संघाचा अश्वमेधाचा घोडा रोखणार कसा ?

संघ ह्या विषयावर आतापर्यंत पुरोगाम्यांनी केलेले विश्लेषण अपुरे व सदोष आहे, त्यात आत्मटीकेचा अभाव आहे, असे वाटल्यामुळे मी नुकतीच ‘आजचा सुधारक’ ह्या मासिकात संघ ह्या विषयावर तीन लेखांची मालिका लिहिली. ते तिन्ही लेख सलग वाचता यावेत, म्हणून एकत्रितपणे येथे देत आहे. त्यावर चर्चा व्हावी, ही अपेक्षा आहे.-रवींद्र रुक्मिणी पंढरीनाथ
RSS
लेखांक पहिला
नमोयुगाचे नऊ महिने उलटून गेले आहेत. ह्या नऊ महिन्यात कोणताही चमत्कार घडून आलेला नाही. स्विस बँकेत लपवलेला काळा पैसा भारतात येईल व त्यामुळे भारताची आर्थिक विवंचना संपेल असे मानणाऱ्यांची निराशा झाली आहे.सरकारी कचेऱ्या, बाजार – कोठेही परिवर्तनाच्या खाणाखुणा दिसत नाहीत. परराष्ट्रधोरणाच्या बाबतीतही नमो सरकार (इस्रायलच्या निषेधास दिलेल्या नकाराचा अपवाद वगळता) पूर्वीचेच धोरण पुढे चालवील अशी चिन्हे दिसत आहेत.निवडणुकीपूर्वी राणा भीमदेवी थाटात जगातील सर्व विषयांवर भाष्य करणारे नमो आता बोलण्याच्या बाबतीत मनमोहनसिंगांचा वारसा चालवीत असल्याचा भास होतो. त्यांची अलीकडील भाषणे ऐकून तर ते रोज सकाळी उठल्यावर ‘मथ्था टेकायला’ राजघाटावर जात असावेत, अशीही शंका येते. (आता नमो हेच गांधींचे खरे वारसदार असल्याचा साक्षात्कार होऊन कॉंग्रेसच्या बुडत्या जहाजातील आणखी काही उंदीर, तसेच काही काही भाबडे(?) सर्वोदयी भाजपच्या वळचणीला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.) ह्या सर्व घडामोडींमुळे पुरोगामी मंडळीनी हुश्श केले आहे.
नाही म्हणायला टमाट्याच्या भावाने गाठलेली शंभरी, स्मृती इराणीबाईंची झटपट पदवी आणि परमगुरु दीनानाथ बात्रा ह्यांच्या सौजन्याने गुजराथेत सुरू असणारे मूल्यशिक्षणाचे प्रयोग ह्यांच्यामुळे पुरोगाम्यांना चघळायला नवे विषय मिळाले आहेत. त्यांच्यावरून नमो सरकारला उघडे पाडता येईल, जनमानसातील त्याची प्रतिमा मलिन होईल अशी स्वप्नेही त्यांना पडू लागली आहेत. पण ते तेवढे सोपे नाही. महागाईमुळे निर्माण होणारा क्षणिक असंतोष वगळता अश्या कोणत्याही गोष्टीमुळे जनमानस फारसे क्षुब्ध होत नाही. प्राचीन काळी भारतातील रस्त्यांवरून मोटारी (अनश्व रथ), तर आकाशातून पुष्पकादि विमाने फिरत असत ह्या गोष्टींचे हसू येण्याऐवजी त्यावर भाबडा विश्वास ठेवणाऱ्यांची संख्या गेल्या काही दशकांत अमाप वाढली आहे. ताजमहाल हे मुळात तेजोमहालय नावाचे शिवमंदिर होते, अश्या तद्दन खोट्या कहाण्या आता जनमानसात रुजल्या आहेत. पूर्वी सारे काही आलबेल होते, सोन्याचा धूर निघत होता, स्त्रियांना स्वतंत्र व समान दर्जा होता, मुसलमानी आक्रमक आले आणि सर्व बरबादी झाली; असा इतिहासाचा सोपा (पण खोटा) अर्थ कोट्यवधींच्या मनात नमोराज्य येण्यापूर्वीच दृढमूल झाला आहे. ह्याचे श्रेय बात्रा-पुरंदरे-ओक ह्यासारख्यांच्या अथक परिश्रमाला जितके आहे, तितकेच ते भारतीय परंपरा नेमकी काय हे समजू न शकलेल्या पुरोगाम्यांच्या अविचारीपणाला व दुराग्रहालाही आहे.
एकीकडे भाजपचा मुकाबला राजकीय पातळीवर करू शकणारी कॉंग्रेस आजही पराभूत मनस्थितीत व अपंगावस्थेत आहे, दुसरीकडे केडरबेस असणारे, पण आपल्या राजकीय भूमिकेविषयी कायम संभ्रमावस्थेत असलेले डावे आता राजकीयदृष्ट्या कालबाह्य ठरले आहेत. कॉंग्रेसच्या भ्रष्ट व संधिसाधू राजकारणाला कंटाळलेली व एकूणच सांसदीय लोकशाहीबद्दल निराश झालेली जनता नमोंकडे तारणहार म्हणून बघते आहे. त्यासाठी त्यांनी ह्या देशातील लोकशाही परंपरा, निधर्मीवाद ह्यांना तिलांजली दिली तरी जनसामान्यांना फारसे दुःख होणार नाही. समता, स्वातंत्र्य, बंधुता, निधर्मीवाद व मुख्य म्हणजे ह्या देशातील बहुविधता ह्या साऱ्यांचे महत्त्व जाणणारी, वंचित शोषितांच्या उत्थानासाठी आग्रही असणारी अशी जी मंडळी आहेत (ज्यांना स्थूलमानाने ‘पुरोगामी’ अशी संज्ञा आहे) ती आज व्यथित आहेत खरी; पण दुसरीकडे ती आजच्या परिस्थितीचे आकलन करून घेण्यात कमीही पडत आहेत. ह्याचे कारण त्यांची निष्क्रियता हेच आहे. गेली अनेक दशके संघ परिवाराने पद्धतशीरपणे केलेल्या कृतींना प्रतिक्रिया देणे हाच त्यांचा एकमेव कार्यक्रम राहिला आहे. पुढाकार घेऊन कृती करणे, सातत्याने चालणारा कार्यक्रम राबविणे ह्यांचा त्यांना विसर पडला आहे.इ.स. १९७७च्या जनता प्रयोगाचे अपयश व त्यानंतर बाबरीविध्वंस ह्या दोन तडाख्यांमधून ते अद्याप सावरलेलेच नाहीत. पूर्वी रा. स्व. संघाचे सामर्थ्य व मर्यादा ह्यांचे योग्य विशेषण करू शकणारे मधु लिमयांसारखे विचारवंत पुरोगामी प्रवाहात होते. पण बाबरी संहारानंतरचा संघ परिवार व नमो ही दोन्ही रसायने अगदी वेगळी आहेत आणि त्यांचे यथायोग्य विश्लेषण करू शकणारी प्रयोगशाळा पुरोगाम्यांकडे नाही, ही सर्वात दुर्दैवाची गोष्ट आहे. त्यामुळे नमोंच्या १५ ऑगस्टच्या भाषणात दाटून येणारे सात्त्विक भाव, मोहन भागवतांचे ‘हिंदुस्तानात राहणारे ते सर्व हिंदू’ असे वक्तव्य, नमो सरकारने परदेशस्थ कंपन्यांना केलेले ‘भारतात येऊन कमवा’चे आवाहन व उत्तर प्रदेशात मध्यम पट्टीत सातत्याने केल्या जाणाऱ्या दंग्यांचे सुनियोजित व्यवस्थापन अश्या एकाच वेळी घडणाऱ्या सर्व ग्लोकल हालचालींचा अन्वयार्थ लावणे त्यांना शक्य होत नाही. शंकराचार्यांनी‘साईबाबा हे देव नाहीत’ असे वक्तव्य का करावे आणि पंतप्रधानांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा देण्याची औपचारिकता का निभावू नये हे जसे त्यांना कळत नाही, तसेच त्यांचे परस्परांशी असणारे नातेही समजून घेता येत नाही, कारण संघ परिवाराबद्दल एका विशिष्ट चौकटीतच विचार करण्याची त्यांना सवय झाली आहे.
अशा परिस्थितीत, संघ परिवार व नमो ह्यांच्या उक्ती-कृतीमागील खरा कार्यकारणभाव समजून घेणे केवळ पुरोगाम्यांसाठीच नव्हे, तर सर्व विचारी नागरिकांसाठी आवश्यक आहे, कारण आपली इच्छा असो वा नसो, देशाचे वर्तमान व भविष्य ह्या दोन घटकांवर फार मोठ्या प्रमाणावर अवलंबून आहे. इतकेच नव्हे, तर ह्या देशाच्या भूतकाळाविषयी भावी पिढ्यांना काय सांगितले जावे हे ठरविण्यातदेखील त्यांची महत्त्वाची भूमिका असणार आहे. त्या दृष्टीने प्रस्तुत लेखात हिंदुराष्ट्राचा विचार व त्याचा गांधीविचाराशी असणारा संघर्ष ह्यांचा परामर्श घेतला आहे.
‘हिंदू हा मुळात धर्मच नाही’
ह्या सर्व गोष्टींचा अन्वयार्थ लावण्यासाठी आपण थोडासा इतिहास समजून घेतला पाहिजे. रा. स्व. संघाचा जन्म १९२५ सालचा. मुस्लीम लीग १९०६ साली स्थापन झाली. हिंदुहितासाठी वेगळ्या संघटनेची गरज १९२०च्या दशकापूर्वी भासली नव्हती, कारण तत्कालीन काँग्रेसमध्ये हिंदुहिताचे प्रतिनिधित्व करणारे बरेच लोक होते. मुळात हिंदू नावाच्या अस्मितेचा जन्मच इंग्रजांच्या आगमनानंतर झाला. त्यापूर्वी ह्या देशात मराठे, राजपूत, रोहिले, जाट इ. राहत असत. हिंदू धर्म नावाची एकजिनसी गोष्टच कधी अस्तित्वात नव्हती. इस्लाम, ख्रिश्चन धर्म ह्यांप्रमाणे एक देव, एक धर्मग्रंथ, एक उपसनागृह, उपासनेची एकच पद्धत – असे काहीही हिंदू ‘धर्मा’त नव्हते. तेह्तीस प्रकारच्या (कोटी म्हणजे प्रकार) देवदेवतांची, हजारो प्रकारच्या उपासनापद्धतींची, जातिव्यवस्थेच्या जन्मजात तुरुंगात बद्ध अशी ही (नेमाडेंच्या शब्दात सांगायचे तर) ‘समृद्ध अडगळ’, तिच्या सर्वसमावेशकत्वामुळे हजारो वर्षे ह्या उपखंडात तगून होती. जातीआधारित स्वयंपूर्ण, विकेंद्रित कृषीकेंद्री ग्रामव्यवस्था हे तिचे व्यवच्छेदक लक्षण. शक, कुशाण हूणांपासून मुस्लिमांपर्यंत अनेक आक्रमक येथे आले व ह्या व्यवस्थेचा भाग होऊन गेले. मोगलांनीदेखील येथील उत्पादनव्यवस्था व उपासनापद्धती ह्यांना हात लावला नाही. ‘हिंदू’ हे नाव सिंधूपलीकडच्या लोकांनी अलीकडच्या लोकांना दिले होते, हे आपण जाणतोच. म्हणजे मुळात ही प्रादेशिक/ भौगोलिक स्थाननिदर्शक संज्ञा. स्वयंपूर्ण, आत्मलीन अशा ह्या गावगाड्याला बाह्य परिस्थितीशी काहीच घेणे देणे नव्हते. त्यामुळे राज्यकर्त्याचा धर्म कोणता, हा प्रश्न त्याला कधी पडला नाही. इथला शूद्र जातिव्यवस्थेला कंटाळून किंवा ब्राह्मण-क्षत्रिय पदाच्या लोभाने मुसलमान झाला, तरी उपासनापद्धती सोडल्यास त्याच्या आयुष्यक्रमात फारसा फरक पडत नसे. म्हणूनच हिंदू वा मुसलमान असणे ही ओळख ब्रिटीशपूर्व काळात महत्त्वाची नव्हती.ब्रिटिशांनी १८७१ मध्ये प्रथम जनगणना घेतली, तेव्हा मुसलमान, पारशी, ख्रिश्चन नसणाऱ्या समूहांना संबोधण्यासाठी ‘हिंदू’ हे नाम प्रथम वापरले गेले.
मात्र इंग्रजांच्या आगमनामुळे हे चित्र बदलले. येथील समाज पार ढवळला गेला. कारण आपल्या व्यापारी हितसंबंधांच्या रक्षणासाठी येथील स्वयंपूर्ण व विकसित उत्पादनतंत्र मोडकळीस आणणे इंग्रजांना आवश्यक होते. हे सारे करताना त्यांनी आव आणला तो मात्र एतद्देशीय जनतेच्या उद्धाराचा. इथल्या ‘रानटी’ प्रजेला सुसंस्कृत करणे ही जणू त्यांच्यावर आकाशातील देवाने सोपवलेली जबाबदारी असावी, असे त्यांनी भासविले. त्यांच्यामुळे येथील व्यवस्थेला हादरा बसला व ती अंतर्मुख होऊन विचार करण्यास बाध्य झाली. ब्रिटीश हुकुमतीने उभ्या केलेल्या प्रश्नांना स्थानिक व्यवस्थेने दिलेला प्रतिसाद स्थूलमानाने तीन प्रकारचा होता:
सुधारणावादी- आपल्या समाजात अनेक अनिष्ट, कालबाह्य रूढी-परंपरा आहेत.वैज्ञानिक विचारांचा, तंत्रज्ञानाच्या प्रगतीचा स्पर्शही आपल्याला झालेला नाही. म्हणून आपण आपल्या समाजात सुधारणा करावी अशी प्रेरणा इंग्रजी विद्या शिकलेल्या काहीजणांत जागली. बंगाल व महाराष्ट्र त्यात आघाडीवर होते. त्यामागे विविध समाजगटांच्या वेगवेगळ्या प्रेरणा होत्या. काहींच्या मनात आपल्या समाजातील सती, बालविवाह, केशवपन ह्यांसारख्या स्त्रीविरोधी रूढींविषयी चीड होती, कुणालायेथील समाजातील साचलेपणाबद्दल, जातिव्यवस्थेतील अन्यायाबद्दल संताप होता. त्याचप्रमाणे इंग्रज हे थोर, आदर्श; म्हणून आपणही ‘साहेबासारखे’ व्हावे, अशी मध्यमवर्गीय प्रेरणाही त्यामागे होती.
पुनरुज्जीवनवादी – हिंदू-मुस्लिम समाजातील उच्च वर्गाने एके काळी येथे राज्य केले होते; ते इंग्रजांनी हिरावून घेतले. एव्हढेच नव्हे तर त्यांनी आपल्या थोर संस्कृतीची अवहेलना केली. म्हणून त्यांचा पाडाव करून ह्या भूमीला गतकाळाचे वैभव प्राप्त करून देणे आपले परमकर्तव्य आहे, असे काहींना वाटले. उत्तर भारतातील पूर्वीचे नवाब-सरदार व प. महाराष्ट्रातील ब्राह्मण समाजातील काही वर्ग ह्या विचारांचा होता. ह्याच प्रेरणेची परिणती पुढे मुस्लिम राष्ट्रवाद व हिंदू राष्ट्रवाद ह्यांत झाली.
नवोन्मेषी परंपरावादी – गांधीजींनी ह्या दोन्ही प्रवाहातील उत्तम ते ग्रहण करीत वेगळाच मार्ग अनुसरला. ते स्वतःला ‘सनातनी हिंदू’ मानत होते.संस्कृती काय आहे हे आम्हाला लुटारू इंग्रजांकडून शिकण्याची गरज नाही, अशी त्यांची भूमिका होती.आपल्या परंपरांचे समर्थन करताना गांधींनी आपल्या बहुविध संचितातील नेमक्या उदारमतवादी, खुल्या परंपरा निवडल्या, किंवा जुन्या परंपरांचा अतिशय नाविन्यपूर्ण अर्थ लावला. त्यांनी वैष्णवाची, पर्यायाने हिंदू माणसाची व्याख्याच ‘वैष्णव जन तो तेणे कहिये जो पीड परायी जाणे रे’ अशी केल्यामुळे परधर्मीयांचा द्वेष करण्याचा हिंदू असण्याशी संबंधच उरला नाही. हिंदू परंपरेतील ‘ईश्वर हेच सत्य’ ही संकल्पना उलटी करून त्यांनी ‘सत्य हाच ईश्वर’ असे मांडल्यामुळे चिकित्सेचा, सत्यशोधाचा, अनेकविध पर्यायांचा मार्ग खुला झाला. आम्हाला आमच्या समाजात सुधारणा करायची आहे, पण ती इंग्रजांसारखे होण्यासाठी नाही, तर आत्मोद्धारासाठी, आमचा समाज उन्नत करण्यासाठी, अशी त्यांची धारणा होती. इंग्रज आमच्यावर राज्य करू शकतात, ह्याचे कारण त्यांचे शस्त्रबळ किंवा तंत्रज्ञान-विज्ञानावरील त्यांची पकड हे नसून आमची गुलाम मनोवृत्तीच आहे.ती त्यजली, तर त्यांना आमच्यावर राज्य करणे अशक्य होईल असे त्यांनी मांडले. तसे करताना त्यांनी कोणत्याही अंधश्रद्धेला थारा दिला नाही की देवळे, तीर्थस्थळे ह्यांचे महात्म्य वाढविले नाही.परंपरांचा अभिमान बाळगताना त्यांनी दाखविलेला मूल्यविवेक आणि जुन्या परंपरांना नवा अर्थ देण्याची त्यांची नवोन्मेषी (इनोव्हेटिव) वृत्ती ह्यामुळे ते पुनरुज्जीवनवाद्यांपासून वेगळे ठरतात.
टिळक युगाच्या अस्तानंतर व गांधीयुगाच्या प्रारंभानंतर पुनरुज्जीवनवादी हिंदूंना येणाऱ्या बदलांची चाहूल लागली. वर उल्लेखिल्याप्रमाणे गांधीनी स्वतःला परंपराप्रिय सनातनी हिंदू घोषित केल्यामुळे पुनरुज्जीवनवादी हिंदूंचा सारा राजकीय अवकाश त्यांनी व्यापला. शिवाय ‘जात’ हा शब्दही न उच्चारता त्यांच्या ग्रामोद्योगाला चालना देण्याच्या, स्थानिक भाषेत कॉंग्रेसचा व्यवहार चालविण्याच्या आग्रहामुळे, पक्षाचे नेतृत्व उच्चवर्गीय – उच्चजातीय सुशिक्षितांकडून उत्पादक जातींकडे (आजच्या भाषेत ओबीसींकडे) सरकले. कॉंग्रेस खऱ्या अर्थाने ‘तेल्या-तांबोळ्यांची’ झाली.कॉंग्रेसमधील मदनमोहन मालवीयांसारख्या परंपरानिष्ठ नेत्यांनाही पक्षाचे बदलते रूप व गांधीचे नेतृत्व स्वीकारावे लागले. त्यामुळे टिळकांच्या मृत्यूनंतर लौकरच पुनरुज्जीवनवादी हिंदू नेतृत्वाला, ‘कॉंग्रेस आता आपल्या हितसंबंधांचे रक्षण करू शकणार नाही’ अशी जाणीव झाली. त्याचाच परिणाम म्हणून त्यानंतर अवघ्या पाच वर्षात रा. स्व. संघाची स्थापना झाली. तेव्हापासून स्वातंत्र्यप्राप्तीपर्यंतच्या २२ वर्षांत संघाने कधीही स्वातंत्र्यआंदोलनात भाग घेतला नाही. संघ संस्थापक डॉ. हेडगेवार एके काळी कॉंग्रेसचे कार्यकर्ते म्हणून स्वातंत्र्य चळवळीत सक्रिय होते, पण संघस्थापनेनंतर त्यांचा चळवळीशी संबंध संपला.हिंदुराष्ट्रवादाचे प्रणेते स्वा. सावरकर सशस्त्र क्रांतीच्या लढ्यात सक्रिय होते. त्यासाठी त्यांना अंदमान येथे काळ्या पाण्याची सजा झाली व त्यात अपार कष्ट सहन करावे लागले. परंतु, त्यांच्या मुक्ततेची पूर्वअटच त्यांनी स्वातंत्र्य-चळवळीपासून दूर राहणे ही असल्यामुळे, सुटकेनंतर त्यांचाही त्याच्याशी संबंध संपला.
गांधींच्या उदयामुळे आंदोलनाचे सशस्त्र पर्व संपुष्टात आले व व्यापक प्रमाणावर अहिंसक चळवळ सुरू झाली. गांधींचा सर्वधर्मसमभाव, इतिहासाचा अन्वयार्थ व भविष्याचा वेध घेण्याची त्यांची दृष्टी सावरकरांच्या जीवनदृष्टीच्या पूर्णतया विरोधात होती. म्हणून सावरकर व हिंदू महासभा गांधीप्रणीत स्वातंत्र्यसंग्रामापासून केवळ दूरच राहून थांबले नाहीत, तर त्यांनी त्याचा विरोधच केला. असे करताना त्यांनी अन्य मार्गाने स्वातंत्र्यासाठी आंदोलन छेडलेही नाही. देशासाठी बलिदान करणारे किंवा अनन्वित छळ सहन करणारे अनेक क्रांतिकारक होऊन गेले. त्यातील बहुसंख्य लोक हे स्वातंत्र्यासोबतच समतेच्या राज्याचे स्वप्न पाहणारे, म्हणजेच साम्यवादी-समाजवादी विचारांचे होते, ज्यांचा हिंदू राष्ट्रवादाशी संबंध नव्हता. आज संघ परिवार ज्या भगतसिंग- सुखदेव-राजगुरू किंवा नेताजी सुभाषचंद्रांवर अन्याय झाल्याचे भासवीत आहेव त्यासाठी गांधी-नेहरू व काँग्रेसवर आगपाखड करीत आहे, त्या थोर क्रांतिकारकांच्या कार्याशी व विचारधारेशी संघ-परिवाराचा किंवा हिंदू राष्ट्रवादाचा काहीएक संबंध नव्हता; असलाच तर विरोध होता व तो जगजाहीर होता, हे आपण लक्षात ठेवले पाहिजे. संघाच्या, किंबहुना हिंदुराष्ट्रवाद्यांच्या गांधीविरोधाची व काँग्रेसविरोधाची पाळेमुळे अशा रीतीने इतिहासात दडली आहेत.
गोडसे व गांधी यांच्यामधील फरक
हा फरक समजून घेण्यापूर्वी आपल्याला एका महत्त्वाच्या मुद्द्याचा परामर्श घ्यायला हवा. तो म्हणजे गांधी व हिंदुराष्ट्रवादी ह्यांत नेमका फरक तो काय? तो लक्षात न घेतल्यामुळे अनेकदा संघीय मंडळी सर्वोदयाच्या व्यासपीठावर किंवा गांधीवादी संस्थांमध्ये मानाने मिरवताना दिसतात.अनेकदा तर अश्या संस्था संघाने गिळंकृत करेपर्यंत भाबड्या (!) गांधीवाद्यांना त्याची खबरबात लागत नाही. ह्या वैचारिक गोंधळामुळे समाजवादी-साम्यवादी-आंबेडकरवादी-स्त्रीमुक्तिवादी इ. सर्व पुरोगामी मंडळी गांधींचा प्रचंड राग करतात. एक वेळ (किंवा अनेकदा) ती संघाला जवळ करतील, पण गांधी त्यांच्यासाठी ‘अस्पृश्य’ असतात. कारण पुनरुज्जीवनवादी (हिंदूराष्ट्रवादी) व गांधी दोघेही परंपरांचा अभिमान बाळगताना आपल्याला दिसतात. अनेकदा त्यांची भाषाही सारखी असते. हिंदू धर्माची थोरवी दोघेही गातात, त्यामुळे‘निधर्मी’ मंडळींचा व जनसामान्यांचा अनेकदा गोंधळ उडतो, किंवा त्यांना जाणीवपूर्वक संभ्रमात ठेवले जाते. म्हणूनच गांधी व गोडसे ह्यांतील नेमका फरक समजून घेणे आवश्यक आहे.
हिंदूराष्ट्रवादी व गांधी दोघेही परंपरेचे समर्थक होते; पण आपल्याला ललामभूत वाटणारी परंपरा कोणती, ह्याविषयीच्या त्यांच्या धारणा व त्यानुसार त्यांच्या विचार व कार्याच्या दिशा परस्परविरोधी होत्या.हिंदुधर्माचे आकारहीन, अघळपघळ रूप, त्यातील बहुविधता, नव्याचा स्वीकार करण्यातील सहजता, थोडक्यात त्यातील अनाग्रही, सहिष्णु वृत्ती हाच हिंदुधर्माचा गाभा आहे, त्याचे शक्तिस्थान आहे, अशी गांधींची श्रद्धा होती. ह्याउलट हिंदुराष्ट्रवाद्यांना हा हिंदूंचा दुबळेपणा आहे असे वाटत आले आहे. गांधींसाठी हिंदू ही केवळ उपासनापद्धती नसून ती एक जीवनप्रणाली होती. अशी जीवनप्रणाली जी पूर्णपणे खुली आहे; जीत आचारविचाराचे बंधन नाही. ते धर्माचा संबंध एकीकडे कर्तव्याशी लावतात, तर दुसरीकडे नीतिमूल्यांशी. ते राजकारणात धर्म आला पाहिजे असे सांगतात, तेव्हा त्यामागे भ्रष्ट राजकारणात मूल्यांची प्रतिष्ठापना केली पाहिजे असा त्यांचा आग्रह असतो. ह्याउलट हिंदुराष्ट्रवाद्यांसाठी हिंदू धर्म ही एक उपासनापद्धतीच आहे. सावरकर जेव्हा ‘हिंदू’च्या व्याख्येत ‘हा देश ही ज्याची मातृभू, पितृभू व पुण्यभू आहे’ असा उल्लेख करतात, तेव्हा त्यांना येथील धर्मांतरित मुस्लिम व ख्रिश्चन हिंदू नाहीत, पण हिंदू धर्माविरुद्ध बंड करणारे जैन व बौद्ध मात्र हिंदू धर्माचाच एक भाग आहेत असे म्हणायचे असते. (त्याच वेळी हिंदू-बौद्ध संघर्ष हे त्यांच्या दृष्टीने भारतीय इतिहासातील एक सोनेरी पानही आहे.) सावरकर व संघपरिवार ह्यांना हिंदू धर्माचे राजकारण करायचे आहे. त्यांना गांधींच्या अर्थाने राजकारणात ‘धर्म’ आणायचा नाही. त्यांच्या दृष्टीने ‘शठं प्रति शाठयम्’, म्हणजे ‘खटाशी असावे महाखट’ हेच योग्य आहे.
मुख्य म्हणजे इंग्रज भारतावर राज्य का करू शकतात व ते उलथवून लावण्यासाठी आपण काय करायला हवे, ह्याविषयीचे गांधी व हिंदुराष्ट्रवादी ह्यांचे विचार परस्परविरोधी आहेत. देश दुबळा झाल्यामुळे तो गुलाम झाला असे दोघांनाही वाटते. पण सावरकर वगैरे मंडळींना वाटते की शक्ती म्हणजे शस्त्राची ताकद. आपल्या समाजातील क्षात्रवृत्ती लोप पावली, आपण स्त्रैण झालो. इंग्रज मात्र शारीरिक दृष्ट्या बळकट आहे. तो नवतंत्रज्ञानावर आधारलेल्या शस्त्रास्त्रांनी सज्ज आहे. म्हणूनच ते ‘भारताचे हिंदूकरण व हिंदूंचे सैनिकीकरण’ (अर्थात स्त्रैण हिंदूंचे पौरुषीकरण) ह्यावर भर देतात. हिंदुत्वाच्या विचारात शारीरिक शक्ती व मर्दानगी ह्या बाबी केंद्रस्थानी आहेत. (साध्वी ऋतंभरा, बाळासाहेब ठाकरे, प्रवीण तोगडिया इ.ची वक्तव्ये आठवावीत.) म्हणूनच रा. स्व. संघ ह्या ‘वीरांच्या’ संघटनेत स्त्रियांना प्रवेश नाही. राष्ट्र सेविका समिती किंवा दुर्गा वाहिनी ह्यांची भूमिका दुय्यम व परिवार प्रमुख ठरवील त्याप्रमाणे असते. एरवी वीर पुरुषांभोवती पंचारती ओवाळणे व मुलांवर धार्मिक संस्कार करणे हेच स्त्रियांचे काम. बाबरी मशिदीच्या आंदोलनाच्या निमित्ताने संघ परिवाराने शांत, सौम्य आदर्शपुरुष असलेल्या रामाचा ‘मेक ओव्हर’ करून त्याची ‘युयुत्सु, धनुर्धर’ प्रतिमा लोकप्रिय केली. त्यासोबतच रामासोबत असणारे त्याचे पंचायतन त्यांनी मोडीत काढले. बजरंगाला निदान वेगळी सेना (दल) तरी मिळाले, पण सीतामाईला मात्र पुन्हा भूमिगतच व्हावे लागले. पूर्वी उत्तर भारतात लोक एकमेकाला भेटल्यावर ‘जय सियाराम’ असे अभिवादन करीत. बाबरीप्रकरणाने त्यांना ‘सिया’ गाळून फक्त‘जय श्रीराम’ म्हणायला शिकविले. …..हिंदुराष्ट्रात स्त्रियांचे स्थान काय असेल ह्यावर आणखी बोलण्याची गरज नाही.
ह्याउलट गांधींचा भर आत्मशक्ती, मनाची शक्ती जागविण्यावर आहे.कारण त्यांच्या मते शक्ती म्हणजे मनाची शक्ती, मनोनिग्रह. भारतीय लोक आपली आत्मशक्ती विसरले. त्यांना मिळालेला सत्य, अहिंसेचा वारसा विसरले. त्यांनी स्वतःच गुलामगिरी स्वीकारली, म्हणून ते गुलाम झाले. त्यांनी जर आत्मभान, आत्मशक्ती जागवली, तर इंग्रज येथे राहूच शकणार नाहीत. केवळ शस्त्रांच्या आधारे, मूठभर इंग्रजांना हजारो मैल दूर असणाऱ्या खंडप्राय प्रदेशातील कोट्यवधी लोकांवर राज्य करता येणे अशक्य आहे, असे ते म्हणत. ही आत्मशक्ती केवळ इंग्रजांना हाकलण्यासाठीच नव्हे, तर स्वराज्यात रामराज्य स्थापण्यासाठी देखील आवश्यक आहे, असेही त्यांचे सांगणे होते. स्त्रियांमध्ये मनाचा कणखरपणा अधिक असतो, म्हणूनच गांधींच्या अहिंसक लढ्यात स्त्रियांना मानाचे स्थान होते.
हिंदुराष्ट्रवादाचा मुख्य आधार ‘हिंदू’ विरुद्ध‘इतर’ असे द्वंद्व उभे करणे हा आहे. परधर्मीयांनी हिंदूंवर सातत्याने अत्याचार केले, असे सांगून हिंदूंमधील द्वेषाग्नी सतत प्रज्वलित ठेवणे ही त्यांची रणनीती आहे. त्याचबरोबर गतेतिहासाचे सुरम्य चित्रण करून त्या गौरवशाली भूतकाळाकडे परत जाण्याची प्रेरणा तेवत ठेवणे हादेखील त्याच रणनीतीचा भाग आहे. भारतीय इतिहासातील भव्यता, उदात्तता ही फक्त हिंदूंमुळे, व त्यातील त्याज्य भाग परधर्मीयांमुळे आहे, असे सांगून इतिहासाची मोडतोड त्यामुळेच तर त्यांना करावी लागते! ताजमहाल सुंदर आहे ना, मग तो हिंदूंचाच असला पाहिजे व स्त्रीविरोधी रूढी असल्या तर त्या मुसलमानांमुळेच असल्या पाहिजेत, ही कसरतही त्यासाठीच. जगभरातील धर्माधारित राष्ट्रवाद्यांची हीच गोची आहे. पाकिस्तानात जो इतिहास शिकविला जातो, तीम्हणजे बात्राप्रणीत इतिहासाची ‘मुस्लिम’ आवृत्ती. गांधींच्या दृष्टीने‘हिंदू’ हा संप्रदाय नसल्यामुळे, त्यांना इतिहासाची मोडतोड करण्याची गरज भासत नाही. त्यांचा राम रहीमसोबत व ईश्वर अल्लासोबत सुखाने नांदू शकतो.

लेखांक दुसरा
मागील लेखात आपण पहिले की नरेंद्र मोदी ह्यांच्या ऐतिहासिक विजयाचे श्रेय जितके हिंदुत्ववाद्यांच्या अथक परिश्रमाला आहे, तितकेच ते भारतीय परंपरेचा अन्वयार्थ लावू न शकलेल्या पुरोगाम्यांच्या अविचारीपणाला व दुराग्रहालाही आहे. हिंदू राष्ट्रवादाचा व रा. स्व. संघाचा जन्मच मुळात गांधीप्रणीत राजकारणाला शह देण्याच्या विचारातून झाला.हिंदूराष्ट्रवादी व गांधी दोघेही परंपरेचे समर्थक होते; पण हिंदू धर्मातील अनाग्रही, सहिष्णु वृत्ती हाच हिंदुधर्माचा गाभा आहे, त्याचे शक्तिस्थान आहे, अशी गांधींची श्रद्धा होती. ह्याउलट हिंदुराष्ट्रवाद्यांना हा हिंदूंचा दुबळेपणा आहे असे वाटत आले आहे. हिंदुराष्ट्रवादाचा मुख्य आधार ‘हिंदू’ विरुद्ध ‘इतर’ असे द्वंद्व उभे करणे हा आहे.म्हणूनच भारतीय इतिहासातील भव्यता, उदात्तता ही फक्त हिंदूंमुळे, व त्यातील त्याज्य भाग परधर्मीयांमुळे आहे, असे सांगून त्यांना इतिहासाची मोडतोड करावी लागते. गांधींच्या दृष्टीने ‘हिंदू’ हा संप्रदाय नसल्यामुळे, त्यांना इतिहासाची मोडतोड करण्याची गरज भासत नाही. त्यांचा राम रहीमसोबत व ईश्वर अल्लासोबत सुखाने नांदू शकतो.
रा. स्व. संघाचे राजकारण समजून घेताना अनेकदा आपली गफलत होते.सर्वसामान्य जनतेला संघ ही केवळ हिंदू धर्माचा अभिमान बाळगणारी, राष्ट्रीय आपत्तीच्या वेळी धावून जाणारी शिस्तप्रिय, सांस्कृतिक संघटना आहे, असे वाटते. डावी मंडळी संघ ही एक फॅसिस्ट संघटना आहे, असे मानतात. पण त्यांचे विश्लेषणही फॅसिझमच्या पाश्चात्य संकल्पनेपुढे जात नाही. भारतीय मातीतून उगवलेला संघ समजून घ्यायचा, म्हणजे मुदलात भारतीय परंपरा काय आहे, हे समजायला हवे. त्या विषयातले डाव्यांचे आकलन अपुरे आहे, एव्हढे म्हटले की पुरे. संघ ही ब्राह्मणी विचारांची छावणी आहे, हाही संघाकडे पाहण्याचा एक महत्त्वाचा दृष्टिकोन आहे. पण ब्राह्मण्य म्हणजे काय, ह्याविषयी सर्वत्र असलेला गोंधळ संघाच्या पथ्यावर पडतो. कारण अब्राह्मणी छावणीतील थोर मंडळीही अनेकदा ब्राह्मण्याच्या नावावर ब्राह्मणांना बडवत राहतात. जोपर्यंत संघ हा सर्वार्थाने शेटजी-भटजींचा होता, तेव्हा ही गफलत खपून जात असे. पण १९९२ साली बाबरी मशीद उद्ध्वस्त करण्याचे ‘पुण्यकर्म’ कल्याणसिंग, साध्वी ऋतंभरा व उमा भारती ह्यांच्या नेतृत्वाखालील बहुजनांनी संपादन केले. त्यानंतर २००२च्या मुस्लिमांना धडा शिकविण्याच्या महाप्रकल्पात दलितांसोबत आदिवासीही सहर्ष सामील झाले. २०१४च्या निवडणुकीत दलित व आदिवासींच्या बहुसंख्य राखीव जागांवर भाजप निवडून आला व मोदींच्या रूपाने बहुजन समाजातला पंतप्रधान संघ परिवाराने देशाला दिला. एव्हढे झाल्यावर संघाला ‘ब्राह्मणी’ म्हटल्याने संघाचे काही एक नुकसान होत नाही. उलट बहुजनातील विचारवंत आता ‘बहुजन’ पटेलांऐवजी ‘ब्राह्मण’ नेहरूंना देशाचे पंतप्रधान केल्याबद्दल कॉंग्रेसला दूषणे देत आहेत. असा वैचारिक गोंधळ माजणे ही बाब संघाच्या नेहमीच पथ्यावर पडली आहे.
एरवीसुद्धा मतामतांचा गलबला उडवून गोंधळ निर्माण करायचा व त्या पडद्याआड आपल्या सोयीचे राजकारण करायचे अशीच संघाची कार्यशैली राहिली आहे.
‘संघ ही एक सांस्कृतिक संघटना आहे, तिचा राजकारणाशी संबंध नाही.’
‘आम्ही हिंदुत्वाचे राजकारण केले, करतो व करत राहू.’
‘भाजप ही आमची राजकीय आघाडी नाही. संघाचा स्वयंसेवक कोणत्याही पक्षात जाऊ शकतो. आमचे अनेक कार्यकर्ते कॉंग्रेसमध्ये आहेत.’
‘हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व’,
‘हिंदू हा धर्म नाही, ती एक जीवनपद्धती आहे. त्यामुळे ह्या देशात हिंदू हिंदू, हिंदू मुस्लिम व हिंदू ख्रिश्चन राहतात असे आम्ही मानतो.’
ह्या व अशा असंख्य निरर्थक, धादांत खोट्या किंवा अर्धसत्याधारित विधानांतून एकच खकाणा उडवून देण्यात संघ परिवार वाकबगार आहे. त्याचबरोबर पुरोगाम्यांच्या दुखऱ्या जागा ओळखून त्यांना उचकवून नको त्या वादात गुरफटून ठेवण्यातही त्यांना यश मिळत आले आहे. ह्या खेळीचे ताजे उदाहरण म्हणजे ‘लव्ह जिहाद’.

खरे तर संघाने लव्ह जिहादचा धुरळा उडवून दिल्यावर त्याकडे दुर्लक्ष करणे हाच योग्य उपाय होता. कारण कोणत्याही राज्यात कोणत्याही सामजिक थराला बोचणारा हा विषय नव्हता. हिंदूंची झोप उडावी, इतक्या मोठ्या संख्येने मुस्लिम पुरुष व हिंदू स्त्रिया ह्यांचे विवाह पार पडल्याची हवादेखील कोठे पसरली नव्हती. अशा वेळी संघ परिवारातील माजी लोहपुरुष माननीय लालकृष्ण अडवाणी व भाजपचा अल्पसंख्य चेहरा श्री. शहानवाज खान ह्यांच्या तसबिरींची वाजतगाजत मिरवणूक काढणे व आंतर-धर्मीय विवाहांना आपल्या कुटुंबात स्थान दिल्याबद्दल त्यांचे जाहीर अभिनंदन करणे असा कार्यक्रम घेणे सेक्युलर मंडळीना शक्य होते. (त्यात शर्मिला-पतौडी, सैफ अली- करीना, सुनील दत्त – नर्गीस ह्यांच्या तसविरीही लावल्या असत्या, तर नव्या-जुन्या चित्रपटशौकिनांचा पाठिंबाही त्यांना मिळाला असता.)
आताही विचार व प्रतिमांच्या सरमिसळीचा खेळ संघ परिवार खुबीने खेळतो आहे.सत्तेवर आल्यानंतरचे मोदी ही निवडणूकपूर्व मोदींची ‘स्किझोफ्रेनिक’ आवृत्ती म्हणावी लागेल, इतक्या त्या दोन्ही मोदींच्या प्रतिमा वेगळ्याच नव्हे, तर चक्क परस्परविरोधी आहेत. नवे मोदी चीन-पाकिस्तानला धमकावीत नाहीत. ग्रामसफाई व मुस्लिमांचे राष्ट्रप्रेम ह्याविषयी आवर्जून बोलतात. पण त्याच वेळी ‘लव्ह जिहाद’चा प्रचार किंवा उ.प्र.च्या निवडणुकी डोळ्यासमोर ठेवून खेळला जाणारा दंगलींचा ‘खेळ’ ह्याविषयी ते अवाक्षरही उच्चारत नाहीत.गांधींचे नाव घेताना विकासाच्या नावाखाली येथील शेतकऱ्यांना संपविण्याचे राजकारण करण्यास ते कचरत नाहीत. भाजप राज्यावर आल्यावर घडलेल्या काही घटना खाली दिल्या आहेत,त्यात तुम्हाला काही सुसंगती आढळते का हे पहा-
मंगळावर यान पाठविणे,
गुजरातच्या शाळांमधून दिनानाथ बात्रांच्या भाकड पुराणकथांना पाठ्यपुस्तकांचा दर्जा देणे,
‘साईबाबा हे देव नाहीत, ते मुस्लिम होते व म्हणून त्यांची पूजा बंद करा’असे फतवे धर्म संसदेने काढणे (अशी काही संस्था आहे व ती हिंदूंच्या धर्माचरणाचे नियोजन करते, असे ह्यापूर्वी कोणाला माहीत तरी होते का?),
विकासाच्या कामासाठी देशातील शेतजमीन ताब्यात घेणे सुलभ व्हावे, म्हणून उरलेसुरले कायदेशीर अडसर तातडीने दूर करणे,
हिंदीच्या सार्वत्रिक वापराचा आग्रह धरणे इ. इ.
भारतीय परंपरेचा संघप्रणीत अर्थ
खरे तर असा अर्थ लावणे ही फार कठीण बाब नाही. मात्र त्यासाठी मागील लेखात दिलेल्या पूर्वपीठिकेच्या संदर्भात संघ काय आहे, हे नीट समजून घ्यावे लागेल. इंग्रजांनी भारत ताब्यात घेवून येथे आपला जम बसवल्यानंतर येथील समाजातील विविध घटकांनी त्या परिस्थितीचा वेगवेगळा अर्थ लावला. आंग्ल विद्याभूषित अभिजनांतील एक वर्ग आपल्या समाजातील अन्याय्य रूढी-परंपरांविषयी सचेत होऊन विचार करू लागला. आपले दास्य हे आपल्या सामाजिक मागासलेपणातून उद्भवले आहे, असे मानणारा वर्ग सामाजिक सुधारणा करण्यासाठी कार्यरत झाला.ह्याउलट ज्यांच्याकडून इंग्रजांनी राज्य ताब्यात घेतले, अशा एकेकाळच्या राज्यकर्त्या वर्गातील एक गट पुनरुज्जीवनवादी बनला, ज्यातून पुढे मुस्लीम लीग व रा. स्व. संघ जन्माला आले.‘आमची परंपरा थोर आहे. गोऱ्या साहेबाने येऊन ती भ्रष्ट किंवा नष्ट केली. म्हणून पुन्हा एकदा त्याला हाकून लावून आपल्या राज्याची पुनर्स्थापना करणे हे करणे हे आपले परम कर्तव्य आहे’, असे ह्या समूहांना वाटले. ह्यापैकी हिंदू पुनरुज्जीवनवादी आपली नाळ पेशवाई, तसेच १८५७च्या समरातील नानासाहेब पेशवे, तात्या टोपे इ. मंडळींशी जोडत असत. उच्च जातीत जन्मल्यामुळे येथील सामाजिक विषमता, त्यामुळे जातीजातींत विभागलेला समाज, अंधश्रद्धा व कमालीची रूढीप्रियता ह्या बाबी आपल्या सद्यस्थितीला जबाबदार आहेत, असे ह्या वर्गाला वाटले नाही. उलट आपली समाजरचना, संस्कृती हे सर्वश्रेष्ठच आहे, असा त्याचा दृढ विश्वास होता. अर्थात, एव्हढा महान समाज इंग्रजांसमोर पराभूत कसा झाला, ह्या प्रश्नाचे उत्तर शोधणे त्याला भाग होते. तेव्हा त्याने एक साधे सोपे उत्तर शोधले- ते म्हणजे ‘परधर्मीयांचा प्रभाव’. पूर्वी सारे काही आलबेल (ऑल इज वेल?) होते. येथे सोन्याचा धूर निघत होता. स्त्रिया वेद लिहीत होत्या. रस्त्यावरून अनश्व रथ व आकाशातून पुष्पक विमाने विहरत होती, ज्ञानविज्ञानात आम्ही प्रगती केली होती. पण हे म्लेंच्छ आले. त्यांच्या रानटीपणापासून बचाव व्हावा म्हणून आमच्या स्त्रिया गोषात गेल्या, आम्हाला आमचे ज्ञान दडवून ठेवावे लागले. असा सोयीस्कर युक्तिवाद पुढे आला. शिवाय मुळात आम्ही क्षात्रतेजमंडित होतो. पण बौद्ध धर्माने आम्हाला ‘हतवीर्य’ केले. आम्ही‘ठोशास ठोसा’ देणारे होतो, पण ह्या अहिंसेच्या तत्त्वज्ञानाने आमचे नुकसान झाले, अशीही मखलाशी करण्यात आली.ह्यात सर्वांत कळीचा मुद्दा होता- ‘आम्ही म्हणजे कोण?’ ह्यात‘आम्ही’ म्हणजे पूर्वीचे सत्ताधीश, म्हणजेच समाजातील उच्चजातीय अभिजन असेच अनुस्यूत होते. पुनरुज्जीवन कशाच्या आधारावर करायचे, ह्या प्रश्नाचेही हेच उत्तर होते. हिंदू राष्ट्रवाद्यांची जीवनदृष्टी जी उच्च वर्ग-जातीय आहे, त्यामागील हा इतिहास आहे.
परधर्मियांचा द्वेष: धार्मिक राष्ट्रवादाची गरज
पण इंग्रजांच्या विरोधात सारा समाज उभा करायचा, तर मग ‘आम्ही’ अधिक व्यापक करणे अपरिहार्य होते. इंग्रजांविरुद्ध कोणी लढायचे? जो थोर वारसा आम्हाला पुनरुज्जीवित करायचा आहे, तो मुळात कोणाचा? आमचे राज्य म्हणजे कोणाचे राज्य? ह्या प्रश्नाला उत्तर पुरविले तेही इंग्रजांनी. मागील लेखात आपण पाहिले की इंग्रजांच्या आगमनापूर्वी ह्या देशात कोणीच हिंदू नव्हता – होत्या त्या असंख्य जाती. राज्यकारभाराच्या सोयीसाठी इंग्रजांनी त्याला नाव दिले- ‘हिंदू’ – जे मुसलमान किंवा ख्रिश्चन नाहीत ते सारे ‘हिंदू’. खरे तर येथील भटके –विमुक्त, आदिवासी, म्हणजे गावगाड्यापासून मुक्त समाजघटक हे चालीरीती, देवदेवता, उपासनापद्धती ह्या कोणत्याही बाबतीत सवर्ण हिंदूंसारखे नव्हते. पण त्यांना अशी ओळख देण्यात आली. त्याचबरोबर १८५७च्या फसलेल्या बंडामुळे सावध झालेल्या इंग्रजांनी जाणीवपूर्वक ह्या दोन्ही समाजगटांमध्ये वैमनस्य पसरविले, ‘फोडा आणि झोडा’ नीती वापरली. पण त्यामुळे लाभ झाला हिंदू पुनरुज्जीवनवाद्यांचा. त्यांना स्वतःची एक ओळख मिळाली व त्याचबरोबर एक शत्रूही. ‘आपण सारे हिंदू व आपले शत्रू म्हणजे मुसलमान (व थोड्या प्रमाणात ख्रिश्चन)’ असे समीकरण निर्माण झाले. म्हणजे हिंदुत्वाची निर्मितीच मुळात मुस्लिमद्वेषाच्या पायावर झाली आहे.
अर्थात ही प्रक्रिया दोन्ही अंगांनी चालली. उत्तर भारतातील मुस्लिम राज्यकर्तेदेखील सत्ता गेल्यामुळे अस्वस्थ होते. त्यांनाही त्यांचा वैभवशाली भूतकाळ (जो फार पलिकडचा नव्हता) खुणावत होता. त्यांनीही मुस्लिम पुनरुज्जीवनवादाची कास धरली. ‘हिंदू आपल्याला सुखाने जगू देणार नाहीत’ असे मुसलमानांना सांगणे ही त्यांची गरज बनली. म्हणजे हिंदू राष्ट्रवाद व मुस्लिम राष्ट्रवाद दोघेही परस्परांच्या आधाराने, परस्परांना पुष्ट करत ह्या देशात उभे राहिले. त्यांचे राजकारणच नव्हे, तर अवघे अस्तित्व परस्परांवर अवलंबून आहे, कारण दुसऱ्याचा द्वेष हीच पहिल्याच्या अस्तित्वाची निजखूण आहे. हिंदुराष्ट्रवादाचे जनक सावरकर व मुस्लिम राष्ट्रनिर्माते जिना ह्या दोघांचे व्यक्तिमत्व, राजकारण, आधुनिकतेचा आग्रह ह्यात कमालीचे साम्य आहे. हिंदुत्वनिष्ठांनी लिहिलेला भारताचा इतिहास व पाकिस्तानातील इतिहासाची पाठ्यपुस्तके ह्या परस्परांच्या आरशातील प्रतिमाच होत. हिंदुत्वनिष्ठांच्या पुस्तकांतील इतिहासात संस्कृतीचे निर्माते म्हणजे हिंदू व मुस्लिम म्हणजे फक्त लुटारू असे वर्णन असते, तर पाकिस्तानातील पुस्तकांत ह्याचा व्यत्यास मांडलेला असतो. ही दोन उदाहरणे हिंदू व मुस्लिम राष्ट्रावादातील साम्य व त्यांचे परस्परपूरकत्व सिद्ध करण्यास पुरेशी आहेत.
हिंदू राष्ट्रवाद व मुस्लिम राष्ट्रवाद ह्या दोन्हीच्या बाबतीत आणखी एक बाब समान आहे. दोन्ही विचारधारांचे पुरस्कर्ते जरी परंपरावादी असले, तरी त्यांचे नेतृत्व आंग्लविद्याविभूषित वर्गाने केले.दोन्ही नेतृत्वांना असे वाटत होते की त्यांच्या समाजाची अवनती इंग्रजांच्या तुलनेत त्यांची ‘मर्दानगी’ कमी पडल्यामुळे झाली आहे. त्यामुळे इंग्रजांप्रमाणे बलशाली होणे, आपल्या स्त्रैण समाजात पुन्हा मर्दानगी जगविणे, हे त्यांना महत्त्वाचे वाटले. संघात स्त्रियांना स्थान नसणे, राष्ट्र सेविका समिती किंवा दुर्गा वाहिनीची भूमिका संघ परिवारातील अन्य संघटनांच्या तुलनेत दुय्यम असणे, संघाचा राम ‘सीतापतिं सुंदरम्, करुणार्णव, गुणनिधि’ नसून सीतेशिवायचा, आक्रमक, स्टीरॉईड्सभक्षी वाटावा इतका बलदंड असा असणे, ह्यामागील कारणमीमांसा अशी आहे.
बाहुबलावर अतिरिक्त विश्वास, तसेच ‘हतवीर्य’ होण्याची भीती ह्या दोन गोष्टी हिंदू राष्ट्रवाद व त्याचा वाहक रा. स्व. संघ ह्यांची व्यवच्छेदक लक्षणे आहेत. सामर्थ्य म्हणजे काय, पुरुषार्थ काय आहे, ह्याबद्दल भारतीय तत्त्वपरंपरेत बरेच चिंतन केले गेले आहे. हिंदूदर्शनांनीही ह्या प्रश्नांचा सखोल विचार केला आहे. पण गम्मत अशी की त्यापैकी कोणीही बाहुबल, म्हणजेच व्यापक अर्थाने शस्त्रबलाला महत्त्व दिले नाही. तिथे सारा भर आहे तो मनोबलावर, मनाच्या कुरुक्षेत्रावर रंगणाऱ्या षड्रिपूंविरुद्धच्या सामन्यावर. दुसरीकडे संघाचा भर मात्र नेहमीच शक्तिसंपादनावर राहिला आहे. आजही भारत मानवी विकास निर्देशांकाच्या बाबतीत तळाचे स्थान गाठण्यात मागास आफ्रिकन देशांशी स्पर्धा करीत असताना, संघ परिवार व मोदी सरकार मात्र भारताला सुपर पॉवर बनविण्याच्या गोष्टी करतात; ह्यावरून त्यांची बलाची व्याख्या लक्षात येते.
हिंदू धर्म विरुद्ध हिंदुत्व
हे शीर्षक पाहून वाचक बुचकळ्यात पडतील. हिंदू तत्त्वज्ञान व संघप्रणीत हिंदुत्व ह्या मुळात वेगळ्या बाबी आहेत की काय?
आपण शांतपणे विचार केला तर आपल्या ध्यानात येईल की ह्या केवळ भिन्नच नव्हेत, तर परस्परविरोधी संकल्पना आहेत. म्हणजे संघाला खऱ्या हिंदुधर्माचे पुनरुत्थान करावयाचे नाही, तर त्या नावाखाली वेगळ्याच धर्माला जन्म द्यायचा आहे, ज्याचा आत्मा हिंदू धर्माच्या प्राणतत्त्वाशी पूर्णतः विसंगत आहे, अशा धर्माला. मी वाचकांना आवाहन करतो, की त्यांनी माझ्या किंवा कोणत्याही लहानमोठ्या माणसाच्या मांडणीवर विश्वास ठेवू नये. त्यांचे त्यांनीच पडताळून पहावे की हिंदुधर्माचा गाभा काय आहे, म्हणजे हिंदुत्व व हिंदुधर्म ह्यातील साम्य-फरक त्यांच्याच ध्यानात येईल.
हिंदू हा मुळात धर्म नव्हताच, हे आपण पूर्वीच पहिले. पण शेकडो वर्षांपासून भारतात अस्तित्वात असलेल्या ह्या विविध जाती-जमाती-पंथांच्या कडबोळ्याला काहीतरी नाव द्यायचे, म्हणून त्याला ‘हिंदू’ म्हटले गेले. त्याची व्याख्या करणे खूप कठीण आहे. त्यात शेकडो देव-देवता-अवतार- पूजा पद्धती. ढीगभर तत्त्वज्ञाने, तीही परस्परविरोधी. समान बाब एकच– श्रम व श्रमिकांचे विभाजन करणारी जातिव्यवस्था. अशा धर्माचे थोडक्यात वर्णन करायचे तर त्यासाठी भालचंद्र नेमाडे ह्यांचे शब्द उसने घ्यावे लागतील- “हिंदू धर्म- एक समृद्ध अडगळ.”
त्यात फेकून द्यावे असे बरेच काही आहे, पण कशाचाही त्याग न करता, येणाऱ्या प्रत्येकाला सामावून घेत पुढे चाललेल्या प्रवाहाचे नाव आहे हिंदुधर्म. सर्वसमावेशकत्व हे त्याचे मर्मस्थान व तेच त्याचे शक्तिस्थानही. त्यामुळे त्यात द्वैतवादी आहेत, तसेच अद्वैतीही; वेद मानणारे आहेत, तसेच वेदांतसमर्थकही. त्यापलिकडे जाऊन देव आहे की नाही ह्याविषयी साशंक असलेले अज्ञेयवादी व ईश्वराची संकल्पनाच नाकारणारे जडवादी ह्या सर्वांना त्यात स्थान आहे. असा हा हिंदुधर्म गेली अनेक शतके, अनेक आक्रमणे पचवूनही टिकून राहिला, ह्याचे श्रेय त्याच्या ह्या लवचिकपणाला आहे. कारण ग्रीक, शक, कुशाण, हूण, मोगल, इंग्रज ह्या साऱ्यांना येथील रणभूमीवर यश मिळाले, येथे तळ ठोकता आला. पण कोणालाच ह्या आकारहीन धर्माला नष्ट करता आले नाही. हा धर्म केवळ टिकून राहिला नाही, तर स्थलकालपरिस्थितीनुसार बदलता गेला. हे बदल सहजासहजी झाले नाहीत, होत नाहीत. ज्ञानेश्वर, तुकाराम, मीरा ह्यांच्यापासून ते फुले,आगरकर, आंबेडकर व थेट दाभोलकर ह्यांना काय सहन करावे लागले ह्यावरून माझे म्हणणे स्पष्ट होईल.पण मुद्दा आहे तो हिंदुधर्माचे व्यवच्छेदक लक्षण असलेल्या सर्वसमावेशकतेचा. ईश्वर किंवा प्रेषित ह्यांचे आदेश पालन करण्याचे बंधन नसण्याचा. हिंदू राष्ट्रवाद्यांना सुरुवातीपासून खटकते ती नेमकी हीच बाब. कारण त्यांच्या तथाकथित धर्मप्रेमामागे दडलाय तो स्वतःच्या धर्माबद्दल वाटणारा न्यूनगंड. त्यांचे इंग्रजांशी असलेले नाते विरोधभक्तीचे होते. त्यांना मनातून इंग्रज (ख्रिश्चन) परंपरा, सभ्यता ह्यांचे आकर्षण होते. आपण ‘त्यांच्यासारखे’ बलवान, पुरुषी व्हायला हवे, म्हणजे आपण मुसलमानांना ‘पुरून उरू’, असे त्यांना वाटत आले आहे. कारण सरतेशेवटी, त्यांच्यासमोर प्रतिमान आहे ते मुस्लिम, ख्रिश्चन ह्या एकेश्वरी पंथांचे. एकाच देवाला पुजणारा, ठरलेल्या दिवशी देवळात जाऊन ठराविक पद्धतीने उपासना करणारा पंथ हा त्यांचा आदर्श आहे. त्यातही मुस्लिमांचा कडवेपणा व ख्रिश्चन चर्चची चिरेबंदी रचना ह्यांचे तर त्यांना विशेष आकर्षण आहे. म्हणून संघाने आधी स्वयंसेवकांना युरोपमधील अर्धसैनिकी दलाचा खाकी हाफपँट-शर्टचा गणवेश दिला, त्यांना धोतर किंवा लुंगी नेसायला लावली नाही. ‘एक धर्म, एक ध्वज, एक गणवेश, एक भाषा’ अशा एकजिनसीपणाचे संघाला अतीव आकर्षण आहे. एकचालकानुवर्तित्व हाही त्याच भावनेचा आविष्कार. हिंदूमहासभा आणि रा. स्व. सं. ह्या दोन्ही संघटनांचे जन्मस्थळ महाराष्ट्र असले तरी हिंदू राष्ट्रवादाच्या पहिल्या पुरस्कर्त्यांमध्ये उत्तर भारतीय व्यक्ती-संघटना मोठ्या प्रमाणावर होत्या. म्हणूनच ‘हिंदी-हिंदू-हिंदुस्थान’ हे संघाचे सुरुवातीपासून घोषवाक्य राहिले आहे. हिंदी म्हणजे संस्कृताधिष्ठित हिंदी; उर्दूच्या संसर्गाने ‘विटाळलेली’ हिंदुस्तानी नव्हे, हे आपण लक्षात घेतले पाहिजे.


संघाचा अजेंडा स्पष्ट

आजच्या घडीला भारतात सुस्पष्ट अजेंडा – कार्यक्रमपत्रिका – असणारी एकमेव राजकीय शक्ती संघपरिवार हीच आहे. २०१४च्या मोदीविजयामागे मोदींच्या व्यक्तित्वाचे वलय, त्याचे निवडणूक प्रचारात करण्यात आलेले उत्तम मार्केटिंग, कॉंग्रेसची ‘रणछोडदासी’ वृत्ती व त्याविरुद्ध मोदींची आक्रमक शैली अशी अनेक तात्कालिक कारणे असली, तरी गेली ७९ वर्षे संघाच्या असंख्य कार्यकर्त्यांनी निरलसपणे ह्या ‘सोनियाच्या दिवसासाठी’ उपसलेले कष्ट हे त्यामागील महत्त्वाचे कारण आहे, हे आपण विसरून चालणार नाही. ह्यातील बहुतेक काळ संघ हा होता. सत्तेवर असण्याचे लाभ संघ कार्यकर्त्यांना मिळत नव्हते. अशा प्रतिकूल परिस्थितीत वेगाने बदलत्या परिस्थितीत आपल्या धोरणांमध्ये यथायोग्य बदल करत, पण ध्येयाविषयी ठाम राहून संघाने हे मार्गक्रमण केले आहे. ह्या काळात दोन महायुद्धे, देशाचा स्वातंत्र्यलढा, फाळणी, स्वातंत्र्य, चीन-पाकिस्तानसोबतची युद्धे, कम्युनिझमचा अस्त व अमेरिकेची जगावरील वाढती दादागिरी, जागतिकीकरण – अशी कितीतरी महत्वाची स्थित्यंतरे व युगान्तरे घडली. गांधीवाद, समाजवाद, साम्यवाद प्रभावहीन झाले. कॉंग्रेसचा सूर्य अस्ताचलाला टेकला. संघ कालबाह्य झाल्याचा पुकारा अनेकदा झाला, पण संघ ह्या साऱ्या गदारोळात टिकून राहिला, नव्हे झपाट्याने वाढला. संघाने जीवनाच्या किती क्षेत्रांना कवेत घेतले आहे, ह्याच्या खाणाखुणा आता हळूहळू दिसतीलच. पण संघाच्या वाटचालीचा आढावा घेताना एक गोष्ट ध्यानात घेतली पाहिजे. गेल्या ८० वर्षात देशातील बहुतेक सर्व पक्ष, संस्था, संघटना तुटल्या किंवा नष्ट झाल्या; अपवाद फक्त संघ परिवार व त्याच्याशी संलग्न संस्था-संघटनांचा. कॉंग्रेसचे दोन तुकडे आधी इंदिरा गांधीनी केले, त्यानंतर केंद्रीय पातळीवर ती एकसंध दिसत असली, तरी राज्यांच्या पातळीवर तिच्यात अनेकदा फूट पडली. कॉंग्रेस व समाजवादी पक्ष ह्यांच्या इतक्या चिरफळ्या उडाल्या आहेत की त्याचा हिशेब ठेवणे कठीण. आंबेडकरवादाला बरे दिवस आले असले, तरी आंबेडकरवादी भ्रातृघातात कम्युनिस्ट व समाजवाद्यांना सहज मात देतील, अशी परिस्थिती आहे. ह्या पार्श्वभूमीवर संघाचे यश डोळ्यात भरण्यासारखे आहे, ह्यात शंका नाही. संघावर सतत टीका होत होती, त्यातून संघ शिकला व त्याने आपल्या त्रुटी दूर केल्या. पहिली ५०-६० वर्षे शेटजी-भटजींचा पक्ष हीच ओळख असलेल्या संघाने आणीबाणीत खरेच आत्मचिंतन केले व कात टाकली. मंडल आयोगाला विरोध करणाऱ्या संघाने त्यानंतरच्या काळात ओबीसींमध्ये मुळे रुजविली. आंबेडकरांच्या विचारांशी शत्रुत्व असलेल्या संघाने कामापुरते बाबासाहेब आत्मसात केले, गांधी-आंबेडकर द्वंद्वाचा संदर्भ देत ‘दलितांचे खरे शत्रू गांधी’ असे दलितांच्या मनात बिंबविले. एकीकडे दसरा संचालनाचे शक्तिप्रदर्शन, नैसर्गिक आपत्तींच्या वेळी मदतकार्य, तर दुसरीकडे आदिवासी, साहित्य-संस्कृती, विविध व्यावसायिक, ग्राहक इ. मध्ये गाजावाजा न करता पद्धतशीरपणे चालू ठेवलेला आपल्या विचारांचा प्रचार-प्रसार ह्यातून, मुख्य म्हणजे सातत्याने व विचारांवर निष्ठा ठेवून केलेले कार्य, ह्यामुळेच संघाला हे यश मिळाले आहे. एकच प्रचार जाणीवपूर्वक व सातत्याने केल्यास तो लोक कसा आत्मसात करतात, ह्याचे धडे घ्यावे ते संघाकडून. ‘हिंदूंचा हिंदुस्थान’ ह्या त्यांच्या मूलभूत समीकरणातच गडबड असली, तरीही लोकांना त्याबद्दल फारसे प्रश्न पडू नयेत, इतपत देशाची विवेकशीलता बधिर करण्यात संघाला यश आले आहे. ‘वास्तव काय असते हे अनेकदा महत्त्वाचे नसते; लोकांना ते कसे भासते हे महत्त्वाचे’ ह्या प्रमेयावर संघाची श्रद्धा आहे. त्यामुळे भारताच्या फाळणीवर अनेक महत्त्वाचे दस्तऐवज वेळोवेळी प्रकाशित होत असताना व त्यातून तिची ऐतिहासिक अपरिहार्यता व गांधींची विवशता अधोरेखित होत असतानादेखील त्यांची ‘फाळणीचे गुन्हेगार’ अशी प्रतिमा जनमानसात ठसविण्यात संघ यशस्वी झाला आहे. स्वातंत्र्यसंग्रामात कुठेच नसलेला संघ आज स्वातंत्र्यासाठी सशस्त्र क्रांतीचे नेतृत्व केल्याच्या थाटात वावरतो आहे. संघाला मिळालेले हे यश कितपत टिकेल, विकासाचे गाजर दाखवून बहुसंख्य जनतेला विस्थापित व नैसर्गिक संसाधनापासून बेदखल करण्याची काय किंमत चुकवावी लागेल, हे पुढचे प्रश्न झाले. आज तरी संघाचा रथ वेगाने निघाला आहे व रस्त्यात येणारा प्रत्येक अडथळा तोडून तो पुढे जाणार, असेच चित्र आहे. कारण सन १९२५ असो की २०१४, सरकार नेहरू-इंदिरेचे असो, मोरारजी-चन्द्रशेखरांचे असो की वाजपेयी-अडवाणींचे, ‘हिंदूंचा हिंदुस्थान’ निर्मिण्याच्या आपल्या प्रतिज्ञेपासून संघ कधीच ढळला नाही. संघ बदलला, सुधारला, त्याचा भगवा रंग फिका झाला इ. साक्षात्कार इतरांना घडले, ते संघाने घडविले, पण त्यांच्या नजरेसमोर ‘लाल किल्ल्यावर भगवा ध्वज’ हेच ध्येय होते. आजही त्या ध्येयापासून किंवा अखंड हिंदुस्थानच्या स्वप्नापासून संघ विचलित झालेला नाही. मात्र ते स्वप्न (बहुसंख्यांसाठी दुःस्वप्न) अजून दूर आहे. कारण ह्या देशातील संस्कृती इतकी बहुविध, संमिश्र व समृद्ध आहे, की तिच्या ताण्याबाण्यातून हिंदू व मुस्लिम धागे वेगळे काढणे म्हणजे प्रयागच्या संगमानंतर गंगा-यमुनेचे प्रवाह पुन्हा वेगवेगळे करणेच होय. हे अनैतिहासिक, निसर्गविरोधी काम करण्यासाठी संघ परिवार कोणत्या क्लृप्त्या लढवीत आहे व ते निष्फळ ठरविण्यासाठी काय करता येईल ह्याचा आढावा पुढच्या व अंतिम लेखांकात घेऊ.

लेखांक तिसरा
(मागील दोन लेखांत आपण पाहिले की गेल्या शंभर वर्षात देशातील सर्व पुरोगामी संस्था-संघटना ह्यांची शकले झाली, पण संघपरिवार मात्र चिरेबंद राहिला. पुरोगामी आपल्या चुकांतून काहीच शिकले नाहीत, पण ‘हिंदूंचा हिंदुस्तान’ ह्या कालबाह्य व अनैसर्गिक संकल्पनेशी निष्ठा कायम ठेवूनही संघ झपाट्याने बदलला. त्याने शेटजी-भटजींचा पक्ष ही आपली प्रतिमा जाणीवपूर्वक बदलली. आजच्या घडीला सुस्पष्ट कार्यक्रम व प्राधान्यक्रम असणारी देशातील एकमेव राजकीय शक्ती रा. स्व. सं. हीच आहे. संघाचा हा अश्वमेधाचा घोडा रोखणे हे देशाच्या बहुविधतेसाठी, तसेच समता-स्वातंत्र्य-बंधुतेवर निष्ठा असणाऱ्या सर्वांसाठी आवश्यक आहे. हिंदुत्वाचा खरा धोका पुरोगाम्यांना किंवा अल्पसंख्याकांना नसून हिंदू धर्म मानणाऱ्याना आहे. कारण हिंदू धर्म व हिंदुत्व ह्या परस्परविरोधी संकल्पना आहेत. सर्वसमावेशकत्व, कशालाही न नाकारणारे अघळपघळ मोकळेपण हे हिंदुधर्माचे स्वभाववैशिष्ट्य आहे, तर हिंदुत्वाला त्याचे वावडे आहे. मुळात एकाच देवाला पुजणारा, ठरलेल्या दिवशी देवळात जाऊन ठराविक पद्धतीने उपासना करणारा एकेश्वरी पंथ हा हिंदुत्ववाद्यांचा आदर्श आहे. मुस्लिमांचे कडवेपण व चर्चची चिरेबंदी रचना ह्यांचे त्यांना अतीव आकर्षण आहे. त्यामुळे हिंदुत्वाचा उदय म्हणजे हिंदू धर्माच्या प्राणतत्वाचा नाश.)
भारत हे मुळात एक राष्ट्र नसून अनेकविध राष्ट्रांचा समूह आहे. शेकडो भाषा, हजारो जाती, विविध धर्म, आचार-विचार-विहार-अर्चना ह्यांविषयी कमालीचे विविधत्व असणारा हा खंडप्राय प्रदेश. पण हे केवळ विसंगतीचे गाठोडे नाही. बंदुकीच्या धाकाने किंवा बाजारपेठेच्या आमिषाने एकत्र राहू शकतील असे हे घटक नाहीत. ह्या सर्वांना शेकडो वर्षे बांधून ठेवणारे चिवट-जीवट असे काही सूत्र आहे. हा खंडप्राय देश हा जगाच्या इतिहासातील सहजीवनाचा एक अभूतपूर्व असा प्रयोग आहे. इतकी विविधता अबाधित ठेवून जर हा देश गुण्यागोविंदाने नांदू शकला, तर जगात शांततामय सहजीवनाला भवितव्य आहे.
ह्या देशाला स्वातंत्र्याची स्वप्ने पडू लागली तेव्हा इथल्या द्रष्ट्या नेत्यांना ही जाणीव झाली होती की येथील जात-धर्म-स्त्री-पुरुष भेद व वर्गभेद ह्यांचे ताणेबाणे परस्परांत गुंफलेले आहेत. त्यामुळे ह्यातील कोणत्याही प्रश्नांची सोडवणूक सुट्या पद्धतीने करता येणार नाही. ह्या भेदातील विषमता व शोषण नष्ट करायचे, पण बहुविधता टिकवायची, जगण्याच्या प्रश्नांना हात घालायचा, पण अस्मितांकडे दुर्लक्ष करायचे नाही, असा हा अवघड मामला आहे. धर्म-जात-भाषा ह्यांच्या अस्मितांनी उग्र रूप धारण केले तर माणसे सारे काही विसरून मरण्या-मारण्याला तयार होतात, हे त्यांनी अनुभवाने जाणले होते.म्हणून बहुसंख्यांकांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या गांधींसारख्या नेत्याने जगाच्या इतिहासात एक वेगळाच मार्ग चोखाळला. त्यांचा मार्ग विग्रहाचा नसून समन्वयाचा होता. शोषितांच्या दुःखाशी नाते जोडत शोषकांनी स्वतःला बदलावे, अधिक समंजस, संवेदनशील बनावे हा तो मार्ग होता. त्यासाठी शोषक वर्गातील शहाण्या मंडळींना त्यांनी प्रायश्चित्ताच्या भूमिकेत नेले. मानवी विष्ठेच्या नरकात आयुष्य घालविणे किंवा कातडी कमावून इतरांना चामड्याच्या वस्तू वापरता याव्या म्हणून त्या चामड्याच्या वासासोबत जीवन कंठणे काय असते, हे समजण्यासाठी उच्चवर्णीयांनी भंग्याचे किंवा चांभाराचे आयुष्य जगावे अशी प्रेरणा त्यांनी दिली. जातियुद्धाचा नारा न देता शांतपणे देशातील सर्व स्तरांतील नेतृत्व त्यांनी ब्राह्मणांकडून बहुजन समाजाकडे, आजच्या शब्दात दलितबहुजनांच्याकडे – हस्तांतरित केले.पुरुषसत्तेविरुद्ध एल्गार न पुकारता त्यांनी देशातील लाखो स्त्रियांना स्वातंत्र्यलढ्याच्या संग्रामात माजघरातून थेट रस्त्यावर उतरविले. ‘हिंदी-हिंदू–हिंदुस्तान’चा आग्रह न धरता मूठभरांच्या संस्कृतनिष्ठ हिंदीऐवजी त्यांनी सर्वाना समजेल, आपलीशी वाटेल अशी ‘हिंदुस्तानी’ घडविण्याचा, वापरण्याचा आग्रह धरला. ही भाषादेखील दाक्षिणात्यांवर न लादता ती त्यांना आपलीशी वाटावी म्हणून हिंदीएतर राज्यात राष्ट्रभाषाप्रचाराचे व्रत घेवून हिंदीच्या स्वयंसेवकांना पाठविले. हा देश केवळ हिंदूंचा नाही,येथील संस्कृती केवळ त्यांची नाही, हे हिंदूंनी समजून घ्यावे ह्याचा आग्रह धरला व अखेरीस त्यासाठी आपल्या प्राणांची आहुती दिली. कामगार संघटना बांधत असतानाही भांडवलदार वर्गाला‘शहाणे’ करण्यावर त्यांनी भर दिला. येथील बहुविधता टिकावी, नव्हे, भारतरूपी सहस्रदलकमळाची एकूण एक पाकळी विकसित व्हावी, म्हणून त्यांनी स्वतंत्र भारताच्या रचनेत दोन गोष्टींचा आग्रह धरला – एक, केंद्रीय सत्ता बलिष्ठ करण्यावर भर न देता मजबूत राज्यांचा समूह – संघराज्य – म्हणून हा देश विकसित व्हावा आणि दोन, प्रत्येक राज्याचा आधार (धर्म वा जाति नसून) भाषा हा असावा.
भारतातील गंगा-जमनी संस्कृती
स्वतःला जहाल क्रांतिकारी समजणाऱ्या प्रत्येक विचारधारेचे पाईक एक तर गांधी काय करतात हे समजू शकले नाहीत, किंवा गांधींचा मार्ग हा क्रांतीची धार बोथट करण्याचा मार्ग आहे असे त्यांनी मानले. गांधी हे कार्ल मार्क्स किंवा डॉ बाबासाहेब आंबेडकरांसारखे धारदार मांडणी करणारे विचारक नव्हते. त्यांचा भर सर्वांना समजून घेत, समजावून सांगत एकत्र आणण्याचा होता. केवळ परकीय सत्तेविरुद्ध लढण्यासाठी नव्हे, तर नंतर एक स्वतंत्र राष्ट्र म्हणून नव्या आव्हानांना सामोरे जाताना सर्वांना एकत्र कसे राखता येईल व जात-धर्म-भाषा इ. विविध अस्मिता एकमेकांच्या उरावर न बसता परस्परपूरक कशा ठरतील ह्याचा विचार करूनच त्यांनी आपली ही रणनीती ठरवली होती. बारकाईने विचार केला तर ती ह्या देशाच्या ‘स्व’भावाशी सुसंगत होती; आपण ज्याला आज हिंदू धर्म म्हणतो, त्याच्या ‘सर्वसमावेशकते’च्या ‘निजधर्मा’शीही तिचे जवळचे नाते होते. कारण वर उल्लेख केल्याप्रमाणे गेली कित्येक शतके ह्या देशातील विविध अंतर्विरोध व विविधता ह्यांना सामावून घेणे येथील समाजव्यवस्थेला शक्य झाले, ह्याचे कारण येथील जनमानसाच्या नसांतून वाहत असणारी, येथील ग्रामकेंद्रित व्यवस्थेतून स्फुरलेली, सातत्याने नव्या-जुन्याची सांगड घालणारी, बहुपेडी, गंगा-जमनी संस्कृती. इथल्या काशी-विश्वेश्वराला रोज जाग येते ती कुणा बिस्मिल्ला खाँच्या शहनाई वादनाने. स्वतःला हिंदुहृदयसम्राट् म्हणविणाऱ्यांच्या नावातील ‘साहेब’चे मूळ पर्शियन ह्या म्लेंच्छ भाषेत असते व ज्या भाषेच्या अस्मितेच्या नावाने ते मतांचा जोगवा मागतात त्यातील निम्म्याहून जास्त शब्द अरबी, तुर्की, पर्शियन सारख्या ‘परकीय’ भाषांतून आलेले असतात. येथील कट्टर हिंदुधर्मीयांच्या ‘उपवासा’ला चालणारे बहुतेक पदार्थ – उदा. बटाटा, साबुदाणा, डाळिंब-सफरचंदासारखी बहुतेक फळे, चहा, कॉफीसारखी बहुसंख्य पेये, सुका मेवा – परकीय भूमीतून अलिकडच्या काळात भारतात आलेली असतात व ती त्यांनी आपली मानलेली असतात. इतकी ही सम्मिलित संस्कृती ह्या देशाच्या रक्तात मिसळलेली आहे.
भारताला स्वातंत्र्य मिळाले आणि एका नव्या राष्ट्राचा जन्म झाला, ही एक अभूतपूर्व घटना होती. त्यापूर्वी हा खंडप्राय देश एक राष्ट्र म्हणून कधी उभा राहिला नव्हता. स्वातंत्र्यलढ्याच्या सर्व प्रक्रियेत आपण राष्ट्र आहोत म्हणजे नेमके काय आहोत, ‘आपण’ म्हणजे कोण, आपल्याला स्वातंत्र्य कोणापासून व कशापासून मिळवायचे आहे अशा अनेक प्रश्नांची साधकबाधक चर्चा झाली. धर्माधिष्ठित राष्ट्रवादाचे पुरस्कर्ते – हिंदू व मुस्लिम राष्ट्रवादी – स्वातंत्र्यलढयापासून दूर राहिले. मार्ग सशस्त्र क्रांतीचा असो की अहिंसात्मक लढ्याचा, रा. स्व. संघ, हिंदू महासभा किंवा मुस्लिम लीग हे सर्व त्यात कोठेही नव्हते. अपवाद करायचा झाल्यास सावरकरांच्या पूर्वायुष्याचा करता येईल. पण काळ्या पाण्याच्या शिक्षेवरून परतल्यावर तेही स्वातंत्र्यलढ्यापासून दूरच राहिले. स्वातंत्र्यसंग्रामात सिंहाचा वाटा अर्थातच गांधीजी व कॉंग्रेस पक्षाचा होता. पण समाजवादी व साम्यवादी प्रेरणा घेऊन कार्यरत असणाऱ्या कार्यकर्त्यांचे ह्या लढ्यातील योगदानही महत्त्वाचे होते. स्वतंत्र भारत कसा असावा ह्याच्या चिंतनात गांधीवादी, समाजवादी-साम्यवादी व आंबेडकरवादी ह्या सर्व विचारप्रवाहांचे मोठे योगदान होते. त्यांचे आपसातील मतभेद कितीही गंभीर असले तरी स्वातंत्र्य-समता-बंधुता ह्या त्रयीवर आधारलेल्या राष्ट्राची निर्मिती ह्या मुद्द्यावर त्यांच्यात एकमत होते. अन्य धर्मीयांच्या द्वेषावर आधारित ‘स्व’ची संकल्पना व त्या आधारावर आखलेला राष्ट्रवाद ह्या सर्वांना अमान्य होता. इ.स. १९४०-४५पर्यन्त हा पुरोगामी प्रवाह इतका बलशाली होता की हिंदू व मुस्लिम राष्ट्रवादाला येथे पाय रोवणे कठीण झाले होते. पण स्वातंत्र्य जवळ आले आणि इंग्रजांनी जाणीवपूर्वक पोसलेल्या हिंदू-मुस्लिम दुहीला सुगीचे दिवस आले. द्विराष्ट्रवादाचा सिद्धांत आधी मांडला सावरकरांनी. त्याचा फायदा मिळाला ‘हिंदू आपल्याला सुखाने जगू देणार नाही’ असा बुद्धिभेद करणाऱ्या मुस्लीम लीगला. सांप्रदायिक दंगे इतके अनावर झाले की त्यापेक्षा फाळणी परवडली, असे म्हणून देशाच्या नेत्यांनी पाकिस्तान निर्मितीला मान्यता दिली. आज फाळणीच्या नावाने गांधी व कॉंग्रेसच्या नावाने खडे फोडणाऱ्या वीरांनी त्याविरोधात कोणतेही आंदोलन उभारल्याचा पुरावा नाही.
संघवर्धनाचा अन्वयार्थ
खरे तर बांगलादेशच्या निर्मितीनंतर धर्माधारित राष्ट्रवादाचा सिद्धांत मोडीत निघाला. वंशशुद्धी व एकारलेल्या राष्ट्रवादाच्या कलेवरांचे हिटलर व मुसोलिनीबरोबर दफन झाले, पण त्यांना गुरुस्थानी मानणारी व स्थापनेनंतर ७-८ दशके निष्प्रभ ठरलेली रा. स्व. संघासारखी संघटना आज केंद्रात व बहुसंख्य राज्यात सत्तेवर आहे व ह्या देशातील सर्व जाती-जमाती-वर्गात तिच्या पाठीराख्यांची संख्या वेगाने वाढते आहे, ह्याचा अन्वयार्थ आपण कसा लावणार?
ह्याच्या अपश्रेयाचा सर्वात मोठा मानकरी (?)आहे कॉग्रेस पक्ष. खरे तर १९३०च्या दशकातील प्रांतिक सरकारांच्या अनुभवावरून गांधीजी सावध झाले होते व स्वातंत्र्यानंतर सत्ता मिळाल्यावर कॉंग्रेसवाले किती भ्रष्ट व निगरगट्ट होऊ शकतात ह्याचा त्यांना अंदाज आला होता. त्यामुळेच त्यांनी स्वातंत्र्यानंतर कॉंग्रेस पक्ष खालसा करण्याची सूचना केली होती. पण फाळणीने डागाळलेले स्वातंत्र्य मिळाल्यावर लागलेल्या दंग्यांची आग विझविण्यात त्यांची शक्ती खर्च पडली व त्यापाठोपाठ हिंदू राष्ट्रवादाच्या पुरस्कर्त्यांनी त्यांची निर्घृण हत्या केली. कॉंग्रेसने त्यांच्या मृत्यूचे भरपूर भांडवल केले. त्यांच्या नावावर सत्तेचा यथेच्छ उपभोगही घेतला. त्यांच्या नावाची माळ जपत त्यांच्या तत्त्वांना पायदळी तुडविण्याचे कार्य ह्या पक्षाने इमानेइतबारे केले. जनता दलाचा प्रयोग फसल्यावर जितकी काही बिगर कॉंग्रेसी सरकारे केंद्रात किंवा राज्यात आली, ती एक तर अंतर्गत वादांमुळे कोसळली किंवा कॉंग्रेसी संस्कृतीची सारी वैशिष्ट्ये, उदा. घराणेशाही, भ्रष्टाचार, दिल्लीश्वरांचेलांगूलचालन, लोकांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष व दरबारी राजकारणावर भर- त्यांनी आत्मसात केली. ठोस पर्यायांच्या अभावामुळे तर कॉंग्रेसची मस्ती अधिकच वाढली. गरीब, दलित, अल्पसंख्य, पुरोगामी इ. मतदार आपल्याशिवाय जाणार कुठे? अशा गुर्मीत वागणाऱ्या कॉंग्रेसला पर्याय मिळताच आता मतदारांनी धडा शिकवला आहे.
आपला खरा वारसा टाकून देऊन देशाला संघ परिवाराच्या कृतक् अस्मितांच्या गर्तेत ढकलण्याच्या अपश्रेयाचे दुसरे मानकरी (?) आहेत तथाकथित गांधीवादी. त्यांतही सरकारी गांधीवादी, संधिसाधू गांधीवादी, संस्थाबद्ध गांधीवादी असे पोटभेद आहेत. पण ह्यासर्वांनी मिळून जाणतेपणी किंवा अजाणता एक गोष्ट केली, ती म्हणजे खरा गांधी लोकांपासून दडवून ठेवला. एक गुळगुळीत, निरुपद्रवी, त्याच्या तीन माकडांप्रमाणे जगातील साऱ्या असत्य-विद्रूप-अमंगल गोष्टींकडे दुर्लक्ष करून भजन करणारा गांधी त्यांनी लोकांपुढे ठेवला. गांधींची प्रतीके- मग ती खादी असो, ग्रामसफाई असो की ग्रामोद्योग – त्यामागील राजकीय आशय काढून घेऊन त्यांची कलेवरे गांधीभक्तांनी सजवली. त्यामुळे राष्ट्रपित्याला आपली मानणारी मुलेच ह्या देशात उरली नाहीत. हिंदू-मुस्लिम ऐक्यासाठी गांधीनी प्राण वेचले, पण आज कोणाही मुस्लिम नेत्याला त्यांच्याविषयी कृतज्ञता वाटत नाही. बहुजनसमाजाला सत्तेकडे नेणाऱ्या मार्गाचा आराखडा त्यांनी बनवला. ग्रामोद्योगाला चालना देणे म्हणजे सर्व उत्पादक जातींना उत्पादन व्यवस्थेत न्याय्य वाटा मिळवून देणे; कॉंग्रेस संघटनेचे लोकशाहीकरण म्हणजे दलित-आदिवासी-बहुजनांना राजकीय सत्तेत सहभाग व नेतृत्व देणे; अशी त्यांची भूमिका होती.मात्र बहुजनांना गांधींबद्दल कसलेच प्रेम नाही. गांधींच्या अस्पृश्यताविरोधी लढ्याच्या अनेक मर्यादा असतील, पण सवर्णांच्या जाणीवजागृतीचा त्यांचा प्रयत्न हा बाबासाहेब आंबेडकरांच्या शोषितांच्या assertionच्या लढ्याला पूरक होता, हे नाकारून चालणार नाही. मात्र आज दलितांच्या मते ब्राह्मणवादाचे प्रतीक संघ परिवार नसून गांधी आहे. लाखो स्त्रियांना देशाच्या स्वातंत्र्याच्या राजकीय लढ्यात सामील करणे, अहिंसा, सेवावृत्ती व संवेदनशीलता ह्या ‘बायकी’ गणल्या जाणाऱ्या गुणविशेषांना राजकीय लढ्यात महत्वाचे स्थान देणे हे गांधींचे विशेष योगदान. पण त्याची बूज स्त्री-अभ्यासकांनी किंवा स्त्री-आंदोलनाने ठेवली नाही. ह्याचे कारण गांधीनी ह्या समाज घटकांसाठी काय केले ह्याचे विश्लेषण गांधीवाद्यांनी त्यांच्यासमोर ठेवले नाही. रचनात्मक काम करणाऱ्या अनेकांनी त्यासाठी आपली आयुष्ये वेचली, पण त्यांच्या कामाचा सांधा त्यांना बदलत्या समाजजीवनाशी जुळविता आला नाही. एकूण गांधी हा एक आदर्शवादी, कालबाह्य वेडा फकीर होता, असाच निष्कर्ष गेल्या तीन पिढ्यांनी काढला आणि गांधींकडे व त्यांच्या विचारांकडे पाठ फिरवली. ह्यासाठी गांधीवादी प्रामुख्याने जबाबदार आहेत.
परंपरा व पुरोगामित्व

संघविचाराला भारतीय विमर्शाच्या केंद्रस्थानी आणून बसविण्यात सर्वात जास्त हातभार लावला आहे तो स्वतःला पुरोगामी म्हणविणाऱ्या आक्रमक वाचावीरांनी.सांसदीय राजकारणातील आपली नेमकी भूमिका त्यांना कधीच सापडली नाही. कॉंग्रेसला विटलेल्या जनतेने अनेकदा त्यांना सत्ता दिली, पण ती टिकविणे त्यांना जमले नाही. मिळालेली सत्ता पूर्ण काळ भोगणेही त्यांना शक्य झाले नाही. त्याना विग्रह-वजाबाकीचे राजकारण समजले,पण बेरजेचे राजकारण कधी उमजले नाही.त्यातील बहुतेकांनी गांधी समजून न घेताच त्याच्यावर फुली मारली. कारण गांधी समजून घेणे म्हणजे ह्या देशाची गुंतागुंतीची परंपरा समजून घेणे. पुरोगाम्यांना वारसा लाभला एकोणिसाव्या-विसाव्या शतकातील सामाजिक सुधारकांचा. आपल्या परंपरेतील त्याज्य काय आहे, हे त्यांना बरोबर माहीत आहे व त्याविरुद्धचा त्यांचा संतापही रास्त आहे. पण जणू काही आपणच ह्या भरतखंडातील आद्य बंडखोर असा त्यांचा आविर्भाव असतो.परंपरेविरुद्ध विद्रोहाचीही एक परंपरा असते, भारतासारख्या प्राचीन देशात तर ती अतिशय जोरकस असते व ह्या विद्रोहाच्या परंपरेशी नाते जुळविल्यानेच आपला विद्रोह समाजात स्वीकारला जाऊ शकतो, हे भान त्यांना राहिले नाही व ह्याचा सर्वात जास्त लाभ संघ परिवाराला मिळाला. परंपरेविषयी अभिमान ही प्रत्येक समाजाची दुखरी जागा असते. त्यात अडकून पडून वर्तमानाकडे दुर्लक्ष करू नये, त्यातील त्याज्य भाग उराशी कवटाळू नये, त्यासाठी मूल्यविवेक वापरावा, ह्याचा आग्रह धरताना त्यातील समृद्ध बाबी आमच्या आहेत, हे देखील ठामपणे सांगितले, तरच समाजाला तुमच्याविषयी विश्वास वाटतो. आपल्या परंपरेत योग, आयुर्वेद, प्राचीन दर्शने, शास्त्रीय कला, कैलास-अजिंठा व ताजमहाल-लाल किल्ल्यासारखे स्थापत्याचे आविष्कार, लोककला अश्या अनेक अभिमानास्पद बाबी आहेत.दुर्दैव असे की त्या पश्चिमेत प्रतिष्ठा पावल्या की मगच आपल्याला त्यांचे महत्त्व वाटते.ह्या देशात प्राचीन काळी खरोखर समृद्धी होती. ज्ञान-तंत्रज्ञान विकसित होते. कला-मानव्यशास्त्रेदेखील प्रगत होती. बौद्ध काळात तर आपली वैचारिक समृद्धी चरमावास्थेला पोहचली होती. तेव्हापासून अठराव्या-एकोणिसाव्या शतकापर्यंत परकीयांनी लुटून नेण्यासारखे आपल्याकडे खूप काही होते, हा इतिहास आहे.त्याचा अभिमान बाळगत असतानाच आपण सातत्याने पराजित का होत राहिलो, आपली ज्ञान-तंत्रज्ञानाची परंपरा लुप्त केव्हा व का झाली, मानवतेला काळिमा लावणाऱ्या रूढी-परंपरा आपल्या रक्तात कशा रुजल्या ह्याचा सातत्याने शोध घेणे ही आपली समाज म्हणून, राष्ट्र म्हणून जबाबदारी आहे. होते असे की संघ परिवार सोन्याचा धूर, अनश्व रथ, पुष्पक विमान अश्या फँटसीत रमतो व जे काही त्याज्य आहे, ते परकीयांकडून आले, असे म्हणून जबाबदारी झटकतो. शंबूक, एकलव्य,चिलया बाळ व सीतात्याग ह्यांचे काय करावे हे त्यांना कळत नाही. ह्याविरुद्ध, आमचे पुरोगामी, परंपरा म्हणजे जणू बाजारगप्पा आहेत, असे मानून त्यांच्याकडे पाठ फिरवितात. धर्म ह्या गोष्टीची तर त्यांना इतकी अॅलर्जी आहे की खुद्द कार्ल मार्क्सच्या त्या सुप्रसिद्ध वचनाचा पूर्वार्ध ते सोयीस्कररीत्या विसरून जातात. मार्क्स म्हणाला होता- “धार्मिक वेदना ही एकाच वेळी खऱ्याखुऱ्या वेदनेचा आविष्कार व खऱ्या वेदनेविरुद्ध उठविलेला आवाज आहे. धर्म हा दबल्यापिचलेल्यांचा हुंदका, बेदर्द दुनियेचे हृदय, तसेच आत्मा गमाविलेल्या व्यवस्थेचा आत्मा आहे. ती जनसामान्यांची अफू आहे.” ह्यातील‘अफू’वरच लक्ष केंद्रित केल्यामुळे धर्माच्या विधायक भूमिकेकडे दुर्लक्ष होते. सर्वसामान्य माणसाला दुःखात, संकटात आधार वाटू शकेल अशा प्रति-ईश्वराची निर्मिती न करताच धर्म व ईश्वराला ‘रिटायर’ करणे शक्य नाही, हे न कळल्यामुळे पुरोगामी ह्या देशात कालबाह्य होऊ लागले आहेत. त्यामुळे हा देश ह्यातील सर्व परंपरांसह त्यांनी संघाला आंदण दिला आहे की काय असे वाटण्यासारखी परिस्थिती त्यांनीच निर्माण करून ठेवली आहे. विवेकानंदांसारखा भाकरीचे तत्त्वज्ञान मांडणारा व येशू ख्रिस्त-पैगंबरांचे माहात्म्य समर्थपणे मांडणारा आधुनिक संतही त्यांनी न वाचताच नाकारला. मग संघ परिवाराने त्याला आपल्या कवेत घेऊन हिंदुत्वाचा प्रणेता केले, ह्यात आश्चर्य ते कोणते?
गेल्या २३ वर्षात आपण स्वीकारलेल्या खाजगीकरण-उदारीकरण-जागतिकीकरण (खा-उ-जा)चे जीवनाच्या सर्व क्षेत्रांत अतिशय खोल व दूरगामी परिणाम झाले आहेत. भल्याबुऱ्या कोणत्याही मार्गाने पैसा मिळविणे हेच सर्वात मोठे मूल्य मानले जाऊ लागले आहे. सांस्कृतिक सपाटीकरण व एकजिनसीकरणाची प्रक्रिया जगभरात वेगाने सुरू झाली आहे. स्थानिक भाषा, संस्कृती कोंडीत सापडल्या आहेत. काही तर नामशेषही झाल्या आहेत. माणसे कमालीची असुरक्षित बनली की मग ती अस्मितेच्या भोवऱ्यात सापडतात.जात-धर्म- कालबाह्य रूढी-परंपरा ह्यात आपले स्वत्व, ओळख व निवारा शोधू लागतात.जगभरात धार्मिक पुनरुज्जीवनाची लाट आली, तशीच ती भारतातही दाखल झाली. त्यामुळे धर्माचे बाजारीकरण झाले. आसारामबापूसारखे ‘संत’ पूजनीय बनले. ह्यामागील जनसामान्यांची मानसिकता लक्षात न घेता धर्मावरच हल्ला चढविल्यामुळे आज सर्वसामान्य जन हे पुरोगामी संघटना-चळवळींपासून दुरावले आहेत. त्यांना संघविचार मनापासून पटतो असे नाही, पण पुरोगाम्यांची वृत्ती त्यांना संघ-विचाराकडे लोटते, हे आपण विसरून चालणार नाही.
कॉंग्रेसचे नाकर्तेपण, डाव्यांची नेहमीची संभ्रमावस्था व जागतिकीकरणामुळे अस्मितेच्या राजकारणाला आलेले उधाण ह्याचा पुरेपूर फायदा संघ परिवाराने उठवला. त्याचबरोबर जवळजवळ सहा-सात दशके त्यांनी सत्तेपासून दूर राहून उमेदवारी केली, ह्याचे श्रेय त्यांना द्यायलाच हवे.‘रा. स्व. संघ हा तरुणाईचे लोणचे घालण्याचा कारखाना आहे’ असे एक विचारवंत म्हणत असत. हे खरे आहे. संघात डोके बंद करण्याची प्रक्रिया अतिशय सफाईने चालवली जाते. त्यामुळे स्वतंत्र विचार करू शकणारी, प्रज्ञावंत मंडळी संघविचाराच्या आसपास फिरकत नाहीत.पण ह्या विचारांशी निष्ठा बाळगून लाखो तरुण-प्रौढ व्यक्तींनी स्वतःला संघाच्या कामात समर्पित केले आहे हे लक्षात ठेवले पाहिजे. लहानपणी घडणारे संस्कार नंतर वज्रलेप बनतात, ह्या साध्या सिद्धांतावर संघाचा पाया रचला गेला. त्याच तत्त्वाने मुलांवर लहानपणीच डोके खुले ठेवण्याचे, प्रश्न विचारण्याचे संस्कार करणे शक्य आहे. राष्ट्र सेवा दलाची निर्मितीही catch them young ह्याच विचाराने झाली होती व त्याने पुरोगामी विचारांना बळदेखील पुरविले होते. आज सेवादल मृतवत् झाले आहे, पण संघ जोरात आहे, कारण तो तिथेच थांबला नाही. जी व्यक्ती जिथे असेल तिथे राहून ती संघविचाराला पूरक काय करू शकेल, ह्याचा बारकाईने विचार संघाने केला आहे. त्यामुळे शाखेबाहेरील लाखो कार्यकर्ते व कोट्यवधी सहानुभूतिदार त्यांना मिळविता आले व विशेष म्हणजे टिकविता आले.माणसे कशी जोडावीत हा एक धडा तरी पुरोगाम्यांनी संघाकडून घेतलाच पाहिजे. कारण त्यांचे स्पेशलायझेशन विचारधारेच्या नावाने माणसे तोडण्यात आहे.
आज संघाजवळ सुस्पष्ट कार्यक्रम आहे,मोदींसारखे धूर्त, मायावी नेतृत्त्व आहे व जनमताचा सावध पाठिंबा आहे. पण तेव्हढ्या आधारावर हिंदुराष्ट्रनिर्मितीच्या ध्येयापर्यंत पोहोचणे शक्य नाही, ह्याचे भानही त्यांना आहे. राजकीयदृष्ट्या अधिक शक्तिशाली पायावर उभे राहिल्यावर आपण ते करूच, हेदेखील संघाला माहित आहे. ह्याविषयी अंधारात आहेत ते पुरोगामी प्रवाह. म्हणूनच दहा तोंडाने बोलणाऱ्या संघाचे कुठले तरी एक वचन ग्राह्य धरून ते भरकटत जातात किंवा संघ/मोदी आता मवाळ झालेत असे मानून गाफील राहतात. पाण्याचे तापमान एकदम वाढवले तर चटके अशक्य होवून लोक त्याबाहेर उड्या मारतात, पण ते हळूहळू वाढविले तर लोकांना त्याची सवय होते हे संघाला नीट माहीत आहे. म्हणूनच मोदी भाषा वरकरणी मवाळ करून गांधींचा सोयीस्कर जप करू लागले आहेत. मोहन भागवतांच्या दसरा प्रवचनात त्यांनी भारताच्या महान विभूतींमध्ये गांधी, विनोबा, जयप्रकाश नारायण ह्यांची नावे घेतली. पण त्याचवेळी संघाने राम मंदिराचा, लव्ह जिहादचा मुद्दा सोडलेला नाही. वेंडी डोनिजरच्या पुस्तकावर घातलेली बंदी, त्यापाठोपाठ गुजरात दंगलीसारख्याअनेक संवेदनशील विषयांवरीलपुस्तकांच्या प्रकाशकांनी घेतलेली माघार, दिनानाथ बात्रांचे ‘शैक्षणिक प्रयोग’, छोट्या छोट्या दंग्यातून सांप्रदायिक वातावरण धुमसत ठेवण्याची संघाची रणनीती ह्या बाबी आपल्याला काय सांगतात? साईबाबांची पूजा करू नका, असा‘फतवा’ निघाला. आता लौकरच सुफी संत, हिंदूंना पूजनीय असणारी पीराची ठिकाणे ह्यांची पाळी येईल. हिंदू-मुस्लिम सामायिक संस्कृतीच्या एकेक प्रतीकावर विचारपूर्वक हल्ला होईल. पूर्वी दिलीपकुमार मुसलमान म्हणून त्याच्या बदनामीचे बरेच प्रयत्न करून झाले. शर्मिला टागोरने एका यवनाशी लग्न केले, म्हणून तिच्यावर व पतौडीवर चिखलफेक करून झाली. आता आंतर-धर्मीय विवाह (म्हणजे अर्थातच हिंदू मुलगी व मुसलमान मुलगा) करणाऱ्या सेलेब्रिटीना लक्ष्य केले जाईल. ‘एक दिवस भारतात हिंदू अल्पसंख्य होतील’, ‘गांधींनी पाकिस्तानला ५५ कोटी दिल्यामुळे त्यांचा ‘वध’ करावा लागला’, ‘मोदी हे जगाच्या पाठीवरचे, किंबहुना मानवी इतिहासातले सर्वात लोकप्रिय नेते आहेत’ – ह्या व अश्या कंड्या आंतरजालावर व सोशल मीडियात वारंवार पिकवल्या जातील.एरव्ही हिंदुराष्ट्रनिर्मितीच्या ध्येयाकडे वाटचाल करताना संघ परिवार एकटा पडला असता. पण आता संघाच्या गाडीला मोदींचे इंजिन जोडले गेले आहे. जागतिकीकरणाची सारी ऊर्जा हिंदुराष्ट्र निर्मितीसाठी वापरण्याची त्यांची रणनीती आहे. भारताची नैसर्गिक संसाधने जर वापरण्यास मिळणार असतील, भारताची बाजारपेठ व कवडीमोलाने मिळणारा बांधीव कामगारवर्ग सहज उपलब्ध होणार असतील, तर अमेरिका भारतातील धर्मनिरपेक्षतेचे, लोकशाहीचे काय होते ह्याची फिकीर करणार नाही, हे त्यांनी हेरले आहे. उलट ज्या मोदींना व्हिसा नाकारला, त्यांना निरंकुश सत्ता मिळावी, ह्यासाठी आपले सामर्थ्य त्यांच्यामागे उभे करण्यास ती मागे-पुढे पाहणार नाही ह्याचीही त्यांना खात्री आहे. म्हणूनच हिंदुराष्ट्रनिर्मितीच्या रस्त्यावरील अडचणी दूर करण्यात संघ परिवार गुंतला असताना खुद्द मोदी आपले लक्ष‘विकासाचा रथ’ सुसाट कसा दौडेल ह्याची काळजी वाहण्यात आपली ऊर्जा खर्च करतील.‘मेक इन इंडिया’च्या नावाखाली आता भारतातील सारी नैसर्गिक संसाधने जल-जंगल-जमीन-खनिजे – बहुराष्ट्रीय कंपन्यांना कवडीमोलाने खुली करून दिली जातील. पर्यावरणाच्या मुद्द्यावरून विकासाचा कोणताही प्रकल्प रोखला जाणार नाही ह्याची यथोचित काळजी विकासपुरुष घेतील. एकात्मिक मानवतावाद व ग्रामीण विकासाचा जप करीतशेतकऱ्याला शेतजमिनीवरून बेदखल करण्याचा कार्यक्रम राबविला जाईल. नरेगा, पर्यावरण सुरक्षा अधिनियम, माहितीचा अधिकार, लोकपाल, भूमी संपादन अधिनियम ह्यांसारखे देशातील गरिबांच्या हिताचे, लोकशाही मजबूत बनविणारे कायदे, योजना गुंडाळून ठेवल्या जातील, किंवा त्यांना पुरेसे पातळ करण्यात येईल. जागतिकीकरणाची फळे चाखणारा मध्यमवर्ग, केव्हाच विकली गेलेली संचार माध्यमे ह्या सर्व बाबींचे सहर्ष स्वागत करेल. प्रश्न उरतो तो फक्त निम्न मध्यमवर्ग व गरीबांचा. (त्यातील बहुसंख्य संघाच्या व्याख्येनुसार हिंदू!) पण विकासाच्या वेदीवर कुणाला तरी बलिदान करावे लागेल आणि बळी नेहमी अजापुत्राचा देतात हे हिंदुधर्मनिष्ठांना कोणी सांगायला नको.
अर्थात हे करताना संघाची मदार असेल आपल्या गोबेल्सतंत्रावर आणि संघविरोधकांच्या विखुरलेपणावर. ‘आधी जातीअंत की वर्गसंघर्ष?’, ‘दलितांचे खरे शत्रू गांधीच’, ‘समाजवादी एकजुटीचे पहिले पाऊल कोणते?’, ‘फुले-आंबेडकर की मार्क्स-फुले-आंबेडकर की मार्क्स-माओ की शिवाजी-फुले-आंबेडकर की नुसते आंबेडकर?’ अशा अंतहीन व अति-महत्त्वाच्या विमर्शात अडकलेल्या मंडळीना आपल्यातला एकेक जण कमी होतोय हे भान आपली स्वतःची पाळी येईपर्यंत येणार नाही, हे संघ परिवार जाणून आहे.
चौखूर उधळलेला हिंदुत्वाचा अश्व ठाणबंद व जेरबंद करणे ही काळाची गरज आहे. कारण तसे न झाल्यास भारताची शकले होण्यास वेळ लागणार नाही. निव्वळ बंदुकीच्या धाकाने विविध समाजघटक एकत्र नंदू शकत नाहीत. पूर्वीही ते शक्य नव्हते. आता माध्यमस्फोटांच्या काळात ते केवळ अशक्य आहे. बाजाराच्या लालसेने ते एकत्र राहतील किंवा कोट्यवधी अजापुत्रांचा बळी सोयिस्कररीत्या विसरला जाईल, अशी वल्गना कोणी केली, तरी तसे घडण्याची शक्यता नाही. त्यामुळे उरतो तो एकच मार्ग, ज्या मार्गाने चालत जाऊन ह्या देशाने कित्येक सहस्रकांची वाटचाल केली. ‘तेच पतित की जे आखडती प्रदेश साकल्याचा’. सकलांना कवेत घेऊन, सर्वांना आपले मानून मार्गक्रमण करण्याचा. सर्वसमावेशकतेचा, अर्थपूर्ण सहजीवनाचा.
‘हिंदुत्त्व की सहजीवन’हा निर्णय आपल्याला करायचा आहे आणि आपल्याजवळ फारसा वेळ उरलेला नाही.
(समाप्त)
रवींद्र रुक्मिणी पंढरीनाथ
मो . ९७६४६४२४३४
ईमेलः [email protected]

Previous articleमाध्यमांची शरणागती
Next articleमाझ्या मैत्रिणी
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.

Comments are closed.