देव भेटला वाळवंटात

सुनील इंदुवामन ठाकरे

पंढरीत राहून देवाला भेटलो नाही तर ते योग्य होणार नाही. म्हणूनच तीन-चार दिवसांनी संध्याकाळी देवाला भेटायला म्हणून निघालो. एका मोठ्या प्रोजेक्टसाठी आलो. दिवसभर बैठकीचं काम होतं. त्यामुळे संध्याकाळी निघालो भेटीगाठींसाठी. उभ्या विठुरायांना भेटायला जाण्यापूर्वी चालत्या-बोलत्या विठुरायांना भेटायला थेट चंद्रभागेच्या वाळवंटात गेलो. आपल्या लेकराबाळांसह पंढरीच्या जत्रेचा आनंद घेणारा सांसारिक विठोबा दिसला. भगवी वस्त्रे नेसून मंद पावलांनी चंद्रभागेच्या वाळवंटातून चालणारा विरक्त विठोबा दिसला. छोटे-मोठे व्यवसाय करून पोट भरणाराही विठोबा दिसला. पण दिवस बुडता बुडता मला माझा ‘‘देव’’ भेटला. मला साक्षात ‘‘वासुदेव’’ भेटला. वाळवंटात शांतपणे बसला होता एकटाच. अठ्ठावीस युगांपासून वैभवी गाभाऱ्यातून थकवा काढायाला आलेला असावा कदाचित.

दिवभराच्या श्रमाने आलेला शीण चेहऱ्यावर दिसत होता. मात्र मूळातलं वासुदेवाचं सावळं तेज मात्र तसंच लख्खं होतं. डोक्यावरील खूप जुन्या टोपातील मोरपीस सारखे आकर्षित करीत होते. देव म्हटला की त्यासोबतच त्याच्या नावाने होणारा बाजारही येतोच. पण हा वासुदेव त्या बाजारातला दिसत नव्हता. मी बराच वेळ ऑब्जर्व्हेशन करीत होतो. एक माऊली आली. आपल्या पूर्वजाचं नाव वासुदेवाला सांगितलं. कॉईन वासुदेवाच्या ओंजळीत टाकला. वासुदेवाने तिच्या पूर्वजाच्या नावानं ‘‘दान पावलं’’ अशी तोंडी पावती दिली. बरं हे दान कुणाकुणाला जाईल हे वासुदेव आपल्या गाण्यातून सांगू लागला. त्याने जवळपास त्या कॉईनच्या तीस-चाळीस वाटण्या केल्यात. सगळ्या देवी-देवतांना, संतांना त्या दानातील हिस्से तोंडीच दिलेत. विठुराया, रुक्मिणी माऊली पासून तर म्हसोबा, भैरोबांपर्यंत सगळ्यांची नावं त्याने आपल्या गीतातून घेतली.

वासुदेव कुणाच्या मागे धावत नव्हता. भीक तर मागतच नव्हता. कुणाला भीती दाखवून लुटतही नव्हता. भीती आणि हव्यास यामुळेच थोड्याशा इमोशनल माणसांची लूट होते. असं दान दिलं नाही किंवा असा विधी करून दक्षिण दिली नाही तर देवाचा कोप होईल अशी धमकी काही प्रोफेशन देवांचे मध्यस्थी देत असतात. मात्र वासुदेव देवासारखा नव्हे तर देवच असल्यामुळे तो असं काही करत नाही. कोणी प्रेमाने दिलं तरच घेतो. आणि त्याची लगेच तोंडी व जगजाहीर पावतीदेखील देतो.

मराठी विश्वकोशात वासुदेवाची एक कहाणी सांगितलेली आहे. त्यानुसार एका ब्राह्मण ज्योतीष्यास एका कुणबी स्त्रीपासून सहदेव नावाचा मुलगा झाला. याच सहदेवाचे वंशज असल्याचे आजचे वासुदेव सांगतात. आज अनेक वासुदेव हे भाड्याने शेती करतात. काही ठिकाणी खाजगी नोकरीदेखील करतात. मात्र भिक्षा मागणे हे त्यांच्या उदरनिर्वाहाचे पारंपरिक साधन आहे. त्यांच्या मुलांना यासाठी विशेष दीक्षादेखील दिली जाते. ते भिक्षेकरी जरी असले तरी त्यांना अत्यंत आदराने व सन्मानाने ही भिक्षा दिली जाते.

वासुदेव हा वैष्णव व त्यातही कृष्णभक्त असतो. त्यामुळे त्याचं रूपदेखील कृष्णासारखंच असतं. डोक्यावरील मोरपिसांचा टोप आणि बासरी ही भगवान श्रीकृष्णाची आयडेंण्टीटी. तीच वासुदेवाचीदेखील असते. याच्या हातात टाळ आणि चिपळ्या असतात. घोळदार अंगरखा, गळ्यात शेला, कमरेला बांधलेला एक दुपट्टा आणि पायात घुंगरं असतात.

मला दुसऱ्या किंवा तिसऱ्या वर्गात एक कविता वासुदेवावरच होती. ‘‘टिल्लम टिल्लम टाळ वाजवतो, मुखी हरीचे नाम गर्जतो, टिल्लम टिल्लम प्रभातकाळी, वासुदेवाची स्वारी आली.’’ एक मस्त रिदम होता या कवितेत. वासदेवाच्याही अस्तित्त्वातही एक रिदम आहे. भल्या पहाटे हा वासुदेव ओव्या व भजने गात निघतो. हातातील टाळ व चिपळ्यांच्या तालात अत्यंत नादमधुर भजनाने वासुदेव अख्खं गाव जागं करायचा आधी.

वासुदेवाची काही हक्काची गावे ठरलेली असतात. या गावांत ते भिक्षा मागायला जातात. अनेक तीर्थक्षेत्रांतही ते असतात. ते त्या तीर्थक्षेत्रांची पूर्ण माहिती व माहात्म्य तिथे येणाऱ्या भक्तांना सांगतात. मोबदल्यात स्वेच्छेने कुणी काही दिलं तर घेतात. उगाच कुणाला पैशांसाठी वेठीस धरत नाही. आध्यात्माचा सिजन असला की दिवसाला 500-600 रूपये त्यांना मिळतात. एरवी कसे-बसे दीड-दोनशे रूपये त्यांना मिळतात. केवळ व्यवसायच नव्हे तर श्रद्धा म्हणूनदेखील हे नियमित पंढरपूर, आळंदी, देहू व अन्य वारी करायला जात असतात. या वासुदेवाची आज पंढरीच्या वाळवंटात ज्यांची भेट झाली त्या वासुदेवाचे नाव मा. तुकाराम नारायण घोडगे, हे बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यातील मिरवत या गावचे. या गावात वासुदेवांची ४० घरे आहेत. त्यातील जवळपास १५ जण हे वासुदेव म्हणून काम करतात. हळूहळू त्यांच्यात शिक्षणाचा प्रचार व प्रसार होत आहे. स्वतः निरक्षर असलेल्या तुकारामजींचा मुलगा एम.ए. करतोय. तो अजूनही वासुदेव झालेला नाही.

आज काळ बदलला तरी ही लोकसंस्कृती अजूनही जोपासली जातेय. खेड्या-पाड्यांमधून परिचित असलेला वासुदेव आता शहरांतूनही दिसतो. अगदी पहाटेला गाव जागृत करणारे हे वासुदेव आता शासनाच्या विविध जागृतीमोहिमांचे घटक बनलेत. विविध शासकीय योजनांचा व जनकल्याणाचा प्रचार व प्रसार हे वासुदेव करतात. शासनाने त्यांना व त्यांच्या पत्नीलाही पेन्शन लागू केली आहे.

वासुदेव हा समाज अत्यंत जुना आहे. वारकरी आणि महानुभाव साहित्यातदेखील यांचे उल्लेख आलेले आहेत. छत्रपती शिवरायांच्या काळात यांची अत्यंत मोलाची कामगिरी राहिलेली आहे. महाराष्ट्राच्या लोकसंस्कृतीचा व लोककलेचा समृद्ध वारसा आहे वासुदेव. पूर्वी पहाटे पहाटे वासुदेवाचा टाळ-चिपळ्यांसह मंजूळ नाद आला की गाव जागं व्हायचं. आता लोक उशिरा उठतात. त्यामुळे वासुदेवालादेखील दिवस निघाल्यावरच बाहेर पडावं लागतं. वासुदेवाने पूर्वीपासूनच गाव जागं करण्याचं काम केलं आहे नि करीत आहेत. गावातील लोकांना अगदी पहाटे पहाटे प्रबोधनाचे गोड पाठ वासुदेव देतो. कृष्णासारखेच व्यवहारज्ञान हा कृष्णसखा देत असतो. आपल्या नादमाधुर्याने जागृतीसह आनंदही वाटत आहे. याच्या मोबदल्यात जे काही मिळालं ते आनंदाने स्वीकारत तो समाधानाची पावतीही देतो,….. दान पावलं हो… दान पावलं…..

-सुनील इंदुवामन ठाकरे
8623053787
पंढरपूर

 

Previous articleमाय सिस्टर्स अँड ब्रदर्स…
Next articleदयार, दिशा आणि तिचे सूर्य
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.

Comments are closed.