बिगर काँग्रेसवाद

सुनील तांबे

जॉर्ज फर्नांडिसच्या वाढदिवसानिमित्त लिहीलेल्या पोस्टला भरपूर प्रतिसाद मिळाला.
जॉर्ज फर्नांडिस यांच्यावर बायोपिक करण्याचा विचार आहे, अशी घोषणा संजय राऊत यांनी केली.
काल रात्री मला एका चित्रपटकर्मीचा फोन आला, प्रस्ताविक बायोपिकची पटकथा कोण लिहू शकेल, अशी विचारणा त्याने केली.
जॉर्जच्या पोस्टवर चर्चाही चांगली झाली.

या पोस्टच्या निमित्ताने बिगर काँग्रेसवादाचं राजकारण ह्या मुद्द्यासंबंधात चर्चा व्हायला हवी, असं ध्यानी आलं. म्हणून ही पोस्ट.

बिगर काँग्रेसवादाच्या राजकारणात दोन प्रवाह होते— भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील मूल्यं शिरोधार्य मानणारे आणि त्या मूल्यांना विरोध असणारे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर, रामस्वामी नायकर, डॉ.लोहिया हे बिगर काँग्रेसवादाच्या राजकारणाचे पुरस्कर्ते होते. हे तिन्ही नेते स्वातंत्र्यचळवळीतील मूल्यं– सामाजिक व आर्थिक न्याय, लोकशाही, व्यक्तीस्वातंत्र्य यांचे कट्टर पुरस्कर्ते होते. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्टेट सोशॅलिझमची कल्पना मांडली होती, रामस्वामी नायकर यांचा आर्थिक विचार डावीकडे झुकलेला परंतु वेल्फेअर स्टेटचा होता. राममनोहर लोहिया यांनी इकॉनॉमिक्स आफ्टर मार्क्स या निबंधाने भारतीय समाजवादाचा विचार मांडण्याची सुरुवात केली होती. समाजवाद काळा-गोरा या शीर्षकाचाही त्यांचा निबंध आहे. भारतीय राजकारणावरील ब्राह्मण्याचं वर्चस्व मोडून काढायला तिघेही कटिबद्ध होते. त्यांच्यात अर्थातच मतभेद व मतभिन्नता होती. त्यामुळे ते तिघेही एकत्र येऊ शकले नाहीत. बिगर काँग्रेसवादाचं राजकारण आंबेडकर, नायकर यांनी पुढारीपण स्वीकारलं तरच पुढे जाऊ शकतं अशी लोहियांची धारणा होती. लोहिया-आंबेडकर यांच्या पत्रव्यवहारात हे स्पष्टपणे दिसतं. पहिल्या सार्वत्रिक निवडणुकांपासून आंबेडकर आणि समाजवादी यांची युती होती.

बिगर काँग्रेसवादाच्या राजकारणातला दुसरा प्रवाह होता रा. स्व. संघ आणि कम्युनिस्ट यांचा. कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाने नेहरूंची संभावना रनिंग डॉग ऑफ ब्रिटीश कॅपिटॅलिझम अशी केली होती. भारताच्या फाळणीला पाठिंबा दिला होता. शासनसंस्था दुर्बल असेल तर क्रांतीची शक्यता अधिक असते. त्यामुळे स्वातंत्र्य मिळाल्यानंतर बंड वा क्रांतीची तयारी त्यांनी केली होती. यासंबंधातील तपशील अनेक पुस्तकांमध्ये आहे. राज थापर यांचं ऑल दीज डेज, हे पुस्तक जिज्ञासूंनी अवश्य वाचावं. समाजवादी आणि कम्युनिस्ट यांच्यामधून विस्तव न जाण्याचं हे प्रमुख कारण होतं.

रा. स्व. संघ आणि जनसंघ त्यावेळी दुबळा होता. त्यांच्या विरोधात बोलणं म्हणजे त्यांचा प्रचार करण्यासारखं होतं कारण गाव-खेड्यात त्याची कुणालाही माहिती नव्हती. चलेचाव आंदोलन, गोवा मुक्ती संग्राम यांचं नेतृत्व समाजवाद्यांनी केलं होतं. बिगर काँग्रेसवादाच्या राजकारणात अन्य प्रादेशिक पक्षही सामील झाले, उदा. चरणसिंग यांचं भारतीय लोकदल. या प्रादेशिक पक्षांचा भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील मूल्यं आणि राज्यघटना यांना विरोध नव्हता. अपवाद रामस्वामी नायकर यांचा. पण तो स्वतंत्र विषय आहे.

काँग्रेसचं नेतृत्व जवाहरलाल नेहरू यांच्याकडे होतं पण त्या पक्षावर भांडवलदार आणि ब्राह्मणी विचारसरणीचं वर्चस्व होतं. पहिले राष्ट्रपती, बाबू राजेंद्रप्रसाद यांनी काशीला ब्राह्मणांचे पाय धुतले होते. त्यावर अतिशय खरमरीत टीका डॉ. लोहिया यांनी केली होती. ब्राह्मण, दलित, मुसलमान व अल्पसंख्य हे तीन समूह राष्ट्रीय आहेत. त्यांची मोट काँग्रेसने बांधली होती. त्याविरोधात शेतकरी जाती व अन्य मागासवर्गीय यांची युती करण्याचं राजकारण लोहियांनी केलं. संसोपाने बांधी गाठ, पिछडा पावे सौ में साठ, ही घोषणा त्यातून आकाराला आली. त्या काळात जनसंघाचा जनाधार– ब्राह्मण, बनिया, राजपूत, होता. बिगर काँग्रेसवादाच्या राजकारणाचा आधार घेऊन आपण पुढे सरकू शकतो ही बाब ध्यानी आली नानाजी देशमुख यांच्या. लोहिया वा जयप्रकाश दोघांनाही राजकीय सत्तेची वैयक्तीक आकांक्षा नव्हती. त्यामुळे लोहिया आणि जयप्रकाश सहजपणे नानाजींच्या व्यूहरचनेचे बळी ठरले.

पॉलिटीक्स इज आर्ट ऑफ पॉसिबल असं म्हटलं जातं. या न्यायाने संघ परिवाराला लोहिया आणि नंतर जयप्रकाश यांनी व्यापक मान्यता मिळवून दिली. ही बाब उशिरा का होईना पण मधु लिमये यांच्या ध्यानी आली. जनता पार्टीत असतानाच लिमये यांनी संघ परिवारावर वैचारिक हल्ला सुरू केला.
मात्र, संघ परिवाराला जनमानसात स्थान मिळालं ते अयोध्येतील राम मंदिराची उभारणी करण्याच्या आंदोलनामुळे. ही कल्पना विश्व हिंदू परिषदेची त्यातही मोरोपंत पिंगळे यांची. सरस्वती नदीचा शोध, एकात्मता यज्ञ आणि रामजन्मभूमी आंदोलन ह्या कल्पना त्यांनी मांडल्या. त्यांचा पाठपुरावा केला. ही बाब 1980 च्या दशकातली. म्हणजे भाजपची स्थापना झाल्यानंतरची. भाजपची स्थापना झाली त्यावेळी गांधीवादी समाजवादी विचारधारेचा स्वीकार करण्यात आला होता. मोरोपंत पिंगळे यांच्या कल्पनेतील आंदोलनं सुरू झाल्यावर भाजपने अधिकृतपणे हिंदुत्वाचा स्वीकार केला. त्यानंतरचा इतिहास आपण जाणतोच.

जॉर्ज असो की नितिशकुमार वा शरद यादव वा अन्य समाजवादी नेते, बिगर काँग्रेसवादाच्या राजकारणात त्यांचे वैयक्तीक हितसंबंध तयार झाले आणि त्यामुळे ते हिंदुत्वाच्या राजकारणासोबत फरपटत जाऊ लागले. लोहिया वा जयप्रकाश यांचं समग्र चरित्र पाहाता त्यांनी अशी तडजोड कधीही केली नसती.

(सुनील तांबे यांच्या फेसबुक पोस्टवरून साभार)

(लेखक जेष्ठ्य पत्रकार व अभ्यासक आहेत)

[email protected]

Previous articleसंविधानाने आपल्याला काय दिलं?
Next articleजॉर्ज फर्नाडिस, लैला कबीर आणि जया जेटली
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.