मनूचा मासा , भिडेंचा झिंगा

सौजन्य – साप्ताहिक चित्रलेखा

लेखक – ज्ञानेश महाराव

मनू नावाचे कुणी ऋषी-महर्षी होऊन गेले की नाही, याबद्दलची खात्री देण्यासाठी शंकराचार्यांनी तोंड उघडलं तरी, ते तोंडावर आपटतील. कारण ती एक पुराणी वानगी (वांगी नव्हे) म्हणजे कथाच आहे. शतपथ ब्राह्मण, मत्स्यपुराण, भागवत पुराण यात मनूची कथा आहे. ही कथा प्राचीन काळातील नसून पौराणिक काळातील आहे. हा पौराणिक वा वेदकाळ कुठला, असा प्रश्न मी ‘तर्कतीर्थ’ अशी ओळख असणार्‍यांना विचारला, तेव्हा ते उत्तर देण्याऐवजी टाळक्यावर उलटी मूठ मारत बसले.
असो. या पुराणी कथेनुसार, मनू महाराजांनी मलय पर्वताच्या पायथ्याशी बसून हजारेक वर्षं तपश्‍चर्या केली. या साधना काळखंडातच सूर्याला अर्ध्य देत असतानाच मनू महाराजांच्या ओंजळीत माशाचं एक पिल्लू आलं. या पिल्लाने मनूकडे जीवदान मागितलं. मनूने त्यास जीवनदान दिलं. अगोदर हा मासा त्यांनी घरातल्या पाणी वापरायच्या भांड्यात सांभाळला. तो मोठा झाला. त्याला मग विहिरीत सोडावं लागलं. तिथेही त्याचा आकार मावेना म्हणून त्याला तलावात, नदीत सोडण्यात आलं. असा क्षमतेपेक्षा जास्त वाढणारा हा मासा काही साधासुधा नव्हता. तो साक्षात विष्णूचा अवतार होता. या माशाने मनूला सांगितलं होतं की, या पृथ्वीवर प्रलय-जगबुडी येणार आहे. त्यावेळी मीच तुला वाचविन. प्रत्यक्षात इतका मोठा जलप्रलय मनूच्या कल्पनेपलीकडचा होता. पण तो येणार आहे, म्हटल्यावर साक्षात ब्रह्मा मनूसमोर प्रकटले आणि म्हणाले, या प्रलयातून वाचण्यासाठी तुला एक नौका तयार करावी लागेल आणि जेव्हा प्रत्यक्षात प्रलय येईल, तेव्हा तू नौकेत सप्तर्षींना (सात ऋषी) घेऊन पाण्यावर स्वार व्हायचे. तेव्हा मासाच तुला योग्य ठिकाणी नेऊन सोडेल.
कथेतल्या क्रमानुसार तसेच झाले. प्रलय आला. प्रलयात नौका तरली. या नौकेला शीड नव्हतं. वल्हवे नव्हती. सुकाणू नव्हते. नौकेला तरंगत ठेवण्याची जबाबदारी माशाकडे होती. प्रलयाने कमाल मर्यादा ओलाडल्यानंतर माशाने ही नौका मलयगिरी पर्वताच्या शिखराकडे नेली. हे शिखर उघडे-बोडके होते. तिथे नौका स्थिरावली. मनू आणि सप्तर्षी नौकेतून उतरले. त्यांच्याकडे विविध झाडांची रोपं आणि बिया होत्या. त्यांनी जसजसा प्रलय ओसरेल, तशा रोपं-बियांच्या माध्यमातून नव्या सृष्टीची निर्मिती केली. मनूने जो प्राणी निर्माण केला, तो म्हणजे मानव.
किती साजूक आहे ना ही वानगी ? पण ही वानगी पुराणातच शोभून दिसणारी आहे. या वानगीला प्रत्यक्षात काहीही संबंध वा पुरावा नाही. कारण गेल्या २००-३०० वर्षांत अशा कल्पनेच्या भयानक उड्या मारणार्‍या माकडकथांना रद्दड ठरवणार्‍या मानववंशशास्त्र ते शरीर विज्ञानापर्यंतच्या अनेक विद्याशाखा निर्माण होऊन त्या विकसितही झाल्यात. त्यातल्या सिद्धान्त-संशोधनाने पुराणांना वाळवीचं खाद्य ठरवलं. डार्विनचा उत्क्रांतीवादाचा सिद्धान्त पुराणांना कंडम ठरवतो. कारण पुराणेच खरी मानायची तर आफ्रिका, अमेरिका, ऑस्ट्रेलिया या खंडावर मानवजातीचा जो शास्त्रीय विकास झाला, तो अमान्य करावा लागेल. त्याप्रमाणेच, कुठला तरी प्रलय आला होता आणि मनूने मानवजातीचा विकास केला, हे झूठ ठरतं. शेकडो वर्षं जगलेल्या मनूने मानवाच्या वैयक्तिक आणि सार्वजनिक व्यवहाराबद्दल एक (कायद्यांची) संहिता निर्माण केली होती, असं सांगतात. ती संहिता म्हणजे मनुस्मृती.
मनुस्मृती मनूनी लिहिली की नाही ? आणि ती लिहिली तर कधी लिहिली ? याबाबत सांगितला जाणारा काळ आणि पृथ्वी व मानववंशाचा विकास हे एकमेकांशी विसंगत आहे. मनुस्मृती भारतात शेकडो वर्षं आस्तित्वात होती. प्राचीन काळात होती तशी ती आधुनिक काळात होती. २६ जानेवारी १९५० रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी राष्ट्राला ‘भारतीय संविधान’ अर्पण केलं; तेव्हा खर्‍या अर्थाने मनुस्मृतीचं विसर्जन झालं. त्याआधी ब्रिटिशांनी त्यांना अभिप्रेत असलेल्या कायद्याचं राज्य प्रस्थापित केल्यानंतर मनुस्मृतीला धक्के जरूर बसले. तरीही त्यातला सनातनी चिवटपणा टिकून होता. परंतु, भारतीय राज्यघटना मनुस्मृतीच्या मुळावरच उठल्याने राज्यघटना आस्तित्वात आल्या दिवसापासून मनुस्मृती समर्थकांना एक दिवसही चैन पडत नाही. रा.स्व.संघाचे द्वितीय सरसंघचालक गोळवलकर गुरुजी ते भिडे गुरुजीपर्यंत एका विशिष्ट वर्गातील व त्यातही एका जातीतील मुखंडांना मनुस्मृतीच्या नावाने अधूनमधून उलट्या-जुलाब होत असतात. वादग्रस्त आणि दंगलखोर अशा संभाजी भिडे यांनी नुकतेच जळगावात मनुस्मृती हीच जगातली पहिली-वहिली घटना असल्याचे तारे तोडले आहेत.
‘मनुस्मृतीतील काही भाग चांगला होता आणि तो भाग आजही उपयुक्त आहे,’ अशी भलावण त्यांनी यापूर्वीही केलीय. त्यांच्या दृष्टीने ‘राष्ट्रीयत्वाच्या भावनेचं जतन करण्यास हिंदू स्त्री-पुरुष हे नपुंसक आहेत. सर्वधर्मसमभाव आणि धर्मनिरपेक्षता हे थोतांड आहे, नालायकपणा आहे.’ हे भिडे यांचे म्हणणे मनुस्मृतीच्या समर्थकांस साजेसं असलं तरी, ते ‘संविधान’विरोधी आहे. विशेष म्हणजे, ज्या मनुस्मृतीच्या कक्षेत असं काहीही बोलण्याची मुभा केवळ भिडे यांच्यासारख्या जन्मदत्त पुरुषांनाच होती; तेच काम ते आज भारतीय राज्य घटनेच्या कक्षेतील, सर्वात महत्त्वाच्या अशा विचार स्वातंत्र्यांचा पुरेपूर उपभोग घेत करीत आहेत. तथापि, नागर समाजात व कायद्याच्या राज्यात ज्या गोष्टी निव्वळ मूर्खपणाच्या आहेत; अशा गोष्टींचा मनुस्मृतीतील श्‍लोकांचा पुरस्कार करणे, हे काही उगाचच आलेलं खूळ नाही.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, त्यांच्या पाच-पन्नास उपसंघटना आणि या उपसंघटनातून वाढलेले ‘कथित विचारपुरुष’ यांच्या नसानसांत मनुस्मृतीचं तत्त्वज्ञान भिनलंय. हे तत्त्वज्ञान त्यांनी शेकडो वर्ष भारतावर राज्य करणार्‍या ५५ राजवंशांच्या कडोसरीवर बसून जमेल तेवढे अंमलबजावणीत आणलंय. त्यासाठी ‘राजा हा विष्णूचा अवतार’ असतो, या मनुस्मृतीतल्या श्‍लोकाचा वापर केला. मग राज्य नंदाचे असो की, मौर्याचे! ग्रीक, शतकर्णी, शक, पर्शियन, हूण, कुशाण, वाकाटक वा मुघल, इंग्रजांचे. या सार्‍या राज्यकर्त्यांना विष्णू अवताराचे दाखले देत त्यांच्या माध्यमातून मनुस्मृतीचा जमेल तेवढा अंगीकार करण्यात आलाय. *मनुस्मृती म्हणजे दुसर्‍यांचं शोषण. मुनस्मृती म्हणजे अत्यल्पसंख्याक वर्गाकडून बहुसंख्याक वर्गावर लादलेली गुलामी.* मनुस्मृती म्हणजे फळाच्या एका कवचात असणार्‍या गराचे सूक्ष्म रूपात असलेल्या जिवाणूंनी केलेलं शोषण म्हणजे एक प्रकारचा निपाह या रोगाचा व्हायरसच आहे. या व्हायरसचे प्रतीकात्मक रूप म्हणजे भिडे !
एरवी सांगली-सातारा-कोल्हापूर आणि महाराष्ट्र कर्नाटकाच्या सीमावर्ती भागातच ज्यांचा वावर आणि व्यवहार होता, ते भिडे आज ब.मो. पुरंदरे यांची जागा बळकावून महाराष्ट्रात हात-पाय पसरवत आहेत. देशात आणि राज्यात जी ब्राह्मणी तोंडवळ्याची मंडळी सत्तेच्या मखरात विराजमान आहेत. त्यांच्या राजकीय औक्षासाठी भिडे यांची उभी पायपीट सुरू आहे. देशात नरेंद्र आणि राज्यात देवेंद्र, हा त्यांच्या मोहिमेचा श्‍वास आहे. गडकोट मोहिमेतून विस्तार, दुर्गादौडीतून संघटन आणि बलिदान मासातून त्यांचा विचार, ते घट्ट करीत आले आहेत. त्यांच्या कार्यात त्यांच्या फसव्या तत्त्वज्ञानाला अंगी राखेसारखे फासून उघडी झालेली तरुणांची पिढी, हे त्यांचं भांडवल आहे. *ब.मो पुरंदरेंनी ज्याप्रमाणे शिवसृष्टी उभी करायचीय, म्हणून झोळी घेऊन महाराष्ट्रातील बहुजनांचे तन, मन आणि धन लुबाडले; छत्रपती परंपरेतल्या घराण्यांकडून कागदपत्रं आणि ऐतिहासिक वस्तू लंपास केल्या; तसंच काम आज भिडे रायगडावर ३२ मणांचं सोन्याचं सिंहासन बसवायचं, या संकल्पातून करीत आहेत.* सोनं जमवीत आहेत. याचा लेखाजोखा कोण तपासणार ? रायगडावर सोन्याचं सिंहासन बसवण्याची परवानगी आहे का, ते भिडेंना कोण विचारणार ? ‘बोच्याला काकडा लावला’ हा भिडेंचा आवडता वाक्यप्रयोग आहे. परंतु, त्यांनी छत्रपती शिवाजी-संभाजीराजांचे नाव घेत बहुजनांच्या अकलेलाच काकडा लावलाय. सोन्याची फुकणी आणि शेंडीला तेलपाणी , असा हा भिडे-उद्योग आहे. या जोरावर जे रा.स्व.संघाला जमत नाही आणि भाजपला साध्य करताना अडचणी आहेत, तोच अवकाश भिडे यांनी व्यापलाय. रा.स्व.संघाला अभिप्रेत असणारे, पण त्यांच्या शिस्तीच्या कक्षेत न मावणारे, संघाला हवेच असणारे, पण न बोलता येणारे मनुस्मृतीच्या पुरस्कारासारखे अपेक्षित धुत्कार भिडेंच्या तोंडून निघत आहेत. त्यामुळे सार्वजनिक जीवनाच्या सर्व कक्षा व्यापल्या जातील आणि भाजप-परिवाराचा शत-प्रतिशत प्रभाव टिकून राहील, असाच भ्रम भिडेंना वापरणार्‍यांच्या थिंक टँकमध्ये आहे. त्यामुळेच भीमा-कोरेगाव प्रकरणात ज्याच्यावर दंगल घडवण्याचा संशय आहे; जो ‘नंबर एक’चा आरोपी आहे, असे भिडे मोकाट आहेत. याउलट, ज्यांचा दंगलीशी, हिंसाचाराशी अर्थाअर्थी संबंध नसणार्‍या सुधीर ढवळे, सुरेंद्र गडलिंग, रोना विल्सन, शीमा सेन, महेश राऊत आणि राणा जेकब यांना नुकतीच पुणे पोलिसांनी अटक केलीय. त्यासाठी त्यांचे नक्षलवाद्यांशी संबंध आहेत आणि भीमा-कोरेगाव येथे घडलेला हा प्रकार आणि त्यानंतरची दंगल नक्षलवाद्यांनीच भडकवली, अशी थिअरी सरकार पक्षाने आधीच मांडली आहे. यातील राजकारणाकडे पाहाता, मनूच्या माशाने जातीयवादाची नौका वाचवण्यासाठी लोकशाहीवादी, बहुजनहितकारक भूमिका घेणार्‍या सहाजणांना गिळून भिडे नावाच्या झिंग्याला देव-धर्म-संस्कृतीच्या नावाखाली बहुजनांना भटीपाशात अडकवून ठेवण्यासाठी मोकळे सोडले आहे, असंच म्हणावं लागेल.
*सीता टेस्ट ट्यूब बेबी, ब्रह्मदेव बाळंत*
कविश्रेष्ठ केशवसुत म्हणतात तसे, ‘जुने जाऊ द्या मरणालागुनी, जाळुनी किंवा पुरुनी टाका’ – हीच खरी पुराणांची लायकी ! यासाठीच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृती जाळली. त्याच्या खूप खूप अगोदर शास्त्र-पुराणांच्या वाचाळ सुकाळाला वैतागून संत ज्ञानेश्वर म्हणतात – *देव हे कल्पित, शास्त्र हे शाब्दिक*
*पुराणे सकळीक, बाष्कळीक* – म्हणूनच ‘प्रबोधनकार ठाकरे म्हणतात, ‘पुराणे ही शौचालया’त टाकण्याच्या लायकीची असून ती पाजी भटशाहीने आपल्या पोटासाठी रचली आहेत ’, असं असतानाही पुराणकथेतून निर्माण झालेल्या मनुस्मृतीचा संभाजी भिडे पुरस्कार करतात. कारण देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, ‘नॅशनल सायन्स कॉंग्रेस’मध्ये पुराणकथांचा दाखला देत, गणपतीच्या गजमुखाला जगातली ‘पहिली प्लास्टिक सर्जरी’ ठरवतात. रामायण ग्रंथातील पुष्पक विमान त्यांना भारतीय ऋषीमुनींचा जगातील पहिला विमान शोध वाटतो. अलीकडेच उत्तर प्रदेशाच्या एका मंत्र्याने ‘नारदमुनींचा सर्वत्र संचार म्हणजे आजचे गुगलचे मायाजाल होते,’ असे तारे तोडलेत. त्यांच्या वरताण उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री दिनेश शर्मा बोललेत. ते म्हणतात, ‘रामायणातली सीता ही पहिली टेस्ट ट्यूब बेबी आहे!’ मग पुरुष असूनही बाळंत झालेल्या ब्रह्मदेवाला हे काय म्हणणार ?
आपल्याच देव-धर्माला बदनाम करणारा हा वेडाचार आता समाजातही झिरपत चाललाय. महाभारतात धर्मराजाने द्रौपदीला जशी परस्पर जुगाराला लावली, तसाच प्रकार ओडिशा राज्यातल्या बालासोर येथे नुकताच २३ मे रोजी घडला. तिथे एका व्यक्तीने आपल्या पत्नीला जुगारात डावावर लावले. त्यात तो हरला आणि पत्नीला गमावून बसला. त्याने पत्नीला स्वतःहून जिंकलेल्या जुगारी मित्राच्या हवाली केलं. तिच्यावर त्या जुगारी मित्राने बलात्कार केला म्हणून प्रकरण पोलिसात गेले आणि उघडकीस आले. ह्यात धक्कादायक असं काही नाही. कारण आजही भटक्या-मागास समाजात स्त्रीला पातिव्रत्याची साक्ष देण्यासाठी उकळत्या तेलात हात घालून एक-दोन रुपयाचं नाणं काढावं लागतं; तसेच पत्नीला जोरात फिरणार्‍या फॅनखाली निरांजनाची वात पेटवायला सांगणारे सुशिक्षित पतीदेव आजही आहेत. त्यांचं हे वागणं धक्कादायक ठरतं आणि *धोब्याचे ऐकून सीतेला चारित्र्य शुद्धता सिद्ध करण्यासाठी अग्निदिव्य करायला लावणारा राम देवासमान कसा होतो? द्रौपदीचं वस्त्रहरण होताच परस्पर लुगडी पुरवणारा; पण तिला जुगाराला लावू नये म्हणून कोणताही चमत्कार न घडवणारा कृष्ण हा देखील देवासमान ? असा दुजाभाव का ?* पुराणकथा खोट्या आहेत, हे समजण्यासाठी आणखी किती दाखले हवेत ? देवांचा देव इंद्रदेव त्याचं मेनकेवरून विश्वामित्राशी आणि अनुसयेवरून गौतम ऋषीशी भांडण. रामायणात राम-हनुमान युद्ध झालं आणि महाभारतात कृष्णार्जुन युद्ध झालं. शंकराने रावणाला वर दिला, तो रामाला पहावला नाही आणि भस्मासुराला वर दिला, तो विष्णूला पहावला नाही. दत्ताच्या ‘तीन शिरे, सहा हात’ची कथा तर भयानक आहे. ब्रह्मा-विष्णू-महेश हे त्रिदेव अत्री मुनीच्या बायकोच्या पातिव्रत्याची परीक्षा घेण्यासाठी किती नीच पातळीवर उतरू शकतात, याचा तो दाखलाच आहे. एकीकडे, जुने जाऊ द्या मरणालागुनी म्हणायचे आणि दुसरीकडे जुनेच पुजायचे-भजायचे, या बिनडोकपणाचाच अर्थ विकास वेडा झाला असा असावा. या वेडपटपणाचं प्रदर्शन करण्याऐवजी वर्तमानाला भिडून चांगले भविष्य घडवणे, माणूस म्हणून अधिक उन्नत होणे, हेच शहाणपणाचे आहे. म्हणूनच भिडेसारख्यांच्या नादाला लागलेल्या सुशिक्षित तरुणांनी आपली उमेद नासवली जाऊ नये, यासाठी संकटाला वेळीच ओळखून ते झटकावे, यासाठी विनंती-
बुद्धीमधली शब्दफुले ही
धोंड्या माथी पडू नये
श्रद्धेचा कुणी गद्धा होऊनी
ओझी सनातन वाहू नये
पुराणातली वानगी कसली
ती तर सारी सडलेली !
कातर जिंकली, सुई हरली
सत्तेची ही ओळख कसली ?
बुद्धिजीवी ही मानवी ओळख
जपूनी ठेवा मनोमनी

विज्ञानाची हाक देऊनी
*सावध करू या, सदा जनी !
(अशा सणसणीत माहितीचे लेख आणि रिपोर्ट वाचण्यासाठी आताच आणा-साप्ताहिक चित्रलेखा-सर्वत्र उपलब्ध)

9322222145

(लेखक साप्ताहिक चित्रलेखाचे संपादक आहेत)

Previous articleअसंगाशी संघ!
Next articleजवाहरलाल नेहरूंचे संघाविषयक आकलन
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.

Comments are closed.