यालाच विकास म्हणतात का हो भाऊ?

(संदीप वासलेकर)
सौजन्य – दैनिक सकाळ
उत्तम कांबळे यांच्या लेखात (सदर ः फिरस्ती (‘अच्छे दिन’ काय असतं रे भाऊ?), ३१मे) ‘सप्तरंग’मध्ये अलीकडंच एक छायाचित्र प्रसिद्ध झालं आहे. ‘एका गरीब महिलेनं तीन दगडांची चूल मांडून रस्त्यावर संसार मांडला आहे…’ असं ते छायाचित्र आहे. हे छायाचित्र भारतातली वस्तुस्थिती अतिशय बोलक्‍या पद्धतीनं सादर करतं.

ते छायाचित्र पाहिल्यावर माझी एक आठवण जागी झाली. काही दिवसांपूर्वी मी लोणावळ्याजवळ wasalekarरात्री एका कामासाठी गेलो होतो. रात्री उशीर होणार होता. मला एक्‍सप्रेस वेवर रात्री उशिरा जाण्याची भीती वाटत होती. अपघात होईल असा विचार मनाला सतावत होता. म्हणून एका मित्रानं तिथल्या एका रिसॉर्टमध्ये रात्रभर राहण्याची सोय केली. ते रिसॉर्ट म्हणजे एक छोटं गावच होतं. त्यात इंग्लंड-अमेरिकेतल्या एखाद्या गावाप्रमाणे बंगले, त्यापुढं हिरवळ, सुंदर रस्ते अशी रचना होती.

मी रात्री ११ ते एक तिथल्या स्वागतकक्षात बसून निरीक्षण करत होतो. एक रात्र राहण्याचा दर २५-३० हजार रुपये होता. लंडनच्या महागड्या मेफेअर भागातही अतिशय चांगल्या हॉटेलमध्ये दर यापेक्षा कमी आहे. विचार केला की लंडन व पॅरिसपेक्षा महागड्या हॉटेलमध्ये येणार कोण? पाहतो तर रात्री ११ ते एक यादरम्यान २५-३५ वयोगटातले युवक व युवती खूप मोठ्या संख्येनं येत होते. बरेच जण घोळक्‍यानं होते. काही जोडपी होती. मध्यरात्रीनंतर ‘खोली शिल्लक नाही’, असं कर्मचाऱ्यांनी सांगितलेलं मी ऐकलं. तरीही मोठ्या प्रमाणात युवक येत होते. येणाऱ्या सर्व युवकांकडं आलिशान गाड्या होत्या. त्यांचे कपडे सिनेमातल्या नट-नट्यांना लाजवतील असे होते. मी कर्मचाऱ्यांकडं चौकशी केली, तेव्हा कळलं की त्या गावात अनेक पार्ट्या होत्या.
मी अनेक देशांतल्या राजवाड्यांमधलं जीवन पाहिलं आहे; परंतु त्या रिसॉर्टमध्ये संपत्तीचे जे ओंगळवाणं प्रदर्शन मी पाहिलं, तसं मात्र इतर कुठंच पाहिलं नाही. त्या रात्रीची दृश्‍यं माझ्या डोळ्यांसमोर अजूनही आहेत.

एकीकडं, कमावण्याच्या वयात नुकतंच पदार्पण केलेल्या युवकांनी रात्री लाखो रुपयांचा चुराडा करायचा आणि दुसरीकडं आयुष्यभर काबाडकष्ट केलेल्या म्हातारीनं तीन दगडांची चूल मांडून रस्त्यावर संसार थाटायचा! यालाच विकास म्हणतात का हो भाऊ?

—————————————————–
ज्याप्रमाणे हाताची पाचही बोटं सारखी नसतात; त्याप्रमाणेच देशातल्या सर्व लोकांची क्षमताही सारखी नसते. परिणामी प्रत्येकाचं उत्पन्न वेगळं असतं आणि ते साहजिकही आहे. साम्यवाद एक अशक्‍य आदर्शवाद आहे, हे रशिया व चीनमध्ये सिद्ध झालं आहे.
मुक्त अर्थव्यवस्थेत उत्पन्नाची विषमता असणारच; परंतु जर कुणी उत्पन्न प्रामाणिकपणे मिळवलेलं असेल तर ठीक आहे. एखाद्या शास्त्रज्ञानं नवीन शोध लावला अथवा एखाद्या उद्योजकानं नावीन्यपूर्ण उद्योग सुरू केला आणि ते श्रीमंत झाले, तर त्या बाबीचं आपण स्वागत केलं पाहिजे; परंतु प्रत्यक्षात श्रीमंतीचा माज असलेला वर्ग कोणत्या मार्गानं श्रीमंत होतो? सरकारी बॅंकांकडं सुमारे २,००,००० कोटी रुपयांची थकबाकी आहे. यापैकी कष्ट करणारे कामगार, शेतकरी, लघुउद्योजक यांची थकबाकी किती आहे? व राजकीय पक्षांशी संबंध असलेल्या मोठ्या उद्योगपतींची थकबाकी किती आहे? एकदा जर थकबाकी असलेल्याची यादी जाहीर झाली, तर सर्वसामान्य लोकांना कळेल, की रिसॉर्टमध्ये रात्री लाखो रुपये खर्च करणाऱ्या मुलांकडं पैसे का आहेत व तीन दगडांची चूल मांडणाऱ्या म्हातारीची स्थिती वाईट का आहे ते!

आता २,००,००० कोटी रुपये म्हणजे किती मोठी रक्कम झाली! या वर्षी आरोग्य खात्याच्या वाटणीला अंदाजपत्रकात ३४,००० कोटी रुपये आले आहेत. जर सरकारी बॅंकांची थकबाकी एवढी मोठी नसती, तर आरोग्य खात्यासाठी सातपट पैसे उपलब्ध झाले असते. रिसॉर्ट बंद झालं असतं; पण रस्त्यावर चूल मांडणाऱ्या म्हातारीला आजारी पडल्यावर जवळ एक हॉस्पिटल मिळालं असतं.

प्रश्‍न केवळ आर्थिक विषमतेपुरता मर्यादित नाही. गाडीमध्ये रात्री दारू पिऊन फिरणारा नट, वकील, हॉटेलमालक रस्त्यावरच्या लोकांचे जीव घेतात. हुशार वकिलांच्या मदतीनं जामिनावर बाहेर फिरतात. रस्त्यावर संसार मांडणाऱ्यांची मुलं आपल्या आई-वडिलांपासून कायमची पोरकी होतात व दारुड्यांचे मित्र ट्‌विटर आणि व्हॉट्‌सॲपवर निरोप पसरवतात… ‘हा नट आणि ती वकील किनई स्वभावानं खूप चांगले आहेत. गरिबांना नेहमी मदत करतात. समाजकार्य करतात. आता काही लोक रस्त्यावर राहण्याचा गुन्हा करतात, तर त्यात त्या बिचाऱ्यांचा काय दोष?’ श्रीमंतांनी खून पाडले तरी त्यांना स्वातंत्र्य मिळवण्याचा मानवाधिकार आहे व रस्त्यावर येऊन संसार मांडणाऱ्यांना जीवनाचाही हक्क नाही. यालाच विकास म्हणतात का हो भाऊ?

—————————————————–
एका मित्रानं आग्रह केला म्हणून मी थॉमस पिकेटी यांचं अर्थशास्त्रावरचं पुस्तक विकत घेतलं. पाहतो तर ते ७०० पानांचं जाडजूड पुस्तक होतं. मी बाजूला ठेवलं. अर्थशास्त्राच्या गेल्या ३०० वर्षांच्या इतिहासात पिकेटी हे प्रमुख पाच तज्ज्ञांपैकी मानले जातात. म्हणून कुतूहलानं मी फक्त मनोगत वाचायला घेतलं व पुढच्या तीन-चार दिवसांत संपूर्ण पुस्तक वाचलं.
या पुस्तकात पिकेटींनी अतिशय सविस्तर आकडेवारी व तपशील देऊन २१व्या शतकात जगापुढं आर्थिक विषमता कशी वाढणार आहे, याचं विश्‍लेषण केलं आहे. विषमतेची झळ जास्तीत जास्त अमेरिकेत असेल. पिकेटींकडं भारत, चीन व ब्राझील या देशांसंबंधीची विश्‍लेषणास आवश्‍यक असलेली आकडेवारी नाही; पण काही ढोबळ हिशेब करून या तिन्ही देशांतही विषमता खूप वाढेल, असा कयास त्यांनी मांडला आहे.

पिकेटींचं जसं कौतुक झालं, तशी त्यांच्यावर घणाघाती टीकाही झाली. टीकाकारांचा त्यांच्या आकडेवारीला अथवा विश्‍लेषणाला आक्षेप नाही. ते सर्व बरोबर आहे, असं ते मानतात; परंतु आर्थिक विषमता या विषयावर इतकी प्रचंड खोली असलेलं पुस्तक लिहून पिकेटी यांनी चूक केली, असं ते सांगतात. टीकाकारांचे म्हणणं असं, की अर्थतज्ज्ञांनी केवळ ‘विकास’ या विषयावर चर्चा करावी. ‘विषमता’ या विषयावर काही लिहिणं हेच चूक आहे. या जगभर गाजलेल्या पुस्तकावर भारतात फारशी चर्चा का नाही?
मुंबईच्या नेहरू केंद्रात एक परिसंवाद चालला होता. एका सुप्रसिद्ध वाहिनीच्या अँकर त्या परिसंवादाचं सूत्रसंचालन करत होत्या. एका मोठ्या अर्थतज्ज्ञानं ‘भारताचा विकास’ यावर आपले विचार मांडले व हा विकास करण्यासाठी नवीन सरकारनं कार्पोरेट क्षेत्रासाठी जमीन व बॅंकांची कर्जं याबाबत खूप सवलती द्याव्यात, असं मत व्यक्त केलं. नंतर चर्चेत ग्रामीण भागात रोजगार निर्माण करण्यासाठी काय करायला हवं, हा प्रश्‍न पुढं आला. त्यावर त्या अँकरनं चर्चा होऊच दिली नाही. ‘‘आपण इथं ‘भारताचा विकास’ या विषयावर चर्चा करण्यासाठी जमलेलो आहोत. त्याचा ग्रामीण भाग, कृषी, युवकांचा रोजगार असल्या गोष्टींशी काही संबंध नाही. हे सगळे प्रश्‍न डाव्या विचारसरणीचे लोक उगाचच उपस्थित करतात. नक्षलवादी जिल्ह्यात कॉर्पोरेट संस्कृती आली तर नक्षलवाद होणार नाही.’’ तिथं एक सुप्रसिद्ध संपादक उपस्थित होते. मी त्यांना विचारलं, ‘‘यालाच विकास म्हणतात का हो भाऊ?’’

—————————————————–
माझा एक मित्र छोटा उद्योजक आहे. त्यानं एका मोठ्या कंपनीला काही माल पुरवला. कंपनीच्या व्यवस्थापकांनी त्याला माल चांगल्या दर्जाचा असल्यामुळं शाबासकी दिली व अजून एक ऑर्डर दिली. त्यानं मोठ्या कंपनीकडून आधी पुरवलेल्या मालाचे पैसे मागितले. व्यवस्थापकसाहेब त्याला म्हणाले, ‘‘सध्या आमच्याकडं पैसे नाहीत. दोन महिन्यांच्या उसनवारीवर माल दे. आम्ही सगळ्यांकडूनच उसनवारीवर माल घेतो.’’
मी त्या उद्योजकाला घेऊन रेल्वे स्थानकावर गेलो. तिथं वडापावच्या गाडीशी फाटकी विजार घातलेला, दाढी न केलेला माणूस उभा होता. त्यानं गाडीवाल्याकडं वडापाव मागितला. गाडीवाल्यानं दिला. त्या फाटकी विजार घातलेल्या माणसानं १०० ची नोट गाडीवाल्याला दिली. गाडीवाला म्हणाला, ‘‘अरे राहू दे पैसे.’’ तो म्हणाला, ‘‘नाही. मी तुमचा वडापाव खाल्ला आहे. तो मला फुकट नको. तुमच्या वस्तूचे पैसे घ्या.’’

दोन भारतीय नागरिक. एकाच्या खात्यात हजारो कोटी रुपये. तोच काय, पण त्याचे व्यवस्थापकदेखील त्यांच्या मुलांना एका रात्रीत लाखो रुपयांचा चुराडा करण्यासाठी रिसॉर्टमध्ये पाठवू शकतात. दुसऱ्याच्या खिशात एकूण १०० रुपये. पहिला लहान उद्योजकाकडून उसना माल घेतो. दुसरा घेतलेल्या वस्तूची लगेच किंमत देतो. पहिल्याचं अर्थशास्त्र फसवणुकीचं. दुसऱ्याचं अर्थशास्त्र प्रामाणिकपणाचं.
अप्रामाणिक व्यवहार करून, गरिबांच्या जागा लुबाडून, बॅंकांची कर्जं बुडवून, लहान उद्योजकांकडं कर्जं मागून जे अर्थशास्त्र चालतं, त्याला विकास म्हणायचा की नवीन शोध लावून, उच्च दर्जाचा ग्राहक जगभर निर्यात करून, कष्टकरी कामगारांना योग्य मोबदला देऊन, लहान उद्योजकांना व बॅंकांना वेळेवर पैसे देऊन जे सुदृढ अर्थशास्त्र चालतं, त्याला विकास म्हणायचं? न कमावणाऱ्या युवकांचे चोचले पुरवण्यासाठी रिसॉर्ट उभे राहतात, त्याला विकास म्हणायचं की उत्तम कांबळे यांच्या छायाचित्रातली म्हातारी सुबक घरात राहायला जाईल, त्याला विकास म्हणायचं? शेतकऱ्यांपाठोपाठ हताश झालेले लघुउद्योजक जेव्हा आत्महत्या करतील, तेव्हा आपण विकास केला असं म्हणायचं, की रेल्वे स्थानकावरचा तो वडापाव खाणारा प्रामाणिक माणूस जेव्हा वैभवसंपन्न होईल, त्याला आपण विकास समजायचं? केवळ ‘विकास’, ‘विकास’ म्हणून झोपेत बडबडण्यापेक्षा आपण सर्वांनी जागृत होऊन स्वतःलाच विचारलं पाहिजे, ‘‘विकास म्हणजे काय हो भाऊ?’’
(संदीप वासलेकर)
सौजन्य – दैनिक सकाळ

Previous articleएकमेका साह्य करू अवघे धरू कुपंथ !
Next articleसंघ-भाजपाचा कोतेपणा संपत नाही
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.