संघाची पापं खडसावून सांगण्याची वेळ आलेली आहे

अमेय तिरोडकर

तुम्ही नेहरूंचं ‘डिस्कव्हरी ऑफ इंडिया’ वाचलंय का?
रवींद्रनाथ टागोरांचं भाषणांचं संपादित पुस्तक ‘नॅशनलिझम’ वाचलंय का? नसतील वाचली तर लगेच वाचा. प्रणब मुखर्जी यांनी संघ स्वयंसेवकांसमोर जे भाषण केलं ते या दोन पुस्तकांचं सार आहे.

ही दोन्ही पुस्तकं माझी आवडती आहेत. पण तरीही मला प्रणबदांचं भाषण आवडलं नाही. न आवडण्याचं कारण ते बोलले त्याबद्दल नाही तर त्यांनी जे बोलण्याचं टाळलं त्याबद्दल आहे.

प्रणबदा भारताच्या इतिहासाबद्दल बोलले. पंडित नेहरू त्यांच्या भाषणांत भारताच्या पाच हजार वर्षांच्या सांस्कृतिक सातत्याबद्दल अनेकदा बोलत. प्रणबदांच्या भाषणात एकदा हा पाच हजार वर्षांचा संदर्भ आला. भारतीय राष्ट्रवादाबद्दल तर त्यांनी नेहरूंचेच शब्द वापरले. टागोर आणि गांधींचाही उल्लेख केला. संघ स्वयंसेवकांनी ज्या गांधी आणि नेहरूंचा आयुष्यभर द्वेष केला त्यांच्यासमोर या दोघांचा आधार घेत प्रणबदा बोलल्यामुळे स्वयंसेवक अस्वस्थ झालेत, बावचळलेत आणि अनेक पुरोगाम्यांना आनंद झालाय .

पण, मी पुरोगामी असलो तरी मला हा आनंद झालेला नाही.

संघाच्या व्यासपीठावर जाऊ की जाऊ नये? हा प्रश्नही माझ्या मनात येत नाही. नक्की जावं. लोकशाही ही संवादावर उभी असते. संघ आपल्याला आवडो न आवडो, भारतातल्या एका वर्गाला ती आपली संघटना वाटतो. त्यामुळे आपण संघाशी बोललंच पाहिजे. हुरियत, बोडो स्वतंत्रतावाद्यांशी आपण बोलतो, नक्षलवाद्यांना चर्चेचं आमंत्रण देतो तसं संघाशीही आपण बोललं पाहिजे.

प्रश्न हा आहे की काय बोललं पाहिजे? जे प्रणबदा बोलले नाहीत !

संघाला हे आता खडसावून सांगण्याची वेळ आलेली आहे की तुमच्या अनेक थेट आणि छुप्या संघटनांच्या माध्यमातून जे हिंसेचं थैमान घातलं जात आहे …गोरक्षा ते लव्ह जिहाद आणि घरवापसी या नावांखाली …ते तातडीने थांबलं पाहिजे. प्रणबदा काय म्हणाले यावर? त्यांनी मोघम भाष्य केलं की आजकाल भारतात हिंसा वाढीला लागली आहे आणि ती परस्पर अविश्वास आणि अज्ञान यातून येते आहे.

संघाला हे पण सांगायला हवं की या देशात संविधान आहे. तुमची भारतीय संविधान बदलण्याची इच्छा जी अनेक तोंडांनी बोलून दाखवता ती मूलतः देशविरोधी आहे. प्रणबदा यावरही मोघम बोलले की भारतीय राष्ट्रवाद हा संवैधानिक देशप्रेमातूनच निर्माण झालेला आहे.

होतं काय, प्रणबदांनी ही जी ‘स्टेट्समन’ लाईन घेण्याचा प्रयत्न केला त्यातून ठोस काहीच निष्पन्न झालं नाही. गांधी संघाच्या व्यासपीठावर जाऊन संघाचं कौतुक करून आले होते असं धादांत खोटं पसरवलेली ही संघटना आहे. गांधींनी संघाच्या शिस्तीचं कौतुक केलं होतं पण जे विचार संघ पसरवत होता (आणि आजही पसरवतो आहे) त्याला स्पष्ट विरोध केला होता. पण जिथे गांधींना, सरदार पटेल, सुभाषबाबू आणि भगतसिंगांना या ढोंग्यांनी मिसकोट केलं आहे तिथे प्रणब मुखर्जींचं काय?

भारतीय इतिहासाचं आणि मागच्या पन्नास वर्षांच्या स्वतःच्या अनुभवाचं संचित असणा-या ह्या चालत्या बोलत्या भारतीय एनसायक्लोपीडियाला संघाची ही मिसकोट करायची वृत्ती ठाऊक नाहीये काय? आणि मग अश्यावेळी कुठलीही संदिग्धता न ठेवता मुद्देसूद स्पष्ट शब्दांत सुनावणं गरजेचं नव्हतं काय?

लक्षात घ्या की प्रणबदांनी इतकं स्पष्ट राहणं का गरजेचं होतं? त्यांच्या भाषणाने संघ स्वयंसेवकांमध्ये काही फरक पडला नसता. पण, ज्यांना आजकाल संघ ही खरोखरच देशप्रेमी संघटना आहे असा गैरसमज झालाय त्यांना या स्पष्टतेमुळे योग्य तो मेसेज गेला असता. एक असा मोठा समाज आहे ज्याला हा हिंसाचार आणि त्यामागे असलेली भयंकर विकृत मानसिकता यांचा संबंध उलगडून सांगणं गरजेचं आहे. या विचारामुळे देशाच्या एकात्मतेलाच हादरा बसतोय, इथल्या विकासाच्या प्रक्रियेलाच खीळ बसतोय हे समजावून सांगणं गरजेचं आहे. प्रणब मुखर्जी यांनी हे करणं ह्या काळाची गरज होती.

प्रणब मुखर्जी यांच्या आत्मचरित्राचा पहिला भाग जेव्हा प्रसिद्ध झाला तेव्हा विचारवंत प्रताप भानू मेहता यांनी इंडियन एक्सप्रेसमध्ये परीक्षण लिहिलं होतं. त्यात ते म्हणाले होते की, “प्रणब मुखर्जी यांच्याकडे सांगण्यासारखं इतकं काही आहे. पण हे आत्मचरित्र मात्र निराशा करतं. त्यांनी जे लिहिलं त्यापेक्षा त्यांनी जे लिहिलं नाही त्याचीच चर्चा यानिमित्ताने होत राहील.”
नागपुरातलं प्रणब मुखर्जी यांचं भाषण हे त्यांच्या आत्मचरित्रासारखंच होतं !

जाता जाता महाभारतामधला एक प्रसंग सांगतो. कृष्ण समेटाची बोलणी करण्यासाठी हस्तिनापुरात आलेला असतो. भीष्म त्याला कुरुंच्या ऐतिहासिक राजवाड्यात रहायला चल म्हणून विनवतो. कृष्ण नाही म्हणतो. विदुराकडे त्याच्या झोपडीत राहीन म्हणतो. नकार देताना कृष्ण कारण काय देतो माहितीये? तो सांगतो, एकतर मी दूत आहे आणि दूताने असं राजवाड्यात येऊन राहणं बरं नाही. आणि दुसरं म्हणजे, ज्या वास्तूत माझ्या बहिणीची.. द्रौपदीची विटंबना झाली तिथे राहणं मला जमणार नाही.

कृष्ण भीष्माला मोघम उत्तर देत बसत नाही. की विदुर तत्वज्ञ आहे आणि मलाही जरा गप्पा झाडायचा शौक आहे तर राहतो आपला एक दिवसासाठी त्याच्याकडे. तो स्पष्ट शब्दांत द्रौपदीची विटंबना आपण विसरलेलो नाही याची जाणीव कुरुंच्या सर्वात बलशाली पुरुषाला करून देतो.

प्रणब मुखर्जी काही कृष्ण नाहीत आणि रेशीमबाग काही कुरुंचा राजवाडा नाही. पण भारतीय लोकशाही नावाच्या द्रौपदीची शंभर संघटनांची पिलावळ पोसत असलेल्या दु:शासनाकडून विटंबना तर होतेच आहे ना? मग, त्यांना थेट सुनवायचं काम तुम्ही नाही तर कोणी करायचं प्रणबदा??

98993 95561

(लेखक एशियन एज या वर्तमानपत्रात कार्यरत आहेत)

 

Leave a Comment