अपेक्षांच्या ओझ्याखाली दबलेले वारस!

भाऊ तोरसेकर
काही वर्षापुर्वी कुठल्या तरी चॅनेलवर ‘कॉफ़ी विथ करन’ नावाचा एक कार्यक्रमAmitabh होत असे. त्यात विविध अभिनेते, चित्रपट कलावंत यांना आमंत्रित करून करण जोहर त्यांच्या मजेशीर मुलाखती घेत असे. त्यात खाजगी प्रश्नांपासून कुठल्याही विषयावर अघळपघळ गप्पा व्हायच्या. अशाच एका भागात जया भादुरी, अमिताभ बच्चन व शाहरुख खान यांच्या एकत्र गप्पांचा कार्यक्रम होता. त्यात करणने अमिताभला दुखरा प्रश्न विचारला होता. शाहरुख जिथे हजर आहे, तिथेच त्याचा समकालीन असलेल्या अभिषेक बच्चन याच्या चित्रपट सृष्टीतील अपयशाविषयी यशस्वी पित्याला प्रश्न विचारला, तर तो पिता अस्वस्थ होणारच ना? कारण मागल्या पिढीत अमिताभ सुपरस्टार होता आणि आजच्याही पिढीतल्या व मुलाच्या वयातील अभिनेत्यांशी अमिताभ टक्कर देतोच आहे. त्याच्या मुलाचे साधे चित्रपटही धंदा करू शकले नाहीत, तर पित्याची वेदना केवढी असेल? भले तो पिता ते दाखवत नसेल, पण दुखणे असतेच. म्हणून असा प्रश्न करणने विचारणेच गैरलागू होते. याचे आणखी एक कारण म्हणजे तिथेच यशस्वी अभिनेत्री व अभिषेकची आई जया भादुरीही गप्पात सहभागी होती. पण हसत हसत करणने तो प्रश्न विचारला आणि अमिताभही काही क्षण गडबडला होता. मनातल्या मनात पिता शब्द जुळवत असताना पलिकडे बसलेल्या शाहरुखने हस्तक्षेप केला. त्याने प्रश्नकर्त्या करणऐवजी अमिताभलाच विचारले, मी या प्रश्नाचे उत्तर तुमच्या वतीने दिले तर चालेल का? अमिताभ ते ऐकून सर्दच झाला. जया भादुरीही त्याच्याकडे बघतच राहिली. कारण उघड होते. त्यांचा मुलगा अभिषेक हा शाहरुखचा समकालीन प्रतिस्पर्धी म्हणून मैदानात आलेला. यशस्वी पित्याचा वारसा मिळालेला अभिनेता असल्याने त्याच्यासाठी चित्रसृष्टीत कुठलाच संघर्ष नव्हता. सहजपणे त्याला भूमिका व चित्रपट मिळालेले होते. शाहरुख झुंज देवून शून्यातून उभा राहिलेला.

गोंधळलेला अमिताभ व जया भादुरी बघतच राहिले तेव्हा शाहरुखने अक्षरश: गयावया करीत त्यांचा होकार मिळवला. प्रश्नकर्ता करण जोहरही गडबडला होता. पण शाहरुख आपल्या मागणीविषयी आग्रही होता. तो काय उत्तर देतो त्याबद्दल अभिषेकचे मातापिताही उत्सुक व अस्वस्थ होते. पण शाहरुखने त्यांच्या मुलाविषयी सांगण्यापेक्षा आपल्याच मुलाचे कथानक सुरू केले आणि उरलेले तिघेही बघतच राहिले. आजचा सुपरस्टार शाहरुख आणि तितकाच क्रिकेटचा सुपरस्टार सचिन तेंडुलकर यांची मुले एकाच शाळेत होती अतिशय श्रीमंतांच्या मुलांसाठी असलेल्या त्या शाळेत ही पाच सहा वर्षाची मुले इतरांसारखीच जा्यची व अभ्यास करायची. पण कुठल्याही स्पर्धेत भाग घ्यायची, तेव्हा त्यांची कशी तारांब्ळ उडायची. त्याची कहाणी शाहरुखने कथन केली. एका साध्या वार्षीक क्रिडा उत्सवात ही दोन मुले इतरांप्रमाणेच धावण्याच्या स्पर्धेत सहभागी झाली होती आणि धावताना दमून मागे पडली. तिथे पालक म्हणून आपण हजर होतो आणि पुत्राची तारांबळ बघून आपल्याला खुप दु:ख झाले, असे सांगताना शाहरुख हळवा झाला. पण तो मुलांनी मागे पडल्याने वा धावू न शकल्याने अस्वस्थ झाला नव्हता. आपल्या मुलाच्या मागे पडण्याविषयी जे काही कानी पडले वा स्पर्धेच्या दरम्यान बोलले गेले, त्याने हा तरूण पिता अस्वस्थ झाला होता. त्याचे त्याने केलेले विवेचनही अतिशय मर्मभेदी होते. सचिन वा आपला मुलगा इतर मुलांसारखेच धावत होते. पण सर्वांचे लक्ष त्याच दोन प्रसिद्ध पित्यांच्या मुलांवर होते. जमलेले तमाम पालक वा लोक त्याच दोन मुलांविषयी बोलत व चर्चा करत होते. त्यांच्याच बारीकसारीक हालचालीवर सर्वांची नजर लागली होती. आणि त्या बिचार्‍या कोवळ्या मुलांना धावण्यापेक्षा त्या नजरांचा मारा सहन करावा लागत होता. बाकीची मुले तशी मोकळी मुक्त धावत खेळत होती. या दोन मुलांना तितके स्वातंत्र्य नव्हते.

काय अडचण होती त्या दोन मुलांना? बड्या प्रसिद्ध व्यक्तीची मुले वा नातलग म्हणून जग त्यांच्याकडे बघणारच. पण त्याचा त्या बालकांवर काय परिणाम होतो? कोवळ्या वयातही त्या मुलांना स्वच्छंदी बागडता येत नाही, की मनमोकळे खेळता वागता येत नाही. जातील तिथे शाहरूख वा सचिनचे मुल म्हणून त्यांना पित्याला खांद्यावर ओझ्यासारखे वाहून न्यावे लागत असते. त्या साध्या धावायच्या स्पर्धेतही त्या मुलांना आपल्या पित्याची प्रसिद्धी व तिचा बोजा उचलून धावावे लागत होते. तो बोजा उचलून धावताना त्यांची दमछाक झाली होती. ज्या मुलांना तसा बोजा उचलावा लागत नाही, त्यांना आपल्या चपळाई वा गुणवत्तेच्या आधारावर यश मिळवता येते. पण मोठ्या व्यक्तीच्या मुलांना मात्र पित्याच्या कर्तृत्व पराक्रम-यश असे अनेक बोजे डोक्यावर घेऊन दौडावे लागत असते. आपल्या मुलाची कोवळ्या वयातली ती तारांबळ बघितली आणि अभिषेक बच्चन किती ओझे घेऊन चित्रपटसृष्टीत आला त्याची मला कल्पना आली. असे शाहरुख म्हणाला, तेव्हा अमिताभ व जया दोघेही कमालीचे भारावून गेलेले होते. आपल्या मुलाचा व्यावसायिक प्रतिस्पर्धी यशस्वी अभिनेता इतक्या सहजपणे हे सांगतो, त्याचे कौतुक अमिताभच्या चेहर्‍यावरून लपले नव्हते. किंबहूना करण जोहरने विचारलेल्या प्रश्नाचे इतके समर्पक उत्तर अमिताभकडेही नव्हते. म्हणून की काय एकप्रकारे शाहरुखच्या त्या उत्तरानंतर त्या पित्यानेही नि:श्वास सोडला. जगाकडे बघण्याची ही दृष्टी खुप मोलाची असते. अभिषेकच्या अपयशाला त्याच्या पित्याच्या यशाच्या बोजाचे कारण असू शकते, याचा कोणी कधीच विचार केला नसेल. ज्यांना सोपी संधी मिळते त्यांना पुर्वजांच्या यशावर स्वार व्हायला मिळते, त्यांना मोठेच यश मिळवण्याची सक्ती असते आणि ज्यांना असा बोजा नसतो, त्यांना मुक्तपणे आपला संघर्ष करून यशाचे शिखर गाठता येते.

हा किस्सा आठवण्याचे कारण राहुल गांधी! मागल्या दहाबारा वर्षात या तरूणाकडून ज्या अपेक्षा बाळगल्या जात आहेत, या कसोटीवर तो उतरत नाही. म्हणून किती टोकाची टिका टिंगल होत असते. पण अल्पवयात त्याच्याकडून कुठल्याही अनुभवाशिवाय बाळगल्या जाणार्‍या अपेक्षा हा त्याच्यावर अन्याय नाही काय? अमिताभ, सचिन वा शाहरुख यांच्या मुलांवर फ़क्त पित्याचा वारसा पुढे घेऊन जाण्याचे ओझे असल्याने ते थकून जात असतील. इथे राहुल गांधी यांच्याकडून किती अपेक्षा पुर्ण करण्याचे ओझे चढवलेले आहे? पणजोबा, आजी व पित्याने देशाचे पंतप्रधानपद भूषवले. देशाच्या स्वातंत्र्योत्तर काळापैकी अर्धी वर्षे पुर्वजांनीच देशावर राज्य केलेले आहे. म्हणूनच त्यांचा वारसा चालवण्यासाठी तितकेच मोठे वा त्यांना साजेसे यश राहुलने मिळवावे, अशा अपेक्षांचा बोजा त्याच्या डोक्यावर चढवलेला आहे. तो नाकरण्याचेही त्याला स्वातंत्र्य नाही. पक्षाच्या सामान्य कार्यकर्त्यापासून नेहरू इंदिराजींच्या चहात्यांपर्यंत आणि सत्तालोलूप कॉग्रेसजनांपासून पत्रकारांपर्यंत प्रत्येकाला राहुलने पंतप्रधान व्हावे असे वाटते आहे. पण त्यासाठी बहुमताचा पल्ला पक्षाला गाठून द्यावा लागतो. तितकी लोकप्रियता जनतेमध्ये संपादन करावी लागते. त्या लोकप्रियतेचे जनतेच्या मतांमध्ये रुपांतर करण्याची किमया साधावी लागते. मोदी वा अन्य कुणा नेत्यावर इतक्या मोठ्या अपेक्षांचा बोजा नाही की सक्तीही नाही. मातापित्यांच्या यशस्वी वारशाचे संधी मिळण्यात लाभ जरूर असतात. पण त्यातून जे अपेक्षांचे ओझे खांद्यावर डोक्यावर चढवले जाते, त्याखाली कितीजण अपयशाने चिरडून जातात, तिकडे जग सहानुभूतीनेही बघत नाही. राहुल गांधींच्या मागे मोठा वारसा असल्याने त्यांना मिळालेली संधी व लाभ नेहमी बोलले व सांगितले जातात. पण अपेक्षांच्या ओझ्याखाली दबून गेलेला राहुल गांधी कोणी कधी समजून तरी घेतला आहे काय?

? भाऊ तोरसेकर (जेष्ठ पत्रकार)

Previous articleगांधीजी भेटत गेलेले…
Next articleसंघशरण सरकार आणि नाकर्ते मंत्री
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.