मोदी जिंकणारच!

– संजय आवटे
————————

घाईतल्या या काही नोंदी.

१. कॉंग्रेसचे तत्त्वज्ञान म्हणजे सर्वसमावेशकतेचे तत्त्वज्ञान, असे आपण म्हणत असतो. तसे ते आहेच. पण, गुजरातमध्ये ज्यांच्या भरवशावर कॉंग्रेसची भिस्त होती, ते तिघेही जातींचे प्रतिनिधी होते. जातवास्तवाचे आकलन हवे, हे खरे; पण ज्या प्रकारे निवडणूक व्यूहरचना आखल्या गेल्या, त्यातून कॉंग्रेसच निवडणूक खेळी म्हणून जातीय ध्रुवीकरण करते आहे, असा मेसेज जाऊ शकतो.
कर्नाटकात लिंगायतांचा मुद्दा कॉंग्रेसला विचारांच्या पातळीवर आणता आला नाही. त्यामुळे, तीही खेळी, ध्रुवीकरणाची खेळी, उरली.
संघ आणि भाजपचा छुपा अजेंडा ठाऊक नसणारे मोदीसमर्थक अधिक आहेत. अशा लोकांना वरवर पाहाता, कॉंग्रेसच संकुचित राजकारण करते आहे, असे साधार पटू शकते.
भारतात अनेकदा हिंदू-मुस्लिम ध्रुवीकरण गृहीत धरले जाते, नैसर्गिक मानले जाते आणि जातीय ध्रुवीकरण मात्र संकुचित मानले जाते. अशावेळी जातवास्तवाचे आकलनही लक्षात ठेवायचे आणि तरीही जातनिरपेक्ष भूमिका घेत पुढे जायचे आव्हान असते. धार्मिक ध्रुवीकरण जे करतात, त्यांना हिंदू म्हणजे असा ब्राह्मणी धर्म अपेक्षित असतो की ज्यानेच जातींना जन्म दिला. पण, तरीही जातवास्तवाच्या आकलनापासून हे सोईने पळ काढतात आणि तुम्हालाच जातीयवादी ठरवतात. जातींना एकवटून धर्माकडे जाण्याचा त्यांचा कट अनेकदा वरवर तरी जातनिरपेक्ष, मानवतावादी वाटतो. आणि, सतत जातीबद्दल बोलणारा खरा जातीअंतवादीही जातीयवादी ठरतो. जातीय दंगली घडवणारे, कोणत्याही जातीचे नव्हे, तर कथित हिंदुत्ववादी असतात! पण, त्यांची मांडणी विचित्र अस्मितांची सरमिसळ करणारी असते. त्यातून सा-या जाती परस्परविरुद्ध उभ्या राहून, अंतिमतः हिंदुत्वाच्या दिशेने जाव्यात, असा “फोडा आणि आपल्या अजेंड्याशी जोडा’ हा डाव असतो. हा गुंता लक्षात घेत राजकीय व्यूहरचना करायला हवी. जातवास्तव कळल्याचा दावा करणा-या अनेकांना हा मुद्दाच समजत नाही. त्यांची मांडणी अंतिमतः संघाच्याच पथ्यावर कशी पडते, हे त्यांना कळत नाही.
गेले काही महिने मी हाच मुद्दा मांडतोय.
पण, मुदीशेठच्या निमित्ताने मनोरंजनाचे साधन मिळालेले आपले पेन्शनर विचारवंत आणि चळवळी संपल्याने बरोजगार झालेले तरुण कार्यकर्ते यांना हे आकलनच होत नाही. ते सोशल मीडियावरच्या हाणामारीवर खुश आहेत. त्यांना जगण्याचे प्रयोजन मिळाले आहे.

२. सर्वसमावेशकतेची प्रतिके वापरणे अथवा विकसित करणे याऐवजी मोदींनी निर्मिलेल्या प्रतिकांत राहुल कसे अडकले, हे “जानवेधारी हिंदू”ने अधोरेखित केले.
तुमची प्रतिके पळवत, त्यांनी नव्या प्रतिमांचे खेळ सुरु केले. आणि, तुम्ही मात्र तुमचीही प्रतिकं जाऊ दिली नि वर पुन्हा त्यांच्या प्रतिमांच्या जाळ्यात स्वतःच्या अस्तित्वाची आत्महत्या होऊ दिली.
राजकारण आणि निवडणुका हा प्रतिकांचा खेळ असतोच. ज्या देशातल्या निवडणुका चिन्हांवरच प्रामुख्यानं लढवल्या जातात, अशा देशात तर आणखी जास्त. आजच्या मल्टिमीडिया भवतालात, प्रतिमा आणि प्रतिकांचं राजकारण ऐन भरात आलेलं असताना, सांस्कृतिक राष्ट्रवादाची मांडणी करणारे लोक यात दोन पावलं पुढं आहेत. बहुसंख्याकवादाच्या सांस्कृतिक भुयारातून ते आपला अजेंडा पुढं रेटतात. अस्मिता आणि प्रतिकं यातून लोकांवर राज्य करतात. याउलट, पुरोगामी शक्तींना मात्र अद्यापही आपली प्रतिकं, प्रतिमा विकसित करता येत नाहीत. आहेत त्या प्रतिमा नीटपणे पोहोचवल्या जात नाहीत. त्यामुळं त्यांचे मुद्दे ‘पॅसिव्ह’ तरी होताहेत किंवा संकुचिततावाद्यांच्या परिभाषेच्या जाळ्यात परिवर्तनवादी अडकताहेत.

३. एक तर मोदींनी हा “खेळ” केलाय. आणि, हा खेळ पुन्हा प्रतिमांचा केलाय. चेह-यांचा केलाय. त्यात “मोदी विरुद्ध राहुल” असा संघर्ष मोदींना हवाय.
मला आठवतं, मी लहान असताना, वक्तृत्व स्पर्धांमध्ये भाग घ्यायचो. बहुतेक जिंकायचोच. तरीही माझ्या आईनं स्पर्धेतलं माझं एकही भाषण कधी सभागृहात येऊन ऐकलं नाही. कारण, ती म्हणायची, “तू बोलायला उभा राहिलास की मला टेन्शन येतं. हा मध्येच भाषण विसरणार तर नाही ना! चुकीचं बोलणार नाही ना! भलतंसलतं काहीतरी बोलणार नाही ना…” वगैरे. आज राहुल बोलत असताना, राहुलसमर्थकांना अगदी असंच भय वाटत असतं. राहुलचं कौतुक म्हणजे एखाद्या लहान बाळाच्या कौतुकासारखं सुरु असतं. पिलू बोलतो आता, स्पष्ट बोलायला लागला आता, सलग पाच मिनिटं बोलतो आता, अशा छापाचं. त्यामुळं चेह-यांच्या लढाईच्या सापळ्यात कॉंग्रेसनं अडकायचं की स्वतंत्र राजकारण विकसित करायचं, आपली परिभाषा विकसित करायची, याचा निर्णय घ्यावा लागणार आहे.

४. पक्ष म्हणून कॉंग्रेस हा आजही अत्यंत मूर्दाड, कृतघ्न असा पक्ष आहे. आणि, अपवाद वगळता तिथल्या नेत्यांना त्यांच्या आदर्शवादाविषयी, सहानुभूतीदारांविषयी, गेल्या चार वर्षांत स्वतःला पणाला लावणा-यांविषयीही काही देणेघेणे नाही. याच्या अगदी उलट भाजपचे आहे. कारण, केडर हेच त्यांचे शक्तिस्थळ आहे. त्यांना अजेंडा माहीत आहे, ध्येय पक्के आहे.

राजकारणाची रणभूमी वापरुन देश ‘राजकारणमुक्त’ करणे हे त्यांचे उद्दिष्ट्य आहे.

५. त्यांना ‘राजकारण’ नकोच आहे. आणि, आपल्याकडेही अनेकांना ‘राजकारण’ नको असते. गफलत आहे ती ‘राजकारण’ या शब्दाच्या व्याख्येत. राजकारणाला बदनाम करताना, राजकीय प्रक्रियेलाच मुद्दाम मलीन केले गेले. लोकशाही, सामाजिक न्याय, समता ज्यांना नको आहे, त्यांना राजकारणच नको असते. सुनील खिलनानी आपल्या ‘आयडिया ऑफ इंडिया’ या पुस्तकात म्हणतात त्याप्रमाणे, “भारतात राजकारण खूप आहे, असे नाही फक्त, तर राजकारणामुळेच भारत आहे. आजचा भारत हे राजकीय प्रक्रियेचे अपत्य आहे. ”
पण, कायम पाच हजार वर्षे मागे जाणा-यांना ही राजकीय प्रक्रियाच नाकारायची असते. मग, राजकारण वाईट; नेते वाईट, अशी आवई उठवत देशाला ‘राजकारणमुक्त’ करायचे! चेहराविहीन करायचे!!

हा डावही कॉंग्रेसला समजलेला नाही. आमच्या समाजवादी, साम्यवादी पक्षांना हे आकलन व्हावे आणि त्यातून त्यांनी काही कृती करावी, अशी अपेक्षाही नाही.
असो.
या फक्त नोंदी. नंतर विस्ताराने मांडेनही.

(संजय आवटे यांच्या फेसबुक पेजवरून साभार)

Previous articleधर्माभिमान करितो धर्माचाची ऱ्हास
Next articleकाँग्रेसकडे हरण्यासारखं आता काहीच नाही
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.