Monday , September 24 2018
Home / तंत्रज्ञान / सुनीता विलियम्स आणि तिचा विक्रमी स्पेसवॉक

सुनीता विलियम्स आणि तिचा विक्रमी स्पेसवॉक

सर्वाधिक काळ स्पेसवॉक करणारी महिला अंतराळवीर असा बहुमान मिळविणारी सुनीता विलियम्स सध्या भारतात आहे. भारतीय वंशाची अमेरिकन अंतराळवीर अशी ओळख असलेल्या सुनीताचे वडील दीपक पांड्या गुजराती, आई बोनी स्लोव्हेनियाची, तर नवरा मायकेल विलियम्स अमेरिकेचा आहे. सुनीताने आतापर्यंत ३२२ तास अंतराळात घालविले आहेत. त्यापैकी तब्बल ५0 तास ४0 मिनिटं तिने स्पेसवॉक केला आहे. महिला अंतराळवीरांमध्ये सुनीताएवढा प्रदीर्घ काळ कोणीही स्पेसवॉक केला नाही. सुनीता सध्याच्या भारतभेटीत अंतराळातील आपले चित्तथरारक अनुभव विद्यार्थ्यांसोबत शेअर करत आहेत. ‘एकेकाळी अंतराळ मोहिमेबद्दल माझ्या मनात भीती होती. मात्र आता अंतराळ मला दुसरं घर वाटतं,’ असे ती सांगते. ‘तुम्हाला आयुष्यात मनापासून जे करावंसं वाटतं तेच करा,’ असा बहुमोल सल्लाही तिने विद्यार्थ्यांना दिला. आतापर्यंत अंतराळातून असंख्य वेळा भारत पाहणार्‍या सुनीताने आपल्याला भारतातील वेगवेगळे प्रदेश, त्यांचे वैशिष्ट्य प्रत्यक्ष जाऊन पाहायचेत, अशी इच्छाही बोलून दाखविली. ‘आपण आपल्या वडिलांची भूमी पाहिली आहे. मात्र दक्षिण भारत, हिमालयाच्या पर्वतरांगा, ईशान्य भारत आपल्या पायाखालून घालायचा आहे,’ असे ती म्हणाली. (यानिमित्ताने भारताचा पहिला अंतराळवीर राकेश शर्माची आठवण होते. तो १९८४ मध्ये जेव्हा अंतराळात गेला होता, तेव्हा पंतप्रधान असलेल्या इंदिरा गांधींनी त्याला विचारले होते, अंतराळातून भारत कसा दिसतो? तेव्हा क्षणाचाही वेळ न घेता राकेशने ‘सारे जहां से अच्छा हिंदुस्ता हमारा’ असं उत्तर दिलं होतं.)

राकेश शर्माशिवाय आतापर्यंत कल्पना चावला आणि सुनीता विलियम्स या भारतीय वंशाच्या दोघींना अंतराळात जाण्याची संधी मिळाली आहे. (कल्पनाचा २00३ मध्ये कोलंबिया यानाच्या दुर्घटनेत मृत्यू झाला.अंतराळातून पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश करताना यानाचा स्फोट होऊन त्या वेळी सात अंतराळवीरांना आपले प्राण गमवावे लागले होते.) या तिघांच्या वेगवेगळ्या मोहिमांनिमित्त त्या-त्या वेळी अंतराळविश्‍व, अंतराळ मोहिमा, अंतराळवीरांचं जीवन, त्यांचं प्रशिक्षण याबद्दल मुद्रित व इलेक्ट्रॉनिक माध्यमांतून भरपूर माहिती पुढे आलीय. मात्र तरीही याविषयातील आपलं ज्ञान अगाधच (!) आहे. एकतर विज्ञान या विषयाबाबतची आपली समजच चुकीची आहे. ‘जेथे विज्ञान संपतं, तेथे अध्यात्म सुरू होतं,’ असे अकलेचे तारे तोडणारे तथाकथित वैज्ञानिक आपल्याकडे असल्याने सामान्य माणूस चांगलाचं गोंधळात पडतो. त्यामुळे अंतराळ हा वेगळा प्रकार आहे आणि लहानपणापासून पुराणकथांमध्ये ऐकलेला ‘स्वर्ग’ नावाचा प्रकार वेगळा आहे, अशी आपली प्रामाणिक समजूत असते. स्वर्ग वगैरे काहीही नसतं असं सांगणारा जयंत नारळीकरांसारखा एखाददुसरा शास्त्रज्ञ सोडला, तर नेमकी शास्त्रीय माहिती फार कोणाला नसते आणि असली तर डोकं शिणविण्याच्या भानगडीत कोणी पडत नाही. शाळा, महाविद्यालयांमध्ये विज्ञान शिकविणार्‍या शिक्षकांचं ज्ञान ‘दिव्य’ असल्याने त्यांनाही याचा उलगडा करता येत नाही. त्यामुळे ‘बिग बँग’च्या प्रयोगादरम्यान देवकण (गॉड पार्टिकल्स) सापडला म्हटल्याबरोबर ‘पहा पहा… देवाचं अस्तित्व आहे की नाही,’ असे म्हणणार्‍यांची गर्दी झाली होती. असो. विषय सुनीता विलियम्स आणि तिच्या अवकाशातील स्पेसवॉकच्या विक्रमाचा होता. ‘स्पेस वॉक’चा मराठीत सोपा अर्थ सांगायचा झाल्यास अंतराळातील चालणं, असा आहे. अंतराळयानातून बाहेर येऊन अंतराळात चालण्याला ‘स्पेसवॉक’ म्हणतात. सर्वात प्रथम अँलेक्सी लिनॉव्ह या रशियाच्या अंतराळवीराने १८ मार्च १९६५ या दिवशी पहिल्यांदा स्पेसवॉक घेतला होता. जवळपास १0 मिनिटं तो यानाच्या बाहेर होता. त्यानंतर एडी व्हॉईट या अमेरिकन अंतराळवीराने ३ जून १९६५ रोजी जेमिनी यानातून बाहेर येऊन २३ मिनिटं अंतराळात उघड्यावर घालविली होती. या विषयातील विश्‍वविक्रम रशियाच्या अँनातोली सोलोयव्ह याच्या नावावर आहे. त्याने आतापर्यंत १६ वेळा स्पेसवॉक केला असून ८२ तास (जवळपास साडेतीन दिवस) त्याने अंतराळ यानाबाहेर घालविले आहेत.

हा स्पेसवॉक म्हणजे बगिच्यात फेरफटका मारणं वा सकाळचा मॉर्निंगवॉक घेण्यासारखा रम्य प्रकार नाहीय. यासाठी अंतराळवीरांना भरपूर तयारी करावी लागते. अंतराळात चालणं म्हणजे पाण्यावर तरंगण्यासारखा प्रकार असल्याने याची तयारी पृथ्वीवर जलतरण तलावात केली जाते. ‘नासा’च्या ह्युस्टन येथील खास जलतरण केंद्रावर अंतराळवीरांची यासाठी तयारी करून घेतली जाते. जवळपास ६.२ मिलियन गॅलन पाणी असलेल्या त्या तलावात ज्याला अंतराळ मोहिमेदरम्यान स्पेसवॉक करायचा आहे, त्याला दररोज जवळपास सात तास घालवावे लागतात. तेथे नासाचे प्रशिक्षक पाण्याचं प्रेशर कमी-जास्त करून अंतराळवीराला प्रशिक्षित करण्यासोबतच त्याच्या शरीराच्या वेगवेगळ्या चाचण्याही घेतात. भरपूर प्रशिक्षण घेऊनही स्पेसवॉक करणे हा सोपा प्रकार नसतोच. ज्याला स्पेसवॉकसाठी पाठवायचं आहे, त्या अंतराळवीरांसाठी खास पोशाख तयार केले जातात, त्याला ‘स्पेस सुट’ असं म्हणतात. हा सुट म्हणजे एक प्रकारे छोटं अंतराळयानच असतं, यात ऑक्सिजन सिलेंडरपासून, अंतराळवीराच्या शरीराचं तापमान नियंत्रित ठेवण्यासाठी थंड पाणी फिरते ठेवणार्‍या ट्यूबपासून त्याच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक सारं काही असतं. यानातून बाहेर पडण्याच्या जवळपास ४५ मिनिटं आधीपासून तो सुट घालण्याची तयारी करावी लागते. यानाच्या बाहेर अंतराळात तीव्र थंडी, गरमी वा कुठल्याही प्रकारचं वातावरण असलं तरी अंतराळवीरावर त्याचा काहीही परिणाम होणार नाही, या प्रकारचा हा सुट असतो. अंतराळात धुळीचे कण सतत फिरत असतात. प्रचंड वेगाने फिरणार्‍या त्या धुळीपासून सरंक्षण व्हावं, यासाठी स्पेस सुटला विशेष आच्छादन असतं. अंतराळात अतिशय तीव्र सूर्यप्रकाशाचा सामना करावा लागू शकतो. त्याचा डोळ्यांवर परिणाम होऊ नये, यासाठी खास सोनेरी रंगाचे विशेष गॉगल्स हेल्मेटचाच एक भाग म्हणून तयार केले जातात. सुट घातल्याबरोबर अंतराळवीर संपूर्ण शरीरात ऑक्सिजन भरून घेतात. शरीरात नायट्रोजन अजिबात राहणार नाही, याची काळजी घेतली जाते. तसे न केल्यास यानाबाहेर अवकाशात शरीरात बबल्स तयार होऊन खांदा, टोंगळा, मनगट अशा काही अवयवांना कायमचा वॉक येण्याची शक्यता असते. त्यामुळे ऑक्सिजनचा पुरेसा साठा सोबत देऊनच यानाबाहेर पाठविलं जातं.

वेगवेगळ्या आयुधांनी सज्ज असा हा विशेष सुट घालून लगेच दार उघडलं आणि निघालं बाहेर, असं करता येत नाही. अंतराळयानातून बाहेर पडण्याचीही एक प्रक्रिया असते. यानाला एकापाठोपाठ एकदोन दरवाजे असतात. एका विशेष दरवाजाने अंतराळवीराला बाहेर काढलं जातं. पहिल्या दारातून बाहेर काढल्यानंतर लगेच ते दार घट्ट बंद (एअरटाईट)करून घेतलं जातं. या प्रक्रियेला ‘एअरलॉक’ म्हणतात. त्यानंतर दुसर्‍या दरवाजातून तो जेव्हा अंतराळात प्रवेश करतो, तेव्हा यानातील अंतराळवीर दुसरं दार पहिल्या दाराप्रमाणेच खास काळजी घेऊन बंद करतात. अंतराळातील कुठलीही गोष्ट यानात प्रवेश करणार नाही, याची विशेष काळजी घेतली जाते. यानाबाहेर पडल्यानंतर अंतराळवीर आपल्या कामाला सुरुवात करतो. आधीच म्हटल्याप्रमाणे तो मौजमजेसाठी स्पेसवॉकसाठी निघाला नसतो. अवकाशयानाची दुरुस्ती, यानाच्या बाहेरील भाग व्यवस्थित काम करत आहेत की नाही याची तपासणी, अवकाशात पृथ्वीवरून आणलेल्या वेगवेगळ्या वस्तूंवर काय परिणाम होतो याची तपासणी, अगोदर पाठविलेल्या उपग्रहाची दुरुस्ती, जे उपकरणं पृथ्वीवर नेऊन दुरुस्त करण्याची गरज आहे, अशी उपकरणं सोबत घेणे, असे अनेक काम या स्पेसवॉकदरम्यान अंतराळवीर करत असतात. हे सारं करत असताना अवकाशातील वातावरणामुळे भरकटल्या जाऊ नये यासाठी एका जाड दोरासारख्या केबल्सने ते यानाला जोडले असतात. या केबलचं एक टोक यानाला, तर दुसरं अंतराळवीरांच्या पोषाखाला जोडलं असतं. सेफर नावाचा एक यंत्रचलित पोशाखही त्यांच्या सुरक्षिततेसाठी त्यांना परिधान करायला लावला जातो. या सेफरचं वैशिष्ट्य म्हणजे यामुळे अंतराळवीर पक्षासारखा अंतराळयानाच्या चारही बाजूंनी हवेत तरंगत त्याची तपासणी करू शकतो. काम संपल्यावर तरंगतच तो आपल्या यानाकडे झेपावू शकतो. सुनीता विलियम्सने हे सारे प्रकार एसटीस ११६, ११७ आणि सोयुझ टीएमए-0५ एम या अंतराळ मोहिमेदरम्यान केले आहे. अंतराळात समोसा नेण्यापासून तेथून मॅरेथॉन शर्यतीत भाग घेण्यापर्यंत बर्‍याच अचंबा वाटणार्‍या गोष्टी तिने केल्या. हे करताना महिला म्हणून ती कुठेही कमी पडली नाही. म्हणूनच आज तिची इतिहासात नोंद झालीय.

(लेखक दैनिक ‘पुण्य नगरी’चे

कार्यकारी संपादक आहेत.)

भ्रमणध्वनी-८८८८७४४७९६

About admin

Check Also

सावधान… सोशल मीडिया तुमच्यावर ‘नजर’ ठेवून आहे!

Share this on WhatsAppकॅलिफोर्नियातील ‘आय.टी.संपन्न’ बे एरियात राहणारा भारतीय परिवार. चक्क मराठी. बाई स्वत: डॉक्टर …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *