भारताला लागलेला शाप

सौजन्य – दैनिक सकाळ
एका दिशेचा शोध -संदीप वासलेकर

भारतात अनेक विद्वान होते. महान विचारवंत होते; परंतु ते ‘मी’पणाच्या आहारी गेल्यामुळं ‘आम्ही’ सर्व मोठे कसे होऊ, याचा विचार करू शकले नाहीत. अर्थात हा ‘मी’पणा विद्वानांपुरताच मर्यादित नव्हता. गेल्या दोन-तीन हजार वर्षांत भारतात अनेक चांगले राजेही होऊन गेले. ते शूर, हुशार, कर्तबगार होते; पण त्यापैकी बरेच जण ‘मी’पणाच्या शापामुळं एकत्रित येऊ शकले नाहीत. त्यांच्यात गुणवत्तेची कमतरता नव्हती; पण ‘मी’पणाचं भूत डोक्‍यावर बसल्यानं ते कधी एकत्र आले नाहीत.
…………………………………………………………………………………….
sakal
दुपारची वेळ होती. भयंकर उकाडा होता. मित्राचे वृद्ध वडील आले व चपला काढून सरळ पाय पसरून बसले. मी चहा विचारला. मला म्हणाले ः ‘‘या उकाड्यात चहा? जरा लिंबू सरबत दे…तूपण घे आणि सांग काल मुद्दाम फोन करून का बोलावलंस?’’
मी म्हणालो ः ‘‘काका, एक प्रश्‍न आहे. उत्तर सापडत नाही. असं म्हणतात की काही हजार वर्षांपूर्वी भारतात खूप संपन्नता होती. मोठ्या प्रमाणात विद्वताही होती. आपल्या पूर्वजांनी नवीन शोध लावले; पण सध्या भारत जगाच्या मागं का? एवढ्या मोठ्या ज्ञानाचा आपल्याकडे खजिना होता. तो वाढला का नाही?’’
मित्राचे वडील म्हणाले ः ‘‘पूर्वी ऋषी-मुनी शिष्यांना गुरुकुल पद्धतीनं शिकवत असत. त्या वेळी पुस्तकं नव्हती. सारं शिक्षण तोंडी दिलं जाई. त्या वेळी ते विचार करत की माझ्यापेक्षा शिष्य थोडासा कमी पडला पाहिजे; म्हणून ते आपल्याकडच्या ज्ञानाचा एक हिस्सा स्वतःकडं ठेवत व उरलेले ९९ हिस्से शिष्याला देत. शिष्यदेखील हातचा एक ठेवून उरलेलं ज्ञान वाटत असे. असं करत करत प्रत्येक पिढीतल्या प्रत्येक गुरूनं हातचा एक राखून ठेवला व अनेक हजार वर्षांनंतर बरंचसं ज्ञान अनंतात विलीन होऊन गेलं! अखेरीस भारतात ज्ञान विकसित होण्याऐवजी संकुचित होत जाऊन क्षय पावलं. गुरूंनी हा हातचा एक का ठेवला? कारण त्यांना ‘मी’ पणाचा शाप होता. मीच सर्वश्रेष्ठ आहे व राहीन; त्यामुळं इतर कुणालाही माझ्या उंचीपर्यंत मी येऊ देणार नाही. या
‘मी’पणावरच्या अतिप्रेमामुळं ‘आम्ही’ म्हणजे सर्व समाज नुकसानीत गेला तरी हरकत नाही.

भारतात अनेक विद्वान होते. महान विचारवंत होते; परंतु ते ‘मी’पणाच्या आहारी गेल्यामुळं ‘आम्ही’ सर्व मोठे कसे होऊ, याचा विचार करू शकले नाहीत.
अर्थात हा ‘मी’पणा विद्वानांपुरता मर्यादित नव्हता. गेल्या दोन-तीन हजार वर्षांत भारतात अनेक चांगले राजेही होऊन गेले. ते शूर, हुशार, कर्तबगार होते; पण त्यापैकी बरेच जण ‘मी’पणाच्या शापामुळं एकत्रित येऊ शकले नाहीत. बाहेरून मुघलांचे व नंतर इंग्रज-फ्रेंच-पोर्तुगीजांचे हल्ले झाले. आपले राजे हरले. त्यांच्यात गुणवत्तेची कमतरता नव्हती; पण ‘मी’पणाचं भूत डोक्‍यावर येऊन बसल्यानं कधी एकत्र आले नाहीत.

स्वातंत्र्यानंतर राजकीय पक्षांत हाच प्रकार घडला. प्रत्येक पक्षात एक व्यक्तीच स्वतःला सर्वोच्च समजू लागली. याला फक्त कम्युनिस्ट अपवाद ठरले. १९७७ मध्ये सत्तेवर आलेल्या जनता पक्षाची शकलं ‘मी’ पणामुळे पडली. अगदी अलीकडं या ‘मी’पणामुळंच आम आदमी पक्षाची वाट लागली. समाजवादी, तृणमूल, द्रविड मुवेत्र कळघम, अण्णा द्रमुक, नॅशनल कॉन्फरन्स यांसह बहुतेक पक्ष ‘मी’च्या गर्तेत अडकले आहेत.
इतकंच नव्हे तर, उद्योगसमूह व अनेक सामाजिक संस्थाही ‘मी’पणाचं ग्रहण लागल्यामुळं अडचणीत आहेत. हा ‘मी’पणा एवढा प्रचंड आहे, की कधीकधी स्वतःच्या भावालाही दूर सारण्यात येतं. कधी कधी भाऊ, मुलगा, मुलगी, सून हेही ‘मी’मध्ये समाविष्ट केले जातात. आर्थिक अथवा सामाजिक क्षेत्रात अतिशय भरीव काम केलेल्या महापुरुषांचे उद्योगसमूह अथवा सामाजिक संघटना आतून पाहिल्या तर संपूर्णपणे ‘मी’ अथवा ‘विस्तृत मी’ म्हणजेच कुटुंब यांच्या आहारी केलेल्या दिसतात. मुंबईत एक प्रसिद्ध योगाभ्यास संस्थाही संस्थापिकांच्या व त्यांच्या कुटुंबाच्या पूर्ण नियंत्रणापलीकडं जात नाही. आणि म्हणे योगाभ्यास, सामाजिक शिक्षण, सामाजिक कार्य करणाऱ्या संस्था जीवनमूल्यांचा प्रचार करतात…’’

मित्राच्या वडिलांनी सरबताचा आणखी एक ग्लास मागितला. ते मला म्हणाले ः ‘‘हे बघ, ही ‘मी’पणा काही फक्त नेतृत्वापुरता मर्यादित नाही. आपल्याकडं प्राप्तिकर, अबकारी कर, पोलिस, नगरपालिका अशा सरकारी खात्यांचे अधिकारी जेव्हा नागरिक, करदाते, उद्योजक, व्यापारी यांनी केलेल्या चुका शोधतात, तेव्हा केवळ स्वतःलाच किती मिळेल, याचा विचार करतात. मानसिकदृष्ट्या पाहिलं तर ‘मी’पणा हाच लाचखोरीचा व भ्रष्टाचाराचा जनक आहे. त्यामुळं नुसते कायदे व लाचखोर प्रतिबंधक यंत्रणा करून मर्यादितच परिणाम होईल.’’
ते पुढे म्हणाले ः ‘‘हे बघ प्रत्येक कंपनीत व संस्थेत एक संचालक मंडळ असतं. ते कसं चालवावं, याचे भरपूर नियम असतात. प्रत्येक राजकीय पक्षाची कार्यकारिणी असते. प्रत्येक सरकारात मंत्रिमंडळ असतं; परंतु आपण प्रत्येक पातळीवर- कंपनी, सामाजिक संस्था, पक्ष, सरकार- संयुक्त नेतृत्व व निर्णयपद्धती खरोखरच अमलात आणत नाही, तर सर्वत्र एकाधिकारशाही जोपासतो.’’

एकदा मी सुप्रसिद्ध पोलिस अधिकारी ज्युलिओ रिबेरो यांच्याशी गप्पा मारत होतो. त्यांना सर्वोच्च न्यायालयानं पोलिस सुधारणा करण्यासाठी चौकशी करण्याचा आदेश दिला होता. त्यात धर्मवीरा आयोगानं केलेल्या एका सूचनेवर भर होता. पोलिस महासंचालक व इतर महत्त्वाची पदं मुख्यमंत्र्यांनी न ठरवता ती मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते व सर्वोच्च न्यायालयाचे प्रमुख न्यायाधीश यांनी एकत्र येऊन संयुक्तरीत्या ठरवली पाहिजेत व योग्य अधिकाऱ्यांच्या नेमणुका केल्या पाहिजेत, अशी ती सूचना होती. रिबेरोसाहेब देशभर फिरले. अनेक नेत्यांना भेटले. तर त्यांना आढळून आलं, की धर्मवीरा आयोगाच्या त्या सूचनेला सर्व मुख्यमंत्र्यांचा विरोध होता, असं नव्हे; तर विरोधी पक्षनेत्यांचाही विरोध होता. आश्‍चर्य वाटलं. मी मित्राच्या वडिलांना ही गोष्ट सांगितली.
ते म्हणाले ः ‘‘अरे, विरोधी पक्षनेत्यांनी का विरोध केला?’’
मी म्हणालो, की रिबेरोसाहेबांनी याबाबत मोघमच सांगितलं; पण त्यांना बहुतेक विरोधी नेत्यांनी जे सांगितलं होतं, त्याचा आशय असा होता ः ‘‘मुख्यमंत्र्यांनी राज्य केलं पाहिजे. मी मुख्यमंत्री होईन तेव्हा माझ्या मनाप्रमाणे मी राज्य करीन.’’
ते म्हणाले ः ‘‘असं नाही. असा ‘मी’पणा भारताप्रमाणेच पाकिस्तान, बांगलादेश, सीरिया, इराक, आफ्रिकेतलं झिंबाब्वे, काँगो, इथिओपिया या देशांतही दिसतो.’’
आपण विद्वत्ता, कर्तबगारी, क्षमता याबाबतीत इंग्लंड, युरोप, अमेरिका, जपान यांच्या तुलनेत आहेत. त्या देशांत सर्व पातळ्यांवर संयुक्त निर्णय घेतले जातात. ते देश त्यांच्या क्षमतेचा कमाल उपयोग करू शकतात. आपण क्षमतेत जरी त्यांच्या तोडीचे असलो तरी मानसिकतेच्या दृष्टीनं पाकिस्तान, बांगलादेश, झिंबाब्वे यांच्या पंक्तीत बसतो. म्हणून आपले लोक जेव्हा भारत सोडून युरोप-अमेरिकेत स्थायिक होतात, तेव्हा ‘मी’पणाच्या डबक्‍यातून बाहेर पडतात. त्यांची प्रतिभा फुलते. ते चमकतात.
मित्राचे वडील म्हणाले ः ‘‘अरे, अमेरिकेत अध्यक्षीय पद्धत आहे. सिंगापूरमध्ये ली कुआन यू एक प्रकारचे हुकूमशहा होते. आता त्यांचे पुत्र पंतप्रधान आहेत. तुर्कस्तानमध्ये रेसीप तायिप अर्दोगान यांनी १२ वर्षांपूर्वी परिवर्तनाच्या दिशेनं चांगलं मार्गाक्रमण सुरू केलं; पण गेल्या तीन वर्षांत वळण घेऊन ते एकाधिकारशहा बनले. त्यांच्यात आणि भारतात फरक काय?’’

मी त्यांना म्हणालो ः ‘‘त्या देशांमध्ये एकाधिकारशाही सर्वोच्च पातळीवर मर्यादित आहे; तीवरही निर्बंध आहेत. सिंगापूरमध्ये ली व आता त्यांचे पुत्र आणि तुर्कस्तानामध्ये अर्दोगान त्यांच्या मंत्रिमंडळातल्या सभासदांशी अतिशय प्रामाणिकपणे व मोकळेपणानं चर्चा करून निर्णय घेतात. अमेरिकेचे अध्यक्ष त्यांच्या मंत्र्यांना व संसदेतल्या नेत्यांना विचारून बहुतेक निर्णय घेतात. याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे, एकाधिकारशाही व ‘मी’पणा यात खूप मोठा फरक आहे. त्या सर्व देशांत वर जरी एकाधिकारशाही असली, तरी राजकीय पक्षांच्या प्रत्येक पातळीवर, प्रत्येक उद्योगसमूहात, प्रत्येक सामाजिक संस्थेत ‘मी’पणाचं भूत थैमान घालत नाही.’’

आपल्या देशात, जो नेता कणखरपणे एकटाच निर्णय घेतो त्याला आपण चांगला नेता मानतो. जो नेता विविध मतप्रवाहांच्या नेतृत्वास एकत्र करून सर्वसमावेशक व संयुक्त निर्णय घेतो, त्याला आपण चांगला नेता मानत नाही. किंबहुना या विषयावर आपण चर्चा करतो, तेव्हा ‘विविध व विरोधी मतप्रवाहांच्या लोकांना एकत्र घेऊन संयुक्त निर्णय घेण्याची क्षमता’ अशी आपण नेतृत्वाची व्याख्या करत नाही. आपण नेहमी नेतृत्व म्हणजे ‘एका नेत्यानं निर्णय घेऊन इतरांना बाजूला सारून अंमलबजावणी करण्याची क्षमता,’ असं मानतो. अर्थात, आपण काही या शब्दांत नेतृत्वाची व्याख्या मांडून तात्त्विक चर्चा करत नाही; परंतु जेव्हा वेळ येते, तेव्हा आपण संयुक्त निर्णयपद्धतीऐवजी एकाधिकारशाहीला झुकतं माप देतो. परंपरागत पक्षात तर हे ६०-७० वर्षं सुरूच आहे; पण ‘आम आदमी’च्या नावानं निवडून आलेल्या तृणमूल काँग्रेस व ‘आप’ या पक्षांत तर ही प्रवृत्ती जास्तच प्रमाणात आहे, हेही सिद्ध झालं आहे.
‘मी’पणाचा परिणाम नेतृत्वापुरता मर्यादित नाही. तो आपल्या दैनंदिन जीवनात, राष्ट्रीय विकास पद्धतीत व राष्ट्रीय सुरक्षा व्यवस्थेतही दिसतो.
मी, माझं घर व गाडी सुंदर ठेवीन; पण रस्त्यावर कचरा टाकीन. मी माझी हौस भागवण्यासाठी दुसरं घर घेईन; पण बिल्डरनं कुणा गरिबाची जमीन बळकावून तिथं इमारत बांधली आहे का, याचा विचार करणार नाही. मी माझ्या मोठेपणासाठी लाइन मोडेन; पण सर्वच जण जेव्हा लाइन मोडतात, तेव्हा आपण समाजाची घडी मोडत असतो, याची पर्वा करणार नाही. मी गरज पडेल तेव्हा पोलिसांना लाच अथवा शिव्या देईन; पण त्यांना चांगली घरं, शस्त्रं, दहशतवाद्यांविरुद्ध लढण्यासाठी उपकरणं मिळावीत म्हणून आंदोलन करणार नाही.

मित्राचे वडील उठले. उभं राहून म्हणाले ः ‘‘हा ‘मी’पणा म्हणजे भारताला शतकांपासून लागलेला शाप आहे. तो जाईल तेव्हाच आपलं भवितव्य उज्ज्वल होईल.’’
आणि मग ते चपला घालून, मागं न बघता खिन्नपणे निघून गेले.

सौजन्य – दैनिक सकाळ
एका दिशेचा शोध -संदीप वासलेकर

Previous articleसत्तेचं विचित्र दुष्टचक्र
Next articleकोर्ट २
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.