राईज अबाव्ह !

मुक्ता चैतन्य

‘ग्रेज ऍनाटॉमी’या सीरिअल मध्ये एक सिन आहे. ज्यात सिएटल ग्रीसमधली चीफ रेसिडेंट डॉक्टर मिरांडा घरी निघण्याच्या घाईत असते. तिच्या मुलाचा पहिला हॉलोवीन असतो. नवरा घरी कधी पोचतेयस विचारण्यासाठी पुन्हा पुन्हा फोन करत असतो. तितक्यात एक इमर्जन्सी होते आणि मिरांडाला पेशंट सर्जरीसाठी घ्यावा लागतो. सर्जरीला जाण्यापूर्वी तो पेशंट सतत त्याला मिरांडा डॉक्टर म्हणून नकोय असं सांगत असतो. पहिल्यांदा मिरांडाला लक्षात येत नाही तो असं का म्हणतोय, ती त्याला समजावयाचा प्रयत्न करत असते. ती उत्तम सर्जन आहे, चीफ रेसिडेंट डॉक्टर आहे, त्याचं आयुष्य उत्तम हातात आहे, पण तो ऐकायला तयार नसतो. पुढच्याच क्षणी तो पेशंट म्हणतो, ‘व्हाईट’ डॉक्टर हवाय मला. मिरांडा ब्लॅक आहे. ती प्रचंड अपसेट होते. आतल्या आत चिडते. पण वरून शांत असते. सर्जरी तीच करणार हे उघड असतं. पण पेशंट डिमांड करतो, ऑपरेशन थेटरमध्ये एखादा ‘व्हाईट डॉक्टर’ पाहिजे. मिरांडा कसलाही वाद न घालता तिच्या हाताखाली काम करणाऱ्या एका गोऱ्या डॉक्टरला सोबत घेते आणि उलट स्वस्तिकाचा टॅट्यू छातीवर कोरलेल्या त्या रुग्णाचं ऑपरेशन यशस्वी करते. रुग्ण वाचतो. एकीकडे मुलाच्या पहिल्या हॅलोविनसाठी तिला उशीर होतोय म्हणून सतत येणारे नवऱ्याचे फोन आणि दुसरीकडे वर्णद्वेषाने गच्च भरलेलं मन असलेला रुग्ण. तरीही ती रुग्णाला निवडते. तिची सहकारी याबद्दल बोलायला जाते, तर मिरांडा तिला म्हणते, ‘आय एम ट्राईन्ग टू राईज अबाव्ह’
असं ‘राईज अबाव्ह’ होण्याचा प्रयत्न अतिशय महत्वाचा आणि बरंच काही सांगून जाणारा वाटतो.
आजूबाजूला बघितलं कि आपापल्या समजुतींना, श्रद्धांना, समज गैरसमजांना कवटाळून बसलेली माणसं दिसतात. आपल्या समजुती चुकीच्या असू शकतात, त्या बदलल्या पाहिजेत हे कुठेही मनाला न शिवलेली माणसं बघितली कि वाटतं यांच्या मन-बुध्दीतली जळमटं कधी साफ होणार.
माझ्या एक परिचित आहेत, ते मुसलमान व्यक्तीच्या वाहनात बसत नाहीत. रिक्षा, टुरिस्ट वाहन चालवणारा व्यक्ती मुसलमान नाही ना हे बघून घेतात मगच बसतात..या मानसिकतेत आणि ऑपरेशनच्या आधी व्हाईट डॉक्टरची मागणी करणाऱ्या रुग्णाच्या मानसिकतेत काहीही फरक नाहीये.
निराळ्या जातीची/ धर्माची सून, जावई असेल तर आपल्याला चालत नाही.
एखादीने कुळधर्म करण्यात रस नाही म्हटलेलं चालत नाही.
आपल्या आजूबाजूला असलेल्या लोकांमध्ये आपल्यापेक्षा वेगळा लैंगिक अग्रक्रम असलेला व्यक्ती असेल तर आपल्याला चालत नाही.
पुरुषाच्या हालचाली स्त्री सारख्या असतील किंवा स्त्री पुरुषासारखी दिसत असेल, वागत असेल तर आपल्याला चालत नाही.
भर लग्नाच्या मंडपात सून हुशार आहे अगदी, पण रंगाने जरा डावीच आहे असं म्हणताना आपण किती चुकतोय हा विचार आपल्या मनाला शिवत नाही.
दिव्यांग व्यक्तीवर आपण आधी हसतो, मग कीव करतो, माणूस म्हणून बघणं जमत नाही.
मुलांना मुलांसारख वाढू देणं आपल्याला जमत नाही.
‘राईज अबाव्ह’ ची गरज आपल्या प्रत्येकाला आहे.
या प्रवासाला अंत नाही. कदाचित डेस्टिनेशनही नाही. कारण जगताना पदोपदी ‘राईज अबाव्ह’ होण्याची गरज आहे. मनातल्या चुकीच्या धारणा, समजुती, लिंगभेद/जात-धर्म भेदाची, वर्चस्ववादाची जळमट दूर सारून ‘राईज अबाव्ह’ होण्याची गरज आहे.
जगात सगळ्यांचं सगळ्यांशी जमलं पाहिजे, सगळ्यांची मत पटली पाहिजेत असं अजिबात नसतं.
आपली मत/धारणा जपत असताना दुसऱ्याचा द्वेष न करणं जमलं पाहिजे.
दुसऱ्याला इजा न पोचवता जगणं जमलं पाहिजे. स्वतःला आतल्या आत चिवडत बसण्यापेक्षा, द्वेष पसरवत बसण्यापेक्षा ‘त्या’ कुंपणांना ओलांडून पुढे जायला जमलं पाहिजे.
जगण्याचं उद्दिष्ट्य काय आहे?
कदाचित एवढंच! ‘राईज अबाव्ह’
#riseabove
मुक्ता चैतन्य.

Previous articleवेदनेचं आभाळ
Next articleऑर्जी — ग्रुप सेक्स — स्विंग्सर्स पार्टी …. सेक्स-पार्टी
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.