्याशिवाय सुषमा स्वराजांचा बचाव करायला पक्ष सरसावला नसता. वसुंधरा राजे यांना भाजपा वेगळा न्याय देतो. एकंदरीत पाहता भाजपाच्या अंतर्गत बरीच खळबळ चालली असावी. भाजपाचे व देशातील सर्वात ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी उगाच म्हणत नाहीत की, देशात आणीबाणी लागू होण्याची शक्यता टाळता येत नाही. नागरी स्वातंत्र्य व नागरिकांचे मूलभूत अधिकार यांचा संकोच होण्याची शक्यता आहे. पं. मोदी यांच्या संभाव्य हुकूमशाहीचा धोका सर्वांनाच वाटू लागला आहे. त्यांच्या सत्ता एकवटण्याच्या उपक्रमाला ब्रेक लावला नाही तर देशावर संकट कोसळेल. मोदी, अंबानी, अदानी यांची निरंकुश सत्ता भारतावर प्रस्थापित होईल, हा खरा धोका आहे.

कुमार सप्तर्षी
(लेखक हे नामवंत सामाजिक कार्यकर्ते आहेत)
भ्रमणध्वनी : ९४२२५४९0४३

Previous articleछगन सदन तेजोमय….
Next articleएकमेका साह्य करू अवघे धरू कुपंथ !
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.