कोब्रापोस्ट – भारतीय प्रसारमाध्यमांचा पर्दाफाश

-तीर्थराज सामंत

पुष्प शर्मा या धाडसी पत्रकाराने, कोब्रा पोस्ट या वेबपोर्टलसाठी भारतीय पत्रकारितेतील सर्वात विलक्षण प्रयोग नुकताच पार पाडला. हा प्रयोग म्हणजे खरतर भारतीय शोध पत्रकारितेच्या इतिहासातील सर्वात मोठा व क्रांतिकारी अविष्कार आहे. प्रयोगाचे नाव कोब्रापोस्ट ने ठेवले आहे ऑपरेशन १३६. या प्रयोगाचे निष्कर्ष अर्थातच मुख्य प्रवाहातील मीडिया साफ दाबून टाकण्याचा यत्न करेल, परंतु भारतातील अगदी नावाजलेल्या वृत्तपत्र समूहांची नैतिकता काय लायकीची आहे याचे सांगोपांग दर्शन घडविणारा कोब्रापोस्टचा हा रिपोर्ट सर्वदूर पोहोचविण्याची जबाबदारी तुमची, माझी, आपणा सर्वांचीच आहे.

आचार्य अटल असे नाव धारण करून, सफेद कुर्ता, धोतर,” राधे राधे” छापलेली रेशमी उपरणे अशा अवतारात पुष्प शर्मा नामांकित वृत्तसमूहांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना, मालकांना भेटला. मी झुंझुनू राजस्थान येथील शाळेतून प्राथमिक शिक्षण पूर्ण करून नंतर आयआयटी दिल्ली व आयआयएम बेंगलोर येथून उच्चं शिक्षण घेतले. त्यानंतर ऑस्ट्रेलियात सेटल झालो, मी एक इ गेमिंग कंपनी स्कॉटलंड मधून चालवितो परंतु मुळात माझी कमिटमेंट हिंदुत्वाशी आहे. उज्जैन येथील एका आश्रमाशी मी जोडलेला आहे. भारतात हिंदुराष्ट्र कायम व्हावे यासाठी आम्ही कार्यरत आहोत, आणि त्यासाठी हात सोडून खर्च करायची आमची तयारी आहे. बोला आपण आमच्या अजेंड्यावर काम कराल काय? त्यासाठी काय किंमत घ्याल अशी विचारणा आचार्य अटल या बड्या प्रसारमाध्यमांतील अधिकारी/मालकवर्ग/पत्रकार/ संपादक अशा मंडळीकडे करीत असे. या सर्व मुलाखती शर्माने गुप्त कॅमेरावर रेकॉर्ड केल्या. कोब्रापोस्टने हे व्हिडियो आपल्या पोर्टल वर टाकले. २४ मे २०१८ रोजी या स्टिंग ऑपरेशनचा दुसरा भाग प्रकाशित व्हायचा होता, दैनिक भास्कर या वृत्त समूहाने उच्चन्यायालयात धाव घेऊन त्यांना बेनकाब करणारे व्हिडियो प्रकाशित करण्यास मनाई करणारा हुकूम आणला.
बर, तर परत एकदा आचार्य अटलने नेमकी काय गाजरे या प्रसारमाध्यमांना दाखविली याकडे वळू. आचार्य अटल देशभर फिरला. हिंदुत्वाची सुपारी घ्यायची तयारी एखाद्या मीडिया हाऊस ने दाखविली की आचार्य अटल आपल्या प्रसार मोहिमेचा नेमका आराखडा मांडत असे. व त्यातील प्रत्येक बारकाव्यावर साधक बाधक चर्चा करून कंत्राट स्वीकारणारे मीडिया हाऊस या मोहिमेतील हरेक पायरी कंत्राट देणाऱ्यास अभिप्रेत आहे त्या प्रकारे पार पाडेल यावर सहमती मिळवत असे. त्यानंतर हे करण्यासाठी किती मोबदला कोणत्या स्वरूपात द्यावा लागेल यावर आचार्य अटल या महानुभावांबरोबर घासाघीस करीत असे.
आचार्य अटलने या सर्वच नामचीन वृत्तसमूहांसमोर, साधारण एकच प्लान ठेवला. त्यात सुरवातीचे काही महिने या वृत्तसमूहांनी त्यांना ‘पुरविण्यात’ येणारा कन्टेन्ट आपल्या वृत्तपत्रात, वाहिनीवरून “पेरायचा” होता. हा कन्टेन्ट साधारणपणे भाजपाच्या राजकीय विरोधकांची, विशेषतः राहुल गांधी, मायावती, अखिलेश, लालू यांची प्रतिमा मालिन करणाऱ्या वृत्तांच्या स्वरूपात असणार होता. या बरोबरीने पहिले तीन महिने मृदू हिंदुत्ववादी लाईन सदर वृत्तसमूहाने घ्यावी अशी अपेक्षा होती. जसजशी २०१९ ची निवडणूक जवळ येईल तसतसे सरळ सरळ भाजपाच्या बाजूने पक्षपाती बातम्या छापाव्यात/ प्रसारित कराव्यात अशी अपेक्षा होती.
आपल्याला नेमका कशा प्रकारचा अपप्रचार करून हवाय, हे स्पष्ट करण्यासाठी मुलाखतीच्या सुरवातीलाच आचार्य अटल दोन ध्वनिमुद्रित जिंगल्स वाजवून दाखवायचा. त्यातील पहिल्या जिंगल मध्ये एक नेता एका शेतकऱ्याला विचारतोय की तुमचे पाय एवढे मळलेले कसे काय? शेतकरी म्हणतो, बेटा, शेतात माती असते, पाय तर मळणारच. नेता म्हणतो- अरे असं आहे काय? काय काळजी करू नका भाऊ, मी निवडून आलो कि सगळ्यांच्या शेतात फरशी बसवून देईल. त्यावर एक धीरगंभीर आवाजात टिपण्णी येते- आपले अमूल्य मत अशा पप्पूला देऊन फुकट घालविणार का ? भगवद गीता समिती कडून लोकहितार्थ जारी.
दुसऱ्या जिंगल मध्ये एका गावकऱ्यांस एक नेता विचारतो, की तुम्हाला गावात काय सुविधा हव्यात? गावकरी सांगतो, बाकी वीज पाणी रस्ते सर्व काही आहे, पण स्मशानासाठी फार लांब जावे लागते. नेता सांगतो “बिलकुल काळजी करू नका. मी निवडून आलो कि प्रत्येक घरात एक स्मशान बांधून देईन” . परत धीरगंभीर आवाजात टिपण्णी येते- आपले अमूल्य मत अशा पप्पूला देऊन फुकट घालविणार का ? भगवद गीता समिती कडून लोकहितार्थ जारी.

आचार्य अटल पुढे सांगायचा कि गेल्या निवडणुकीत आमच्या “संगठन का” बजेट ८००० कोटी होते, या खेपेस ते खूप जास्त असणार आहे. पैशाची कमी नाही, प्रचार बरोबर झाला पाहिजे. वृत्तसमूहातील धुरिणांना शर्माचे एकूण रूप, भाषा, व “प्रपोजल’ पाहून समोर सोन्याचे अंडे देणारी कोंबडीच बसल्याचा भास होत असे. त्यातील अनेकांनी हावऱ्या प्रमाणे आचार्य अटलचा प्रस्ताव तात्काळ मंजूर करून टाकला, काहींनी तर हा हिंदुत्ववादी अजेंडा अजून कसा चांगल्याप्रकारे राबविता येईल याबद्दलच्या आपल्या कल्पना आचार्य अटलला इमेल करून कळविल्या.

सध्या “राष्ट्र्वादा” ची चलती आहे. हिंदुत्ववादी मालकांच्या राष्ट्रवादाच्या संकल्पनेशी स्वतःस सुसंगत करून घेण्याची चढाओढ मीडिया मधेही स्पष्ट दिसून येते. सरहद्द विरहित पत्रकार या जागतिक संघटनेने केलेल्या २०१७ सालच्या सर्व्हेत, लेखन स्वातंत्र्याच्या बाबतीत भारत १३६ व्या क्रमांकावर असल्याचे उघड झाले आहे. या सर्वेक्षणातील निष्कर्षावरूनच कोब्रापोस्टने आपल्या स्टिंग ऑपरेशनचे नाव १३६ असे ठेवले आहे.

कोठला विचार राष्टवादी आहे व कोणता राष्ट्रद्रोही आहे हे अतिशय कर्कश्य पणे जाहीर करणाऱ्या संघटना आहेत व त्यांना राजसत्तेचे अभय आहे, हिंदुत्ववादी राजकारणावर टीका करणारांस सोशल मीडियावर धमक्या देणे, फोन करून जीवे मारण्याच्या धमक्या देणे हे प्रकार नित्याचे झाले आहेत. अशा परिस्थितीत भारतीय वृत्तसंस्थांमधील पत्रकारांनी स्वतःवर आपणहून अभिव्यक्ती मर्यादा घालून घेतल्याचे दिसून येते, असे हे सर्वेक्षण नोंदवते.

याहून महत्वाचे निरीक्षण खुद्द पुष्प शर्माने नोंदविले आहे. आचार्य अटल या नावाने भेटीगाठी झाल्यानंतर, ज्या वृत्त समूहांनी आचार्य अटलचा अजेंडा राबविण्यास होकार दिला होता, त्याना पुष्प शर्माने परत फोन करून अजून चित्रविचित्र मागण्या समोर ठेवल्या. कॅम्पेनचा भाग म्हणून, अरुण जेटली, मनेका गांधी, वरुण गांधी, जयंत सिन्हा, मनोज सिन्हा यांची प्रतिमा मालिन करायचे काम हाती घायचे होते. शेतकरी चळवळी व निदर्शने हे माओवाद्यांचे कारस्थान आहे असे रंगवायचे होते. त्यानंतर सिव्हिल सोसायटीमधील, नागरी हक्कांसाठी आग्रही असणाऱ्या प्रशांत भूषण, दुष्यन्त दवे, इंदिरा जयसिंग अशा मंडळींची बदनामी करणारी मोहीम चालवायची होती. त्यानंतर न्यायव्यवस्थेच्या “न्यायी” भूमिकेवर प्रश्नचिन्ह लावणाऱ्या बातम्या, कन्टेन्ट प्रसृत करायची मागणी होती.
आपल्या “राष्ट्रवादी” प्रसार माध्यमांनी आचार्य अटलच्या ह्या मागण्या पूर्ण करण्यास साफ नकार दिला असे जर तुम्हाला वाटले असेल, तर तुम्ही अतिशय भाबडे आहात. हे सर्व करण्यास आपली प्रसार माध्यमे एका पायावर तयार झाली. याचा अर्थ एवढाच, की ही मंडळी स्वतःच्या बापाचीही नाहीत. पुरेसे पैसे मिळणार असतील तर हे लोक कसलीही मोहीम चालवितील.

टाइम्स ग्रुप हा भारतातील सर्वात शक्तिशाली मीडिया हाऊस आहे. त्यांचे टाइम्स ऑफ इंडिया हे वृत्तपत्र आज १७९ वर्षाचे आहे. जगातील सर्वाधिक खपाचे इंग्लिश वृत्तपत्र असा त्याचा लौकिक आहे. सर्व आवृत्या मिळून त्याचा रोजचा खप तीन करोड च्या वर आहे. टाइम्सचा पसारा मोठा आहे. त्यांची पाच वृत्तपत्रे आहेत, एकतीस मासिके आहेत, बत्तीस रेडियो स्टेशन्स आहेत. एकूण ११ हजार कर्मचारी इथे काम करतात. निर्भय व निरपेक्ष पत्रकारिता टाइम्स ग्रुप मध्ये केली जाते असा एक सर्वसामान्य समज भारतात आहे. अशा या नामचीन वृत्तसमूहाचा पर्दाफाश पुष्प शर्माने कोब्रापोस्ट मध्ये केलेला आहे.
फक्त टाइम्स ग्रुपचं नाही तर वृत्तव्यवसायातील दिग्गजांना पुष्प शर्माने उघडे पडले आहे. या यादीत कोण नाही ? इंडिया टीवी, दैनिक जागरण, सब टीवी, अमर उजाला, समाचार प्लस, पंजाब केसरी, एच एच एन २४ X ७, स्वतंत्र भारत, स्कुपव्हूप, रेडीफ, टीव्ही १८, हिंदुस्थान टाईम्स, ए बी पी न्यूज, भारत समाचार, लोकमत, इंडिया टुडे ग्रुप, के ग्रुप, न्यू इंडियन एक्सप्रेस, स्टार इंडिया, या सगळ्यांनाच पुष्प शर्माने अक्षरशः नागडे केले आहे. यातील प्रत्येकाची पुष्प शर्मा बरोबरची सविस्तर मुलखात कोब्रा पोस्टच्या संकेत स्थळावर उपलब्ध आहे.
बाकी इंडिया टीव्ही ,ए बी पी न्यूज वैगेरेच स्टिंग ऑपरेशन पाहून आपल्याला धक्का बसायचं कारण नाही. पण टाइम्स ग्रुप जर अशा तर्हेची ‘म्याटर’ वाजवत असेल, तर आपल्या लोकशाहीचा एक आधारस्तंभ किती ठिसूळ झालेला आहे याची कल्पना येते. पुष्प शर्माने केलेले टाइम्स ग्रुप मधील स्टिंग ऑपरेशन इथे मुद्दाम सविस्तर देत आहे.

रेडियो मिरची हा एफ एम चॅनेल हा टाइम्स वृत्तसमूहाच्या मालकीचा आहे. भारतातील अडतीस शहरात लोक सकाळ दुपार संध्याकाळ हा चॅनेल ऐकत असतात. हा एफ एम चॅनेल जाहिरातीसाठी अव्वल समजला जातो कारण करोडो लोकांपर्यंत तो रोजच पोचत असतो. प्रदीप व्ही या रेडियो मिरचीच्या जाहिरात विभागाच्या प्रमुखा बरोबर झालेल्या मुलाखतीचे स्टिंग कोब्रापोस्ट वर आहे. शर्मा या प्रदीप व्ही ना सांगतात की आम्हाला आमचा राजकीय अजेंड्यास पूरक असा ‘कंटेन्ट’ तुमच्या चॅनेलच्या माध्यमातून प्रसृत करायचा आहे. “म्हणजे नक्की कसा कन्टेन्ट ?” प्रदीप व्ही विचारतात. शर्मा त्यावर काँग्रेस व राहुल गांधींची प्रतिमा मालिन करण्याचा प्लॅन नीट उलगडून सांगतात. त्यावर प्रदीप व्ही जी काही प्रतिक्रिया देतात त्यावरून कळते की हे चारित्र्य हननाची सुपारी घ्यायला ते एका पायावर तयार आहेत, एवढेच नाही तर हेच काम ते अगदी अलीकडे पर्यंत ते व्यवस्थित पार पाडत आलेले आहेत. प्रदीप व्ही उत्साहाने सांगतात की अहो हे काम निवडणूक काळात आम्ही उत्तम केलेले आहे. भाजपाची अशा स्वरूपाची इतकी कँपेन आम्ही चालवलीत, इतकी कँपेन चालवलीत, की आता मला नेमका आकडाही सांगता येणार नाही. एक मॅडिसन नावाची एजेन्सी होती, त्यांच्या मार्फत हे काम आम्हाला मिळत असे. इथे पुष्प शर्मा शिताफीने या प्रदीप व्हीना बोलत करतात. प्रदीप व्हीच्या तोंडून अशी माहिती बाहेर पडते कि खुद्द भाजपाच्या कमिटीने एका एजेंसी मार्फत रेडियो एफ एम ला कंत्राट दिले होते. प्रदीप व्ही पुढे शर्माला सांगतात कि थेट व्यहवार करण्यापेक्षा आचार्य अटलच्या आश्रमाने एखादी त्रयस्थ एजेन्सी धरावी व त्यांच्या बरोबर पैशाचा व्यहवार करावा. त्या त्रयस्थ एजेंसी बरोबर आम्ही – म्हणजे रेडियो एफ एम, व्यहवार करेल, रोकडित व्यहवार करायचा असेल तर उत्तमच. ते सगळ्यांनाच सोयीचे पडेल.

त्यानंतर पुष्प शर्मा रेडियो मिरचीच्या पाटणा ऑफिसमधील तीन अधिकाऱ्यांना भेटला. त्यापैकी रेडियो मिरची पटना चे प्रमुख प्रभू झा यांनी तर शर्मास सांगितले की त्यांना ज्या तर्हेचे काम हवे आहे, उदाहरणार्थ गीतेतील श्लोक उचलून ते सद्य राजकीय परिस्थितीवर भाष्य म्हणून वापरायचे व त्यातून भाजपा विरोधकांची प्रतिमा मालिन करणारा संदेश बिंबवायचा, हे काम करण्यासाठी मी तुमची भेट आमच्या स्क्रिप्ट रायटरशी घालून देतो. तो एक नंबर काम करून देईल . आचार्य अटलला भेटून या प्रभू झा यांना बंधुप्रेमाचे भरतेच आले, त्यांनी शर्मन सांगितले की, अहो मी पण आर एस एस चाच माणूस आहे. तुमचे काम म्हणजे माझे काम. मी काय, आमचे इकडचे प्रोग्राम हेड काय, आमची जडण-घडण संघातच झाली आहे. गेल्या खेपेस सुद्धा आम्ही इथे भाजपाची प्रचार मोहीम चालविण्याचे कंत्राट घेतलेच होते की. प्रभू झानी शर्माला असेही सांगितले कि आमची अख्खी टीमच “त्याच” विचाराची आहे. आम्ही सगळी माणसे, त्यांची पार्श्वभूमी पाहूनच घेतो, त्यामुळे तुम्हाला दहा ठिकाणी जायची गरज नाही. तुमचं टार्गेट फक्त सांगा, आणि टार्गेटची प्रतिमाभंजन करण्याचे काम माझी क्रिएटिव्ह टीम चोख पार पाडेल.

पुष्प शर्मा एवढ्यावर थांबला नाही, त्याने नंतर मंगलोर ऑफिस मध्ये एरन डिमेलो बरोबर हिंदुत्वाचा अजेंडा, करमणुकीच्या कार्यक्रमांतून गुंडाळून कसा पेश करता येईल याची चर्चा केली. खरतर डिमेलोंनेच त्याला सांगितलं की आम्ही थेट टीका नाही करू शकणार नाही पण मनोरंजनाच्या कार्यक्रमातून हा पेड प्रचार किंवा अपप्रचार बेमालूमपणे पेश करता येईल. त्यानंतर शर्मा गुवाहाटीला जाऊन टाइम्सच्या डेप्युटी जनरल मॅनेजर अंशुमन डे यांना भेटला. डे कडे शर्माने बांगलादेशातून येणाऱ्या स्थलांतरितांचा प्रश्न काढला. डे त्याला म्हणाले कि असे इश्यू एक तर संपादकीयातून मांडता येतील किंवा “प्रायोजित” संपादकीयातूनही रेटता येतील. तुम्ही कंटेन्ट द्या, आम्ही तो बरोबर वृत्तपत्रीय भाषेत सादर करू. मीडिया जगतात या प्रकाराला “ऍडव्होटोरियल” या नावाने ओळखले जाते. पण डे सारखा शर्माला आम्ही तुमची जाहिरात कशी करत राहू त्याचे मार्ग सांगत राहिला. शर्माने जेव्हा विरोधकांवर वार करण्याची गोष्ट काढली तेव्हा डे त्याला म्हणाला की ते फार सावधानीपूर्वक करावं लागेल.

त्यानंतर शर्मा हैदराबाद येथील टाइम्सचा डेप्युटी जनरल मॅनेजर, विजय भास्कर रेड्डी यांना भेटला. रेड्डी स्वतःच हिंदुत्ववादाने भारून गेलेले होते असे शर्मास वाटले, लव्ह जेहाद चा मुद्दा तापवत ठेवणारी एखादी मोहीम सुरु करायची झाली तर तुम्ही सहकार्य कराल का असे शर्माने त्यांना विचारले. रेड्डी म्हणाले “हो जायेगा” ! या नंतर शर्मा, दिल्ली रेडियो मिरचीचे मुख्य अधिकारी विजय प्रताप सिंग याना भेटला. चंदीगढचे डेप्युटी मॅनेजर विशाल गुलेरी यांची भेट घेतली पुढे लखनौ मध्ये नवभारत टाइम्सचे चीफ मॅनेजर बिपीनकुमार याना भेटला. सगळेच “धंदा” करण्यास आनंदाने तयार होते. बिपीनकुमार तर शर्माना म्हणाले की मोदी शहा जोडगोळी आमच्या पेपर वर नाराज आहे. त्यामुळे सरकारी जाहिराती पूर्वीसारख्या मिळत नाहीत. विरोधकांचे चारित्र्यहनन करून मोदी शहांची मर्जी संपादन करता आली तर चांगलेच आहे.

या सगळ्या स्टिंग ऑपरेशनचा कळस म्हणजे शर्मा थेट टाइम्स ग्रुपच्या एक्झिक्युटिव्ह प्रेसिडेंट संजीव शाह व त्यापाठोपाठ टाइम्स ग्रुपचे सर्वेसर्वा विनीत जैन यांना भेटला. संजीव शाह याना शर्माने आपला अजेंडा श्रीकृष्ण व भगवद गीतेपासून सुरवात करून देशभरात धार्मिक ध्रुवीकरण घडवून आणण्याचा असल्याचे स्वच्छ शब्दांत सांगितले. संजीव शहा यावर “करेक्ट, करेक्ट, बस वही” असे उदगार काढत राहिले. त्यानंतर शर्माने विनीत जैन यांची भेट घ्यायची वार्ता सुरु केली, त्यावर संजीव शहा जरा आढेवेढे घेऊ लागले. म्हणाले, की मी एकदा विनीत बरोबर बोलून घेतो, कस आहे, की आम्ही कोणावरही पूर्ण विश्वास ठेवू शकत नाही. ही मिटिंग अतिगुप्त ठेवावी लागेल.

त्यानंतर शर्माला विनीत जैन यांची अपॉइंटमेंट मिळाली, परंतु तत्पूर्वी संजीव शहाबरोबर अजून एक मिटिंग पार पडली. संजीव शहा त्यांना म्हणाले की विनीत माझ्यावर जाम उखडलाय, कारण मी या सगळ्यात पैशाचं काही ठरवलंच नाही. विनीत जैनना तुमचा एकंदर अजेंडा दाखविल्यावर त्यांचं म्हणणं पडलं की हे राबवायचे किमान हजार कोटी द्यावे लागतील. मी म्हंटले काय विनीत, हजार कोटी कोण देईल, कस शक्य आहे ? तर विनीत म्हणाले ठीक आहे, पण ५०० कोटीच्या खाली बातच करू नका. अखेरीस शर्माची विनीत जैनबरोबर भेट करून देण्यात आली. जैन त्याला म्हणाले की तुमचा अजेंडा वैगेरे ठीकच आहे, परंतु आमची विश्वासार्हता यात पणाला लागेल , त्यामुळे आम्हाला वरवर तरी आम्ही समतोल राखत असल्याचे दाखवावे लागेल. अशी एकारली भूमिका घेता येणार नाही. पण हा समतोल असल्याचा दिखावा साधत तुमचा अजेंडा राबवावयास आमची हरकत नाही. शर्मा यांच्या भाजपच्या राजकीय विरोधकांवर प्रच्छन्न टीका करण्याच्या प्रस्तावावर जैन यांची काही हरकत दिसली नाही. जैन यांच्या भेटी नंतर शर्माची भेट परत एकदा संजीव शहा बरोबर होते. या भेटीत शहा त्याला ५०० करोड रुपयाचे “एस्टीमेट” देतात. वर, टाइम्स प्रकाशने रोज ७ करोड लोकांपर्यंत पोचत असल्याने, हि किंमत कशी वाजवी आहे ते सुध्दा सांगतात.

शर्मा त्याला या पाचशे करोड पैकी एक तृतीयांश रक्कम रोकड स्वरूपात स्वीकाराल का अशी विचारणा करतात. संजीव शहांकडे सगळ्या प्रश्नांवर तोडगे तयार आहेत. ते म्हणतात कि आपण त्रयस्थ मध्यस्थ कंपनीच्या माध्यमातून रोकड रक्कम सफेद करून घेऊ शकतो.  या नंतरची भेट शर्मा, संजीव शहा व विनीत जैन यामध्ये होते. जैन फारसे बोलत नाहीत, संजीव शहाच शर्माना, ते देणार असलेली रोख रक्कम टाइम्सच्या खात्यात सफेद होऊन कशी आणता येईल हे सोप्या भाषेत समजावून सांगत राहतात. विनीत जैन मध्ये मध्ये फक्त हुं, हुं करताना ऐकू येते.

कोब्रापोस्ट ने टाइम्स वृत्तसमूहावर केलेल्या हल्ल्याची कहाणी इथे संपते. खर तर कोब्रापोस्टने हे ऑपरेशन इतर कैक वृत्तसमूहांवर केले आहे, पण घाव जिव्हारी लागलाय टाइम्सच्या. दे वर कॉट पँट्स डाउन ! गेल्या आठवड्यात कोब्रापोस्ट ने टाइम्सवरील स्टिंग ऑपरेशन अगदी विनीत जैन व संजीव शहा यांच्या व्हिडियोसह प्रसिद्ध केल्यानंतर टाइम्सने या पुष्प शर्माची अख्खी कुंडली खणून काढली. पुष्प शर्माला २००९ साली दिल्ली पोलिसांकडून खंडणी उकळण्याच्या गुन्ह्याबद्दल अटक झाल्याची बातमी टाइम्सने २८ मी रोजी छापली. पुष्प शर्मा हा ब्लॅकमेलर असून त्याने जो काही “पुरावा” कोब्रापोस्ट वर व्हिडियोच्या रूपात टाकला आहे तो संपादित असून वेगवेगळे तुकडे जोडून मुद्दाम टाइम्स व इतर प्रतिष्ठित वृत्तसमूहांची बदनामी करण्याचे षडयंत्र आहे असा दावा टाइम्स ने केलेला आहे. टाइम्सच्या दाव्यात तथ्थ्य असेलही, पण आश्चर्य एवढ्याच गोष्टीचे वाटते की एक टीनपॉट ब्लॅकमेलर सरळ उठून टाइम्स ग्रुपच्या कॉलरला हात घालतो, टाइम्स ग्रुपच्या विश्वसार्हतेलाच सुरुंग लावतो आणि टाइम्स ग्रुप त्यावर कायदेशीर कारवाईची नोटीसही काढत नाही, प्रत्युत्तरादाखल हा माणूस स्वतःच कसा फ्रॉड आहे याचे रिपोर्ट देत राहते. यातच सत्याचे किती अंश कोणाच्या बाजूने आहेत याचा अंदाज येतो.

कोब्रापोस्टचे हे स्टिंग ऑपरेशन जर खरे असेल, तर राजकीय नेत्यांच्या, सरकारी अधिकाऱ्यांच्या भ्रष्टाचाराची प्रकरणे वेशीवर टांगणारा आपला मीडिया, स्वतः किती स्वच्छ आहे याची प्रचिती कोब्रापोस्ट च्या ऑपरेशन १३६ ने आपल्याला दिली आहे.

-तीर्थराज सामंत

Previous articleशाकाहार हा सर्वश्रेष्ठ आहार, हा सत्यापलाप!
Next articleचातक, पावशा, कावळ्याचे घरटे ……
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.