जॉर्ज फर्नाडिस, लैला कबीर आणि जया जेटली

-अविनाश दुधे

एकेकाळी संपूर्ण देश गाजवणारे लढवय्या कामगार नेते जॉर्ज फर्नाडिस आपल्या शेवटच्या काळात अल्मायझर आणि पार्किन्सन या आजारामुळे अतिशय केविलवाण्या एकाकी अवस्थेत मृत्यूची वाट पाहत होते . तेव्हा त्यांच्या आयुष्यातील एका नाजूक गुंत्याबाबत मी लिहिलेला हा जुना लेख …

…………………………………………………………………..

बातम्यांच्या गर्दीत काही बातम्या त्यातील तपशिलामुळे लक्ष वेधून घेतात. एक लढवय्या नेता म्हणून ओळख असलेले देशाचे माजी संरक्षणमंत्री जॉर्ज फर्नाडिस आणि समता पार्टीच्या माजी अध्यक्ष जया जेटली यांच्यासंदर्भातील ही बातमी आहे. सध्या अल्मायझर आणि पार्किन्सन या आजारामुळे स्मृती हरवून बसलेल्या फर्नाडिस यांना आपल्याला भेटू द्यावे, अशी याचिका जया जेटली यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केली होती. न्यायालयाने जेटली यांची विनंती मान्य करत १५ दिवसांतून एकदा १५ मिनिटांसाठी भेटण्याची त्यांना परवानगी दिली. मात्र या भेटीत फर्नाडिसांना त्यांनी स्पर्श करू नये, असे निर्देश न्यायालयाने दिले आहे. भेटीला जाण्यापूर्वी त्या भेटीची सूचना फर्नाडिस यांच्या पत्नी लैला कबीर यांना देणे आवश्यक असल्याचेही न्यायालयाने म्हटले आहे. याअगोदर जया जेटली यांची यासंदर्भातील याचिका उच्च न्यायालयाने फेटाळून लावल्यामुळे त्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. ‘She is neither a proper nor a necessary party to the present suit and she is not in relation with Mr. George Fernandes as that of plaintiffs. I am of the considered view that the visiting rights also cannot be granted’ ‘ ‘ या शब्दात उच्च न्यायालयाने त्यांना भेटीचा अधिकार नाकारला होता. जया जेटली यांचे जॉर्ज फर्नाडिससोबत कुठलेही नाते नसल्याने अशी याचिका दाखल करण्याचा अधिकार नाही. त्यामुळे त्यांना भेटीचा अधिकारही देता येणार नाही, असे काहीसे उच्च न्यायालयाचे म्हणणे होते.


हे प्रकरण समजून घेण्यासाठी आधी जॉर्ज फर्नाडिस-लैला कबीर-जया जेटली हा प्रेमाचा त्रिकोण समजून घ्यावा लागतो. जार्ज फर्नाडिसांचं लग्न माजी केंद्रीय मंत्री, शिक्षणतज्ज्ञ हुमायून कबीर यांची मुलगी लैला कबीर यांच्यासोबत १९७१ मध्ये झालं होतं. तो प्रेमविवाह होता. विमान प्रवासात या दोघांची भेट झाली होती. जवळपास दहा वर्षे त्यांचा संसार झाला. (त्यांना सुशांतो (सीन) फर्नाडिस नावाचा एक मुलगा आहे. तो सध्या अमेरिकेत इन्व्हेस्टमेंट बॅंकर आहे.) १९८४ मध्ये काही मतभेदांमुळे जॉर्ज फर्नाडिस आणि लैला कबीर या दोघांनी वेगळं राहणं सुरू केलं. त्याच सुमारास जया जेटली जार्जच्या आयुष्यात आल्या. आयएएस अधिकारी अशोक जेटली यांच्या पत्नी आणि क्रिकेटपटू अजय जडेजाच्या या सासू. (अशोक आणि जया जेटलींची मुलगी आदितीने अजयसोबत लग्न केले आहे.) महाविद्यालयीन जीवनात सौंदर्य स्पर्धेतील विजेत्या राहिलेल्या जया जेटली जॉर्जच्या व्यक्तिमत्त्वामुळे कमालीच्या प्रभावित झाल्या. त्यांनी त्यांच्यासोबत काम करणे सुरू केले. काही काळातच त्यांच्यात एक नातं विकसित झालं. आजच्या भाषेत ज्याला ‘लिव्ह इन रिलेशनशिप’ म्हणता येईल, त्या पद्धतीने हे दोघे आतापर्यंत एकत्र राहिले.

जॉर्ज फर्नाडिस संरक्षणमंत्री असतानाही दिल्लीतील कृष्ण मेनन मार्गावरील शासकीय निवासस्थानात हे दोघे एकत्र राहत असत. जया जेटली तेव्हा समता पार्टीच्या अध्यक्ष होत्या. दिल्लीच्या राजकीय वर्तुळात सार्‍यांना या दोघांच्या नात्याबद्दल कल्पना होती. एनडीए सरकारच्या काळात जया जेटलींच्या कथित तहलका दलाली प्रकरणामुळे जार्ज फर्नाडिस अडचणीत आले. त्यांना मंत्रिपदाचा राजीनामाही द्यावा लागला. मात्र तरीही त्यांचे संबंध कायम राहिले. हे नातं या दोघांनी कधी लपविलं नाही आणि कधी त्यावर जाहीर भाष्यही केलं नाही. एक अतिशय समंजस नातं या दोघांमध्ये विकसित झालं होतं. त्यामुळे या नात्याला कायद्याच्या वा समाजमान्य चौकटीत बसविण्याची गरज त्या दोघांनाही कधी वाटली नाही. मात्र नातं समाजमान्य नसणं हीच गोष्ट आज या दोघांनाही कमालीची मानसिक त्रास देणारी ठरत आहे. २०१० मध्ये जॉर्ज फर्नाडिस यांना अल्मायझर या आजाराने ग्रासले. सोबतच पार्किन्सनचाही त्रास असल्याने ते बिछान्याला खिळले गेले. तेथून या दोघांच्या नात्याला ग्रहण लागले.

जॉर्ज आजारी पडल्यानंतर अनेक वर्षे परदेशात असलेल्या त्यांच्या पत्नी लैला कबीर भारतात परतल्या. त्यांनी लगेच जॉर्जला ताब्यात घेऊन पंचशील मार्गावरील आपल्या निवासस्थानी आणलं तेव्हापासून जॉर्ज त्यांच्या निगराणीत आहेत. जॉर्जला कोणाला भेटू द्यायचं वा नाही हे त्याच ठरवितात. दीड वर्षापूर्वी जॉर्जच्या भावांनीही न्यायालयात धाव घेऊन लैला आपल्या भावाची भेट घेऊ देत नाही, अशी तक्रार केली होती. आता तीच पाळी जया जेटलींवर आली आहे. जवळपास 30 वर्षे ज्या व्यक्तीसोबत त्यांनी घालविले त्याला भेटताही येत नाही हे माझ्यासाठी कमालीचं वेदनादायी आहे. किमान माणुसकीच्या नात्याने मला भेटू द्यावे, अशी विनंती त्यांनी न्यायालयाला केली होती. आता १५ मिनिटांसाठी का होईना त्या भेटू शकणार आहेत.मात्र त्यांना जॉर्जचा साधा हातही हातात घेता येणार नाही. (जॉर्ज आज ८२ वर्षाचे आहेत. लैला ८० च्या तर जया जेटली पंचाहत्तरीत आहेत. त्यामुळे जॉर्जला स्पर्श करता येणार नाही ही न्यायालयाची अट मनोरंजक वाटते. त्यासाठी न्यायालयाने इन्फेक्शनचं कारण दाखविलं आहे.)

ही अशी प्रकरणं मोठी नाजूक आणि संवेदनशील असतात. यात कोणाला नायक-खलनायक ठरविता येत नाही. आपण बाहेरची माणसं त्यावर टीकाटिप्पणी करून मोकळे होतो. पण त्या-त्या नात्यांतील गुंतागुंत, बारकावे, भावनिक आंदोलन संबंधितांनाच माहीत असतात. या अशा नात्यांना नैतिक-अनैतिकतेच्या पारडय़ात तोलनेही चुकीचे आहे. काही वर्षापूर्वी  राजेश खन्नाचंही असंच प्रकरण बाहेर आलं होतं. शेवटच्या काही वर्षात त्याच्यासोबत ‘लिव्ह इन रिलेशनशिप’मध्ये असलेल्या प्रतिभा अडवाणी या त्याच्या मैत्रिणीला तो जाताच त्याच्या कुटुंबीयांनी घराबाहेर काढलं. तिला त्याच्या अंत्यसंस्कारातही सहभागी होऊ दिलं नाही. ‘सुपरस्टार’ अमिताभ बच्चनलाही हा अनुभव आला आहे. १९८४ मध्ये ‘कुली’ चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान जखमी झाल्यानंतर तो मरणाशी झुंज देत असताना रेखाला त्याच्या कुटुंबीयांनी तेव्हा भेटू दिलं नव्हतं. ही अशी उदाहरणं इतिहासातही भरपूर आढळतात. बाजीराव-मस्तानीची प्रेमकहाणी अजरामर आहे. मात्र बाजीराव मृत्युशय्येला खिळला असताना मस्तानीला त्याला भेटू देण्यात आलं नव्हतं.

सामान्य माणसाच्या आयुष्यातही असे प्रकरणं घडत असतात. त्यामुळेच ‘पती, पत्नी आणि वो’ या थिमवर अनेक हिंदी चित्रपटही निघाले आहेत. या अशा प्रकरणात माणसं मानवी स्वभावानुसारच वागतात. आपल्या पतीच्या आयुष्यात आलेली दुसरी स्त्री ही कुठल्याही पत्नीला आवडत नसते. तिच्यामुळे तिला जे भोगावं लागते त्याची जखम ती आयुष्यभर विसरत नाही. त्यामुळे आयुष्याच्या संध्याकाळी पती मृत्युशय्येवर असतानाही त्याच्या प्रेयसी वा मैत्रिणीची जवळीक ती सहन करू शकत नाही. कदाचित त्या प्रेयसीच्या सानिध्याने त्याच्या शारीरिक, मानसिक अवस्थेत सुधारणा होऊ शकते. मात्र एखादादुसरा अपवाद वगळता कुठलीच पत्नी यासाठी परवानगी देत नाही. तिची ही खुन्नस जेवढी स्वाभाविक आहे तेवढीच त्या प्रेयसीची तगमगही सच्ची असते. ज्याच्यासोबत त्याच्या पत्नीपेक्षाही अधिक वर्षे घालविली,ज्याच्या सार्‍या सुख-दु:खात सोबत दिली त्याला साधं भेटताही येत नाही ही अवस्था तिला मानसिक उद्ध्वस्त करणारी असू शकते, हे सहसा कोणी समजून घेत नाही.अशा प्रकरणात सहानुभूती बायकोलाच असते. (लेखिका मिथिला सुभाष यांच्या शब्दात सांगायचं तर बायकांचं अशा प्रकरणातील वागणं हे केवळ  ‘चार अक्षतांचा रुबाब तेवढा असतो’ )

प्रेयसी, मैत्रीण ही शेवटी बाहेरचीच ठरते. अनेकदा प्रेयसी पैसा व मालमत्तेवर दावा करेल या भीतीतूनही तिला तिच्या प्रियकराला भेटू दिले जात नाही. कारणे काहीही असू द्या. त्या प्रकरणातील सत्यता त्या तिघांनाच माहीत असते. त्यामुळे बाहेरील कोणीही अशा प्रकरणाबाबत तर्क बांधणे चुकीचे ठरते. जॉर्ज फर्नाडिसांच्या प्रकरणात नेमकं काय घडत आहे हे अल्मायझरमुळे त्यांना स्वत:ला तरी समजत आहे की नाही, कळायला मार्ग नाही. मात्र एका तडफदार, जिगरबाज नेत्याच्या आयुष्याचे अखेरचे दिवस कुठल्याही कारणामुळे वेदनादायी ठरू नये अशीच आपली सार्‍यांची इच्छा असेल.

(लेखक ‘मीडिया वॉच’ दिवाळी अंक, पब्लिकेशन व वेब पोर्टलचे संपादक आहेत )

8888744796

………………………………………….

अविनाश दुधे यांचे जुने लेख वाचण्यासाठी www.mediawatch.info या वेब पोर्टलवर वरच्या बाजूला उजवीकडे ‘साईट सर्च करा’ असे जिथे लिहिलेले आहे त्याखालील चौकोनात –अविनाश दुधे– type करा आणि Search वर क्लिक करा.

Previous articleबिगर काँग्रेसवाद
Next articleसंघाची पापं खडसावून सांगण्याची वेळ आलेली आहे
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.

Comments are closed.