Monday , September 24 2018
Home / featured / मोठ्यात मोठी महत्त्वाकांक्षा

मोठ्यात मोठी महत्त्वाकांक्षा

– संदीप वासलेकर

मी ३० वर्षांपूर्वी ऑक्‍सफर्डमधून पदवी घेऊन परतलो, तेव्हा भूतानमध्ये शिक्षकाची नोकरी करण्यासाठी वर्तमानपत्रातली जाहिरात पाहून अर्ज केला होता. मला ती नोकरी मिळाली नाही*. *नंतर आयुष्याला वेगळं वळण मिळालं व ती महत्त्वाकांक्षा अपुरी राहिली. पण मला भूतानमधली ती शिक्षकाची नोकरी न मिळाल्याची हुरहूर एकसारखी वाटते. कधी कधी अजूनही शिक्षक व्हावंसं वाटतं मला.

एकदा नॉर्वेतील एक विद्यार्थिनी माझ्या शेजारी बसली होती. आंतरराष्ट्रीय राजकारण, अर्थकारण, साहित्य या सारख्या अनेक विषयांचं तिचं आकलन पाहून मी प्रभावित झालो. ती नॉर्वेची नागरिक होती व लुंडमध्ये शिक्षण घेत होती. तिला विचारलंः ‘‘इथं पदवी मिळाल्यावर पुढं काय करायची इच्छा आहे?’’

ती म्हणालीः ‘‘माझी महत्त्वाकांक्षा खूप मोठी आहे; पण ती मला साध्य करता येईल की नाही, हे मला माहीत नाही.’’

मी विचारलंः ‘‘तुला यूनो, नॉर्वेचं पराराष्ट्र मंत्रालय, नॉर्वेतल्या तेलाच्या आंतरराष्ट्रीय कंपन्या इथं मोठ्या जबाबदारीवर काम करण्याची इच्छा आहे का?’

ती म्हणालीः ‘‘बिलकूल नाही. माझी महत्त्वाकांक्षा खूप मोठी आहे. ती खूप प्रयत्न करूनही साध्य नाही झाली, तर मग परराष्ट्र मंत्रालय, यूनो, वगैरे इतर बाबींचा विचार करता येईल.’’

मी पुन्हा विचारलंः ‘‘तुझी एवढी मोठ्यात मोठी महत्त्वाकांक्षा आहे तरी काय, हे मला सांगू शकशील का?’’**ती म्हणालीः “मला नॉर्वेतल्या एका ग्रामीण शाळेत शिक्षिका होण्याची महत्त्वाकांक्षा आहे; पण आमच्याकडं शिक्षिकेची नोकरी अतिशय प्रतिष्ठित समजली जाते. ती मिळवण्यासाठी सर्वांत हुशार विद्यार्थी व विद्यार्थिनी प्रयत्न करतात. त्यामुळं प्रवेश मिळणं सोपं नाही.’’

ती विद्यार्थिनी अपवादात्मक नव्हती. युरोपमध्ये ऑक्‍सफर्ड, केंब्रिज, सोबोर्न, लुंड, उपसाला, हाइडलबर्ग या विद्यापीठांतल्या अनेक युवक व युवती शिक्षक अथवा अध्यापक होण्याची महत्त्वाकांक्षा बाळगतात.*

जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग, अर्थतज्ज्ञ अमर्त्य सेन, राजकीय तज्ज्ञ जोसेफ नाथ असे विविध क्षेत्रांतले तज्ज्ञ अध्यापनाचं काम आवर्जून करतात.

आपल्या देशातले अनेक उद्योगपती, राजकीय नेते, खेळाडू, कलाकार यांचं आपण कौतुक करतो; पण त्या सगळ्यांच्या जडणघडणीमागं त्यांच्या शाळेतल्या शिक्षकांचा हातभार होता, याची जाणीव आपल्याला राहत नाही.

भारताच्या सर्वोच्च नेत्यांपैकी डॉ. राधाकृष्णन, वेंकटरामन व डॉ. अब्दुल कलाम या तीन राष्ट्रपतींनी उच्च पदावर आल्यावरही शिक्षकांचं महत्त्व सांगण्याचा खूप प्रयत्न केला.

शिक्षक होणं ही खूप मोठी महत्त्वाकांक्षा असू शकते,’ असं त्यांपैकी कुणालाही वाटलं नाही, याची मला खंतही वाटते.

भारतात समाजसेवा म्हणून शिक्षण क्षेत्रात कार्य करू इच्छिणारे अनेक युवक आहेत; परंतु ‘शिक्षक होणं’ या बाबीकडं महत्त्वाकांक्षा म्हणून पाहणारे युवक मला भेटले नाहीत.

आपल्याकडं शिक्षकांची स्थिती खूप विदारक आहे. सरकारी शाळांतल्या शिक्षकांचा वापर सर्रासपणे जनगणना, निवडणुका व इतर कारकुनी कामांसाठी केला जातो. एवढंच नव्हे तर, काही गावांत सरपंच हे शिक्षकांना घरची अथवा शेताची कामं करण्यास भाग पाडतात. म्हणजे शिक्षण सोडून आपण शिक्षकांना एक प्रकारे गुलाम केलं आहे.

आपलं सर्वांत मोठं उत्तरदायित्व आपल्या शिक्षकांकडं प्रामुख्यानं आहे, असं कुणाला वाटतं का? समाजात जास्तीत जास्त मान, प्रतिष्ठा व आदर असलेली व्यक्ती ही शिक्षकच असली पाहिजे, याविषयी आपल्या मनात तीळभरही शंका असायला नको.

जिथं शिक्षक होतो भ्रष्ट, तो समाज होतो नष्ट,’ हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे.

उद्याचा भारत आजच्या विद्यार्थ्यांमधून बनणार आहे. त्यासाठी भारतातल्या सर्व ६ लाख खेड्यांतल्या व सर्व शहरांतल्या सर्वच्या सर्व विद्यार्थ्यांना सक्षम करणारे उच्च दर्जाचे शिक्षक देशभर हवे आहेत.*

नॉर्वेतली ती विद्यार्थिनी ‘शिक्षक होणं’ ही मोठ्यात मोठी महत्त्वाकांक्षा समजते. कारण नॉर्वे हा अतिशय प्रगत देश आहे. शिक्षक होणं हे जगातल्या प्रगत देशांत प्रतिष्ठेचं समजलं जातं. ज्या देशात सर्वांत बुद्धिमान युवक हे शिक्षक होणं, ही केवळ समाजसेवा समजतात किंवा शिक्षणाकडं एक महत्त्वाचं करिअर म्हणून पाहत नाहीत, ते देश मागासलेले असतात.

(लेखक जागतिक घडामोडींचे अभ्यासक व पन्नासहून अधिक  देशांचे सल्लागार आहेत)

About Avinash Dudhe

अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या मीडिया वॉच अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.

Check Also

आंतरजातीय विवाह आणि मुरली चरित्र

Share this on WhatsApp  – प्रा.हरी नरके आंतरजातीय विवाह केला म्हणून त्याच्या सासर्‍यानेच त्याची हत्त्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *