Monday , September 24 2018
Home / featured / शाहू महाराज आजही मराठय़ांना अडचणीचे

शाहू महाराज आजही मराठय़ांना अडचणीचे

लेखक – विजय चोरमारे

सव्वीस जूनला राजर्षी शाहू महाराज यांची जयंती. फुले-शाहू-आंबेडकर-विठ्ठल रामजी शिंदे हे आधुनिक महाराष्ट्राचे, पुरोगामी महाराष्ट्राचे प्रेरणास्त्रोत आहेत. परंतु महाराष्ट्राच्या एकूण समाजकारणावर जातवास्तवाचा मोठा प्रभाव असल्यामुळे महापुरुषांचा नामोल्लेख करतानाही अनेकांची अडचण होताना दिसते. महाराष्ट्रातील पुरोगामी विचारवंत काही वर्षापूर्वी ‘फुले-आंबेडकरांचा’ महाराष्ट्र असा उल्लेख करायचे. हीच मंडळी कोल्हापुरात आल्यावर त्यात शाहूंचे नाव समाविष्ट करत. म्हणजे कोल्हापूरच्या बाहेर शाहूंना फुले-आंबेडकरांच्या बरोबरीने स्थान दिले जात नव्हते. राज्यकर्त्यांचेही यापेक्षा वेगळे काही नव्हते. परंतु कांशीराम-मायावती यांनी उत्तरप्रदेशातील सत्तेत असताना फुले-आंबेडकरांच्याबरोबरीने राजर्षी शाहूंना स्थान दिले, त्यानंतर महाराष्ट्राच्या पातळीवरही शाहूंचे नाव घ्यायला सुरुवात झाली आणि आज ते रूढ झाले. महर्षी विठ्ठल रामजी शिंदे मात्र आजही उपेक्षित आहेत. त्यांचे कार्य या तीन महापुरुषांच्या तोडीचे असूनही त्यांना या पंगतीत स्थान मिळालेले नाही. हे सगळे पुन्हा जाती-पातीच्या समाजकारणाशीच संबंधित आहे. महात्मा फुले माळी समाजाचे दैवत, डॉ. बाबासाहेब आंबेडकर दलितांचे दैवत बनले. राजर्षी शाहू महाराज आणि विठ्ठल रामजी शिंदे यांना स्वीकारणे मराठा समाजासाठी तेवढे सोपे नव्हते. आजही नाही. आजही मराठय़ांना शाहू महाराज अडचणीचेच वाटतात. देशात आरक्षण ही संकल्पनाच राजर्षी शाहू महाराजांनी सुरू केली, आपल्या संस्थानात मागासवर्गीय आणि आर्थिक दुर्बलांसाठी पन्नास टक्के आरक्षण लागू करण्याचा ऐतिहासिक निर्णय शाहू महाराजांनी घेतला होता. वेगवेगळ्या नावांनी काम करणाऱ्या मराठा संघटना आज शिवाजी महाराज, जिजाऊ यांची नावे घेतात, परंतु शाहू महाराज अनेकांना अडचणीचे वाटतात. कारण शाहू महाराजांना स्वीकारले, तर आरक्षणाचे समर्थन करावे लागते. आणि आरक्षणाचे समर्थन करून मराठय़ांचे संघटन करता येत नाही.
अनेक घटकांकडून जाणीवपूर्वक उपेक्षा केली जावी, असे कार्य राजर्षी शाहू महाराजांनी केले आहे. राज्यकर्त्यांनाही शाहू महाराज अडचणीचेच वाटतात. शंभर वर्षापूवी शाहूराजांनी ज्या दूरदृष्टिने निर्णय घेतले, त्याच्या जवळपासही आजचे राज्यकर्ते जाऊ शकत नाहीत. मानवी जीवनाच्या विकासाचे असे एकही क्षेत्र नाही, ज्यासाठी महाराजांनी काम केले नाही. उस्ताद अल्लादिया खाँ साहेबांना त्यांनी कोल्हापूरला आणल. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे दलितांचे नेते असल्याचे त्यांनीच माणगावच्या परिषदेत जाहीर केले. सक्तीच्या प्राथमिक शिक्षणाचा कायदा केला. राधानगरी धरण बांधून सिंचनाची सोय केली. कुस्तीला प्रोत्साहन दिले. कोल्हापुरात प्रत्येक जातीसाठी स्वतंत्र वसतिगृहे सुरू करून उच्च शिक्षणाच्या क्षेत्रात क्रांतिकारक कार्य केले. फासेपारध्यांच्या पुनर्वसनासाठी त्यांनी राबवलेली बांधकाम योजना राज्यकर्त्यांना नेहमीच मार्गदर्शक ठरणारी आहे. हे सगळे करीत असताना समाजातील विशिष्ट वर्गाशी त्यांना मोठा संघर्ष करावा लागला. संघर्ष करतानाही त्यांनी विकासाची वाट आणि तळागाळातील घटकांप्रती असलेली बांधिलकी याचा कधी विसर पडू दिला नाही. प्रस्थापितांनी त्यांच्या बदनामीच्या कहाण्या रचल्या. परंतु नव्या पिढीतल्या इतिहास संशोधकांनी त्या कहाण्या म्हणजे हितसंबंध दुखावलेल्या मंडळींनी रचलेली कुभांडे असल्याचे सप्रमाण सिद्ध केले आहे.

धारवाडे आणि कणबरकर
बाबूराव धारवाडे आणि रा. कृ. कणबरकर ही दोन नावे महाराष्ट्राच्या विचारविश्वात चांगली परिचयाची आहेत. धारवाडे यांचे वय आहे ऐंशी आणि कणबरकर यांचे व्याण्णव वर्षे. राजर्षी छत्रपती शाहू स्मारक ट्रस्ट आणि भाई माधवराव बागल विद्यापीठ या दोन संस्थांच्या माध्यमातून पुरोगामी चळवळीला दिशादर्शन करणारे विचारमंथन गेली चार दशके सातत्याने घडवून आणण्यात या दोघांचे योगदान खूप मोलाचे राहिले. फुले-शाहू-आंबेडकर-विठ्ठल रामजी शिंदे यांची विचारधाना मानून वाटचाल करणाऱ्या या दोन ऋषितुल्य व्यक्तिंना येत्या रविवारी राजर्षी शाहू पुरस्काराने गौरवण्यात येत आहे. आयुष्यभर ज्यांनी इतरांचा गौरव करण्यात पुढाकार घेतला, त्यांच्या वाटय़ाला असे गौरवाचे क्षण येणे ही अत्यंत महत्त्वाची घटना आहे. बाबूराव धारवाडे हे मूळचे पत्रकार. जनसारथी हे साप्ताहिक आणि नंतर सायंदैनिक त्यांनी चालवले. राजर्षी शाहू महाराज हा श्वास मानून आयुष्यभर त्यांनी काम केले. कोल्हापूर गॅझेटियरमध्ये शाहू महाराजांच्यासंदर्भातील बदनामीकारक मजकूर प्रसिद्ध झाल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी विधानपरिषदेत त्याविरोधात आवाज उठवला. सरकारने गॅझेटियरचे संपादक मंडळ बरखास्त केले. त्यानंतर संबंधित मजकूर वगळून त्याजागी नवीन वस्तुस्थितीनिदर्शक मजकूर प्रसिद्ध करण्यासाठी धारवाडे यांनी चौदा वर्षे अखंड पाठपुरावा केला आणि सरकारला अद्ययावत स्वरूपातील गॅझेटियर प्रसिद्ध करायला भाग पाडले. एका व्यक्तिने एका विषयासाठी एवढय़ा दीर्घकाळ केलेल्या संघर्षाचे हे उदाहरण दुर्मीळच म्हणावे लागेल.
विधानभवनाच्या प्रांगणात राजर्षी शाहू महाराजांचा जो पुतळा उभा आहे, त्याचे संपूर्ण श्रेय धारवाडे यांचेच आहे. राज्यकर्त्यांची निष्ठा तळागाळातील माणसांप्रती असायला पाहिजे आणि तोच प्राधान्याचा विषय असायला पाहिजे, हे राजषी शाहू महाराजांच्या कारभारातून शिकायला मिळते. अशा या लोकराजाचा पुतळा विधानभवनापुढे असायला हवा, असे धारवाडे यांना वाटले. त्यांनी ती कल्पना तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख, विधानपरिषदेचे सभापती ना. स. फरांदे आणि विधानसभेचे अध्यक्ष अरुण गुजराथी यांच्यापुढे मांडली. नुसती कल्पना मांडून ते थांबले नाही, तर ती प्रत्यक्षात येण्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला. त्यातूनच हा पुतळा उभा राहिला. याचदरम्यान लोकसभेच्या सभापतीपदी असलेल्या मनोहर जोशी यांनी लोकसभेच्या प्रांगणात शाहूंचा पुतळा उभारण्याची घोषणा कोल्हापुरातील एका सभेत केली. घोषणा झाली, परंतु त्यादृष्टीने पुढे फारशा हालचाली झाल्या नाहीत. तेव्हा या पुतळ्यासाठीही धारवाडे यांनी पाठपुरावा केला आणि लोकसभेच्या आवारात शाहूंचा पुतळा उभा राहिला. धारवाडे यांच्या अशा प्रत्येक संघर्षात प्राचार्य रा. कृ. कणबरकर यांची कृतीशील साथ राहिली. स्वातंत्र्यपूर्व काळात जी पहिली पिढी शिकली त्या पिढीचे कणबरकर हे प्रतिनिधी. कर्नाटकात छोटय़ाशा गावात सामान्य कष्टकरी कुटुंबात जन्मलेले कणबरकर इंग्रजी विषयांत एमए झाल्याची खबर कर्मवीर भाऊराव पाटील यांना समजल्यावर कर्मवीर अण्णा त्यांना रयत शिक्षण संस्थेत घेऊन आले. साताऱ्याच्या छत्रपती शिवाजी महाविद्यालयातून त्यांनी अध्यापनाचे कार्य सुरू केले. पुढे विवेकानंद शिक्षण संस्थेत प्राचार्य म्हणून त्यांनी प्रभावीपणे काम केले. प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिग हाऊसचे न्यू कॉलेज त्यांनी प्राचार्यपदी असताना नावारुपाला आणले. (‘पानिपत’कार विश्वास पाटील न्यू कॉलेजचे विद्यार्थी. त्यांनी आपली एक कादंबरी न्यू कॉलेज आणि प्राचार्य कणबरकर यांना अर्पण केली आहे.) पुढे ते शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू बनले. कणबरकर म्हणजे शिक्षणक्षेत्रातील कठोर शिस्त आणि सचोटीचे आदर्श उदाहरण मानले जाते. शिस्तीच्या बाबतीत कठोर असले तरी ग्रामीण भागातून आलेल्या गोरगरीब विद्यार्थ्यांच्या अडचणी समजून घेऊन त्यांना आवश्यक ती सर्व प्रकारची मदत करताना कणबरकर यांनी सतत एका सहृदय पालकाची भूमिका बजावली. सत्यशोधक चळवळीचा प्रभाव असल्यामुळे त्यांनी सेवेत असताना आणि निवृत्तीनंतरही फुले-शाहू-आंबेडकरांच्या विचारांच्या प्रसारासाठी अव्याहतपणे कार्य केले. भाई माधवराव बागल उतारवयात स्वत:च्या घरातून बाहेर पडले, तेव्हा कणबरकर यानी विद्यापीठात ठराव करून त्यांची आयुष्यभरासाठी विद्यापीठात व्यवस्था केली.

-विजय चोरमारे

About Avinash Dudhe

अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या मीडिया वॉच अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.

Check Also

आंतरजातीय विवाह आणि मुरली चरित्र

Share this on WhatsApp  – प्रा.हरी नरके आंतरजातीय विवाह केला म्हणून त्याच्या सासर्‍यानेच त्याची हत्त्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *