नेर अर्बन -सामाजिक उलाढाल करणारी पतसंस्था

संतोष अरसोड

नोकरीच्या मागे लागून कुणाची गुलामी करण्यात धन्यता माणन्यापेक्षा आपणच आपलं वेगळं विश्व का निर्माण करू नये या ध्येय्याने झपाटलेली काही तरुण मंडळी समोर आली. त्यातील एकाने एका पतसंस्थेकडे 50 हजार रुपयाचे कर्ज मागितले पण त्याला तिथे अपमानास्पद वागणूक मिळाली. या अपमानाचे रूपांतर सात्विक संतापात झाले अन त्यातून मग एका पतसंस्थेचा जन्म झाला. जी वेळ आपल्यावर आली ती इतरांवर येऊ नये ही भावना यामागे होती. आर्थिक अन सामाजिक उलाढाल करणारी ही पतसंस्था अनेकांची जीवनदायीनी झाली आहे. नेर अर्बन को- ऑपरेटीव्ह सोसायटी हे या पतसंस्थेचे नाव आहे. हे नाव आता यवतमाळ जिल्हाभर झाले आहे.
यवतमाळ हा तसा पाहिला तर आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचा जिल्हा. मात्र एकीकडे असे निराशेचे ढग दाटून आलेले असतांना काही ठिकाणी मात्र आशेची किरणे दिसून पडतात. नेर अर्बन को-ऑप क्रेडीट सोसायटी हा असाच एक आशेचा किरण ठरू पाहतो आहे अनेकांसाठी. शेतकरी, बेरोजगार, महिला बचत गट यासह शिक्षणपिडीताना एक भक्कम असा आधार या सोसायटीने दिला आहे. एकीकडे मोठया बँकेत वाट्यास येणारे अनुभव फार विचित्र असतात. वेळेवर कर्ज मिळत नाही. सन्मानाची वागणूकही क्वचितच मिळते. अशा साऱ्या पार्श्वभूमीवर नेर अर्बन ने मात्र लोकांमध्ये एक वेगळा आत्मविश्वास निर्माण केला आहे. अडल्या नडल्याचा आर्थिक आधार म्हणून ही सोसायटी आता जिल्हाभर नावारूपास आली आहे.
नेर सारख्या छोट्याशा शहरात या सोसायटीची मुहूर्तमेढ रोवली आहे. लहानपणापासून सोबत खेळलेल्या मित्रांनी या सोसायटीची स्थापना केली. नोकरी करण्यात आयुष्य घालण्यापेक्षा आपण आपलं स्वतंत्र जग का निर्माण करू नये म्हणून या संस्थेचा जन्म झाला. सहकार व्यवस्थापण पदविका अभ्यासक्रम पूर्ण केलेला प्रदीप झाडे नावाचा तरुण आणि त्याच्या स्वप्नांना खरा आकार देणारा अभियंता नरेंद्र गद्रे यांच्या धाडसातुन या संस्थेचा 9 ऑगस्ट 2002 क्रांतिदिनी जन्म झाला. उपेक्षित लोकांना आर्थिक आधार देऊन त्यांच्या जीवनात क्रांतिकारक बदल व्हावे म्हणून क्रांतिदिनाचा मुहूर्त निवडला असे संस्थापक नरेंद्र गद्रे सांगत होते. एका बँकेने 50 हजार रु कर्ज नाकारले हा राग सुद्धा मनात होताच म्हणूनच ही संस्था काढली हे सांगताना गद्रे खूप भावनिक झाले होते. त्यांच्या या धाडसात प्रशांत काळे, सुनील दरोई, दिलीप डोळे, सुरेंद्र ठेंगरी व इतर संचालकांचा सिंहाचा वाटा आहे. सन 2002 ला एका छोट्या जागेत सुरू झालेली ही पतसंस्था आता जिल्हाभर आपले कार्यक्षेत्र वाढवत आहे.यवतमाळ, वणी, आर्णी, नेर आणि लाडखेड असा संस्थेचा विस्तार झाला आहे.
यशाचा हा प्रवास प्रचंड खडतर आहे. ही पोरं काय करणार म्हणून कुणी सभासद पण होत नव्हते. अखेर सभासदांची रक्कम स्वतःच भरून संस्था नोंदणी करावी लागली.आज मात्र ही संस्था जिल्ह्यातील लोकांना आधार वाटू लागली आहे.500 कोटींची उलाढाल असलेल्या या संस्थेत जवळपास 55 कर्मचारी व 50 दैनिक ठेव प्रतिनिधी आहेत. पहिल्या वर्षांपासूनच ऑडिट चा ‘अ’ वर्ग दर्जा कायम आहे.
संस्थेची आर्थिक उलाढाल 500 कोटींची जरी असली तरी संस्थेची सामाजिक उलाढाल प्रचंड मोठी आहे. नेर तालुक्यातील परिवर्तनवादी चळवळीला खरा आधार या संस्थेने दिला आहे. धर्म व जातीच्या नावाखाली बहकलेल्या तरुणांना योग्य मार्गदर्शन करून त्यांना व्यवसाय उभे करून देण्यात संस्थेचे योगदान लाखमोलाचे आहे. प्रशिक्षण शिबीर घेऊन कार्यकर्ते तयार केले आहेत. स्पर्धा परीक्षेत मुलं यशस्वी व्हावीत म्हणूनही अनेक उपक्रम राबवीले आहेत.निबंध स्पर्धेसारखा उपक्रम व्यापकपणे राबविण्यात आला आहे. गावातील प्रतिभेचा सन्मान व्हावा म्हणून आदर्श शिक्षक पुरस्कार, नेर भूषण पुरस्कार नित्यनेमाने देण्यात येतात.
संस्था इथपर्यंतच थांबत नाही तर शेतकऱ्यांसाठी एक पाऊल पुढे टाकत आहे. रासायनिक शेतीपेक्षा सेंद्रिय शेती करावी यासाठी पुणे येथून मार्गदर्शक बोलावून शेतकऱ्यांना वेगळी दिशा देण्याचा प्रयत्न केला आहे. ज्या शेतकऱ्यांच्या शेतात पाणी आहे त्यांना ड्रीप साठी मदत करण्यात आली आहे. तेजीमन्दित शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून अल्पदरात वेअर हाऊस ची व्यवस्था संस्थेने केली आहे. शेतीपूरक व्यवसाय उभारणी साठी पुढील काळात गावोगाव सर्वेक्षण करून होतकरू तरुणांना आर्थिक पाठबळ देण्यासाठी संस्थेने मास्टर प्लॅन तयार केला आहे.
नेर अर्बन च्या या सामाजिक व आर्थिक दृष्टीकोनामुळे जवळपास 40 टक्के लोकांना आर्थिक आधार मिळाला आहे. अडचण आली की पावलं नकळत नेर अर्बन च्या इमारतीकडे वळायला लागतात अन तिथून जगण्याची नवी उर्मी घेऊन परत येतात. निराश मनांत आशेची किरणे पेरणारी ही संस्था अनेकांना आपला अंतिम आधार वाटते.

संस्थापक- नरेंद्र गद्रे (9422166777)  अध्यक्ष – सौ. अनघा नरेंद्र गद्रे, व्यवस्थापक -प्रदीप झाडे (9423110110)

(लेखक मीडिया वॉच नियतकालिक व वेब पोर्टलचे असोसिएट एडिटर आहेत)

9623191923

Leave a Comment