नेताजींच्या मृत्यूविषयात रहस्यमय लपवाछपवी

Bose_Gandhi_1938भारतीय स्वातंत्र्यलढय़ातील महानायक नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या गूढ मृत्यूच्या रहस्याची पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. नेताजी बोस यांच्या पणती रेणुका चौधरी यांनी नेताजींच्या विषयातील सत्य लोकांसमोर का येऊ दिलं जात नाही, हा प्रश्न उपस्थित केला आहे. याचदरम्यान भारतीय राजकारणातील वादग्रस्त व्यक्तिमत्त्व असलेले सुब्रह्मण्यम स्वामी यांनी ‘नेताजी १९५३ पर्यंत जिवंत होते. रशियाने त्यांना सैबेरियातील तुरुंगात ठेवले होते. रशियाचे तेव्हाचे अध्यक्ष स्टॅलीन यांनी त्यांना फाशी दिली,’ असा दावा केला. ते एवढय़ावरच थांबले नाहीत. भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांना ही वस्तुस्थिती माहीत होती, असा बॉम्बगोळाही त्यांनी टाकला आहे. ‘दुसर्‍या महायुद्धाच्या समाप्तीनंतर नेताजी तेव्हा रशियाच्या अधिपत्याखाली असलेल्या मंचुरिया प्रांतात गेले होते. रशियाने आझाद हिंद सेनेच्या सरकारला मान्यता दिल्याने रशियात आपल्याला आश्रय मिळेल, असे नेताजींना वाटत होते. मात्र दुसर्‍या महायुद्धानंतर बदललेल्या परिस्थितीत नेताजी इंग्लंड, फ्रान्स, अमेरिका, रशिया या दोस्त राष्ट्रांसाठी युद्ध गुन्हेगार ठरले होते. त्यामुळे रशियात प्रवेश करताच रशियाची गुप्तचर संस्था केजीबीने नेताजींना अटक करून सैबेरियात नेले. या अटकेबाबत स्टॅलिनने डिसेंबर १९४५ मध्ये जवाहरलाल नेहरूंना पत्र लिहिले होते. त्या पत्रात नेताजींचे काय करायचे, याची विचारणा करण्यात आली होती. हे पत्र मिळताच नेहरूंनी २६ डिसेंबर १९४५ रोजी आपले स्टेनोग्राफर श्यामलाल जैन यांना बोलावून ब्रिटनच्या पंतप्रधानांना लिहावयाच्या पत्राचा मजकूर त्यांना सांगितला. त्या पत्रात नेहरूंनी स्टॅलिनकडून आपल्याला नेताजींच्या अटकेची माहिती मिळाली आहे. या विषयात आपण काय करायचे ते ठरवा, असे पंतप्रधान अँटली यांना लिहिले होते. त्यानंतर इंग्लंडचे अधिकारी रशियात पोहोचले. त्यानंतर काही वर्षांतच नेताजींना फाशी देण्याचा निर्णय घेण्यात आला, असेही सुब्रह्मण्यम स्वामी सांगतात. ‘पंडितजींचे स्टेनोग्राफर श्यामलाल जैन यांनी ही वस्तुस्थिती नेताजींच्या मृत्यूची चौकशी करण्यासाठी १९७२ मध्ये गठित करण्यात आलेल्या खोसला आयोगाला सांगितली होती. मात्र राजकीय दबावामुळे आयोगाने ही माहिती रेकॉर्डवर घेतली नाही,’ असंही त्यांचं म्हणणं आहे. हे सारं अतिशय खळबळजनक आहे.

नेहमीप्रमाणे स्वामींचं म्हणणं सहजपणे उडवून लावावं, असं नाही. याचं कारण अलीकडे जी माहिती समोर येत आहे, ती स्वामींनी दिलेल्या माहितीला पूरक अशीच आहे. काही महिन्यांपूर्वी कोलकात्यातील एका स्वयंसेवी संस्थेने नेताजींचा मृत्यू कधी आणि कसा झाला, ही माहिती माहितीच्या अधिकारात गृहमंत्रालयाकडे मागितली होती. गृहमंत्रालयाच्या अंतर्गत सुरक्षा विभागाने खास सरकारी पद्धतीने त्याला उत्तर दिलं आहे. ‘आतापर्यंत सरकारने नेताजींच्या मृत्यूचे नेमके कारण जाणून घेण्यासाठी शहनवाज समिती, खोसला समिती व मुखर्जी समिती अशा तीन समित्या गठित केल्या होत्या. यापैकी शहनवाज व खोसला समितीने नेताजींचा मृत्यू १८ ऑगस्ट १९४५ रोजी तैवानमधील तायहोकूजवळ झालेल्या विमान अपघातात झाला आहे. त्यांच्या अस्थी टोकियोजवळील रेनकोजी येथील मंदिरात ठेवण्यात आल्या आहेत, असे आपल्या अहवालात नमूद केले आहे. १९९९ मध्ये गठित करण्यात आलेल्या मुखर्जी आयोगाने नेताजी आता जिवंत नाहीत. मात्र त्यांचा तायकोहूजवळील विमान अपघातात मृत्यू झाला नाही. रेनकोजी मंदिरातील अस्थीही त्यांच्या नाहीत, असे या आयोगाने स्पष्ट केले आहे,’ असे सरकारकडून सांगण्यात आले. गमतीची गोष्ट म्हणजे भारत सरकारने शहनवाज व खोसला आयोगाचे अहवाल संपूर्णत: स्वीकारले आहेत. मात्र मुखर्जी अहवालातील निष्कर्ष सरकारला मान्य नाहीत. सरकार कोणाचंही असो, नेताजींच्या मृत्यूचे रहस्य उलगडण्यात त्यांची भूमिका संशयास्पदच राहिली आहे. मनोज मुखर्जी आयोग हा अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारच्या कार्यकाळात स्थापित करण्यात आला होता. या आयोगाला सरकारने सहकार्य केले नाही. त्यांना अनेक महत्त्वपूर्ण फाईल्स उपलब्ध करून देण्यात आल्या नाही, असा आरोप या समितीतील सदस्यांनीच केला होता. मुखर्जी समितीने तैवानमध्ये जाऊन त्या विमान अपघाताची चौकशी करण्याची परवानगी मागितली होती. ती त्यांना देण्यात आली नाही. समितीने तैवान सरकारच्या अधिकार्‍यांसोबत पत्रव्यवहार केला. तैवान सरकारने त्यांना नि:संदिग्धपणे कळविले होते की, ‘१४ ऑगस्ट १९४५ ते २0 सप्टेंबर १९४५ या कालावधीत तायहोकू परिसरात कुठलाही विमान अपघात घडला नाही.’ नेताजींच्या मृत्यू प्रकरणाचा शोध घेणार्‍या अनेक अभ्यासकांचेही मत असेच आहे. असा कुठलाही अपघात झालाच नव्हता. तत्कालीन ब्रिटिश भारत सरकार, अमेरिका यांनी असा अपघात झाल्याची बातमी मुद्दामहून पेरली, असे अभ्यासकांचे म्हणणे आहे.

नेताजींचा मृत्यू विमान अपघातात झाला नाही, हे स्पष्ट करणार्‍या अनेक घटना तुटक तुटक स्वरूपात प्रत्येक काही महिन्यानंतर समोर येतात. नेताजींच्या संबंधातील कुठलीही माहिती केंद्र सरकारला मागितल्यास आंतरराष्ट्रीय संबंधांवर त्याचे विपरीत परिणाम होतील, असे सांगून ती नाकारली जाते. विशेष म्हणजे केंद्रात सरकार कुठलंही असो, त्यांचं उत्तर हे असंच असतं. याचा अर्थ नेताजींच्या मृत्यूविषयात नक्कीच काहीतरी रहस्य आहे. नेताजींचा मृत्यू झाल्यापासूनच हा गोंधळ आहे. नेताजींच्या मृत्यूची बातमी जेव्हा महात्मा गांधींना सांगण्यात आली होती तेव्हा त्यांनी Subhash is not dead, Subhash can not die this way असं उत्तर दिलं होतं. गांधीजींनी नेताजींचे भाऊ शरदचंद्र बोस यांना तार करून नेताजींचं मृत्यूनंतर Postponed Shradhha, hold mild prayer (श्राद्ध वगैरे करू नका, फक्त साधी प्रार्थना करा),’ अशी तार केली होती. तेव्हाच्या सरोजिनी नायडू, वल्लभभाई पटेल, मौलाना अब्दुल कलाम आझाद अशा मोठय़ा नेत्यांच्या प्रतिक्रियाही तपासल्यात, तर त्यांचाही नेताजींचा मृत्यू झाला, यावर विश्‍वास नव्हता, हे लक्षात येते. एवढंच काय, पंडित नेहरूही या विषयात संभ्रमात होते. नेताजींचे मोठे भाऊ सुरेशचंद्र बोस यांनी नेताजींच्या मृत्यूचे पुरावे पंडितजींकडे मागितले होते. तेव्हा त्यांना लिहिलेल्या लेखी पत्रात ‘माझ्याजवळ या विषयात कुठलेही ठोस पुरावे नाहीत. यदाकदाचित नेताजी देशात आलेत, तर त्यांचं स्वागत करण्यात मी आघाडीवर असेल,’ असे संदिग्ध उत्तर नेहरूंनी दिले होते. असं असलं तरी पंडितजींना नेताजींच्या मृत्यूविषयात नेमकी माहिती असावी, असं मानणार्‍यांचा मोठा वर्ग आहे. मात्र आंतरराष्ट्रीय दबावामुळे नेहरू या विषयात काही करू शकले नसावेत, असं म्हटलं जातं. नेताजींच्या गूढ मृत्यूविषयातील रहस्याचा पडदा रशियात उघडू शकतो, यावर आता एकमत होत आहे. रशियाची गुप्तचर संस्था केजीबीच्या गुप्त कागदपत्रांमध्ये नेताजींबाबत संपूर्ण माहिती मिळू शकते, असे अभ्यासकांना वाटत आहे. रशियातील कम्युनिस्ट राजवट संपल्यानंतर कोलकात्याच्या जाधवपूर विद्यापीठाच्या डॉ. पुरबी रॉय व त्यांचे सहकारी मॉस्कोला गेले होते. मात्र रशियाने त्यांना सहकार्य करावे यासाठी भारत सरकारने पाठपुरावा केला नाही. सहकार्यही केले नाही. या विषयात भारत सरकारचीही मोठी काहीतरी मजबुरी दिसते आहे. ‘टाईम्स ऑफ इंडिया’ने दिलेल्या माहितीनुसार भारताच्या गृह, संरक्षण व परराष्ट्र मंत्रालयात नेताजींच्या विषयातील शंभरेक गुप्त फाईल्स आहेत. त्यातील जवळपास ३९ फाईल्स पंतप्रधान कार्यालयात आहे. आतापर्यंत सत्तेवर राहिलेल्या काही नेत्यांजवळ या विषयात नक्कीच ठोस माहिती असावी, पण कोणीच तोंड उघडत नाही. याचा अर्थ त्या फाईल्समध्ये जे काही दडलं आहे, ते खूपच खळबळजनक आणि धक्का देणारं असावं.

नेताजींच्या चाहत्यांना भारतीय जनता पार्टीचे सरकार तरी या विषयातील माहिती उघड करेल, असं वाटत होतं, पण त्यांचीही तोंडं चूप आहेत. सुब्रह्मण्यम स्वामींनी एवढा खळबळजनक दावा केल्यानंतरही भाजपाच्या कुठल्याही जबाबदार नेत्याने या विषयात तोंड उघडलं नाही. स्वामी म्हणतात, त्याप्रमाणे पंडित नेहरूंना याविषयाची माहिती असती, तर भारतीय जनता पक्षासाठी तर ते घबाड होतं. नेहरूंना खलनायक ठरवून भाजपाला भरपूर राजकीय लाभ उठविण्याची संधी होती. मात्र तसं झालं नाही. याचा अर्थ सत्य काही वेगळं आहे. मात्र जे काही सत्य आहे, ते बाहेर यावं, ही तमाम भारतीयांची इच्छा आहे. भारताच्या प्रत्येक प्रांतातील माणसांना नेताजींबद्दल प्रचंड आकर्षण आहे. नेताजी सार्‍यांचेच हिरो आहेत. स्वातंत्र्यानंतर नेताजी दीर्घ काळ जिवंत होते. ते भारतातही येऊन गेले, असं मानणार्‍यांची संख्या कोट्यवधीत आहे. त्यामुळे सत्य कितीही धक्कादायक असलं तरी ते बाहेर आलं पाहिजे. खरंतर नेताजींचा मृत्यू विमान अपघातात झाला की नाही, हे तपासणं आता फारच सोपं आहे. जपानच्या रेनकोजी मंदिरातील नेताजींच्या अस्थी आणि नेताजींच्या मुलीची (अनिता बोस व्हिएन्नामध्ये राहतात.) डीएनए तपासणी केल्यास त्या अस्थी खरंच नेताजींच्या आहेत का, याचा उलगडा होऊ शकतो. खरं तर हे खूप आधी करता आलं असतं. मात्र सरकार यात पुढाकार घेत नाही, याचा अर्थ काहीतरी गडबड नक्की आहे.

 

अविनाश दुधे
(लेखक दैनिक ‘पुण्य नगरी’चे कार्यकारी संपादक आहेत.)

भ्रमणध्वनी : ८८८८७४४७९६

Previous articleआम्ही अर्थभान कसे विसरलो?-संजय सोनवणी
Next articleपुरून उरले ते नेमाडेच !
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.