शहरांत माणसांची मनं संपली जातात आणि शरीर नाजूक होतात. लहान गावात माणसाची शरीर संपतात; पण मनं नाजूक राखली जातात. मागचं सदर लिहिल्यावर मग तडप लागावी तशी मला वणीच्या उन्हाची तहानंच लागली. या उन्हाळ्यात वणीला जाणं झालंच नव्हतं. जाऊन दोन दिवस राहून आलो. भरदुपारी एक वाजता रेल्वेलाइनपर्यंत एक-दोन किलोमीटरची पायी रपेट मारून आलो. मध्ये एक दोन फोन आलेत. पायातल्या रबराच्या स्लीपर्स आणि मोबाईल फोन दोन्ही चटका लागेल इतके गरम झालेत. चपला पायात घालवेना, मोबाईल कानाला लाववेना; पण शरीराला काही त्रास झाला नाही. निर्जीव वस्तू त्रस्त झाल्यात; पण सजीव शरीर मात्र शांत होतं. एखादी परीक्षा पास झाल्यासारखं वणीचं नागरिकत्व आपण अजून टिकवून ठेवलं असण्याचा आनंद मग मला झाला.
वाळ्याचा, मोगऱ्याच्या फुलांचा वास आला की उन्हाळा माझ्या अंगात भिनायला सुरुवात होते. या चाहुलीनीच उन्हाळ्याची ‘उमंग’ माझ्या मनात दाटायला सुरुवात होते. आधी दारं-खिडक्यांना लागणाऱ्या वाळ्याच्या ताट्या, वाळ्याचे पडदे हा म्हणजे उन्हाळ्याचा जाहीरनामा असायचा. त्यांच्यावर पाणी टाकलं की खोलीभर पसरणारा त्याचा शीतल सुवास, पंख्याने पसरणारी त्यांच्यातून येणारी थंड हवा हा सगळा एकूणच शीतल अनुभव असायचा. झिरपणाऱ्या काळ्या माठात वाळ्याची जुडी टाकलेलं थंड पाणी हेही उन्हाळ्यात एखाद्या पेयासारखं आनंद देऊन जातं.