सोशल मीडियातील अभिव्यक्तीची जीवघेणी मरमर

परवा नागपुरात सात तरुण मुलांचा मोबाईलमध्ये सेल्फी (स्वत:चे छायाचित्र स्वत:च घेणे) घेण्याच्या नादात तलावात बुडून मृत्यू झाला. तरुण मुलांचा असा अवचित मृत्यूचा प्रसंग त्यांच्या कुटुंबासाठी किती जीवघेणा असतो, हे ज्यांनी अनुभवलं आहे, ते या घटनेतील गांभीर्य समजू शकतात. या घटनेचे जे तपशील समोर आले आहेत ते पाहता या तरुणांच्या नादाबद्दल खंत व्यक्त करावी की एकंदरीतच सोशल मीडियाच्या विळख्यात सापडलेली युवापिढी सारासार विचारशक्ती हरवून बसत आहे याबद्दल चिंता व्यक्त करावी, काही कळत नाही. कुठल्याही पर्यटनस्थळावर गेल्यानंतर स्वत:चा फोटो घ्यावासा वाटणे ही अगदी नैसर्गिक गोष्ट आहे. मात्र ज्या होडीत चढून या तरुणांनी सेल्फी घेण्याचे प्रयत्न केले ती होडी फुटकी आहे, आपल्याला पोहता येत नाही, पाण्याची खोली भरपूर आहे, त्यात मोठय़ा प्रमाणात गाळही आहे, हे सारं दिसत असतानाही या तरुणांनी होडी पाण्याच्या मध्यभागी नेण्याचा प्रयत्न केला. या हौसेला काय म्हणायचं? व्यक्त होण्याची जीवघेणी मरमर… याशिवाय दुसर्‍या शब्दात या घटनेचं वर्णन करता येत नाही. व्यक्त व्हावंसं वाटणं, स्वत:ला जगासमोर Heroic स्वरूपात सादर करणं, स्वत:च्याच प्रेमात पडणं ही माणसाची नैसर्गिक प्रवृत्ती आहे. ग्रीक पुराण कथेतील स्वत:च्या प्रतिमा प्रेमात पडलेल्या तरुणाची कहाणी सगळ्यांनाच माहीत आहे. तो रोज तलावावर जातो. तिथे पाण्यातील स्वत:चे प्रतिबिंब न्याहाळतो व स्वत:च्याच प्रतिमेवर मोहित होतो. पुढे हा त्याचा छंद होतो. त्याचं त्याला वेड लागतं. या मानसिक अवस्थेला नार्सिसस किंवा नार्सिसिझम (Narcissism) असं म्हणतात. मानसशास्त्राचा सुप्रसिद्ध अभ्यासक सिग्मंड फ्राईड याने आपल्या On Narcissisam या लेखात माणूस स्वत:च्याच प्रेमात बुडाल्यासारखा कसा वागायला लागतो यावर सविस्तर लिहून ठेवलं आहे.

त्या ग्रीक तरुणाच्या काळात आरसा नसल्याने तो तलावातील प्रतिबिंबांच्या प्रेमात पडला. मात्र सुमारे आठेक हजार वर्षांपूर्वी आरशाचा शोध लागल्यानंतर माणसाचं स्वत:बद्दलचे प्रेम अधिकच वाढले. माणूस लहान असो वा मोठा, गरीब असो वा श्रीमंत… दिवसातून दोन-चारदा आरशात स्वत:ला न्याहाळल्याशिवाय त्याला चैन पडत नाही. तशीच परिस्थिती आता इंटरनेट आणि सोशल नेटवर्किंगमुळे उद्भवली आहे. या साधनांच्या अतिवापरातून आणि स्वत:ला कायम प्रेझेन्ट करण्याच्या नादात काही माणसं स्वत:मध्ये इतकी मग्न होऊन जातात की, त्यांना सतत आपल्याला सुखद वाटतील अशा संवेदनांचा शोध घ्यावासा वाटतो. आपल्या आजूबाजूला जरा नजर फिरविली तर सोशल मीडियाग्रस्त अशी ही माणसं प्रत्येक घरात, कार्यालयात, शाळा-महाविद्यालयात, रस्त्यांवर, प्रवासात सगळीकडे आढळतात. अशा लोकांना प्रत्येक थोड्या वेळानंतर माोबाईलकडे पाहिल्याशिवाय चैन पडत नाही. आपल्या नकळत कुणाचा कॉल तर येऊन गेला नाही ना; वा कुणाचा एसएमएस, व्हॉटस्अपवर मेसेज आलेला असूनही आपल्याला ते समजलंच नाही असं तर झालं नाही, असं त्यांना सारखं वाटत असतं. तसंच आपल्या मोबाईलची रेंज नीट नसल्यामुळे कोणाचा कॉल किंवा मेसेज येत नाही असं होत नाही ना, हेही ते वारंवार तपासतात. ही अशी माणसं (यात बाया-मुलीही आल्या बरं…) कायम चार्जर घेऊन फिरतात. कुठेही गेले की त्यांची नजर चार्जर लावण्यासाठी सॉकेट कुठे मिळते हे पाहण्यासाठी भिरभिरते. ही माणसं रात्री झोपतानाही सेलफोन उशाशी घेऊन झोपतात. मध्यरात्री जाग आली की व्हॉटस्अप चेक करतात. सकाळी उठल्याबरोबर पुन्हा तेच. कुठल्याही ठिकाणचा फोटो काढला की तो चटकन ‘फेसबुक’ वा ‘व्हॉटस्अप’वर टाकणं हे अशा माणसांचं व्यसन असतं. फेसबुकवर वेगवेगळ्या स्त्री-पुरुषांच्या टाईमलाईनवर जरा नजर फिरविली की, स्वत:ला प्रेझेन्ट करण्याचा नाद किती बोकाळला आहे, हे चटकन लक्षात येतं. सध्या माणसं कुठल्याही पर्यटनस्थळावर फिरायला गेलेत की तेथील निसर्गसौंदर्याचा आनंद घेण्याऐवजी तेथील फोटो काढून तो फेसबुकवर टाकण्यात धन्यता मानतात. बरं एवढं करून ते शांत बसतील आणि निसर्गाचा आस्वाद घेतील, तर असंही नाही. त्यानंतर काही वेळाने त्या फोटोला लाईक किती मिळाल्या, कोणी काय कॉमेंट्स टाकली यावर त्यांचं सारं लक्ष असतं. निव्वळ फिरण्याच्या विषयातच नाही, जीवनातील सार्‍याच क्षेत्रांवर या सोशल मीडियाच्या वेडाने आक्रमण केलं आहे. एखाद्या कार्यक्रमाला गेले आहेत, तर त्या कार्यक्रमाचा आनंद घेण्याऐवजी तेथील फोटो शेअर करण्याकडे लोकांचं जास्त लक्ष असतं. लग्नसमारंभ, अपत्यप्राप्ती, नवीन वाहन खरेदी, दागिने वा कापड खरेदी किंवा वैयक्तिक आयुष्यातील यशाचा कुठलाही प्रसंग असो… अगदी कुटुंबासोबत बाहेर जेवायला जाणे, घरी कुठल्या डिशेस तयार केल्यात असे अगदी कशाचेही फोटो लोक फेसबुक वा व्हॉटस्अपवर टाकतात.

मी प्रत्येक क्षणाला काय करतो, हे सांगणं ही जणू आता गरज झाली आहे. यात लहान-थोर कोणाचा अपवाद नाही. आपले पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून अनेक नेते, कलाकार, संपादक, समाजसेवक सार्‍यांना प्रत्येक क्षणी काहीतरी सांगायचं असतं. कुठलाही छोटा-मोठा निर्णय घेतला की नेत्यांची ट्विटरवरून टिवटिव सुरू होते. भारत क्रिकेट सामना जिंकून दोन मिनिटं होत नाही, तर पंतप्रधान अभिनंदनाचं व्टिट करून मोकळे होतात. आपले महाराष्ट्राचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यात पटाईत आहेत. ते तर व्टिट करण्याची कुठलीही संधी सोडत नाहीत. कधी काय घडते आणि मी टिवटिव करतो, असं त्यांना होऊन जातं. तावडेंनाच काय म्हणायचं… या सोशल मीडियाच्या नादात भलेभले प्रसंगाचं गांभीर्य विसरतात. गेल्या वर्षी वर्णद्वेषविरोधी चळवळीतील महान नेते नेल्सन मंडेला यांच्या अंत्यसंस्कारप्रसंगी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा हे समोर अंत्यसंस्काराचे विधी सुरू आहेत हे विसरून डेन्मार्कच्या महिला पंतप्रधान हॅले थॉर्निंग आणि ब्रिटनचे पंतप्रधान डेविड कॅमेरून यांच्यासोबत सेल्फी काढण्याच्या नादात सहभागी झाले होते. त्यावेळी ओबामांच्या बाजूला बसलेल्या त्यांच्या पत्नी मिशेल ओबामांच्या चेहर्‍यावर या पोरखेळाबद्दलची नाराजी स्पष्टपणे दिसत होती. ही सेल्फी तेव्हा जगभर गाजली होती.obama थोडक्यात सेल्फी घेण्याचा हा नाद भल्याभल्यांना आहे. सध्या जगभर माणसं कशाचाही सेल्फी घेतात. मध्यंतरी श्रीलंकेतील उदाई राय या तामिळ युवकाने आपल्या काकाच्या मृतदेहासोबतचा सेल्फी सोशल साईटवर टाकून खळबळ उडवून दिली होती. अलीकडेच इसाक मार्टिनेझ या अमेरिकेतील तरुणाच्या खांद्याला गोळी लागली. या महाभागाने रुग्णवाहिका बोलाविण्यापूर्वी रक्तबंबाळ अवस्थेतील आपला सेल्फी काढला आणि अपलोड केला. एवढंच नव्हे तर रुग्णालयात पोहोचेपर्यंत तो आपलं स्टेटस् अपडेट करीत होता. हे असे प्रकारही व्यक्त होण्याची जीवघेणी मरमर या प्रकारातच मोडते.

माणसं अशी का वागतात? स्वत:कडे लक्ष वेधून घेणे, ही माणसांची मूळ प्रवृत्ती आहे. इतरांनी आपली प्रशंसा करणे, गुणगौरव करणे हे कोणालाही हवंहवसं असतं. स्तुती ही परमेश्‍वरालाही प्रसन्न करते म्हणतात, ते उगीच नाही. माणसाच्या मनातील या स्तुतिप्रिय भावनेला सोशल मीडियातून अगदी सहजतेने खतपाणी मिळते. आपल्या फोटोला कोणीतरी wow म्हणतो. Handsome, beautiful, Gtacious अशा विशेषणांनी गौरवितो म्हटल्यानंतर प्रत्यक्षात तसं नसलं तरी कोणीही सुखावणारच. सोशल मीडियाचं एक वैशिष्ट्य म्हणजे येथे सामान्य माणसांनाही आपण कोणीतरी विशेष आहोत असं वाटायला लागते. फोटो वा कॉमेंट्सला मिळणार्‍या लाईक्समुळे त्याला स्वत:ला स्टार असल्याचा फिल येतो. मार्क लियरी नावाचा ड्यूक युनिव्हर्सिटीमधला मानसोपचार तज्ज्ञ म्हणतो, ‘फेसबुक वा व्हॉट्सअप हे आजच्या तरुणाईसाठी स्वत:ची जाहिरात करण्याचं साधन झालं आहे.’ मात्र सोशल नेटवर्किंगचं ते जग आभासी आहे याची खबरबातही त्याला नसते. सोशल मीडियातील आभासी विश्‍वात त्याचा आत्मसन्मान आतल्या आत सुखावत जातो आणि तो नकळतपणे त्या जाळ्यात आणखी खोल खोल रुतत जातो. आज तर व्यसन म्हणावं या पातळीपर्यंत त्याची भयावहता पोहोचली आहे. अलीकडेच जे सर्वेक्षण झालं आहे त्यात तरुण पिढी दिवसातला दहा तासांपेक्षा अधिक वेळ फेसबुक, व्हॉटस्अप, इन्स्टाग्राम आदी सोशल नेटवर्किंग साईटवर घालवितात, अशी माहिती समोर आली आहे. त्याच्याही पुढे म्हणजे कॉम्प्युटर, मोबाईल आणि टीव्ही या तीन स्क्रिन दिवसाच्या २४ तासातले १६ ते १७ तास व्यापून टाकतात, हे चित्रही पुढे आले आहे. याचे परिणाम अतिशय भयावह आहेत. त्याबद्दल स्वतंत्रपणे विस्ताराने लिहिता येईल. सध्या एवढंच सांगावसं वाटतंय की, सोशल मीडियाचा नाद आपल्या वा आपल्या जिवलगाच्या जिवावर उठू नये एवढी काळजी तरी किमान प्रत्येकाने घेतली पाहिजे.

अविनाश दुधे
(लेखक दैनिक पुण्यनगरीचे कार्यकारी संपादक आहेत.)
भ्रमणध्वनी : ८८८८७४४७९६

Previous articleमाध्यमांची रणनीती : प्रवाहातली आणि भोवऱ्यातली
Next articleरेडकाची गोवंशहत्येविरूद्ध तक्रार
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.