कविता

               निरोप

दारात तुला शेवटची आंघोळ घालण्यासाठी

गल्लीतल्या बायकांनी घोळका केला,

आडोशाला पातळाच्या तुला न्हाऊ घातलं

पहाटेच्या थंडीत गरम पाण्याची आंघोळ

निदान शेवटची असूनही गरम पाण्याची.

जन्मभर वेदनेचा गाव होतीस तू आता

तुझे शांत डोळे माझं अस्तित्व गिळतात,

मनाच्या अंगणात पेटलीय आठवणींची चिता,

रंगानी उमलण्याआधीच फुलांची राख झालीय,

तुझ्या त्या डोंगर माथ्याच्या घरात

बैचेन दोन पोर आजही तुला शोधतहेत

ज्या वयात तुझ्या चेहर्यापेक्षा तुझा

स्पर्शच त्याच्याशी बोलका होता नेमक

त्याच वयात त्यांनी तुझा अखेरचा

मुका चेहरा पाहिला, आणि कळलंही नाही 

त्यांना समोर नक्की काय घडतय.

तिरडीच्या दोर्यानी जेवढा तुझा देह आवळला

कदाचित त्याहूनही जास्त आवळेल तुझ्या

आठवणींचा दोर आयुष्यभर त्या पोरांच्या गळ्यात.

 

— रवींद्र हुन्नूरे

8087600149

 

 

    अलगद झेल तिला 

 

आत्महत्येचा प्रतिवाद करत 

माझी कविता 

धावते आहे 

तुझ्या महिरपी केसांच्या वळणवाटांमधून 

एखाद्या अवखळ नदीसारखी…

दुडूदुडू चालणा-या बाळाचे 

बोबडे बोल घेऊन 

ती गाऊ पहाते 

विश्वात्मकतेचे गाणे,

निर्वाती सकारात्मकतेचे डोहाळे जोजवत 

ती शोषून घेते प्राणवायू,

तगवते स्वतःला; 

पण 

निःश्वासांच्या कड्यावर 

अलगद झेल तिला 

पा-यासारखी आहे ती 

निसटून जाईल ती चटकन 

तापमानाचे निर्देशांक 

नोंदवण्यापूर्व

 

 ■ श्रीरंजन आवटे 

9762429024

 

   सुंदरतेची स्वप्नं

 

हवा दुषित आहे

मला सुंदरतेची स्वप्नं फुटताहेत

ही हवा निर्मळ होणं कठीणय

मला कळतंय

सुंदर स्वप्नं मिटणं कठीणय

मला जाणवतंय

 

मी अगणित सुंदर स्वप्नांनी

लगडलेल्या देहानिशी

ही दुषित हवा

अंगावर  घेत उभीय

दुषित हवेतल्या या

एकुलत्या एक क्षणावर

माझ्या स्वप्नभारल्या देहाचं

घर्षण सुरूय

प्रियकराच्या एकाग्रतेनं

 

या दुषित हवेत हा उजळताक्षण

तग धरेल का..? शंकाय!

पण क्षण तर उजळलाय नुक्ताच

 

मी तो प्रियकराच्या उन्माद तंद्रीत

काळभूमीत पेरतेय

क्षण निघालाय वेगात

भूमिकन्येच्या निद्रित मुखावर

तरंगतेय स्मित

 

खोल भूमीत ती निद्रिस्त आहे

स्मित पांघरत

नि या विराण भूमीवर

मी उभीय

स्वप्नांनी लगडलेल्या देहानिशी

ही दुषित हवा झेलत

 

            -प्रिया जामकर

 

 

 

नदीच्या मुली

…………….

 

 

माझी कविता खोटी आहे 

पण नदीच्या मुलींनी

कवितेवर नेम धरण्यासाठी

बनवलेली गलूल खरी आहे

 

माझी कविता सशासारखी आहे

भित्री आणि गुबगुबीत

या मुली मात्र मला सोलु शकतात 

माझा खोटेपणा आतडं फाडून

खोलू शकतात

 

त्या शिंपू शकतात

माझ्या रंगवलेल्या कवितेवर

त्यांचं पाण्यासारखं 

दिसणारं रक्त

 

माझ्या गोऱ्या कवितेवर

भाळू शकत नाहीत या काळ्या मुली

त्यांना शाकरून घ्यायाचे नाही काहीच

त्यांना

शिकार करायची आहे

 

माझी मुलगीही सामील आहे त्यांच्यात

 

 

– भरत दौंडकर

9850665451

 

शिक्रापूर, ता. शिरूर, जि पुणे

 

 

 

 

कविता जगतील तुझ्यासोबत

मी लिहिलेल्या सर्व कविता जपून ठेव तुझ्याकडे..
मी तर म्हणेन,जगव त्यांना तुझ्या परीने…
जसं जमेन तसं..
सुखातल्या..दुःखातल्या..सगळ्याच..
कारण तुझ्या विचारानेच जन्माला आल्यात त्या..
आता त्यांना पोरकं करू नकोस..
माझ्या कवितांसह आपला संसार तर शक्य नाहीय..
पण निदान त्यांना जपण्याची ग्वाही मला दे…
म्हणजे तुझ्यासह जगतेय, याचा भास होत राहील..
आयुष्यभर..
आणि कवितांबद्दल कदाचित कुणी आक्षेपही घेणार नाही..
त्यांना अडकवणार नाही कुणी नैतिक अनैतिकतेच्या भोवऱ्यात..
जगतीलच त्या तुझ्यासोबत…आनंदात..
तुझ्या माझ्याच ना त्या शेवटी..
आपल्याच…

तेजस्वी बारब्दे लाहुडकर पाटील

अमरावती

९५६१५३७७८४

 

 

   हात

 

टेकायला जागा नव्हती दुरोदूर

तरीही चालत राहिलो

इळनमाळ

वाटलं होतं

आता कसले उभे राहतोय

रेतीत रुतलेले पाय

 

मागे-पुढे जगायला

आधार तरी कशाचा .. ?

तरीही दिवस काढलेच ना या बजबज पुरीत…

मिरगाच्या पावसात सडसडून भुमी भिजवी

तशीच भिजवीत राहिलीस

या टळटळीत उन्हात मला …

 

दाह झाला

दाह केला

फेकलो गेलो होतो दुरोदूर एकांतात

पण तुझे काळेभोर हात होते

रातीला

बाकी माझ्याकडे काय होतं …?

– नागनाथ खरात, मोटेवाडी (मा), ता. माळशिरस, जि. सोलापूर

     9921527906

 

 

 

 

Previous articleविचारधारा आणि कार्यकर्ता दोघांनाही एक्सपायरी डेट असते !
Next articleगो लाईव्ह : कृती, प्रकृती ते विकृती
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.