अकबर बादशहाची चित्रवेल्हाळ पुस्तके

 

अरुण खोपकर

नुकताच जागतिक  ग्रंथ दिन साजरा झाला. या _दिनानिमित्त एका निरक्षर बादशहाला कुर्निसात

 

ग्रंथ म्हटल्यावर बहुधा डोळ्यासमोर छापील पुस्तकच येते. पण ग्रंथपरंपरा ही छपाई सर्वत्र पसरण्याआधीच्या काळातही जाते. कातड्यावर लिहीलेले, पॅपिरसवर लिहीलेले, तालपत्रांवर लिहीलेले असे ग्रंथांचे कितीतरी प्रकार आहेत.

 

चीनी संस्कृतीत कागदाचा शोध लागला. सातव्या शतकात इस्लाम आल्यानंतर जगात एक सांस्कृतिक वादळ वेगाने भ्रमण करू लागले. मध्य आशियातून आलेल्या मोगलांनी इस्लामचा स्वीकार केला आणि कागद पर्शियात आला. पर्शियातून मोगलांनी तो भारतात आणला आणि त्याचा अतिसुंदर वापर केला. 

 

मध्य आशियातील पंधराव्या ते सतराव्या शतकातल्या ग्रंथसंस्कृतीवर युनेस्कोतर्फे १९७९साली झालेल्या चर्चासत्रात वाचल्या गेलेल्या प्रबंधांच्या संकलनाचे एक देखणे पुस्तक माझ्या अभ्यासिकेत आज मी परत चाळत आहे. त्यात सुलेखनकला, पुस्तकातले नक्षीकाम आणि सजावट, पुस्तकबांधणी आणि मिनीएचर्सच्या महत्वाच्या  चित्रणशैलींवर भरभक्मम संशोधनावर आधारित निबंध आहेत. या पुस्तकाची पाने चाळताचाळता चार शतकातल्या मध्य आशियातल्या ग्रंथसंस्कृतीचे एक चलच्चित्रच माझ्या डोळ्यासमोर येते आहे.

 

भारतात आलेल्या सुलतानी राजवटीबरोबर कागद आला खरा. पण कागदाचा वापर केलेल्या ग्रंथांची परंपरा ही हुमायून अकबरापासून सुरू होते. भारतीय ग्रंथसंस्कृतीत सिंहाचा वाटा असणारा अकबर हा स्वत: निरक्षर होता असे सांगतात

.

 

अकबर हा जगातल्या फार मोठ्या पुरूषांपैकी एक होता हे कदाचित आज भारतातल्या खुज्या धर्मातिरेक्यांना पुन्हापुन्हा सांगावे लागेल. तो केवळ सम्राट, राज्यकर्ता म्हणून महान नव्हता. तो एक अत्यंत प्रतिभाशाली कर्ता पुरूष होता. त्याच्या धार्मिक सहिष्णु वृत्तीतून भारतीय स्थापत्यकला, नगररचना, राज्यव्यवस्था हे सारे बदलले. युद्धशास्त्र बदलले आणि भारतीय ग्रंथसंस्कृती बदलली. अकबराच्या काळाचा दृश्य इतिहास म्हणून ह्या सचित्र पुस्तकांना फार महत्व आहे. प्रा. सोम प्रकाश वर्मा यांनी चित्रांच्या सहाय्याने मुगल कालीन दैनंदिन जीवनावर एक सुंदर ग्रंथ लिहीला आहे. (ISBN 978-81-7305-424-2)

 

 

 

आजच्या जागतिक ग्रंथदिनाच्या संदर्भात मी अकबराच्या चित्रशाळेत किंवा तस्वीरखान्यात निर्माण झालेल्या काही ग्रंथांचा उल्लेख करतो.‘अकबरनामा’ ह्या ग्रंथात अकबराच्या साम्राज्याचा इतिहास आहे. त्यातल्या लढाया, किल्ल्यांचे वेढे, सैन्याच्या छावण्या, शस्त्रास्त्रे हे सारे ओघाने येतेच. अकबराच्या राजप्रसादाच्या जीवनाची वेचक अंगे येतात. त्यातून उत्सवात होणाऱ्या गाण्याबजावण्याबरोबर, दरबारातल्या चित्रकारांचीही स्वचित्रे येतात. तऱ्हेतऱ्हेचे पोशाख, दागदागिने, पगड्या, जामा इ. ची अतिसूक्ष्म तपशीलातली चित्रे मिळतात. त्यात अमीर येतात आणि फकीर व पीरही येतात. समाजाचे सारे स्तर येतात

.

 

अकबराला विविध धर्मसंस्कृतींबद्दल आणि धर्मग्रंथांबद्ल कमालीचे कुतूहल होते. त्याने रामायण व महाभारत ह्या दोन्हींचे सचित्र ग्रंथ करून घेतले होते. तसेच पंचतंत्राच्या ‘अन्वर इ सुहैली’ या पर्शियन भाषांतराचे सचित्र पुस्तक केले आहे. सुदैवाने मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयात हे संपूर्ण पुस्तक संस्कारित अवस्थेत उपलब्ध आहे. अकबराने आपल्या आजोबांच्या आत्मचरित्रावर आधारित ‘बाबरनामा’ हा अतिदेखणा सचित्र ग्रंथ तयार करून घेतला. तो दिल्लीच्या राष्ट्रीय वस्तुसंग्रहालयात आहे.

 

 

 

 

अकबराच्या तस्वीरखान्यातला एक आणखी महत्वाचा ग्रंथ म्हणजे ‘हमझानामा’. हा ग्रंथ एकप्रकारे अकबराचे स्वप्नरंजना आहे. त्यात अद्भुताचा अंश बाहुल्याने आढळतो. पण त्याचा चरित्रनायक हमझा ह्यात अकबर स्वत:ची प्रतिमाही शोधतो आहे.जणू काही पटकथा लिहावी तसे ह्या ग्रंथांचे खर्डे लिहीले जात ते अकबराच्या सहकार्याने. ह्या साऱ्या ग्रंथातली चित्रे अकबर ती तयार होताना विविध अवस्थेत पहात असे. त्यांचे मूल्यमापन करीत असे. त्यात फेरबदल सुचवित असे. ह्यातल्या एकेका ग्रंथाला कित्येक वर्षे लागली. विशिष्ट प्रकारचा आणि आकाराचा कागद मिळवणे, त्यावर तो शेकडो वर्षे टिकावा याकरता संस्कार करणे, तसेच फिके न पडणाऱ्या रंगांकरता आवश्यक सामग्री मिळवणे, चित्रकारांचा संच जमवणे, त्यांच्या बलस्थानांप्रमाणे त्यांना कामे वाटून देणे, गोष्टीतल्या कोणत्या प्रसंगांची चित्रे त्यातले भाव आणि नाट्य दर्शवू शकतील असे प्रसंग निवडणे, व्यक्तिविशेष, परिसरविशेष आणि ऋतु व प्रहर ठरवणे, रंगसंगती साधणे इ. एक ना दोन तर हजारो तपशील योग्य प्रकारे ठरवूनच एकेक सुंदर चित्र तयार होत असे. मग त्याच्यातल्या नक्षीकामावर, सुलेखनावरही तितकेच लक्ष द्यावे लागायचे. बांधणी शतकानुशतके टिकेल अशी करून घेणे हेदेखील महत्वाचे होते.

कागदाला, रंगांच्या रसायनाला आणि गोंदाला कीटकांचा उपद्रव न होईल ह्याची खबरदारी घेणे हे सारे करता करता ग्रंथाच्या एकेका प्रतीला एकेका

इमारतीइतकाच वेळ व खर्च लागत असे.अकबराच्या तस्वीरखान्याच्या प्रभावाखाली राजस्थानी मिनीएचर चित्रशैली निर्माण झाल्या. त्यातून पहाडी, बसोली, कांगडा अशा अनेक हिमाचलप्रदेशातील शैली तयार झाल्या. उत्तरभारतीय व दख्खनी शैली या साऱ्यांवर मुगल दरबाराची सावली पडलेली होती. त्या छायेतच छपाईपूर्वीची ग्रंथसंस्कृती निर्माण झाली आणि वाढली. ह्या निवेदनात्मक चित्रशैलीत सेल्युलॉईडपूर्वीचा सिनेमाही दडलेला आहे.अकबराची उंची कळण्याकरता त्याला पहाणाऱ्याला स्वत:ची अशी काही उंची असावी लागते. गांडूळांना ऐरावत कसा बघता येईल?भारतीय चित्रकला आणि ग्रंथसंस्कृती यांच्या निरक्षर विशालकाय आधारस्तंभाला परत प्रणाम.”

 

Previous articleआसारामबापू आणि त्यांचे भाबडे व आक्रमक भक्त
Next articleपुस्तकी ज्ञान आणि वास्तविकता
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.