‘महानायका’चं महारहस्य!

सौजन्य – दैनिक सकाळ
विश्वास पाटील

आझाद हिंद सेनेचे संस्थापक आणि स्वातंत्र्यचळवळीतले ज्येष्ठ नेते नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा विमान अपघात आणि त्यात झालेला त्यांचा मृत्यू, हे प्रकरण इतिहासातलं एक ‘महागूढ’ ठरलं आहे. नेताजी यांचा शेवट कसा झाला आणि ते किती काळ जिवंत होते, याबद्दल आजही वेगवेगळे मतप्रवाह आहेत. पश्‍चिम बंगाल सरकारनं त्यांच्या ताब्यात असलेली नेताजींसंदर्भातली ऐतिहासिक कागदपत्रं नुकतीच खुली केली आहेत. या कागदपत्रांतून काय बाहेर येईल? त्याचबरोबर अन्य देशांकडची कागदपत्रं खुली झाली तर त्यातून कुठली माहिती उघड होईल? नेताजींचं कार्य आणि स्वातंत्र्यचळवळीतल्या अनेक घटनांचा अर्थ आता नव्यानं लावता येईल का? अशा अनेक मुद्द्यांचा हा वेध…

नेताजी सुभाषचंद्र बोस यांचं विमान- अपघातात निधन झाल्याची बातमी पहिल्यांदा २१ ऑगस्ट १९४५ या दिवशी इंग्लंड आणि भारतात प्रसिद्ध झाली, तेव्हा उरुळी कांचनच्या निसर्गोपचार केंद्रात मुक्कामाला असलेल्या गांधीजींसह उभा देश हळहळला. तेव्हा दूर दक्षिणेत केरळच्या कुण्णूर इथल्या तुरुंगात ब्रिटिशांनी नेताजींचे मोठे बंधू बॅरिस्टर शरद बोस यांना डांबून ठेवलं होतं. शरदबाबूंनी तेव्हा आपल्या डायरीत अशी नोंद केली आहे ः ‘काल रात्री माझ्या स्वप्नात बाळ सुभाषची प्रतिमा अचानक उभी राहिली. त्याची तेजःपुंज चर्या मला ओथंबून गेल्यासारखी दिसली अन्‌ ती प्रतिमा बघता बघता आभाळासारखी मोठी होत गेली.’’

आज दिवसेंदिवस नेताजींचं जीवन; विशेषतः त्यांच्या मृत्यूबाबतचं कथन, त्यांच्याविषयीच्या फायलीnetaji आणि कागदपत्रं ही सारीच रहस्यं अधिकच गूढ बनू लागलेली आहेत. पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी नेताजींविषयीच्या ६२ गोपनीय फायली नुकत्याच लोकांसाठी खुल्या केल्या आहेत. त्यातून मुख्य रहस्याचा स्फोट झाला नसला, तरी प्राप्त कागदपत्रांवरून या विषयाच्या शंका अधिकच गडद बनवल्या आहेत. या वादळानं घोंघावतं स्वरूप धारण केलं असून, त्याच्या पोटातून कदाचित आधुनिक भारताच्या इतिहासातलं सर्वांत मोठं आणि धक्कादायक रहस्य बाहेर पडण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. त्यातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुरेसा वेळ देऊन नेताजींच्या देशातल्या आणि परदेशांतल्या जवळच्या नातेवाइकांना भेटीचं आमंत्रण दिलं आहे.
काँग्रेसचं अध्यक्षपद दोन वेळा भूषवलेला आधुनिक विचारांचा राष्ट्रनेता; तसंच दूर सिंगापूर आणि ब्रह्मदेशात जाऊन ब्रिटिशांसाठी लढणाऱ्या ३० हजार युद्धकैद्यांच्या ठायी देशप्रेमाची ज्योत तेजवून युद्धकैद्यांमधून आझाद हिंद सेना स्थापन करणारा झुंजार सेनानी, जगभरातल्या सशस्त्र क्रांतिकारकांच्या इतिहासाची कमान उंचावणारा श्रेष्ठ ‘महानायक’ असे जे नेताजी, त्यांच्याभोवती आज एका महारहस्याचं वादळ घोंघावू लागलं आहे.

आजवर केंद्र सरकारनं नेताजींच्या मृत्यूची चौकशी करण्यासाठी शाहनवाज आयोग, खोसला आयोग आणि मुखर्जी आयोग असे तीन आयोग नेमले. त्यांपैकी जगभर फिरून सर्वंकष चौकशी करण्याचं काम माजी न्यायमूर्ती असलेले मनोजकुमार मुखर्जी यांनी मोठ्या कष्टानं पार पाडलं. ‘नेताजींचा मृत्यू विमान-अपघातात झालेला नसून, ते मोठ्या धाडसानं रशियाच्या हद्दीत जाऊन पोचले होते, असा निष्कर्ष मुखर्जी यांनी काढल्याचं अभ्यासक सांगतात; पण दुर्दैवानं तेव्हाच्या केंद्र सरकारनं हा अहवालच संसदेसमोर सादर केला नाही.

आजमितीस केंद्र सरकारकडं असलेल्या सुमारे १५० फायली आपल्या पोटात कोणतं रहस्य घेऊन बसल्या आहेत? १८ ऑगस्ट १९४५ या दिवशी घडलेल्या त्या कथित अपघाताचं रहस्य काय आणि प्राप्त व अप्राप्त फायलींच्या पाठीमागं विणलेले नेमके धागेदोरे कोणते, या मुद्द्यांचा विचार करताना माझ्या डोळ्यांसमोर उभी राहते ती पहिली शाहनवाज समिती. १९५६ च्या दरम्यान भारतीय संसदेत आणि संसदेबाहेरही जनप्रक्षोभ वाढला. ‘नेमकं काय झालं आहे नेताजी सुभाषचंद्र बोस यांचं?’ या प्रश्‍नानं तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांना भंडावून सोडलं होतं. शेवटी पंडितजींनी नेताजींचे लाल किल्ल्यात गाजलेले लष्करी सहकारी शाहनवाज खान यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नेमली. त्या समितीत सुभाषचंद्रांचे आणखी एक सख्खे वडीलबंधू आणि पेशानं डॉक्‍टर असलेले सुरेशचंद्र यांची सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली, हे खूपच महत्त्वाचं!

१५ ऑगस्ट १९४५ या दिवशी अमेरिकी फौजांसमोर जपान हे राष्ट्र शरण आलं, तेव्हा जपान बेटाचा ताबा घेण्यासाठी अमेरिकी विमानं आणि आगबोटी पूर्व आशियाकडं वेगानं निघाल्या होत्या. तेव्हा इंग्लंड आणि अमेरिकी लष्करी अधिकाऱ्यांच्या प्रमुख ध्येयापैकी एक महत्त्वाचे ध्येय होतं ते म्हणजे सर्वोच्च युद्धगुन्हेगार – मोस्ट वाँटेड वॉरक्रिमिनल – नेताजी सुभाषचंद्रांना तत्काळ अटक करणं आणि पूर्व आशियातून दूर हलवणं.

युद्धकाळात आपल्या राजस आणि तेजस्वी व्यक्तिमत्त्वानं नेताजींनी जपानी लष्करी आणि नागरी अधिकाऱ्यांना जिंकलं होतं. त्यामुळंच पराभवाच्या छायेतसुद्धा जपान नेताजींसारख्या आपल्या युद्धकालीन मित्राला शत्रूच्या ताब्यात द्यायला तयार नव्हता. त्यामुळं जपान बेटावर अमेरिकी फौजा पोचण्यापूर्वी नेताजींनी तिथून निघून जाण्याच्या धाडसी योजनेला मदत करणं हे जपानी बांधवांनी आपलं कर्तव्य मानलं. आजवर उपलब्ध असलेल्या सर्व देशी आणि परदेशी कागदपत्रांतून एक निर्विवाद सत्य बाहेर येतं ते म्हणजे नेताजींचे आणखी एक धाडसी उड्डाण. नेताजींना सिंगापूर, सायगाव, तैपेई या मार्गानं मांच्युरियामधल्या डेरेन या गावी पोचायचं होतं. तिथून मांच्युरियामधले त्यांचे मित्र त्यांना रशियापर्यंत सोबत करणार होते. त्याचदरम्यान घडला तो तैपेईचा १८ ऑगस्टचा विमान-अपघात.

नेताजींच्या जीवनप्रवासाचा विचार करता बहुतेक सर्व अभ्यासकांना असं वाटतं, की विमान-अपघाताचा तो प्रकार म्हणजे नेताजींनीच शत्रूच्या डोळ्यांत केलेली धूळफेक होती. युद्धप्रवण क्षेत्रातून प्रवास करताना सुरक्षेच्या दृष्टीनंच त्यांनी स्वतःच रचलेला तो बनाव होता. त्यांनी विमान-अपघात घडवून आणला असावा किंवा तो घडला तरी त्यात त्यांचं निधन न होता ते ठरल्याप्रमाणं मांच्युरियाकडं निघून गेले असावेत. कोलकत्याच्या घरातून बाहेर पडतानाही जानेवारी १९४१ मध्ये भारताच्या सरहद्दीबाहेर गेल्यावरच त्यांनी ती बातमी १० दिवसांनंतर फुटू दिली होती. बलदंड योजना आणि त्या प्रत्यक्षात आणण्यासाठी अचाट धाडस याचे धडे नेताजींनी शिवचरित्रातून घेतले होते. सर जदुनाथ सरकार यांनी लिहिलेलं शिवाजीमहाराजांचं चरित्र आणि त्यातलं ‘आग्र्याहून सुटका’ हे प्रकरण कोलकत्याच्या प्रेसिडेन्सी तुरुंगात असताना नेताजींना मुखोद्गत होतं, याचे अनेक पुरावे मला आढळून आले आहेत.

जेव्हा शाहनवाज आयोग चौकशीसाठी पूर्व आशियात गेला होता, तेव्हा चौकशीचं काम सुरू असताना शाहनवाज खान आणि नेताजींचे बंधू डॉ. सुरेशचंद्र या दोघांमध्ये अनेकदा कडाक्‍याची भांडणं झाली. ‘नेताजी हयात असल्याचे पुरावे नोंदवून घेण्यात शाहनवाज हेतुपुरस्सर टाळाटाळ करत आहेत, ते सचोटीनं आपलं काम पार पाडत नाहीत,’ असा सुरेशचंद्र यांचा आक्षेप होता. सर्वांत धक्कादायक गोष्ट म्हणजे, शाहनवाज यांनी पूर्व आशियात प्रदीर्घ प्रवास करूनही जिथं अपघात घडला, त्या तैपेईला भेट देण्याचं मुद्दाम टाळलं आणि आपला अहवाल केंद्र सरकारला देऊन टाकला. तेव्हा एकेकाळचे नेताजी यांचे खासगी सचिव आणि ख्यातनाम संसदपटू, खासदार ह. वि. कामथ यांनी जाहीरपणे अशी भूमिका मांडली की ः ‘शाहनवाज आयोगानं नेमकी अपघाताच्या ठिकाणाला भेट न देणं म्हणजे, हत्या घडल्याच्या ठिकाणी न जाता आणि मूळ पंचनामा न करता खुनाचं रहस्य शोधल्याचा दावा करण्यासारखी हास्यास्पद गोष्ट आहे.’ पुढं लवकरच योगायोगानं शाहनवाज यांना केंद्र सरकारमध्ये मंत्रिपद मिळालं. नेहरूंनंतर इंदिरा गांधी यांच्या काळातसुद्धा ते मंत्रिपदावर होते.
मात्र, डॉ. सुरेशचंद्र बोस हे नेहरूंसह केंद्र सरकारशी अनेक वर्षं भांडत होते. त्यांच्या नेताजींच्या मृत्यूच्या निष्कर्षाबाबत आक्षेप घेणाऱ्या पत्राला पंडित नेहरूंनी स्वतःच्या सहीनं दिलेलं १३ मे १९६२चे पत्ररूपी उत्तर इतिहासात उपलब्ध आहे. ते असं ः ‘आपण नेताजींच्या मृत्यूबाबतच्या पुराव्याची विचारणा माझ्याकडं केली आहे. मात्र, मी तुम्हाला कोणताही थेट किंवा निर्णायक पुरावा पाठवून देण्यास असमर्थ आहे. मात्र, चौकशी आयोगादरम्यान जो भौतिक आणि परिस्थितीजन्य पुरावा समोर आला आहे, त्यावरून नेताजींचं निधन झाल्याच्या निष्कर्षापर्यंत आम्ही आलो आहोत.’

त्या कथित विमान-अपघाताच्या वेळी नेताजींसोबत कर्नल हबीब-उर्-रहमान हे एकमात्र भारतीय साक्षीदार होते. नेताजींचं नेमकं काय झालं, या काळजीपोटी गांधीजींनी हबीब यांना अनेकदा चर्चेसाठी बोलावून घेतलं होते. त्याबाबत गांधीजींनी स्वतः केलेली नोंद अशी आहे ः ‘नेताजींसारख्या आपल्या महान नेत्यानं दिलेल्या कमांडनुसार- कडक आदेशानुसार- हबीब बोलत असावेत.’ आता उपलब्ध झालेल्या कोलकता फायलीवरून असं स्पष्टच होतं, की १९७१ पर्यंत नेताजींच्या जवळच्या नातेवाइकांवर केंद्रीय गुप्तचरांचा सातत्यानं पहारा होता.
एका वेळी ११-११ मोठे अधिकारी या कामाला जुंपले जायचे. त्यासाठी भारत सरकारनं प्रचंड खर्च केला आहे; तसंच नेताजींचे पुतणे बॅरिस्टर ओमियोनाथ हे अनेक देशांत प्रवास करत असताना त्यांच्याही पाळतीवर गुप्तचर ठेवलेले होते. दुसरीकडं तत्कालीन पंतप्रधान पंडित नेहरू विविध राज्यांच्या यंत्रणांना अशी स्पष्ट पत्रं लिहितात की ः ‘नेताजींच्या माजी सैनिकांना सरकारमध्ये कुठंही जबाबदारीच्या नोकरीमध्ये घेऊ नका.’ अशा पत्रांची संख्या सुमारे पंचवीसच्या वर आहे. या केवळ बाजारागप्पा किंवा सांगोवांगीची गोष्ट नव्हे, तर नेहरूंची पत्रं नेहरू कुटुंबीयांनीच ‘कलेक्‍टेड वर्क्‍स ऑफ पंडित नेहरू ः सेकंड सिरीज्‌’च्या अनेक खंडांत प्रकाशित केलेली आहेत. त्यामुळं ती कुणी खोटी ठरवण्याचाही प्रश्‍न उद्भवत नाही. काँग्रेसच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत खुद्द गांधीजींनी नेताजींच्या विरोधात प्रचार केला होता, तरीही नेताजी मताधिक्‍यानं निवडून आले होते. एवढंच नव्हे तर, नेहरूंच्या युनायटेड प्रोव्हिन्स (सध्याचा उत्तर प्रदेश) या राज्यात तर ७० टक्के अधिक मतं नेताजींना मिळाली होती. तेव्हा गांधीजींनी नेहरूंची आणि कृपलानींची जाहीर खरडपट्टी काढली होती. एकूण परिस्थिती पाहता, स्वातंत्र्यानंतर आपलं अवघे जीवन राष्ट्राला समर्पित करणारा नेताजींसारखा नेता इथं सर्वोच्च स्थानी राहणं हे काळाचेच संकेत होते.

या एकूण रहस्यमय कथेचे अनेक धक्कादायक पदर आहेत. १९४९ च्या दरम्यान नेताजींचे वडीलबंधू बॅरिस्टर शरद बोस यांना ‘नेताजी रशियात जिवंत असून, ते एक मोठी संघटना उभारण्याच्या प्रयत्नांत आहेत,’ असे संकेत मिळाले होते; तसंच याबाबतची चर्चा अफगाण आणि रशियन अधिकाऱ्यांमध्येही झाली होती. काही अमेरिकी अधिकाऱ्यांनी नेताजींना युद्धकाळात अटक केली होती, अशीही वदंता आहे. अमेरिकेच्या नॅशनल रेकॉर्डस ऑफ अर्काइव्ह्‌ज ॲडमिनिस्ट्रेशन (NARA) यांच्याकडंही काही महत्त्वाची कागदपत्रं आहेत. १९५६ मध्ये ‘तैवानीज्‌ ब्रिटिश इन्क्वायरी फाइल’ ही फाइल महत्त्वाचं वळण घेते. नेताजींच्या मृत्यूबाबतची महत्त्वाची कागदपत्रं ब्रिटिश उच्चायुक्तालयानं परराष्ट्र मंत्रालयाकडं दिली होती. त्याही कागदपत्रांची फाईल मुखर्जी आयोगानं अनेकदा मागूनही त्यांना मिळाली नाही. मात्र, या फायलीच्या पाच प्रती ब्रिटिशांनी भारत सरकारला दिल्याच्या नोंदी ब्रिटिश कागदपत्रांत आढळतात.

‘सुभाषचंद्र बोस यांच्या मृत्यूची कारणमीमांसा’ ‘File No. १२ (२२६) ५६ PM` ही अत्यंत महत्त्वाची फाइल केंद्र सरकारनंच १९७२च्या दरम्यान नष्ट केल्याचा आरोप केला जातो. ती फाइल सुरवातीला नेहरू यांच्या ताब्यात आणि त्यानंतर इंदिरा गांधी यांच्या काळात त्यांचे प्रधान सचिव पी. एन. हक्‍सर यांच्याकडं असायची. ती नष्ट झाल्याचं कळताच तत्कालीन खासदार समर गुहा यांनी इंदिरा गांधी यांच्याकडं तत्काळ तक्रार केली होती. तिला उत्तर देताना पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी ३ जानेवारी १९७४ रोजी गुहा यांना लेखी उत्तर पाठवलं होतं. ते असं ः ‘त्या फायलीमध्ये काही दस्तऐवजांच्या फक्त प्रती होत्या, ज्या प्रती आजही तुम्हाला अन्य फायलींमध्ये मिळतील.’ आता उपलब्ध झालेल्या कोलकता कागदपत्रांच्या वेळी नेताजींचे नातू चंद्रा बोस यांनी असा जाहीर आरोप केला आहे की ः ‘१९७१ मध्ये बंगाल सरकारच्या ताब्यात असलेली नेताजींविषयीची आणखी एक महत्त्वाची फाइल बंगालच्या मुख्यमंत्र्यांनी जाळून नष्ट केली आहे.’

अशा कितीतरी प्राप्त-अप्राप्त आणि नष्ट केलेल्या कागदपत्रांनी या धक्कादायक रहस्याला वेटोळं घातलेलं आहे! ताश्‍कंद कराराच्या वेळी रशियात लालबहादूर शास्त्री आणि नेताजी यांची भेट झाल्याचं शास्त्रीजींचे नातेवाईक आता जाहीरपणे बोलू लागले आहेत. कुणी अभ्यासक असंही सांगतात, की एका अज्ञातस्थळी इंदिरा गांधी आणि नेताजी यांची भेट घडवण्यात आली होती; पण हुशारीनं त्या भेटीविषयी कोणत्याही लेखी नोंदी ठेवल्या गेल्या नाहीत. आज इंग्लंड, अमेरिका आणि रशिया या देशांत जुन्या दफ्तरखान्यांमध्ये नेताजींविषयीच्या अनेक फायली गुप्ततेच्या आवरणाखाली पडून आहेत. जनता पक्षाच्या काळात लंडनमधल्या उच्चायुक्तांच्या पदावर (कै) ना. ग. गोरे होते. अशा अनेक फायली लंडनच्या दफ्तरखान्यात असल्याचं त्यांनी मला १९९० च्या दरम्यान अनेकदा सांगितलं होतं. अशा फायली NGO विभागात म्हणजे सांकेतिक शब्दांत ‘नॉट गो आउट ऑफ द ऑफिस’मध्ये पडून आहेत; पण भारतातले अनेक धाडसी तरुण आता माहिती-अधिकाराच्या शस्त्राचा वापर करून देशोदेशीच्या दफ्तरखान्यापर्यंत पोचले आहेत. नवे रहस्यभेदही होत आहेत.

नेताजींच्या शोधासाठी मीही माझ्या आयुष्यातली अनेक वर्षं खर्ची घातली आहेत. देश आणि देशाबाहेरचे दफ्तरखाने धुंडाळताना भीतीच्या आणि दबावाच्या काळ्या सावल्या माझ्याही भोवती घिरट्या घालून गेलेल्या आहेत. तरीही मी माझे प्रयत्न सोडले नाहीत. दिल्लीच्या रामकृष्णपुरम विभागात लष्कराचं रेकॉर्ड आहे. तिथं नेताजींबद्दलच्या अनेक फायली उपलब्ध असून, सुमारे शंभराहून अधिक फायली गोपनीयतेच्या आवरणाखाली लोकांना उपलब्ध होऊ शकत नाहीत. एके दिवशी त्या ग्रंथालयात माझ्या हाती चुकून त्या फायलींची अनुक्रमणिका असलेलं हस्ताक्षरातलं पुस्तक हाती आलं. मी ते अधाशासारखं वाचू लागलो. तेवढ्यात तिथल्या कर्मचाऱ्यांनी ते झडप घालून माझ्या हातून हिसकावून घेतलं आणि ‘हे पुस्तकही पाहायचा कुणाला अधिकार नाही,’ असं मला बजावून सांगितलं.

१९९६च्या पावसाळ्यात मी टोकियोत मुक्कामाला होतो. तिथल्या जपानी ग्रंथालयातून आणि परराष्ट्र खात्यातूनही मला खूप अस्सल कागदपत्रं मिळाली. त्यांच्या घसघशीत आधारावरच मी माझ्या ‘महानायक’ कादंबरीमधल्या युद्धाचा कालखंड लिहिला आहे. मात्र, तेव्हा टोकिओमधल्या भारतीय दूतावासात मात्र माझी अनेकदा उलटतपासणी घेतल्यासारखा प्रकार घडायचा. आयपीएस दर्जाचे एक वरिष्ठ अधिकारी ‘एवढ्या दूर येण्याचे तुम्हाला कारण काय? तुम्हाला नेताजींच्या मृत्यूच्या संदर्भातच स्वारस्य आहे की काय?’ अशा अनेक प्रश्‍नांची सरबत्ती माझ्यावर करायचे.

आज मात्र नेताजींवर जीवनभर प्रेम करणाऱ्या माझ्यासारख्या अनेक नेताजीप्रेमींना मनापासून खूप आनंद होत आहे. त्याचं कारण म्हणजे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या विषयाबाबत घेतलेला रस आणि दाखवलेली आस्था. पंतप्रधानांनी एक-दीड महिन्याची पुरेशी मुदत देऊन देशातल्या आणि परदेशांतल्या नेताजींच्या सर्व नातेवाइकांना भेटीचं निमंत्रण दिलं आहे. त्यांच्या देहबोलीतून हेच ध्वनित होतं, की मोदींना नेताजींच्या आप्तस्वकीयांच्या साक्षीनं केवळ त्यांनाच नव्हे, तर संपूर्ण देशाला वेगळं काही तरी सांगायचं आहे. एकदाच काय तो पडदा उघडला जावा आणि रहस्यमयतेची सारी दालनं खुली व्हावीत. या भूमीवर जीवनातल्या प्रत्येक क्षणी प्राणापल्याड प्रेम करणाऱ्या नेताजींसारख्या युगपुरुषाचं नेमकं झालं तरी काय? खरंच ते १९४५ नंतर हयात होते का? कुठे नि कसे? त्यांची आणि शास्त्रीजींची रशियात भेट घडली, हे खरं का? कुण्या बलाढ्य राष्ट्राच्या काटेरी कुंपणानं एक युद्धकैदी म्हणून त्यांना जखडून ठेवलं होतं, की कुणी आपल्या राजकीय स्वार्थासाठी त्यांना ओलीस ठेवलं होतं? १९४५ नंतर कसं होतं त्यांचं जीवन? ‘जसा आभाळात चंद्र, तसा आम्हा भारतीयांच्या हृदयात सुभाषचंद्र!’ असं आचार्य अत्रे यांनी वर्णन केलेले आमचे सुभाषचंद्र!

आता उत्सुकता कमालीची ताणली गेली आहे. नेताजींच्या आप्तस्वकीयांच्या सोबतच आम्हा नेताजीप्रेमींचे कान नवा रहस्यस्फोट ऐकण्यासाठी आतूर झालेले आहेत !

विश्वास पाटील
सौजन्य – दैनिक सकाळ

Leave a Comment