डॉ. आंबेडकर विरुद्ध वांशिक मुलनिवासिवाद …

सौजन्य – डॉ. संजय दाभाडे , पुणे ….

imagesबहुसंख्य आंबेडकरी चळवळ, रोहित वेमुला व कन्हैय्या हे आंबेडकरी व डाव्या चळवळीच्या मैत्रीचे प्रतिक असून ह्या दोघं नैसर्गिक मित्रांनी यापुढे ” ब्राम्हणशाही व भांडवलशाही ” विरुद्ध एकजुटीने संघर्ष करावा अशी भूमिका घेत आहे. रोहितच्या प्रकरणात आंबेडकरी व डाव्या चळवळीने अत्यंत टोकदार लढाई संसदेत व संसदेबाहेर खांद्याला खांदा लावून पुढे नेली. रोहितचे प्रकरण दडपण्यासाठी संघ परिवाराने कन्हैय्याचा व जे.एन.यु. तील तथाकथित देशद्रोहाचा मुद्दा उपस्थित केल्याची खुद्द डाव्यांचीच भूमिका आहे. परंतु हि वस्तुस्थिती हेतुपूर्वक दुर्लक्षीत करून, ” रोहितच्या मुद्द्यापासून लक्ष विचलित करण्यासाठी कन्हैय्या प्रकरण आरेसेस व कम्युनिस्ट ब्राम्हणांनी उभे केले” असे मुलनीवासिवाल्यांचे म्हणणे आहे. असा अजब शोध लावणारे अर्थातच अगदी लोक अत्यल्पसंख्य आहेत. परंतु तरीही त्यांना उत्तर देणारे काही लेखन मी केले होते. ज्याप्रमाणे हिटलरला ज्यू फोबिया , आरेसेसला इस्लाम फोबियाने ग्रासले , अगदी तसेच मुलनिवासिवाल्यांना ब्राम्हण फोबियाची लागण झाली असल्याने, ते प्रत्येक घडामोडीचे विश्लेषण ( मुळात त्याला विश्लेषण म्हणताच येणार नाही, कारण त्यांचा ” निष्कर्ष ” आधीच तयार असतो ) ब्राम्हण षडयंत्राच्या चष्म्यातून करतात, असे मला वाटते. अर्थात त्यांच्या विचार स्वातंत्र्या नुसार त्यांना पटलेली भूमिका त्यांनी मांडणे हा त्यांचा अधिकार असून, बाबासाहेबांनी दिलेल्या ह्या विचार स्वातंत्र्याच्या ” घटनात्मक” अधिकाराचा मी सन्मान करतो.
माझ्या मांडणी नंतर माझ्या काही रागावलेल्या मुलनिवासिवादी मित्रांनी फोन करून मला जाब विचारला. काही जणांशी मैत्रीपूर्ण संवाद झाला याचे मला समाधान वाटते व तीव्र वैचारिक मतभेद असूनही मित्रत्व मानणारे छान व संवादी असे नवे मित्रही त्यांच्यातून मिळालेत , याचाही मनस्वी आनंद वाटतो. माझ्या माडणीला प्रत्युत्तर देणारे काही लेखन मला वाचायला मिळाले. प्रत्युत्तर देणाऱ्या ह्या मित्रांचा मी ऋणी आहे. ह्या सर्व मित्रांशी संवाद सुरु राहावा याकरिता हा लेखन प्रपंच.
ब्राम्हण हे ह्या देशातील मुळचे नसुन ते परकीय युरेशियन असून उर्वरित बहुजन ह्या देशातील मूलनिवासी असल्याचा सिद्धांत म्हणजे मुलनिवासिवाद. काही ब्राम्हणेतर संघटनांचा हाच मूळ वैचारिक पाया आहे.
मुळात मला ह्या मुलनिवासिवादाची दखल घेऊन त्याचा प्रतिवाद करण्याची गरज का वाटली ते आधी स्पष्ट करतो. मी व माझी पत्नी, कष्टकरी कामगार महिला वर्गासाठी मोफत क्लिनिक चालवतो व येथेच आम्ही महामानवांची छायाचित्रे लावली आहेत. हिंदुत्ववादी परिवाराने ज्यांचा खून केला त्या दाभोलकर व कॉम्रेड पानसरे यांची छायाचित्रे व स्लोगन्स देखील येथे आम्ही लावली आहेत. याठिकाणीच काही दिवसांपूर्वी काही कार्यकर्ते भेटण्यास आले होते व त्यातील एक मुलनिवासीवादी अत्यंत त्वेषाने म्हटले कि, ” ब्राम्हण दाभोलकर हे ब्राम्हणांचे एजंट होते व सर्व ब्राम्हण वाईट नसतात असा भ्रम लोकांमध्ये पसरविण्याची कामगिरी त्यांच्यावर सोपविण्यात आली होती. ”
बाबासाहेबांचा वारसा असल्याचा दावा करणाऱ्या मुलनीवासिवाद्याच्या तोंडातून बाहेर आलेले हे वंशद्वेशी विषारी फुत्कार ऐकून मी अक्षरशा अवाक झालो व त्यानंतर असा विषारी प्रचार करणारे अगदीच मुठभर असले तरी त्यांच्याकडे दुर्लक्ष करता येणार नाही हे लक्षात आले.
बाबासाहेबांच्या वाटचालीचा विचार करतांना , एक बाब प्रकर्षाने स्पष्ट होते कि मानवतावाद , माणूसपण व माणुसकी हेच मुल्य त्यांच्या आयुष्याच्या केंद्रस्थानी होते. शोषाकांशी शोषितांची
लढाई हि मानवतेसाठी अटळ आहेच , परंतु
ती लढाई कधीच वांशिक असू शकत नाही ह्यावर
बाबासाहेबांची प्रखर निष्टा होती .
त्यांच्या आयुष्यावर खोलवर परिणाम करणारे महात्मा फुले, कबीर , बुद्ध , जॉन ड्युई हे सारे प्रखर मानवतावादी होते. इथे कुठेही मूलनिवासीवादाला काडीचेही स्थान नाही. बाबासाहेब ब्राम्हण व ब्राम्हणशाही ( किंवा
ब्राम्हणवाद किंवा ब्राह्मण्य ) यामध्ये
फरक करतात . ब्राह्मण्य म्हणजे वर्चस्ववाद . ब्राम्हणी धर्म प्रणीत सामाजिक ,आर्थिक व सांस्कृतिक वर्चस्व प्रस्थापित करू पाहणारी
प्रवृत्ती म्हणजे ब्राम्हणवाद , असे बाबासाहेबांना अभिप्रेत होते . प्रत्येक ब्राम्हण ,
ब्राम्हण्यवादी असेलच असे
नाही . याठिकाणी बाबासाहेब परिवर्तनावर व
माणसातील माणूसपणा वर विश्वास ठेवतात . त्यामुळे बाबासाहेब आयुष्यभर जातीच्या पलीकडे
जाऊन ब्राम्हणा सहित सर्व जातीतील मित्र जोडतात व समतेसाठीच्या लढयांमध्ये त्यांना सहभागी करून घेतात , इतकेच नव्हे तर एका ब्राम्हण
स्रीला पत्नी म्हणून स्वीकारतात . बाबासाहेबांनी निर्मिलेल्या
व जगाच्या पाठीवर अतुलनीय ठरलेल्या भारतीय
राज्य घटनेत वंशवादाला चिमुटभर देखील
स्थान नाही . राज्य घटनेत सर्वत्र माणूसच केंद्रीभूत आहे .
याउलट , प्रत्येक जन्माला आलेला ब्राम्हण परकीय युरेशियन शत्रू असून ,तो वर्चस्ववादी च असतो व ह्या देशातील प्रत्येक ब्राम्हणेतर मात्र मूलनिवासी असून जन्मताच तो समतावादी असतो अशी धारणा मुलानिवासिवाद बाळगतो . याच भूमिकेमुळे मुलानिवासिवादी बाबासाहेबांच्या ब्राम्हण
पत्नीला विषकन्या ठरवून मोकळे होतात . मुलानिवासिवाद अशा रीतीने बाबासाहेबांच्या ,बुद्धांच्या व राज्य घटनेच्या विरोधात उभा राहतो .
महात्मा फुलेंनी आर्य अनार्य हा ब्राम्हणी वर्चस्वाचा सिद्धांत ब्राम्हनांवरच उलटवला, परंतु मानवतावादाला च सर्वोच्च स्थान देऊन ब्राम्हण स्रीयांच्या आश्रयासाठी आश्रम देखील फुले दाम्पत्यानीच सुरु केला.
महात्मा फुले ,कबीर व जॉन ड्युई यांना प्रेरणास्थान मानणाऱ्या बाबासाहेबांचा मानवतेसाठीचा शोध अखंड चालू राहिला व तो अखेरीस बुद्धांच्या चरणी येउन विलीन झाला. इथे कुठेही मुलानिवासिवाद चुकूनही आढळत नाही.
शुद्र कोण होते … ? ह्या पुस्तकात तर बाबासाहेबांनी आर्य-अनार्य सिद्धांताचाच अत्यंत कठोर शब्दांत समाचार घेतला आहे.
बाबासाहेब म्हणतात,
१) “आर्य भारतात बाहेरून आलेत हा सिद्धांत सापाला ठेचल्या प्रमाणे ठेचून मारला पाहिजे. ”
-डॉ .बाबासाहेब आंबेडकर ,१९४६ .
(हु वेअर द शुद्राज ..? डॉ .आंबेडकर रायटिंग अन्द स्पीचेस , खंड ७ …प्रकरण ५ ,पृष्ठ क्र .८६ ).

२) “आर्यन वंश सिद्धांत हा इतका बिनबुडाचा व मूर्खपणाचा आहे कि ह्या सिद्धांताचा फार पूर्वीच मृत्यू व्हायला पाहिजे होता …”
-डॉ .बाबासाहेब आंबेडकर ,१९४६ .
(हु वेअर द शुद्राज ..?
पृष्ठ क्र -.८० )
३) “आर्य वंश सिद्धांताचे प्रसारक इतके उतावीळ आहेत कि त्यांच्या हे लक्षातच येत नाही कि त्यामुळे ते ” मूर्खांच्या नंदनवनात ” जाऊन पोहोचतात.
त्यांना काय सिद्ध करायचे आहे हे त्यांनी आधीच ठरविले
असून त्याप्रमाणे त्यांच्या सोयीने ते पुरावे शोधत बसतात .”
-डॉ .बाबासाहेब आंबेडकर ,१९४६ .(हु वेअर द शुद्राज ..? पृष्ठ क्र.८० ).
ह्या मांडणीच्या सुरुवातीलाच मी म्हटलेय कि, आपले मूलनिवासीवादी मित्र विश्लेषण करीतच नाहीत, कारण त्यांचा निष्कर्ष आधीच पक्का निश्चित असतो. कार्यकारण मीमांसा करून निष्कर्षाकडे येण्याची अभ्यासकाची पद्धत पूर्णपणे नाकारून, आधीच मनात योजीलेल्या निष्कर्षा प्रमाणे विषयाची व कार्यकारण भावाची जुळवाजुळव करण्याची त्यांची नीती व रणनीती आहे , असे मला वाटते.
वर बाबासाहेबांनीच स्वच्छः शब्दांत सांगितले आहे कि ,
” त्यांना काय सिद्ध करायचे आहे हे त्यांनी आधीच ठरविले असून त्याप्रमाणे त्यांच्या सोयीने ते पुरावे शोधत बसतात …… त्यामुळे ते मूर्खांच्या नंदनवनात जाऊन पोहोचतात.…. ”

आपले मूलनिवासीवादी मित्र नेहमीच अलीकडच्या डी. एन.ए . संशोधनाचा संदर्भ देऊन ब्राम्हण हे मुळचे युरेशियन, म्हणजे परकीय असल्याचे सातत्याने सांगत असून त्यांच्या मुलानिवासिवादी थियरीचा, हे संशोधन म्हणजे अक्षरश मुख्य आधारस्तंभ बनलेला आहे. सर्व चर्चांची सुरुवात व शेवट हाच संदर्भ देऊन करणे हे आमच्या मुलानिवासिवादी मित्रांचे इतिकर्तव्य बनलेले आहे.
हे डी. एन.ए . संशोधन उपलब्ध झाले आहे हे सत्य आहेच, परंतु अन्य एका अलीकडील अश्याच संशोधनातून हे देखील स्पष्ट झाले आहे कि, आजच्या घडीला भारतातील कुणीही व्यक्ती शंभर टक्के शुद्ध एकाच वंशाची नाही.
बाबासाहेबांच्या वेळी हे संशोधन उपलब्ध नसल्याने त्यांनी आर्य – अनार्य सिद्धांत नाकारला, असे मुलानिवासिवादी मित्रांचे म्हणणे आहे. बाबासाहेबांनी ज्या त्वेषाने व तीव्रतेने आर्य – अनार्य थियरी नाकारली असल्याचे आपल्याला त्यांच्या ” हु वेयर शुद्राज … ? ” ह्या ग्रंथातील उपरोक्त दिलेल्या लिखाणातून दिसते. ते बघता , उपरोक्त डी. एन.ए . संशोधन बाबासाहेबांना जरी उपलब्ध झाले असते तरी त्यांनी वांशिक व वंशभेद मानणाऱ्या सिद्धांताला किती महत्व दिले असते ?
दुसरे असे कि जो मानवतावाद त्यांच्या आयुष्याचा केंद्रबिंदू होता, त्यात वांशिकतेला अक्षरशा शून्य स्थान होते व वंश द्वेषा बद्दल तीव्र घृणा होती, याबाबत माझ्या मनात तिळमात्र शंका नाही. हिटलरच्या वंश द्वेषाने पोळलेल्या व दुसऱ्या महायुद्धाच्या पार्श्वभूमीवर जगभरात वंशवादाचा धिक्कार करण्याची सार्वत्रिक भावना असतांना, व मुळातच डॉ आंबेडकरांवर उदारमतवादाचा प्रभाव असतांना, कोणत्याही परिस्थितीत वांशिक सिद्धांताचा स्पर्श सुद्धा त्यांना होणे शक्य नव्हते.
परंतु मुलानिवासिवादी मात्र बाबासाहेबांच्या फक्त एखाद दुसऱ्या वाक्याचा संदर्भ घेऊन बाबासाहेबांच्या विचारांवर स्वताच्या वांशिक सिद्धांताचे आरोपण करण्याची केविलवाणी धडपड करतात. उदाहरणार्थ , ” पुरोगामी ब्राम्हण व प्रतिगामी ब्राम्हण ह्या एकाच शरीराच्या दोन भुजा आहेत ” हे वाक्य मुलानिवासिवाद्यांचे सर्वाधिक आवडते आहे. कधीही ते हे वाक्य फेकून बाबासाहेब कसे ब्राम्हण विरोधी होते हे पटविण्याची धडपड करतात. परंतु असे करतांना ते बाबासाहेबांच्या एकूण संपूर्ण मानवतावादी तत्वज्ञानाकडे व त्यांच्या प्रत्यक्ष जीवन व्यवहाराकडे पूर्ण कानाडोळा करतात.
महाडचा चवदार तळ्याचा संगर सुरु असतांना त्यात काही ब्राम्हण देखील बाबासाहेबांच्या खांद्याला खांदा लावून अस्पृश्यांच्या हक्कासाठी लढत होते. ब्राम्हणेतर चळवळीचे शिलेदार जेधे व जवळकर ह्या दोघांनी ह्या चळवळीला पाठींबा देण्याचे जाहीर केले, परंतु त्यासाठी सत्याग्रहातून ब्राम्हणांची हकालपट्टी करावी हि अट घातली. ह्यास प्रत्युत्तर देणारा अग्रलेख बाबासाहेबांनी २७ जुलै १९२७ च्या बहिष्कृत भारताच्या अंकात लिहिला. बाबासाहेब लिहितात, ” ब्राम्हण जातीत जन्मलेला कोणीच मनुष्य मनापासून उदारमतवादी असू शकणार नाही असे आमची मनोदेवता आम्हास सांगत नाही. एवढेच नव्हे तर आतापर्यंतचा आमचा तसा अनुभवही नाही. आमच्या कार्याविषयी सहानुभूती बाळगणारे सर्वं लोक आम्हास पाहिजेत , मग ते ब्राम्हण असोत वा ब्राम्हणेतर.”
मुलानिवासीवादी मात्र बाबासाहेबांच्या ह्या भूमिकेला एका झटक्यात नाकारून मोकळे होतात व बाबासाहेबांच्या चळवळीत ब्राम्हण नव्हे तर सारस्वत होते असा केविलवाणा बचाव करतात.
सिद्धार्थ कॉलेजचे पहिले प्राचार्य म्हणून प्राध्यापक अश्वथामाचार्य बलाचार्य गजेंद्रगडकर यांनी जबाबदारी घ्यावी असा आग्रह बाबासाहेबांनी केल्याने ब्राम्हण गजेंद्रगडकर यांनी एल्फिन्स्टन कॉलेजचा राजीनामा देऊन बाबासाहेबांनी अत्यंत प्रेमाने दिलेली जबाबदारी स्वीकारली. बाबासाहेबांनी स्थापन केलेल्या औरंगाबादच्या मिलींद महाविद्यालयाला प्राचार्य म .भी . चिटणीस यांच्या सारखे जीवनदायी ब्राम्हण मिळालेत
ते उगाच नाहीत .
कन्हैय्या हा भूमिहार जातीचा असून ह्या भूमिहारांचा बिहार मधील दलितांवर अत्याचार करण्यात सहभाग असतो, असा मुद्दा एका मुलानिवासिवाद्याने मला परवा फोनवर तावातावाने सांगितला. आता हाच मुद्दा महाराष्ट्रात लावला तर काय चित्र दिसते ? महाराष्ट्रातील दलित व आदिवासींवरील अत्याचारात कोणत्या जाती अग्रेसर आहेत ? मराठवाड्यातील नामांतर चळवळीच्या वेळी गावागावांत झालेले अत्याचार, खैरलांजी, खर्डा, सोनई , भूतेगाव , व अश्या असंख्य दलित अत्याचारांत कोणत्या जाती सहभागी होत्या ? मूलनिवासी वाल्यांच्या मूलनिवासी व्याख्येतील ब्राम्हणेतर जातीचे काही लोक ह्यात सहभागी आहेत हे तर सूर्यप्रकाशा इतके सत्य आहे. अर्थात व्यक्तीशा मी तरी काही व्यक्तींच्या कडून होणाऱ्या ह्या अत्याचारांबाबत संपूर्ण त्या जातीलाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करण्याचा करंटेपणा करणार नाही.
परंतु मूलनिवासीवाल्यांचा युक्तिवाद असा आहे कि ह्यामागे ब्राम्हणांचेच डोके जबाबदार आहे. खुद्द बाबासाहेबांनी ह्या युक्तीवादाचा खरपूस समाचार घेतलेला आहे. बहिष्कृत भारत मधील ” नकटा नकट्याला हसतो ” ह्या लेखात बाबासाहेब म्हणतात, ” अस्पृश्य समजल्या जाणाऱ्या वर्गाच्या उन्नतींच्या आड ब्राम्हणच येतात असे नाही. ब्राम्हनेतरही आड येतात. अस्पृश्यांना मारहाण करण्यात व त्यांचा छळ करण्यात ब्राम्हनेतर पुढाकार घेतात. परंतु ब्राम्हनेतर पुढारी सगळे खापर ब्राम्हनांच्याच डोक्यावर फोडून मोकळे होऊ पाहतात. ”
इतकी स्पष्टता बाबासाहेबांच्या विचारांतून अधोरेखीत होत असतांना त्यांना वंशवादी व मुलनिवासिवादी ठरविण्याचा आटापीटा केला जातोय याचे दुक्ख होते.
बाबासाहेबांच्या महानिर्वाणा नंतर देखील काही मुठभर लोकांनी बाबासाहेबांच्या दुसऱ्या पत्नी, ब्राम्हण जातीच्या माई आंबेडकरांवर नको ते आरोप केले होते. मुलनिवासिवादी त्याच आरोपांना आजही पुढे घेऊन जात आहेत. दलित व दलीतेतरांशी विवाह केलेल्या ब्राम्हण स्रीयांना विषकन्या म्हणे पर्यन्त मजल जाऊ लागली आहे.
बाबासाहेबांचा महान ग्रंथ ” बुद्ध आणि त्यांचा धम्म ” ह्या ग्रंथाची प्रस्तावनाच वगळून हा ग्रंथ प्रकाशित करण्या पर्यंत काही लोकांची मजल गेली होती. त्याचे कारण असे कि ह्या प्रस्तावनेत बाबासाहेबांनी माई यांच्याबद्दल अत्यंत प्रेमाने कृतज्ञता व्यक्त केली होती. पुढे बाबासाहेबांचे पंजाब मधील थोर अनुयायी व त्यांचे संशोधन सहाय्यक भगवान दास यांनी
” बाबासाहेबांच्या दुर्मिळ प्रस्तावना ” प्रकाशित केल्यावर हि प्रस्तावना जगासमोर आली. आपल्याच महान नेत्याचे आपल्याला गैरसोयीचे ठरणारे लेखनच गायब करून टाकण्याची हि घटना दुर्मीळ व दुर्दैवी आहे. अश्या अस्वस्थ करणाऱ्या पार्श्वभूमीवर बाबासाहेबांना संकुचित वंशवादी मुलनिवासिवादात अडकवू पाहणार्यांपासून सावध राहणे गरजेचे वाटते.
जगभरात वांशिकता नाकारून बहुसांस्कृतिकता स्वीकारण्याला अनन्य साधारण मान्यता मिळू
लागली आहे . भिन्न वंशाचे सामाजिक गट
एकत्रितपणे नांदू लागल्यास अश्या वैविध्यपूर्ण
समाजाची प्रगती होते व खऱ्या अर्थाने मानवी
संस्कृती उन्नत होते , हा विचार मूळ धरू
लागलाय . असा विचारच मानवी समाजाचे
खरे खुरे आशास्थान आहे . ह्या पार्श्वभूमीवर कोणत्याही स्वरूपाचा वंशवाद माणसाचा
शत्रू असल्याचे अधोरेखित होत
आहे . संघप्रणीत मुस्लिम
द्वेष व त्यावर आधारित स्युडो हिंदू राष्ट्रवाद
व मुलानिवासिवाद प्रणीत ब्राम्हण द्वेष , दोघेही
मानवी समाजाचे व डॉ .आंबेडकर प्रणीत अस्सल
भारतीय राष्ट्रवादाचे शत्रू आहेत .
डॉ .आंबेडकरांचा मानवतावाद वैश्विक मूल्ये जोपासणारा आहे . बाबासाहेबांच्या अनुयायांमध्ये जाती धर्माच्या व लिंगभेदाच्या भिंती तोडून मानवतेला सर्वोच्च स्थान देणारा व तत्वज्ञानाच्या क्षेत्रात तसेच सामाजिक,सांस्कृतिक व राजकीय विश्वात ह्याच वैश्विक भूमिकेमुळे दबदबा निर्माण केलेला फार मोठा वर्ग आहे. भारतीय राज्यघटनेला व तीच्यातील चिरंतन मानवतावादी तत्वांना रोहित वेमुला प्रमाणेचn छातीशी कवटाळून घेऊन प्राणपणाने संघर्ष करणारा हा वर्गच आशास्थान आहे.

डॉ. संजय दाभाडे…
( पुणे )….

Previous articleनीतिमत्तेच्या ठेकेदारांनो…
Next articleसावरकरांवरील गांधीहत्येचा कलंक कधीही पुसला जाणार नाही…
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.