एकटेपण !

लेखक – मंगेश सपकाळ , मेलबोर्न ऑस्ट्रेलिया

आपल्याला एकटेपण का येतं, कसं येतं… ह्याची प्रत्येकाची लाख निरनिराळी कारणं असतील. ती किती वेळ टिकतात, हेही प्रत्येकाच्या लाईफस्टाईलवर आणि मेन्टॅलिटीवर अवलंबून असतं. पण कुणीही By Choice एकटेपण स्वीकारत नाही. ते आपल्या-आजूबाजूच्या गोष्टींमुळे आपल्यावर लादलं जातं.

प्रत्येकजण कधी ना कधी ह्या एकटेपणाच्या अनुभवातून गेलेला असतो. एकटेपण येणं आपल्या हातात नसेलही, (कळत-नकळत आपणच त्याला कारणीभूत असतो), पण ते एकटेपण घालवणं फक्त आणि फक्त आपल्याच हातात असतं. या एकटेपणावर कुठलीही औषधं नाहीत, कारण एकटेपण शारीरिक नाही, ते सगळं ‘मानसिक आहे, ते भावनांचं विश्व आहे. पण त्या मानसिकतेचा परिणाम तुमच्या शरीरावर बदल घडवत-बिघडवत असतो.

एकटेपण हे देखील भावनांचं विश्व असल्यामुळे, इथेही एकटेपणाचं शिकार, पुरुषांच्या तुलनेत ‘बायकांनाच’ जास्त व्हावं लागतं.
कारण, भावना – ‘व्यक्त होणं’, ‘व्यक्त करणं’, ही बायकांची फार मोठी गरज होऊन जाते. आणि जर हे व्यवस्थित होत नसेल, तर बायकांना हमखास एकटेपण येऊ लागतं.

इथेही पुरुषांचं एकटेपणावरचं सोल्युशन आणि बायकांचं एकटेपणावरचं सोल्युशन फार वेगळं असतं.
पुरुष बहुतांशवेळी ते एकटेपण मित्रांत घालवतो, तर बायका ते एकटेपण घालवण्यासाठी ‘नात्याचा’ आधार शोधतात. कधी नवीन नाती शोधतात.

मला कधीकधी असंही वाटतं, की
बायकांचं लग्न करणं, वा अंडी जन्मला घालणं, हे त्यांचं एकटेपणावर मात करण्यासाठी काढलेलं एक प्रकारचं सोल्युशन असतं.
बायकांची मुलं, ही बायकांचं एकटेपण घालवतात.
लग्नाची (Companionship) आणि मुलांची गरज ही पुरुषांपेक्षा स्त्रियांनाच जास्त असते, असं मला मग उगाच वाटून जातं. (हे चुकीचं असू शकतं)

याच धर्तीवर, सर्व नाही, पण बहुतांश “बायका एकट्या राहू शकत नाहीत”, असंही मला वाटतं.

अर्थात, एकटेपण, भावना आणि स्ट्रेस, ही केवळ स्त्रियांची मक्तेदारी नाही, याची मला पूर्ण जान आहे.

————–

” पण, एकटेपण येवढं वाईट का असतं ? ”

त्याआधी एकटेपण का आलं, कुठून आलं याच्या मुळाशी जायचं असेल तर आपल्याला उत्क्रांती गाठावी लागेल.
उत्क्रांती… बायोलॉजिकल आणि सोशलदेखील.

उत्क्रांतीच्या काळात आपण छोटछोट्या टोळ्या घेऊन फिरायचो. जेणेकरून आपण कुणाचं भक्ष्य होणार नाही, आपलं संरक्षण होईल या हेतूने आपलं ‘सोशल-गॅदरिंग’ वाढलं. समूहात असाल तर सहज मोडता येणार नाही, अशी भावना रुजली. स्वतःच्या संरक्षणासाठी ‘टोळी’ गरजेची वाटू लागली. पुढे लाखो टोळ्या पडल्या, हजारो समाज घडले…. प्रेम-माया-वात्सल्य रुजू लागलं, समाज आकार घेऊ लागला, समाजात सुखरूप राहायचं असेल तर त्या समाजाचे नियम आले, बंधनं आली. पण आपल्या मेंदूत एक छाप पडली – ती ‘एकटेपण’ वाईट. कारण एकटेपण ‘इन्सिक्युरिटी’ निर्माण करते. त्यामुळे आपण एकाचे दोन – दोघांचे तीन बनवण्यात समर्थन मानू लागलो.

पण एकटेपण म्हणजे तुम्ही एकटे राहताय, असं नव्हे.
तुम्हला गर्दीतही, कुटुंबातही एकटेपण वाटू शकतं.
तुमच्या भावनिक गरजा पूर्ण होत नसल्या की तुम्हाला एकटेपण वाटू लागतं.

एकटेपणाला दुर्लक्ष करू नये, कारण हेच एकटेपण म्हणजे पुढे स्ट्रेस, डिप्रेशन, Anxiety सारख्या महा-आजारांना आमंत्रण करतो. आणि हे महा-आजार कॅन्सर-सारखं तुम्हाला आतून पोखरून काढतात.

एकटेपण म्हणजे कितीतरी शारीरिक-मानसिक गरजांना मुकणे !

———————-

एकटेपणामुळे डिप्रेशन येणाऱ्या व्यक्ती हळूहळू लाखो आजारांचं घर बनते.

होतं काय, स्ट्रेस काय करतो, तर Cortisol नावाचं Hormone तयार करतो. हे Hormone तसं वाईट, पण उत्क्रांतीच्या काळात आपलं जिवंत राहण्यासाठी सतर्क करण्यासाठी हॉर्मोनची निर्मिती झाली असावी. Cortisol हे Stress Hormone, कमी वेळ असेल तर ते Healthy ठरतं, पण जास्त वेळ टिकलं तर ते त्रासदायक ठरतं. हे Hormone इतर चांगल्या गोष्टी मारतं. म्हणजे तुमची Immune System ते खराब करतं. जिथे तुमचं Immune बिघडतं, तिथे तुम्ही हजार रोगांना आमंत्रण देता. Cortisol Hormone आणि Oxytocin Hormone, या दोघांचंही खूप सुंदर नातं आहे, जे आपण पुढे कधीतरी BDSM पोस्टींच्या दरम्यान पाहू.

आपलं Happy असणं, हे आपल्या आरोग्यासाठी फार गरजेचं आहे.

एकटेपण-स्ट्रेस-डिप्रेशन …. हे प्रकार कोणी स्वतःहून स्वीकारत नाहीत, हे मला मान्य आहे. पण त्याकडे दुर्लक्ष करणं, ते घालवण्यासाठी प्रयत्नशील नसणं ही एकप्रकारची आत्महत्या झाली.

प्रत्येक मानसिक आजारावर, आपला आहार आणि आपलं रुटीन, ह्या दोन महत्त्वाच्या गोष्टी असणार आहेत. ते ढासळल्याने देखील वरचं सगळं गणित बदलू शकतं.

————————

एकटेपण घालवण्याची सर्वात पहिली आणि फार महत्त्वाची स्टेज म्हणजे – “व्यक्त होणे”

भारतातल्या लोकांना बाहेरगाव फार भुलवत असेल कदाचित, पण इकडे आल्यावर आमची सर्वात मोठी लढाई असते ती “एकटेपणाशी लढणं”. आणि ही लढाई फार अवघड असते. मी गर्दीत-परिवारात, तेही मुंबईसारख्या ठिकाणी वाढल्यामुळे मला ऑस्ट्रेलियात प्रचंड एकटेपणा जाणवला. इकडचं कल्चर, जॉब आणि अर्थात संसार-रडगाणं ही इतर कारणं होतीच…. मी माझा एकटेपणा घालवण्यासाठी ‘फेसबुकचा’ आधार घेतला. तो अगदीच ठरवून नव्हता, पण तो आधार वाटला. व्यक्त होण्यासाठी देखील आपण कोणावर अवलंबून राहायचं नाही, तेवढंही मी लाचार होणार नाही, ह्या अट्टाहासापायी मी फेसबुकलाच माझं झाड बनवलं. माझ्या मनात येणारे उलटे-सुलटे सगळे विचार-सगळ्या भावना मला इकडे रिकाम्या करता आल्या. लोकांना त्या पटतील का, पटायला हव्यात का, याची तमा मी बाळगली नाही (बहुतांश वेळी). बऱ्याच गोष्टी वादग्रस्त ठरल्या, आणि त्याचा सुरुवातीला त्रासही झाला. पण तेही डोक्यापर्यंत न आणण्याचं प्रोग्रामिंग करत गेलो., शिकत गेलो. त्याचा मला भरपूर फायदा झालाच. मला माझ्या विचारांवर विचार करण्याची, ते पडताळून पाहण्याची संधी मिळालीच, पण माझं व्यक्त होण्याचं हक्काचं माध्यम मला मिळालं.

अर्थात आज मी ह्या केवळ एकाच माध्यमावर अवलंबून नाहीच. पण हे मी माझ्यासाठी तेव्हा काढलेलं सोल्युशन होतं. फेसबुक हे मी हवं तेव्हा माझं हक्काचं “झाड” बनवतो.. असं प्रत्येकाकडे प्रत्येकाचं काही ना काही सोल्युशन असावं.

कारण व्यक्त होणं हे ऑप्शन नाही, तर आपली फार मोठी गरज आहे.
व्यक्त होण्यासाठी तुम्ही कशाचा आधार घेताय, हे महत्त्वाचं नाही, पण तुम्ही तुमच्या भावना व्यक्त करताय का, याकडे पाहणं फार महत्त्वाचं आहे. तुमच्याकडे असा मित्र-मैत्रीण-पार्टनर-माध्यम असणं फार गरजेचं आहे, जिथे तुम्हाला व्यक्त होण्यासाठी कशाची-कुणाची भीती नाही. मनमोकळं करण्यासाठी तुमच्या मनात ‘हा काय विचार करेल, ही काय विचार करेल’ … येणार नाही, असं कुणीतरी झाड हवं. ती आपली गरज आहे.

लोकांत मिसळता यायला हवं.
आपण माणसं ‘सोशल ऍनिमल’ आहोत. आज फेसबुक, व्हॉटसऍप, इंस्टाग्राम, युट्युब अशा असंख्य सोशल साईट्स चालण्याचं कारण देखील हेच आहे, आपलं एकटेपण जातं यामुळे. त्यामुळे त्याकडे सकारात्मक दृष्टीने व्यक्त होण्याचा एक प्लॅटफॉर्म म्हणून पाहायला हवं, ना की उठसुठ ह्याच्या-त्याच्या विरोधात आपली गरळ ओकणं.

आपल्या जवळच्या व्यक्तींवर प्रेम असेल, तर त्याच्या ‘व्यक्त’ होण्याच्या गरजा पूर्ण होतायेत का, हेही पाहणं गरजेचं आहे. आपल्या व्यक्तीसाठी आपल्याला झाड होता यायला हवं.

—————–

एक गोष्ट आपल्याला डोक्यात फिट करावी लागेल, ती म्हणजे

” आयुष्यात सगळंच काही आपल्याला मिळणार नाही. ‘हवंय ते सगळं मिळालंय’ अशी कुठलीही व्यक्ती जगात नाही, कारण आपल्या इच्छा कधीही संपणार नाहीत. एकतर आपल्या गरजा कमी कराव्या लागतील, नाहीतर मग त्या पूर्ण करण्यासाठी प्रयत्न तरी जास्त करावे लागतील. आई-बाप-मुलं-मित्र यातलं कुणीही आपलं आयुष्य नाही. ते फक्त आपल्या आयुष्याचा एक भाग आहेत. नाती आपल्यासाठी असतात, आपण नात्यांसाठी जन्म घेतला नाही. आपल्याला हवं असणारं नातं घडवण्याचीही आपल्यात धमक हवीच. आपण कितीही ‘स्ट्रॉंग असण्याचा दिखावा केला, तरी आपण आपल्याशी खोटं वागू शकणार नाही. जे आहे ते स्वीकारायला हवं. लोक काय म्हणतील हा विचार करून आयुष्य फक्त ढकलता येईल, त्याला जगणं कसं म्हणणार ? ”

आर्थिक नुकसान होऊ नये म्हणून जेवढं आपण काळजी करतो, तेवढं शारीरिक-मानसिक नुकसान होऊ नये म्हणून करत नाही.
आयुष्य फार सोपं असताना, आपण उगाच किचकट करत बसतो आणि त्यात आयुष्य उपभोगण्याचंच राहून जातं.

स्वतःवर अतोनात प्रेम करता यायला हवं.

क्योंकी …. “लाव्हीये बेल”, इन फ्रेंच.

बोले तो —- ‘लाईफ इजे ब्युटीफुल’

आयुष्य केवळ यासाठी सुंदर नाही, की आपल्याला फक्त जगणं मिळालं.
आयुष्य यासाठीही सुंदर आहे की, ते “मिळालेलं आयुष्य अजून सुंदर बनवण्यासाठी, आपल्याला एक संधी देतं”

– मंगेश सपकाळ

(लेखक उपहास , वक्रोक्ती व विनोदी पद्धतीने अनेक विषयांचा परखड वेध घेतात  )

Previous articleलग्नाळूंचा बाजार
Next articleदोन ध्रुवांवर लोंबकळणारी फुलपाखरं
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.