योगी आदित्यनाथच्या अन्यायाचा बळी

मुग्धा कर्णिक

 

आदित्यनाथ बिश्तच्या दुष्टपणाचा, अन्यायाचा एक बळी. एक सत्कर्मी कसा तुरुंगात सडवला जातो आहे…                                                                                          
आपण वाचतो नि विसरतो… माणसे भोगत रहातात.
डॉ. काफील यांनी तुरुंगातून लिहिलेले पत्र… पाच दिवसांपूर्वीच तळतळून हे पत्र लिहिले आहे. मराठीत अनुवादले आहे. वाचू दे सर्वांना या द्वेषभक्तांचे हलकट प्रताप.
डॉ. काफील खान, उत्तर प्रदेशातील गोरखपूरमध्ये झालेल्या बालमृत्यू कांडात अनेक मुलांचे प्राण ज्याच्यामुळे वाचले तो डॉक्टर अजूनही खोट्या आरोपांखाली तुरुंगात आहे. जिथे जामीनही नाकारला जातो अशी खालची कोर्ट्स न्यायाच्या माना मुरगाळत आहेत. डॉ. काफील यांनी तुरुंगातून वहीच्या दहा पानांवर हे पत्र लिहून पत्रकारांपर्यंत पोहोचवले आहे. आणि ते अर्थातच मुख्य प्रवाहातील नव्हे तर समांतर पर्यायी प्रवाहातील पत्रकारांनी पोहोचवले आहे.
या प्रकरणात सर्वोच्च पातळीवर लक्ष घातले गेले पाहिजे. मेडिकल फ्रॅटर्निटीनेही डॉ. काफील यांच्या पाठीशी निर्भयपणे उभे राहिले पाहिजे.
शेअर करा जरूर. कॉपीपेस्टही केले तरी चालेलच.
——————–

डॉ काफील लिहितात-
———

प्रत्येक क्षण मी जपला आहे, प्रत्येक दृश्य माझ्या मनात अगदी आत्ताच घडून गेल्यासारखे ताजे आहे डोळ्यासमोर. आठ महिने गजांआड असह्य छळ आणि अवहेलना सहन केल्यानंतरही ते तसेच आहे. मी कधीकधी प्रश्न विचारतो स्वतःला- ‘मी खरंच गुन्हेगार आहे?’ आणि माझ्या हृदयाच्या तळातून उमटतो एक स्पष्ट मोठ्ठा नकार- नाही.
१० ऑगस्ट २०१७च्या त्या रात्री मला वॉट्सॅपवर मेसेज आला, त्या क्षणापासून मी एक डॉक्टर म्हणून, एक पिता म्हणून, देशाचा एक जबाबदार नागरिक म्हणून जे जे करायला हवं ते ते केलं. लिक्विड ऑक्सिजनचा पुरवठा अचानक थांबल्यावर ज्यांचे जीव धोक्यात आले त्यांना वाचवण्यासाठी मी सारे केले. तऑक्सिजन नाही म्हणून मरणाच्या हातात सापडत चाललेली ती निष्पाप मुले वाचवण्यासाठी मी सर्वशक्तीनिशी प्रयत्न केले. मी सर्वांना फोन केले, भीक मागितली, बोलत राहिलो, धावलो, गाडी पळवली, मी ऑर्डर केली, ओरडलो, किंचाळलो, समजूतही घालत राहिलो, पैसे खिशातून खर्च केले, उसनवार केली… रडलो. माणूस म्हणून जेजे करणं शक्य होतं ते सर्व केलं.

माझ्या विभागप्रमुखांना, सहकाऱ्यांना, प्राचार्यांना, अक्टिंग प्राचार्यांना, गोरकपूरच्या डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेटना, गोरखपूरच्या अडिशनल डायरेक्टर हेल्थना, सीएमएस- सीआयसी, वगैरे सर्वांना फोन करून परिस्थिती किती गंभीर आहे ते सांगितलं. ऑक्सिजन संपल्यामुळे मुले मरत आहेत हे सांगितलं. सगळे कॉल रेकॉर्ड्स आहेत माझ्याकडे.
मी पुरवठादारांकडे भीक मागितली- मोदी गॅस, बालाजी, इंपेरिअल, मयूर गॅस एजन्सी, बीआऱडी कॉलेजच्या आजुबाजूची सगळी हॉस्पिटल्स, सर्वांचे कॉन्टॅक्ट नंबर्स मिळवले आणि मोठी सिलिंडर्स पाठवायची विनंती केली. शेकडो निष्पाप बालकांच्या जिवाचा प्रश्न होता.
मी त्यांना रोख पैसे दिले आणि उरलेले डिलिवरी नंतर देईन हे सांगितलं. आम्ही २५० सिलिंडर्सची व्यवस्था केली. जोवर लिक्विड ऑक्सिजनचा टॅन्क येत नाही तोवर यावर काम चालवायचे होते. एक मोठा सिलिंडर २१६ रुपयांना पडतो.
मी एकेका क्युबिकलपासून दुसरीकडे धावत होतो. १०० नंबरच्या वॉर्डपासून १२ नंबरपर्यंत तिथून इमर्जन्सी वॉर्डपर्यंत- ऑक्सिजन सप्लायच्या जागेपासून ते जिथे तो पोहोचतो तिथवर- ऑक्सिजन येत रहावा म्हणून धावत राहिलो.
जवळच्या हॉस्पिटल्समधून सिलिंडर मिळवण्यासाठी माझी गाडी पळवत होतो. जेव्हा हे पुरेसे नाही हे कळले तेव्हा मी सीमा सुरक्षा बलच्या ऑफिसात गेलो. तिथे डिआयजींना भेटून सगळी परिस्थिती सांगितली. त्यांनी फार झटकन प्रतिसाद दिला आणि मदत केली. त्यांनी मोठा ट्रक दिला, रिकामे सिलिंडर गॅस एजन्सीपर्यंत न्यायला, भरलेले सिलिंडर्स आणायला, पुन्हापुन्हा ते भरून आणायला सैनिक दिले. त्यांनी ४८ तास न थांबता काम केले. त्यांच्यामुळे आम्हालाही धीर आला. त्यांना माझा सलाम- त्यांच्या मदतीसाठी मी कायम ऋणी राहीन.
जय हिंद.
मी माझ्या ज्युनिअर आणि सिनियर डॉक्टरांशी बोललो, स्टाफशी बोलून कामं करवून घेत होतो, ‘पॅनिक होऊ नका, निराश होऊ नका, पालकांवर संतापू नका, विश्रांतीसाठी थांबू नका. आम्हाला टीम म्हणून एक दिलाने काम करून जीव वाचवायचे होते.’
ज्यांची मुलं मरून गेली त्या पालकांचे सांत्वनही करत होतो, त्यांच्या संतापाला आवर घालत होतो. सगळा गोंधळ माजलेला. मी त्यांना सांगत होतो, लिक्विड ऑक्सिजन संपला आहे, पण मोठे सिलिंडर्स आणवून घेत आहोत आम्ही. किती किंचाळत होतो मी- जीव वाचवण्याकडे सगळे लक्ष केंद्रित करा म्हणून सांगत होतो. मी रडत होतो, आम्ही सगळेच रडत होतो… ऑक्सिजन सप्लायर्सना वेळेवर बिलांचे पैसे न दिल्याच्या प्रशासकीय अपयशामुळे केवढी मोठी आपत्ती आली होती- आणि हे काय भलतंय उभं राहिलं होतं.
१३ ऑगस्टला पहाटे दीड वाजता लिक्विड ऑक्सिजनचा टॅक आला तोवर आम्ही थांबलो नाही.
पण दुसऱ्या दिवशी मुख्यमंत्री योगीजी महाराज आले आणि माझं आय़ुष्य पार उलटंपालटं झालं. १३ ऑगस्टला सकाळी ८ वाजून १७ मिनिटांनी ते आले आणि त्यांनी विचारलं, ‘तर, तुम्ही डॉ. काफील काय? तुम्ही सिलिंडर्सची व्यवस्था केलीत?’
मी म्हणालो- होय सर.
ते संतापले, सिलिंडर्सची तजवीज केली म्हणजे तुला वाटलं तू हीरो झालास काय. बघतो मी.
योगीजी संतापले कारण हा सगळा प्रकार मिडियात आला होता. मी अल्लाशपथ सांगतो, मी कुणाही मिडियाच्या माणसांना त्या रात्री काहीही कळवले सांगितले नव्हते. ते सगळे रात्रीच तिथे आले होते.
मग पोलीस आमच्या घरी आले, ओरडत, धमक्या देत, माझ्या कुटुंबियांना छळ करत आले. लोक मला सांगू लागले, की ते मला एनकाउंटरमध्ये मारून टाकतील. माझे कुटुंबीय, माझी आई, माझी पत्नी, माझी मुलं इतकी घाबरलेली की मी शब्दात नाही सांगू शकत.
माझ्या कुटुंबियांना सगळ्या त्रासापासून, अपमानापासून वाचवण्यासाठी मी पोलिसांच्या स्वाधीन झालो- कारण मी काहीही वाईट केले नसताना मला काय होणार, मला न्याय मिळेलंच असाच विचार केला मी.
पण आता दिवस गेले, आठवडे गेले, महिने सरले… ऑगस्ट २०१७ ते एप्रिल २०१८. होळी आली, दसरा आला, ख्रिसमस गेला, नववर्ष आले , दिवाळी आलीगेली… प्रत्येक तारीख- तारीख पर तारीख… जामीन मिळवण्याच्या आशेत सरली. मग आम्हाला कळलं की न्यायालयही दबावाखालीच काम करीत आहेत- त्यांनीही हे मान्य केलंय.
एका निरुंद कोठडीत १५० कैद्यांच्या सोबत जमिनीवर झोपतोय, रात्री लाखो डास आणि दिवसा हजारो माशा. जिवंत रहाण्यासाठी अन्न गिळतो. शेतात लाज झाकत आंघोळ करतो आणि मोडक्या दाराच्या संडासात उरकतो. रविवार, मंगळवार आणि गुरुवारची वाट पाहात रहातो, कुटुंबिय भेटतील म्हणून.
नरक झालंय जगणं, माझ्यासाठीच नव्हे तर माझ्या संपूर्ण कुटुंबासाठी. ते सारे दरवाजे ठोठावत फिरले, पोलीस स्टेशनपासून कोर्टापर्यंत, गोरखपूरपासून अलाहाबादपर्यंत… न्यायाच्या आशेत. सगळं व्यर्थ ठरतंय.
माझ्या मुलीचा पहिला वाढदिवसही मी साजरा करू शकलो नव्हतो. आता ती एक वर्ष सात महिन्यांची झाली. मी स्वतः पेडिअट्रिशियन आहे… माझं मूल वाढताना पाहायला न मिळणं हे किती वेदनादायक आहे… मी डॉक्टरच्या नात्याने पालकांना सांगत असे की वाढीचे मैलाचे दगड किती महत्त्वाचे असतात. आणि आता मलाच माहीत नाही माझी लेक कधी चालू लागली, कधी बोलू लागली, कधी धावू लागली.
पुन्हा तोच प्रश्न मला सतावतो- मी खरंच गुन्हेगार आहे का? नाही नाही- नाही.
मी १० ऑगस्ट २०१७ला विभागप्रमुखाच्या परवानगीने सुटीवर होतो. तरीही मी कर्तव्य म्हणून धावत गेलो तिथे. चूक केली मी?
त्यांनी मला विभागप्रमुख केलं, बीआरडीचा कुलगुरू नेमलं, शंभर बेड्सच्या अक्युट एनकेफिलायटिस सिंड्रोमच्या वॉर्डचं प्रभारी नेमलं असं खोटंच सांगितलं आहे.. मी ८ ऑगस्ट २०१६ला कायमस्वरूपी रुजू झालेला सर्वात ज्युनिअर डॉक्टर आहे. एनआरएचएमचा नोडल ऑफिसर, आणि पेडिआट्रिक्सचा लेक्चरर. माझं काम विद्यार्थ्यांना शिकवणे आणि मुलांवर उपचार करणे. लिक्विड ऑक्सिजनच्या, जंबो सिलिंडर्सच्या खरेदी, टेंडर, ऑर्डर, मेन्टेनन्स, सप्लाय, पैसे चुकवणे या कशातच माझा संबंध नाही.
पुष्पा सेल्स या ऑफिशियल सप्लायरने पुरवठा थांबवला तर मी कसा जबाबदार? अगदी मेडिकलशी काहीही संबंध नसलेलाही कुणी सांगेल की डॉक्टकचा संबंध उपचाराशी अशतो- ऑक्सिजनच्या खरेदीशी नाही.
डीएम गोरखपूर, डीजीएमई, प्रिन्सिपाल सेक्रेटरी हेल्थ एज्युकेशन यांनी चौदा रिमांइंडर्सनंतरही काहीही कारवाई केली नाही, पुष्पा सेल्सला त्यांचे ६४ लाखाचे बिल चुकते झाले नाही- गुन्हेगार ते आहेत.
उच्चपातळीवरचे हे प्रशासकीय अपयश आहे. त्यांना प्रकरण किती गंभीर होऊ शकते ते कळले नाही. आणि स्वतःला वाचवण्यासाठी त्यांनी आम्हाला बळीचा बकरा बनवले, तुरुंगात टाकले. सत्य गोरखपूरच्या तुरुंगात बंदिस्त आहे.
जेव्हा पुष्पा सेल्सच्या मनीष भंडारीला जामीन झाला, तेव्हा आम्हालाही आता न्याय मिळेल असे वाटले. पुन्हा एखदा कुटुंबियांत राहू लागेन, पुन्हा एकदा काम करू लागेन.
पण नाही- आम्ही अजून वाटच पाहातो आहोत.
सर्वोच्च न्यायालय सांगते- जामीन मिळणे हा हक्क आहे, तुरुंग हा अपवाद आहे. आमचे उदाहरण न्यायाच्या अपलापाचे मूर्तीमंत उदाहरण आहे.
मी आशा करतो, ती वेळ येवो… मी माझ्या कुटुंबियांसमवेत, माझ्या लेकीसोबत असेल. सत्य अखेर जिंकेल. न्याय होईल.
एक असहाय्य, हृदय विदीर्ण झालेला बाप, पती, भाऊ, मुलगा आणि मित्र…

डॉ. काफील खान
१८ एप्रिल २०१८

(ताजा कलम – डॉ. काफील खान यांना अखेर  बुधवारी अलाहाबाद उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे)

Previous articleकॉर्पोरेट लॉबी छोटे हॉस्पिटल गिळतेय
Next articleकाळाबरोबर झेपावणारे हिंस्र पशू
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.