असंगाशी संघ!

– संजय आवटे
————————————————————–

‘… संघ स्वातंत्र्यचळवळीत नव्हता, हे खरंय, पण मग डॉ बाबासाहेब आंबेडकर तरी स्वातंत्र्यचळवळीत कुठं होते?’ असा सवाल टीव्ही डिबेटमध्ये एक संघ स्वयंसेवक विचारत होते.
असा सवाल करायचं धाडस आजवर संघ स्वयंसेवकांचं कधी झालं नव्हतं. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ कधीच नव्हता स्वातंत्र्यचळवळीत, असा मुद्दा पुढे आला की स्वयंसेवकांची तारांबळ होत असे. ते वेगळा विषय काढत असत. पण, डॉ आंबेडकरांशी तुलना करायची हिंमत करत नसत.
संघ स्वयंसेवकांनी आज ती हिंमत केली.
कारण, गेले अर्धशतक कॉंग्रेसच्या वाटेनं राजकारण करणारे प्रणव मुखर्जी साक्षात संघ व्यासपीठावर गेले होते. विखाराचा अजेंडा कायम ठेऊनही सर्वसमावेशक होत जाणा-या संघटना जास्त धोकादायक असतात. महापुरुषांचं अपहरण करत, त्यांच्या विचारांना दूर सारत, फक्त प्रतिमांवर राजकारण करणं हा संघाचा खास अजेंडा आहे. डॉ बाबासाहेबांना तर संघानं आता एवढं जवळ ओढलं आहे की संघ आणि बाबासाहेब एकत्र काम करत होते, असंच पुढच्या पिढीला सांगितलं जाईल.
अरे, तुम्ही स्थापन झालात १९२५ मध्ये. त्यानंतर दोन वर्षांनी बाबासाहेबांनी मनुस्मृती जाळली, तेव्हा तुम्ही काय करत होतात? तेव्हा, तुम्ही बाबासाहेबांसोबत होतात? उलटपक्षी, बाबसाहेबांनी १९२३ मध्ये बहिष्कृत हितकारिणी सभा स्थापन केली आणि १९२४ मध्ये गांधीजी बेळगावच्या कॉंग्रेस अधिवेशनाचे अध्यक्ष झाले, म्हणून घाईने तुम्हाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघ स्थापन करावा लागला! मुसोलिनी वगैरे आयकॉन तर उभे होतेच तुमच्या बाजूला.
पण, अशा प्रतिमा तयार करायच्या, हे संघाचं षडयंत्र जुनं आहे. त्या प्रतिमांच्या सापळ्यात लोकही लगेच अडकतात. मुखर्जींनी काय सणसणीत चपराक दिली म्हणे संघाला? अरे, अशा भाषणाने चपराक वाटावी, एवढी संघाची कातडी मृदू आहे का? मुखर्जी हेच बोलणार, हे गृहीत होते. त्यात टाळ्या पिटण्यासारखे काय आहे? संघाच्या व्यासपीठावर जाऊन मुखर्जींनी संविधानाचं कौतुक केलं, हे म्हणजे तर फारच झालं. संघाच्या व्यासपीठावर गेले, म्हणून मुखर्जी थोडेच ‘हिंदूराष्ट्र हवे’ अथवा ‘राममंदिर यही बनाएंगे’ असं म्हणणार होते? मुखर्जीच काय, भागवतही तसं म्हणणार नव्हते!
गांधीजींनी संघाबद्दल काढलेल्या गौरवोद्गारांचा विपर्यस्त दाखला आजही देणा-यांना, ‘हेडगेवार हे भारताचे थोर सुपुत्र आहेत’, असा प्रणवकृत दाखला मिळणे, ही खरी ॲचिव्हमेंट आहे. जे विधान मोदीही टाळतात, ते त्यांना मुखर्जींकडून मिळाले. मुखर्जींना बोलायचेच होते परखड, तर संघाच्या कल्पनेतील ‘राष्ट्रवाद’ हा कसा भारतीय राष्ट्रवादाच्या विरोधी आहे, धोकादायक आहे, असे त्यांनी थेटपणे सुनावायला हवे होते. नागपुरात बोलत असूनही, आणि, ‘राष्ट्रवाद’ हा विषय असूनही, प्रणवदांनी डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा उल्लेख करु नये, हे आश्चर्यच. नेहरु आणि गांधींना ‘कोट’ करताना, फारच निरुपद्रवी अवतरणं ‘कोट’ करण्याची प्रणवदांची ‘दक्ष’ता जाणवण्याइतपत होती! अत्यंत सावध, छापील असं हे भाषण होतं.
संघ एवढा चलाख आहे की मोहन भागवतांनी मुखर्जींपूर्वीच एकतेचे कीर्तन सुरु केले होते. सरसंघचालक नेहमी समारोप करतात. पण, इथे भागवत अगोदर बोलले आणि मुखर्जी शेवटी. पाहुण्यांचा सन्मान म्हणून ते बरोबर आहेच. पण, एकतेची, प्लुरलिझमची कॅसेट मुखर्जी टाकणार, हे भागवतांना आधीच माहीत होते. त्यामुळे, तो सूर अगोदर आळवून संघ कसा अगदी एकतेच्या विचाराचा आहे, हे भागवतांनी चलाखीने अधोरेखित केले.
ब्राह्मणी राष्ट्रवादाचा कावा संघाचा आहे, हे लपून राहिलेले नाही. गोळवलकर गुरुजींच्या ‘बंच ऑफ थॉट्स’पासून ते सरसंघचालकांच्या विविध भाषणांपर्यंत अनेक पुरावे देता येतील. अर्थात, ही संघटना एवढी मोठी आणि तशी जुनीही, पण फार काही विचारधन निर्माण होऊ नये, अशी ‘व्यवस्था’ विचारपूर्वकच केली गेली आहे! ‘विचारवंत’ वगैरे निर्माण होणार नाहीत, अशी दक्षताही संघ अगदी प्राणपणाने घेत आला आहे!
राज्यघटनेचं निर्माण करत होते, तेव्हा बाबासाहेबांची कशी आणि किती थट्टा संघाच्या मुखपत्रातून, ‘ऑर्गनायझर’मधून केली जात होती, यालाही पुरावे आहेत. तोच संघ आज नेहरुंची थट्टा कशी करतो, गांधींची रेवडी कशी उडवतो, हे जगजाहीर आहे. गांधीहत्येबद्दल संघाची भूमिका काय आहे आणि नथुराम त्यांच्यालेखी कोण आहे, हे नव्याने सांगण्याची गरज नाही.
एवढे करुनही संघाला आपण सर्वसमावेशक आहोत, असा दावा करायचा असतो. त्यासाठीच्या प्रतिमानिर्मितीचे कार्यक्रम संघाचे सातत्याने सुरु असतात. म्हणजे, ‘मनुस्मृती ही आद्य राज्यघटना आहे. तो मानवधर्मग्रंथ आहे. या ग्रंथाच्या रचनाकाराच्या सावलीला उभे राहाण्याचीही तुमची लायकी नाही!’ असं म्हणणारे संभाजी उर्फ मनोहर भिडे हे संघाचेच. त्यांनी शिवरायांचा जयजयकार करत मनुस्मृतीचं समर्थन करायचं. बाकी शॅडो आर्मी तर तयारच आहे आपला अजेंडा पूर्णत्वाकडे नेण्यासाठी. प्रत्येकाची काम ठरलेली. ती चोखपणे ज्याने-त्याने करायची!
पण, तरीही संघ मात्र गोड. भागवत आज किती छान सांगत होते, तुझ्या गळा, माझ्या गळा, गुंफू एकतेच्या माळा! असं वाटावं की एवढ्या या गोड आजोबांना कशाला करतात विरोध लोक? असेल थोडा वेगळा विचार, पण म्हणून एकदम नाकारायची कशी एवढी मोठी संघटना? देशभर हजारो विकास प्रकल्प सुरु आहेत संघाचे! भारतात अशी कोणतीही संघटना नाही, जी एवढी विधायक कामं करत असेल! अशी विधायक कामं, इथं हे गोड आजोबा… संघाला विरोध करणारे जरा जास्तच विखारी, आततायी आणि असहिष्णू आहेत बुवा! संघाचा खरा विजय होतो तो इथं. विखाराला विरोध करणारेच विखारी आणि जातीयवादाला विरोध करणारेच जातीयवादी ठरवले जातात. संघाला हे हवं असतं. संघ मग आपण कसे सहिष्णु आहोत, या थाटात स्वतःला लोकशाहीवादी वगैरे म्हणवून घेतो. तिरंग्याला नाकारत, भारताची कल्पनाच नाकारत तो स्वतःला राष्ट्रभक्त म्हणवून घेतो. तेव्हा, त्याच्यासमोरच्या राष्ट्राची कल्पना स्पष्ट असते.
या प्रतिमानिर्मितीसाठी संघानं आजवर अनेक साहित्यिकांना, विचारवंतांनाही आपल्या व्यासपीठावर बोलावलं. इतिहासातले असोत वा वर्तमानातले, शहाणे लोक आपल्या संघटनेत नसतात, हे संघाला समजलंय. मग त्या प्रतिपूरणासाठी संघ इतरांना आयात करतो. त्यांच्या प्रतिमेच्या जोरावर ऐतखाऊसारखा स्वतःला विचारी वगैरे म्हणवतो. मग, स्वातंत्र्यचळवळ असो वा संयुक्त महाराष्ट्र आंदोलन, सहभाग कशातच नाही, फक्त लष्करी गणवेशातल्या कवायतींनी संघ स्वतःला राष्ट्रवादी म्हणवतो. गेल्या सत्तर वर्षांचा इतिहास नाकारत एकदम हजारो वर्षांचा इतिहास असलेला ‘भारत’ मांडायचा. (प्रणवदाही तोच भारत सांगत होते. हजारो वर्षांपूर्वीचा. आधुनिक राष्ट्रराज्याचा नव्हे. स्वातंत्र्यचळवळीतून विकसित झालेला भारत नव्हे!) संघाला आधुनिक भारत नको असतो. संघ तो नाकारतो. म्हणजे, आपल्याला कोणी हिशेब मागू नये. आणि, विविधतेत एकता ही इथल्या मातीतच आहे. तुम्ही काय नवीन सांगताय, असा प्रतिप्रश्न करायचा. पण, तो इतिहास सांगतानाही गोतम बुद्ध (विष्णूचा अवतार नव्हे!) टाळायचा, कबीर, चार्वाक, बसवण्णा, अकबर टाळायचे. मुस्लिमविरोधाचा इतिहास मांडायचा. राष्ट्रवादाचं बाहेरुन आयात केलेलं मॉडेल विकसित करायचा प्रयत्न सुरु ठेवायचा आणि त्यासाठी ‘शॅडो आर्मी’ला रसद पुरवायची. एवढं करुनही संघ ही कशी अनेक विचारधारांपैकी एक राष्ट्रवादी विचारधारा आहे, अशी ॲकॅडॅमिक मांडणी करत राहायची.
प्रणव मुखर्जी संघाच्या व्यासपीठावर जाऊन जे काही बोलले, त्यामुळं संघाला चपराक वगैरे बसलेली नाही. ‘संघ बदलतोय’ अशा धाटणीची चर्चा त्यामुळं सुरु होणं, संघाचा विचारसुद्धा लक्षणीय असा राष्ट्रवादी विचार आहे, तो महत्त्वाचा विचार आहे. भारताच्या एका थोर सुपुत्रानं स्थापन केलेली ही सहिष्णु संघटना आहे, हे जे संघाचं ब्रॅंडिंग झालंय, ते संघाला हवं असतं.
बुद्धाचा अवघा विचार फेकून त्याची प्रतिमा वापरणारे हे लोक आहेत. बाबासाहेबांना अवघा विरोध करुन, त्यांच्या फोटोसमोर नतमस्तक होणारे हे लोक आहेत. ज्या बाबासाहेबांनी तुमच्याच गावात हिंदू धर्म सोडला, तिथंच बाबासाहेबांना हिंदूराष्ट्रवादाचे पुरस्कर्ते म्हणू शकणारे हेच आहेत!
‘मुखर्जी, तुम्ही या, हवं ते बोला’, असं संघानं सांगितलं कारण, ते कसं वापरायचं, हे आम्ही बघू, हे संघाला माहीत आहे. संघ मुखर्जींनाच बोलावणार. हमीद अन्सारींना नाही बोलावणार! त्यात मुखर्जी इंग्रजीत बोलणार, हेही भागवतांना माहीत होतं. देशभर लोक व्हिज्युअल्स बघतील. भाषण कोणाला कळणार आहे! मुद्दा प्रतिमांचा आहे.
राजकारण आणि निवडणुका हा प्रतिकांचा खेळ असतोच. ज्या देशातल्या निवडणुका चिन्हांवरच प्रामुख्यानं लढवल्या जातात, अशा देशात तर आणखी जास्त. आजच्या मल्टिमीडिया भवतालात, प्रतिमा आणि प्रतिकांचं राजकारण ऐन भरात आलेलं असताना, सांस्कृतिक राष्ट्रवादाची मांडणी करणारे लोक यात दोन पावलं पुढं आहेत. पुरोगामी शक्तींना मात्र अद्यापही आपली प्रतिकं, प्रतिमा विकसित करता येत नाहीत. आहेत त्या प्रतिमा नीटपणे पोहोचवल्या जात नाहीत. किंवा, आपल्याच प्रतिमांचा गैरवापर कसा होतो, हे त्यांना समजत नाही. त्यामुळं त्यांचे मुद्दे ‘पॅसिव्ह’ तरी होताहेत किंवा संकुचिततावाद्यांच्या परिभाषेच्या जाळ्यात परिवर्तनवादी अडकताहेत.
हा प्रतिमांचा खेळ संघाला समजलाय, म्हणून तर प्रत्यक्ष एवढं कुरुप असूनही प्रतिमा सुंदर ठेवण्याचा प्रयत्न संघ करत असतो. हा डाव आपल्याला समजायला हवा.
मुद्दा विरोधी विचाराचा नाही. विखाराचा आहे. विखार हाही एक राष्ट्रवादी विचारच आहे, या विधानाला पाठिंबा देण्यासारखं आहे हे. संघ असो वा ‘जमाते इस्लामी’, यांना ‘लेजिटेमसी’ मिळू नये.
शर्मिष्ठा मुखर्जी म्हणूनच आपल्या वडिलांना म्हणाल्या, The speech will be forgotten, visuals will remain.
शनिवारवाड्यावरच्या एल्गार परिषदेच्या आयोजनात नक्षलवाद्यांचा हात होता, असे पोलिसांकडून सांगितले जात असतानाच, संघाच्या विचारधारेला मात्र माजी राष्ट्रपतींकडून लेजिटेमसी मिळणे हे सगळे केवळ योगायोग नसतात!
प्रतिमांच्या या खेळात आपण एवढे बावळट ठरता कामा नये!

– संजय आवटे

Previous articleसंघाची पापं खडसावून सांगण्याची वेळ आलेली आहे
Next articleमनूचा मासा , भिडेंचा झिंगा
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.