दयार, दिशा आणि तिचे सूर्य

‘मीडिया वॉच’ पब्लिकेशनतर्फे प्रकाशित होणाऱ्या ‘मीडिया वॉच’ अनियतकालिकाच्या जानेवरी -मार्च २०१७ च्या अंकात प्रकाशित झालेल्या ‘दयार , दिशा आणि तिचे सूर्य’ या Cover Story ला ‘लाडली मीडिया अवॉर्ड फॉर जेंडर सेन्सिटिव जर्नालिझम’ जाहीर झालाय.  ‘मीडिया वॉच’ च्या कार्यकारी संपादक शर्मिष्ठा भोसले यांना आज १४ सप्टेंबरला दिल्लीत ‘हिंदू’ चे माजी संपादक पी . साईनाथ यांच्या हस्ते हा पुरस्कार दिला जाणार आहे . शर्मिष्ठा भोसले यांची वेगळ्या जगाची ओळख करून देणारी पुरस्कारप्राप्त कव्हर स्टोरी – वाचायला विसरू नका –  संपादक

…………………………………………………………………………………………………………….

-शर्मिष्ठा भोसले

मी फोनवर दिशाला खुणेचं ठिकाण सांगितल्यानुसार एका पानटपरीच्या बाजूला उभी आहे. टपरीवाला मला कधीपासून रोखून बघायलाय. मी या गावातली नक्कीच नाही हे हेरलंय त्यानं. माझं नवखेपण जाणवलंय त्याला. ते तो हिरव्या-ओल्या पानावर कात-चुना लावता-लावता सराईतपणे न्याहाळालाय. तशीच ओठंगून उभीय मी. मला एसटी स्टँडवर घ्यायला वर्षा आली. वर्षा केवढी गोड आहे! उंच, रंगानं उजळ, रेखीव आणि हसऱ्या चेहऱ्याची. तिनं काळ्या रंगाचा सलवार कमीज घातलाय. मी नको म्हणतानाही माझी बॅग हातात घेऊन वर्षा निघाली. आम्हा दोघींना सोबत निघालेलं पाहून टपरीवाल्याच्या नजरेतलं सहज कुतूहल विरघळलंय. तिथं आता एका निष्कर्षावर आल्यागत ‘अच्छा, अस्सय व्हय’! टाईपचं कुत्सित हसू आणि खूप साऱ्या चौकशांचा स्वस्त तवंग दिसायलाय… तो बाजूला सारत मी वर्षाच्या मागेमागे चालू लागले.

मुख्य रस्त्यावरून मध्ये वळलोय आम्ही. अरुंद गल्ल्या, बैठी घरं, आणि सकाळची चहलपहल हाताळणारा रस्ता. ‘तुझी वाटच पाहातेत सगळे.’ वर्षा म्हणाली. पाचेक मिनिटं चाललो तेव्हा एक कंपाऊंडनं वेढलेलं मोठं आवार लागलं. वर्षा म्हणाली, ‘चल आत.’ गेटवर दोन्ही बाजूंनी दोन हिरवे झेंडे फडकत होते.

आत पाऊल टाकलं तशी माझी मैत्रीण दिशा समोर आली. म्हणाली, ‘हमारे दयार में आपका तहे दिल से इस्तकबाल करते है!’ दयार..! कसला हसीन शब्द आहे. ‘दयारे दिल की रात में चराग सा जला गया, मिला नही तो क्या हुआ वो शक्ल तो दिखा गया..’ मी नकळत नासीर काज्मींची गझल गुणगुणायला लागले…

‘हाजी मंजील, १९७७’ दयारच्या उंबऱ्यापाशी मी थोडी अडखळते. आत जाते. एकामागोमाग एक अशा चार खोल्या आहेत. दगडी फरशी. जुनं .. उबदार घर.

मग मैत्रीण मला दयारच्या मागे घेऊन गेली. तिथं मोठं अंगण होतं मैत्रीण म्हणाली, ‘इथं आम्ही.. विसावतो… रडतो… भांडतो… आणि अजून काय-काय.. खूप सगळ्या उलथापालथी पाहिल्यात या अंगणानं. त्याच्याजवळ खूप किस्से आहेत.’

तेवढ्यात उमा आली. ‘रंगबावऱ्या स्वप्नांना सांगा रे सांगा.. कुंदकळ्यांना वेलींना सांगा रे सांगा..’ तिच्या मोबाईलची रिंगटोन वाजली. हिनं मनाच्या कुठल्या कप्प्यात जपून ठेवली असतील रंगबावरी स्वप्नं…? त्यांचं काय होणाराय पुढं?… मी विचारात पडले तर समोर चहा धरला मानसीनं.

आतल्या खोलीत एक मैत्रीण नुकतीच न्हाऊन आलेली. साडी नेसत  होती. गाठ मारताना मला बघून हसली अन बोलली, ‘गुरू ने बोलाय, कमरका नाडा और बटवा, दोनो कभी ढिल्ला नई रखनेका..!’ तिनं तिच्या जगण्याचं, तगण्याचं तत्वज्ञान केवढं सहज सांगून टाकलं मला.. मी विचारच करत बसले…. या खोलीत ‘लडकियों का मदरसा’ असं लिहिलेला लहानसा बॉक्स आहे. मानसीनं सांगितलं, ‘हा बॉक्स आमच्या गुरूनं ठेवलाय इथं. घरात वरच्या वर जो काही चिल्लर-खुर्दा हातात येईल तो आम्ही याच्यात टाकत राहतो. ही सगळी रक्कम मग इथं जवळ असलेल्या मुलींच्या मदरशाला देतो. आमच्याकड रेशनचं धान्य येतं. त्यातलापन ठराविक हिस्सा तिथं पोचता करतो.’

अंगणात वेल होता एक. त्याच्याकड बोट दाखवत वर्षा म्हणाली, ‘हा दोडक्याचा वेल लावला होता. आला वर, वाढला आणि वाढतच गेला नुसता… एकदा बहरला, पण नंतर कधी फूल, फळ काही धरलं नाही. पण मी उखडले नाही त्याला. म्हणलं काय का असंना, सोबत तरी आहे की तेवढी…’

आतल्या खोलीत सज्जावर खूप सारी पितळी आणि स्टीलची भांडी, पिंपं आणि अजून काय-काय हारीनं मांडून ठेवलंय. त्याविषयी विचारल्यावर दिशा सांगते, ‘आमच्यात वाटण्या होत नाहीत. हे सगळं परंपरेनं, पिढ्यानपिढ्या चालत आलेलं सामान, त्यात भरही पडत जाते. पण एक गुरु बदलून दुसरा केला, की ओळख बदलते. गुरू बदलण्याला रीत टाकणं म्हणतात. पण असा गुरू बदलला की मग नावही बदलतं. कागदोपत्री व्यवहारांचीही अडचण होते.’

दयारच्या आतल्या खोलीत खूप साऱ्या तसबिरी टांगल्यात. ‘या सगळ्या गुरुंच्या आहेत.’ दिशा सांगते, ‘आमच्या एक मोठ्या गुरु, त्यांना सगळे आदरानं नानी म्हणायचे, मोहल्ल्यात खूप मानायाचे त्यांना लोकं. त्यांचा शब्द सगळ्या स्त्री-पुरूषांसाठी अंतिम असायचा. त्यांनी इजाजत दिल्याशिवाय सोयरिकाही मंजूर व्हायच्या नाहीत. आजही लग्नं होताना आमच्या दयारमधून हळद जाते लग्नघरी. आमच्या तमन्ना गुरूंनी एक मुलगी दत्तक घेतली होती. तिच्या लग्नावेळी मग आम्हाला सगळ्या मोहल्ल्यातून हळद आली…’

मदिना खालानं आम्हाला जेवायला बोलावलं. खाला इथंच राहतात. दिवसभरातलं घरातलं काम आणि स्वयंपाक बघतात. खूप चव आहे त्यांच्या हाताला. जाता-जाता मानसी म्हणाली, ‘बडेका’ चालतंय का तुला?’ मी ‘हो’ म्हणले तसं ती आश्चर्यानं बघतच राहिली. मला म्हणली, ‘कोण समाजाचं तुम्ही?’ मी म्हणले, ‘मराठा’ तसं तिच्या चेहऱ्यावरचा संभ्रम अजूनच गडद झाला. ‘तुमको समझना चाहती हूं तो तुम्हारे साथ, तुम्हारा खाना खाऊ ये भी जरूरी है नं?’ या माझ्या प्रश्नावर तिनं हसून मान डोलावली.

जेवल्यावर आम्ही गप्पा मारत बसलो सगळ्याजणी तेव्हा एक मैत्रीण बीडी पीत होती. मी म्हणाले, ‘थोडं कमी कर हळूहळू….’ ती म्हणली, ‘जाऊ दे सोड गं… मला म्हातारं होईपर्यंत जगायचं नाही…’ खिन्न हसली.. मला कळलंच नाही काय बोलावं पुढं ते..

दिशानं मला एका स्वतंत्र, दयारपासून वेगळ्या बांधलेल्या खोलीत नेलं. निळ्या रंगाच्या भिंती होत्या. देवघर होतं. आम्ही केवढा तरी वेळ तिथं गप्पा मारत बसलो. बोलता-बोलता दिशा सहज म्हणाली, ‘हा ‘निर्वाण का कमरा’ आहे. एखादी व्यक्ती तिचा नैसर्गिक कल सापडल्यावर आमच्यात सामील व्हायला येते ना, तेव्हा सगळी प्रक्रिया करून तिला चाळीस दिवस इथं बंद ठेवलं जातं. हा स्वत:तल्या कुण्या तरी नवीनच ओळखीला शोधण्याचा काळ असतोय. खूप मुश्कील, आतूनबाहेरून हलवणारा, परीक्षा पाहणारा… या खोलीनं केवढी घुसमट आणि उलथापालथ पाहिलीय ते या भिंतींनाच माहीत…’ मी थरारून गेले ऐकताना..

रात्री आमच्या सगळ्यांचं ठरलं की पिक्चरला जाऊया. ‘दंगल’चा ९ ते १२ चा शो होता. सिनेमात महावीर फोगटची भूमिका करणारा आमीर खान आणि त्याच्या दोन कुस्तीपटू मुली पितृसत्तेला आव्हान देत होत्या. ‘म्हारी छोरीयां छोरो से कम है के?’ या आमीरच्या डायलॉगवर लोकांनी अंधारात टाळ्या-शिट्ट्यांचा पाऊस पाडला. इंटरव्हलच्या उजेडात मात्र आमच्या आजूबाजूला बसलेल्या पुरुषांच्या आणि बायांच्याही नजरेत मला तीच पितृसत्ता दिसली. नजरअंदाज न करता येणारी. आमच्या आरपार रोखून पाहणारी. मी आणि प्राची ‘लेडीज के लिये’ असं लिहिलेल्या बाथरुममध्ये गेलो तर तिथेही ती मागोमाग आली. ‘कुठं जायचं?’ हा प्रश्न प्राचीसाठी अधिकच गडद करून गेली. काही काळात पुन्हा अंधार झाला.

समतेसाठीची लढाई पडद्यावर बघण्यात पुन्हा सगळे रंगून गेले. पिक्चर संपला तसं सगळे बाहेर आले. मी या सगळ्या मैत्रीणींचे चेहरे निरखत होते. तिथं बेचैनी होती, संभ्रम होता तशी समजूत आणि स्वीकारही होताच. एकजण दुसरीला म्हणाली, ‘काय गं, तू खेळणार का कुस्ती अशी?’ त्यावर दिशा बोलली, ‘या घडीला तरी काही दिसत नाही. पण काही पिढ्या अशा गेल्यावर क्रीडास्पर्धांमधून आपल्या सहभागासाठी एक स्वतंत्र गट नक्की असेल.. तसं असाव यासाठी प्रयत्न तरी करूच शकतो नं आपण…’ यावर मी नुसती मान डोलवू शकले…

दुसऱ्या दिवशी बाजारला जायचं होतं. प्रत्येकीचा वार, त्यादिवशी ठराविक गावचा ठराविक बाजार ठरलेला असतोय. मांगतीला जाण्यासाठी.

मी आणि दिशा संगमनेरच्या बाजाराला निघालो होतो. आम्ही जाताना प्रवासात दिशा लिहित होती. एक कॉलेजला जाणारा तरुण तिच्याकडं कधीचा कुतुहलानं बघत होता. त्यानं तिला विचारलं, ‘तुम्ही काय लिहिताय?’ दिशा म्हणाली, ‘लेख.’  त्यांचा संवाद मग चालूच होता प्रवासभर. निरोपावेळी त्यानं दिशाचा नंबर घेतला. त्याच्या नजरेत भारावलेपण आणि आदर होता.

आम्ही बाजाराच्या तोंडाशी उभे होतो. शनिवारचा बाजार. केवढ्या तरी रंग, गंध आणि आवाजांची धूळ उंचउंच उठली होती. आपापला माल चढ्या बोलीत विकायला सगळे बायामाणसं जीवतोड जाहिरात करत होते. ‘या.. या, बघा वांगी सस्ती लावली..’ ‘हे टमाटे घ्या गावरान… दहाला किलो…’ ‘हे मेथी, कोथमीर, कांदापात पाचला दोन जुड्या..’ मसाले, लोणची, मटार, संत्री, बोरं, पेरू, आवळे, भोपळे, सुक्या लाल मिरच्या, … मालाच्या असंख्य रंगांची महिरप नजर न ठरू देणारी… दिशा मला म्हणाली, ‘आता मी माझ्या कामात लागेन. झपाझप चालेन. मला गाठायचं काम तुझं. समजा चुकामुक झालीच, तर बाजाराच्या तोंडाशी इथंच भेटू शेवटी.’ मी ‘हो’ म्हणते न म्हणते तोवर दिशा चालू लागली होती.

बाया-बापड्या दिशाला पाहून खुलल्या, तिच्याशी तोंडभरून बोलायल्या. दिशा समोर असलेल्या मालाला हात लावायची. बाया तिच्या हातावर पाच रुपये टेकवायच्या. पुरुषांचंही तेच. पण त्यांच्या बोलण्यात जिव्हाळा क्वचितच दिसला. तिथं हेटाळणी आणि कुत्सितपणच जास्त होतं.

एका माणसाच्या पथारीवर वांगी होती. दिशानं मालाला हात लावला तरी हा पैसेच काढेना. दिशा म्हणाली, ‘जाओ, मैने तलाक दे दिया आपको.’

एक बाई दिशाला बोलली, ‘थांब की जरा, इतकी घाई कशाला करती? तुला काय संसार आहे का घरी जाऊन?’ दिशाचं उत्स्फूर्त उत्तरही तयार होतं त्यावर, की ‘जन्माला आलेल्या कुणाला संसार चुकलाय व्हय? चला माझ्या घरी दावते तुम्हाला माझा संसार.’

बाजारात एकेक गल्ली ओलांडतांना मोठा पिंपळ लागला. पण हा पिंपळ डेरेदार नाही, उंचउंच वाढलाय नुसता. पायथ्याला मारुतीचं छोटंसं देऊळ आहे. शनिवार असल्यानं रुचकीच्या पानांचा हार चढवलाय कुणीतरी मारुतीला. लाल शेंदरानं माखलेला मारुती, आणि रुचकीची हिरवी पानं.

वाटेत पोतराज भेटला… उग्र मुद्रा… भाळावर हळदकुंकवाचा मळवट… पायांत वाक्या, कमरेला घुंगुरमाळा… हातात आसूड आणि कंठात ओढ लावणारे जाडेभरडे सूर…

वीसाची नोट हातावर टेकवली तसा तो गात राहिला…

‘आळंदी करून देहूला जाते मी वाकडी

अन् जाते मी वाकडी, देहूला जाते मी वाकडी…

तुकारामाचा मंडप कोण्या शिंप्यानं शिवीला..

कोण्या शिंप्यानं शिवीला… त्यावर अभंग लिहिला

देव विठ्ठलाचा त्यावर अभंग लिहिला

कुणाचे गं वाडेघोडे, कुणाच्या गं गाईम्हशी,

अन स्वर्गीच्या वाटं आतमा चालला उपाशी…

आतमा कुडीचं लागलं भांडण, चालला देहाला सोडून

स्वर्गीच्या वाटं यमराज करी विचारपूस

खरं सांगा आत्माराजा, कधी केली यकादस..

मरणाच्या वाटं सोबत येतंय काय हो,

पाच बोटाचा धरम, हातावरलं गोंदण..’

पोतराज मरतावेळचे दाखले देत होता आणि बाजारात मागणारी दिशा जगतावेळचे… पण दोघांना सांगायचं होतं ते तत्वज्ञान मात्र सारखंच होतं की…

एकजण पैसेच काढेना. दिशा म्हणली, ‘दाजी, काढा पैसे. हिजड्यावनी नका वागाय लावू.’ त्यानं लगेच पाचचा बंदा काढला. एक बाई विचारायली दिशाला, ‘अगं, मिसरी देऊ का तुला? हे मुळे अन् तोंडले जाईनात बघ.’ तशी दिशा लगेच डबल हात लावते दोन्हीला. तिच्या बाजूची आजी पैसे द्यायला वेळ लावायली असं पाहून दिशा म्हणायली, ‘आजी, तुमचा लेक काहीच कमवना बघा. माझी कशी गुजराण व्हायची? द्या लवकर पाच रुपये.’ पुढचीसोबत बोलणं होतं, की ‘बाई, किती हफ्ते बुडवशील? मी तुला टळंना अन तू मला!’ एकजण वर ओट्यावर बसलेला आणि त्याची बायको खाली माळवं विकत बसलेली. दिशा उपरोधानं म्हणते, ‘बराबरच हाय की, बाईनं असं खालच्या पायरीवरच असावं. रावसाहेब, बसा तुम्ही ओट्यावर!’ रावसाहेब हसतात अन बाई तोंडावर पदर लावते. अजून थोडं पुढं बसलेल्या बाईची दिशा कितीतरी आस्थेनं विचारपूस करते, ‘कधी आली गं, तुझं ऑपरेशन झालतं नं? कशी आहेस आता?’ एका मुलीला धीर देते, ‘तू भरतीसाठी यावेळीसुद्धा प्रयत्न कर. होईल तुझं सलेक्शन नक्की!’ एका बाईनं एक रुपया दिल्यावर दिशा म्हणते, ‘पंतप्रधान आहेत की हजार पाचशेच्या नोटा बंद करतात. अन तू अजून एक रुपया बंद करनास! घरची भिईना अन दारची पदर घेईना असं झालंय बघ तुझं..’ तेवढ्यात एकजण दिशाला चिडवतो, ‘पावती पुस्तक का छापून घेईनास?’ दिशाही लगोलग उत्तर देते, ‘हो, जीआर आला की टाकतेच छापायला.’ एकजण तिला म्हणतो, ‘अहो, आम्ही तुमच्या गाववाले, आमच्याकडे कशाला मागता पैसे?’ दिशाचा प्रतिसाद तयार असतो, ‘गाववाले काय रेशन भरतात काय आमच्या घरात? जेवाया देतात का?’ गाववाला बोलतो, ‘या की!’ दिशा त्यावर म्हणते, ‘सगळे मिळून १८० लोक आहेत. चालंल का?’ गाववाला मग ‘नको नको’ म्हणत हसतो अन् पैसे पुढं करतो. एक अचारवाला जरा निवांत होता. माझ्याकडं नजर रोखत म्हणाला, ‘ये कौन है?’ दिशानं सांगितलं, ‘येभी मेरे साथ आई है..’ त्यानं नजर अजुनच घट्ट रोवली माझ्यावर… विचारला, ‘पर ये तो ओरिजिनल लगती है…?’ त्या प्रश्नातली धग माझ्या कातडीच्याही आत पोचली… मी पोळून निघाले. काही न कळून तिथंच खिळून राहिले… तसं दिशानं मला हाताला धरून पुढं चालतं केलं.

एका काकुंना दिशाचा बटवा खूप आवडला. त्या म्हणाल्या, ‘कुठून आणलास गं? मलाही दे की एक आणून.’ दिशा म्हणाली ‘पुढच्या बाजाराला येताना आणते नक्की!’ मग एका भाजीवाल्या काकूजवळ आम्ही जरा विसावतो. दिशा त्यांना सांगते, ‘ताई, उद्या माझा लेख पेपरात छापून येणार आहे बरं!’ काकू हरखून जातात, ‘अगं बाई, खरंच?’ केवढा तरी वेळ मग त्या जिव्हाळ्यानं कायकाय बोलत-सांगत राहतात… आम्ही सोबत चहा पितो आणि निघतो. जरा पुढं दिशा थांबते. मला एक जागा दाखवत सांगू लागते, ‘हे इथं एक आजी बसत असती. मी माय म्हणते तिला. तिच्या नाकात मोत्याची टपोरी नथ असते. एकदम जुनी… अस्सल! दर दोन महिन्यांनी ती नथ गहाण ठेवते. मग मी विचारते, ‘नथ कुठाय?’ मग ती मला हलाखीची अजून एक गोष्ट ऐकवते. मी धीर देते तिला आणि पुढं निघते. असं आमचं नातं आहे बघ…’ त्या न पाहिलेल्या आजी, त्यांची पाणीदार नथ आणि बाणेदार संघर्ष असं सगळं माझ्या डोळ्यासमोर उभं राहतं…. दिशा मात्र कधीचीच पुढं निघून गेलेली असते. मी धावतपळत तिला गाठते. दिशा सांगू लागते, ‘लोक आम्हाला अक्का, ताई असं म्हणून बोलतात. काही असेही असतात, जे मामा, मावशी म्हणतात. पण ‘काका’, ‘आत्या’ नाही म्हणत बघ… त्यांना आमच्यासारख्या लोकांसोबत आईकडचं नातं चालत असावं, बापाकडचं नाही…’

मग आम्ही खाटीक गल्लीत गेलो. मासे, कोंबड्या, पिसं, पिंजरे, कलकलाट, बकरे, सुरे… इथं प्रत्येकजण पाचऐवजी दहा रुपये देत होता. अरुंद गल्ल्या, लोकांची गर्दी, इथं बाया जवळजवळ नव्हत्याच. सगळे पुरुष, त्यांच्या नजरा आणि आम्ही दोघी.. एकानं माझ्याकड बोट दाखवत विचारलं, ‘ये क्या नयी कारीगर है?’ दिशा म्हणाली ‘हां’. मग मलाही वरखाली पाहात त्यानं दहाची नोट देऊ केली. ती घेताना रोखलेली सुरमेवाली नजर पाहून मी आतबाहेर कमालीची हादरले. खिळून राहिले जागच्याजागीच. दिशानं पुन्हा माझा हात धरून खेचतच पुढं नेलं. पुढं-पुढं जात होतो तसं पाऊल ठेवायलाही जागा नव्हती. मागं वळून पाहावं तर पाठीला केवढ्या तरी नजरा चिकटलेल्या दिसायल्या… एका चाचानं विचारलं, ‘ये तो पहले कभी नही दिखी..’ दिशा म्हणाली, ‘अभी कल-परसों आई है..’ चाचा मला पैसे देत म्हणाले, ‘अच्छा, रख लो बेटा.. खुदा तुमपे रहम रख्खे..!’ त्यांच्या बुढ्या नजरेत सगळ्या दुनियेची मासुमियत, मोहब्बत दिसली मला… डोळे भरून आल्यानं समोरची चिंचोळी वाटही दिसना झाली. दिशाचा हात मी घट्ट पकडून ठेवला.

नजरा.. काळ्या, घाऱ्या, हिरवट, सुरमेदार… नजरा.. हपापलेल्या, भेदरट, संशयी, सराईत, खरवडणाऱ्या.. सवाल करणाऱ्या, सहानुभूती दाखवणाऱ्या, देह्मनातून आरपार जाणाऱ्या… माझं स्त्री असणं वा नसणं स्कॅन करू पाहणाऱ्या नजरा.. त्या वाचता-वाचता मी थकून गेलते आता. मी माझं मलाच चाचपून पाहिलं… आतल्याआत एखाद्या रिकाम्या सुरईगत  पोकळ झाल्यासारखं वाटायलं होतं… माझं तिथं त्या क्षणी मौजूद असणं मलाच जाणवेना झालं.. सगळं देहमन बधीर झालतं…

आम्ही काळी-पिवळीचा प्रवास करून घरी आलो तेव्हा अंधारून आलतं. मला वापस औरंगाबादला निघायचं होतं. मी आवराआवर केली आणि दिशासोबत एसटी स्टेंडला निघाले तेव्हा साडेनऊ वाजत आले होते. सामसूम मोहल्ल्यातून फक्त काही बाया तेवढ्या गप्पा मारत ओसरीवर बसलेल्या… आम्ही स्टेंडवर आलो आणि गाडीची वाट बघत बसलो गप्पा मारत. तसा एक सभ्य दिसणारा माणूस अचानक येऊन आम्हाला ‘नगरची गाडी कधी येणार? तुम्हाला कुठं जायचंय’ असं विचारू लागला. आम्ही त्याला उत्तर दिलं तसा तो आमच्या समोरच्याच बाकड्यावर बसला. त्याची नजर आमच्यावर खिळलेली होती. पुढच्या अर्ध्या-पाऊण  तासात ती अधिकाधिक गडद होत गेली. ती वाचता आली नाही… पण ती नकोशी होती हे नक्की जाणवत होतं.

एसटी येत नाही हे कळून आम्ही बाहेर मुख्य रस्त्यावर आलो. काही वेळानं बाजूला नजर टाकली तर तोच सभ्य दिसणारा माणूस उभा होता. तीच नजर. अजून गडद. तिथं अजून काही अनोळखी लोक येऊन चौकशी करून गेले.. ‘कुठं जायचंय? आम्हीपण नेवासा फाट्यालाच चाललोय’ आणि अजून बरंच काय काय… एक कारपण थांबली समोर येऊन, आतला माणूस म्हणला, ‘चला मीपण नेवासा फाट्यालाच निघालोय.’ पण त्याचा आवाज परका वाटला आणि नजर भिरभिरणारी. आम्ही ठामपणे ‘नाही’ म्हणलं. थर्टीफस्टची रात्र असल्यानं असेल कदाचित, पण काहीच वाहन मिळत नव्हतं. शेवटी दिशानं एक फोन लावला. मग थोड्याच वेळात रहीम त्याची ऑटोरिक्षा घेऊन आला. रहीम, विशीतला हसरा पोरगा आहे. दयारच्या बाजूच्याच दलित-मुस्लीम वस्तीत राहतो. म्हणाला, ‘बोलो किधर चलना है?’ दिशा म्हणाली, ‘देख, ये मेरी सहेली है, उसे औरंगाबाद जाना है. यहां से तो गाडी नही मिल राही. हम नेवासा फाटेपे जाये तो मिल सकती है.’ रहीम उत्साहात म्हणाला, ‘तो क्या फिकर है दीदी? चलो चलते है.’ आम्हाला लपेटून राहिलेल्या सगळ्या नजरांचा वेढा सोडवत आम्ही आत बसलो. थंडी वाढतच होती. रहीम सफाईदारपणे ऑटो चालवत होता. सोडावॉटरसारखी फसफसणारी बडबडही करत होता. म्हणाला, ‘मै और दिशा दीदी कितने सालों से दोस्त है. हम एकदुसरे को इन्सान बोलके देखते, जानते. वो मेरकू भाई बोलती. अब रिश्ता बनने को और क्या चाहिये ना?’ मी हसून मान डोलावते. दिशा मला सांगते, ‘सभ्य म्हणवल्या जाणाऱ्या समाजात आम्हाला सतत नकारच वाट्याला येतात. पण आम्हाला दलित आणि मुस्लीम समाजाकडून मिळणारी स्वीकारार्हता आणि स्वागतशीलता नेहमीच खूप जास्त असत आलीय.’ रहीम बोलतच होता, ‘देखो ना, आज साल खतम होराय तो दुनिया जश्न मनारी. और अपन सब ठंडी में घुमरे..अपने जिने की मुश्कीले खतमीच नई होरी….’ त्यावर दिशा म्हणाली, ‘वो तो है, अपने लिये जिंदगी अलग तो है. पर हम जैसे सामना करते आये उसका, वैसे ये बाकी लोग थोडे कर पायेंगे? हमारी खुशी, हमारे जश्न, हमारे गम सिर्फ हमारे है. वो दुनिया के और किसी के जैसे नही.’ रहीम उत्साहात म्हणतो, ‘हां, हां… वो भी तो एकदम बराबर है…!’

आम्ही नेवासा फाट्याला आलो आणि ऑटोला टेकून एसटीची वाट बघत उभं राहिलो. बाईकवाली पोरं, त्यांच्यामागं बसलेल्या क्वचित काही पोरीही उत्सवी मूडमध्ये आसपास जल्लोष करत होते. काही पोरं उगाचच आमच्या आसपास घुटमळू लागलेली. तेवढ्यात एक एसटी येताना दिसली. दिशानं खूप समोर जाऊन हात केला. पण ड्रायव्हरनं एसटी थांबवलीच नाही. मग रहीमनं जाऊन आमच्यासाठी चहा आणला. अजून काही वेळ गेला तशी दुसरी एसटी आली. यावेळी दिशा समोर जाऊन हात करत म्हणाली, ‘थांबवा, थांबवा. लेडीज आहे. प्लीज थांबवा…’ मी घाईघाईत ऑटोतली बेग घेत एसटीत बसले. दिशाला आणि रहीमला निरोपाचा हात केला.

उद्याची सकाळ नव्या वर्षातली असणार होती. नवी सकाळ, तिचा चकाकणारा सूर्य माझ्यासारख्या सगळ्यांच्या जगण्यात न बोलावता उगवणार होता.. उगवत राहणार होता. पण दिशा…रहीम…मानसी…वर्षा…मदीना खाला.. सगळ्यांनाच आपापल्या सकाळीसाठीचे सूर्य दररोज खेचून आणावे लागणार होते. त्यासाठीचं बळ त्यांना कुठून मिळत असंल?

मीडिया वॉच’ चा हा अंक bookganga.com वर https://www.bookganga.com/eBooks/Books/details/5165330078222945409?BookName=Media-watch-Jan—March-2017    या link वर Online विक्रीसाठी उपलब्ध आहे.

————————————–

(लेखिका ‘मीडिया वॉच’ च्या कार्यकारी संपादक आहेत.)

   [email protected]    

Previous articleदेव भेटला वाळवंटात
Next articleलाईफपार्टनर – एकटेपण – पजेसिव्हनेस – मल्टिपार्टनर !
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.

Comments are closed.