मीडिया वॉच दिवाळी अंक -२०१८
-अतुल कहाते
ज्या लोकांना न्यूनगंड असतो असे लोक सोशल मीडियाचा जास्तीत जास्त आधार घेतात असं व्हॉकेनबर्ग, पीटर आणि शोटेन यांच्या २००६ सालच्या संशोधनातून दिसून आलेलं आहे. जे लोक स्वत:विषयी आश्वस्त आणि स्थिर असतात त्यांना याची गरज भासत नसल्याचं अभ्यासक सांगतात. सुप्रसिद्ध मानसशास्त्रज्ञ सिग्मंड फ्रॉईडचं या संदर्भातलं लिखाण महत्त्वाचं आहे. माणूस स्वप्रेमात बुडाल्यावर कसा वागायला लागतो याचे दाखले त्यानं दिले आहेत. सोशल मीडियाच्या संदर्भात ते अनेकदा दिसून येतं. आपल्याला सातत्यानं कुणाच्या तरी इमेल्स याव्या असं वाटणं, आपल्या फेसबुक आणि व्हॉट्सअॅपच्या गोतावळ्यामध्ये सतत हलचल सुरू राहावी असं वाटणं ही सगळी या अस्थिरतेची आणि स्वप्रेमाची लक्षणं आहेत.
१९५१ साली अमेरिकी मानसशास्त्रज्ञ कार्ल रॉजर्स यानं प्रथमच “खरं स्वत्व” नावाची संकल्पना मांडली. याचा सारांश म्हणजे प्रत्येक माणसाच्या वागण्या-बोलण्यातल्या छटा, त्याचे विचार हे सगळं पूर्णपणे प्रकट होण्यासाठीच्या पुरेशा संधीच अनेकदा उपलब्ध होत नाहीत. म्हणजेच कुठल्याही माणसाला आपल्या दैनंदिन आयुष्यात इतर लोकांशी संवाद साधताना त्यामधल्या काही गोष्टी झाकून टाकाव्या तरी लागतात किंवा त्या आपोआपच दबलेल्या राहतात. आपोआपच कुठल्याही माणसाच्या व्यक्तिमत्वामधल्या या छटांची खरी जाणीव फक्त त्या माणसालाच असते. इतर कुणाला ते समजू शकत नाही. कार्ल रॉजर्स याच्या मूळ संकल्पनेला आधारभूत मानून त्यानंतर सुमारे पाच दशकं उलटून गेल्यावर जॉन बार्घ आणि त्याचे काही सहकारी यांनी “इंटरनेटवरचं खरं स्वत्व” नावाची संकल्पना मांडली. याचा सारांश असा: इंटरनेट जेव्हा नवं होतं तेव्हा अनेक लोक आपली खरी ओळक लपवून इंटरनेटवर बनावट नाव आणि रूप धारण करून प्रकटायचे. म्हणजेच इंटरनेटवर माणसांची खरी ओळख लागू शकत नसे. प्रत्यक्षातला माणूस आणि इंटरनेटवरचा तोच माणूस या दोन प्रतिमा प्रत्यक्षात एकाच माणसाच्या आहेत असं सांगितलं तर कित्येक जणांच्या बाबतीत हे खोटं वाटावं अशी परिस्थिती असे. आभासी जगात खोट्या नावाचा मुखवटा घातलेला माणूस आपल्या भावनांवर प्रत्यक्ष आयुष्यात घातलेला मुखवटा मात्र टराटरा फाडून मोकळा होत असे. यामुळेच आभासी सायबर विश्वात माणसं एकमेकांशी अधिक मोकळेपणानं संवाद साधतील असं मानलं जायला लागलं.“सोशल मीडिया”च्या मुळाशी हाच आशावाद होता!
“सोशल मीडिया” या तंत्रज्ञानाविषयी अलीकडे इतकं बोललं आणि लिहिलं जातं की त्यात नव्यानं काय सांगायचं असा प्रश्न काही वेळा पडू शकतो. खूप पूर्वीपासून हे दुधारी अस्त्र असल्याची जाणीव झाली होती. लोक ज्या बेबंद प्रकारे फेसबुक, व्हॉट्सअॅप वगैरे वापरायला लागले होते ते बघता एके दिवशी हे अंगलट येणार याची दाट शक्यता दिसत होती. ज्या माणसानं आपलं अख्खं आयुष्य फक्त इतरांनी लिहिलेला मजकूर वाचण्यात आणि फार फार तर अधूनमधून किरकोळ प्रतिक्रिया देण्यात घालवलेलं असेल त्या माणसाला आता दिवसाचे २४ तास वाटेल ते लिहिण्याची परवानगी मिळाल्यावर दुसरं काही होण्याचा प्रश्नच उद्भवत नव्हता. या माध्यमाची लोकप्रियता “आपल्या प्रत्यक्ष आयुष्यातल्या मित्रांशी आभासी ऑनलाईन विश्वातसुद्धा संपर्कात राहणं शक्य असल्यामुळे” वाढत गेल्याचं सुरुवातीला मानलं जाई. तसंच या तंत्रज्ञानाचा फायदा एकटेपणा दूर करण्यासाठी होऊ शकतो असंही म्हटलं जाई. भारतातसुद्धा अनेक ठिकाणी झालेल्या सर्वेक्षणांमध्ये एकटेपणा हा अनेक जणांच्या आयुष्यातला मुख्य प्रश्न बनला असल्याचं दिसून आलं आहे. साहजिकच “सोशल नेटवर्किंग”मुळे त्यांना आधार मिळू शकतो असं लोक म्हणायला लागले.
प्रत्यक्षात “सोशल मीडिया” किमान भारतात तरी कसं वापरलं जातं हे आपण काही निरीक्षणांमधून खात्रीनं सांगू शकतो. इतरांशी संपर्कात राहणं आणि सगळ्या महत्त्वाच्या बाबतींमध्ये अद्ययावत राहणं हा या माध्यमाचा मुख्य हेतू असल्याचं वरकरणी दिसतं. अनेक जण आपली प्रतिमा उजळवण्यासाठी या माध्यमाचा वापर करताना दिसतात. आपलं खरं आयुष्य दु:खी किंवा फार आकर्षक नसल्याची भावना अनेक जणांना आतून खात असते. हे आयुष्य एकदम झोकदार, यशस्वी किंवा रोमांचक असल्याचं भासवण्यासाठी “सोशल नेटवर्किंग” वापरलं जातं. जे लोक आधीपासूनच यशस्वी किंवा श्रीमंत वगैरे असतात त्यांना आपलं हे स्थान टिकवून ठेवण्यासाठी “सोशल मीडिया”चा वापर करावा लागत असल्याचं दिसतं. सातत्यानं स्वत:विषयीच्या अपडेट्स टाकणं, स्वत:चं “स्टेटस” बदलणं, आपल्या रोजच्या दिनक्रमामधल्या अत्यंत किरकोळ आणि क्षुल्लक गोष्टी रंगवून सांगणं हे अनेक जण न चुकता करत राहतात. त्यातच शाब्दिक वर्णनं कंटाळवाणी होत असल्यामुळे शक्य तितकी छायाचित्रं टाकणं, स्वत:चे व्हीडिओ शेअर करणं यालाही ऊत आलेला असतो. आपल्याविषयी सगळ्या जगाला सदोदित कुतूहल असतं अशा गोड गैरसमजापोटी हे होत राहतं. याची दुसरी बाजू म्हणजे इतर लोकांच्या “सोशल मीडिया”वरच्या अशाच उथळ प्रकारांना आपण प्रोत्साहन दिलं नाही तर तेही आपल्याकडे ढुंकून बघणार नाहीत या भीतीपोटी “तू मेरा लाईक कर, मै तेरा” असा निरर्थक प्रवास दिशाहीन अवस्थेत सुरू राहतो. कुठेतरी मिसळ खायला गेलो इथपासून सोसायटीच्या गणेशोत्सवात तिसरं संयुक्त बक्षीस मिळवलं इथपर्यंत असंख्य गोष्टींची लाखो छायाचित्रं फेसबुक, व्हॉट्सअॅप, इन्स्टाग्रॅम, स्नॅपचॅट वगैरेंमधून फिरत असतात. ती लाईक आणि शेअर केली जातात.
आपल्या देशात आपल्या काल्पनिक ऐतिहासिक महानतेची चलती तर पूर्वीपासूनच आहे. आपण गॅलिलिओ, न्यूटन, आईनस्टाईन यांच्या आधी भौतिकशास्त्र, विश्वाची निर्मिती वगैरे सगळ्या गोष्टींचा शोध लावून ठेवलेला होताच! त्याच्या वार्ता जगभर पसरवण्यासाठी आपण तेव्हा फक्त इंटरनेट आणि सोशल मीडिया यांची निर्मिती केली नव्हती; एवढंच. आता तेही झाल्यामुळे आपण आपल्या उज्ज्वल वैज्ञानिक इतिहासाविषयी एकमेकांना “पुराव्यांनिशी” सांगू शकतो. हा मजकूर लिहून झाल्यावर एक चूक लक्षात आली; तीही दुरुस्त करून टाकू. आपल्याकडे तेव्हा इंटरनेट पण होतं आणि फॅरेडे, हर्ट्झ, मॅक्सवेल, टेस्ला, मार्कोनी, जगदीशचंद्र बोस यांनी विनाकारणच आपल्याकडे आधीपासून असलेल्या बिनतारी संदेशवहनावर पुन्हा संशोधन केलं हेही सांगितलं पाहिजे. तर तेव्हाचं इंटरनेट आणि तेव्हाची बिनतारी संदेशवहनाची व्यवस्था यांच्या जोरावर महाभारतात रणांगणावर काय सुरू होतं याची वार्ता एकीकडून दुसरीकडे जात असे. पुन्हा या सगळ्याचा एकोणिसाव्या आणि विसाव्या शतकात नव्यानं शोध घेण्याची काहीच गरज नव्हती. इतकंच काय तर “प्लॅस्टिक सर्जरी”चे जनक आपणच होतो हेही आपल्याला काही महिन्यांपूर्वी समजलं असेलच. असे सगळे संदेश शक्य तितक्या वेळा एकमेकांना फॉरवर्ड करणं आणि जे लोक याला विरोध करत असतील त्यांचा आवाज बंद करून टाकणं हा आपल्याकडच्या लोकांचा सोशल मीडियावरचा अत्यंत आवडता खेळ आहे.
जे खरं असतं ते खोटं आहे असं म्हणायचं आणि जे खोटं असतं ते खरं आहे असं म्हणायचं हा सोशल मीडियावरचा अजून एक आवडता छंद आहे. हा छंद तसा वैश्विक पातळीवरचा आहे. कारण सर्वकालीन सर्वश्रेष्ठ अमेरिकी राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्पनं याला “फेक न्यूज” या नावाखाली अत्यंत महत्त्वाचं स्थान प्राप्त करून दिलं आहे. कुणी काही प्रश्न विचारायचे नाहीत, त्याच्याविषयीच्या खर्या बातम्या कुणी सांगितल्या किंवा छापल्या की त्यांना “फेक न्यूज” म्हणून मोकळं व्हायचं हा त्याचा आवडता प्रकार आहे. स्वत: मात्र बेदिक्कतपणे ट्विटरवरून वाटेल त्या थापा मारत राहायचं आणि इतर माध्यमांची आपल्याला अजिबात गरज नसल्याचं सांगत राहायचं हा नवा “पॅटर्न” त्यानं रुजवला आहे. अर्थात याची लागण इतर ठिकाणी होणं स्वाभाविकच आहे. आपल्याकडे तसं हे पूर्वी थोड्याफार प्रमाणात होतंच; पण आता ते अगदी सर्रास घडताना दिसतं आहे. कुठल्याही सार्वजनिक संस्थांवर यामुळे लोकांचा विश्वास बसू नये अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. माध्यमं, न्यायालयं, सामाजिक संस्था, कार्यकर्ते हेच “फेक” आहेत असा प्रचार बेमालूमपणे केला जातो आहे आणि सोशल मीडियावरून तो सगळीकडे पसरवला जात आहे. अभ्यासू पत्रकार, संशोधक, विश्लेषक यांचा अत्यंत हीन भाषेत अपमान केला जातो आहे. साधं वर्तमानपत्रसुद्धा न वाचणारा माणूस आता तज्ज्ञ झाला आहे. याचं कारण म्हणजे त्याच्या हातात सोशल मीडिया आहे. आपल्याला वाटतं तेच सत्य आणि आपल्या विरोधात असलेलं मत म्हणजे “फेक न्यूज” अशी सरळसरळ विभागणी झाली आहे. यातून सार्वमत तयार केलं जाणं आणि त्याला विरोध करणार्यांवर अश्लाघ्य भाषेत ताशेरे ओढणं हा लाखो भारतीयांचा आवडता दिनक्रम आहे.
आपल्या नेहमीच्या आयुष्यात स्त्री ही भारतात नेहमीच असुरक्षित असते. सोशल मीडियावर तर स्त्री असणं हाच मुळात प्रचंड मोठा गुन्हा आहे. नेहमीच्या आयुष्यात किमान इतर लोकांचा, न्यायव्यवस्थेचा धाक तरी गुन्हेगारांना असतो. सोशल मीडियावर मात्र अशी कुठलीच भीती नसल्यामुळे विलक्षण अपमानास्पद भाषा वापरणं, अत्याचार करण्याच्या धमक्या देणं, सगळे मुद्दे हाणून पाडणं, गलिच्छ टिप्पणी करणं हे अक्षरश: क्षणोक्षणी घडतं. कुठल्याही स्त्रीनं सोशल मीडियावर आपलं मत मोकळेपणानं मांडणं आणि कित्येकदा तर नुसतं सोशल मीडियावर नुसतं असणं हेच तिच्या ऑनलाईन छळासाठी पुरेसं ठरतं. यातून जर देशाच्या परराष्ट्र मंत्र्याची सुटका होत नसेल तर इतर स्त्रियांविषयी काय बोलणार?
तरुणाईच्या सोशल मीडियाच्या वापराविषयी तर बोलावं तितकं कमी आहे. सगळीकडेच प्रत्यक्ष संवाद कमी होत चाललेला असल्यामुळे तरुणाई सातत्यानं सोशल मीडिया हेच आपलं संवादाचं मुख्य माध्यम असल्यासारखं वागते. यात तात्काळ समाधान मिळवण्यासाठीची धडपड मुख्य असते. सातत्यानं आपली छायाचित्रं सोशल मीडियावर झळकवण्यामागचा मुख्य हेतू तोच असतो. यावर लोकांनी कॉमेंट्स द्यावेत, लाईक करावं, शेअर करावं ही प्रमुख इच्छा असते. आपोआपच सोशल मीडियावर हे छायाचित्र वगैरे टाकून ते संपत नाही. त्यापाठोपाठ किती जणांनी ते लाईक केलं आहे, किती जणांनी काय कॉमेंट टाकली आहे हे सगळं बघत राहण्यात प्रचंड वेळ जातो. शिवाय हे आणखी सुरू राहावं अशी भावना मनात असल्यामुळे आलेल्या कॉमेंटला उत्तर देणं गरजेचं असतं. यातून संबंधित मुला/मुलीच्या मेंदूत “डोपामाईन” हे सुखद रसायन वाहत राहतं. एखाद्या दारुड्यानं सावकाशीनं दारू पीत राहावं तसाच हा प्रकार असतो. याची लागण आता थोरामोठ्यांनाही झाली आहे. शब्दांची जागा छायाचित्रांनी घेतली आहे. सतत इतरांचे किंवा स्वत:चे फोटो काढणं आणि ते शक्य तितक्या ठिकाणी पोस्ट करणं हा एक आवडता उद्योगच झाला आहे. यामधल्या असंख्य जणांना “सेल्फायटिस” रोगानं ग्रासलेलंही आहे. कित्येक जण स्वप्रतिमेच्या अतिप्रेमात बुडून गेलेले असल्यामुळे “नार्सिसिस्ट” झालेले आहेत. मानसोपचारतज्ज्ञ, मानसशास्त्रज्ञ, थेरपिस्ट, कौन्सिलर या मंडळींची चलती आहे!
फेसबुकवर आपले आई-वडील, शिक्षक आणि नातेवाईक असतात या भीतीपोटी आताची शाळकरी आणि महाविद्यालयीन मुलं-मुली इन्स्टाग्राम, स्नॅपचॅट वगैरेंकडे वळली आहेत. असंख्य चित्रविचित्र छायाचित्रं टाकत राहण्याचा हा निरर्थक उद्योग आहे. स्नॅपचॅटमध्ये तर एकानं एक संदेश टाकला की दुसर्यानं त्याला उत्तर द्यायचं, मग तिसर्यानं असं करत करत ती “स्टोरी” तुटू द्यायची नाही अशी अपेक्षा असते. याचा सोपा अर्थ दिवसभर त्या स्नॅपचॅटमध्येच बुडून जायचं. याचं कारण म्हणजे आपण त्या “स्टोरी”तून बाहेर पडलो तर आपण बेदखल झालो. इतर लोक आपल्याला इथून पुढे फार मानानं वागवणार नाहीत!
ज्या लोकांना न्यूनगंड असतो असे लोक सोशल मीडियाचा जास्तीत जास्त आधार घेतात असं व्हॉकेनबर्ग, पीटर आणि शोटेन यांच्या २००६ सालच्या संशोधनातून दिसून आलेलं आहे. जे लोक स्वत:विषयी आश्वस्त आणि स्थिर असतात त्यांना याची गरज भासत नसल्याचं अभ्यासक सांगतात. सुप्रसिद्ध मानसशास्त्रज्ञ सिग्मंड फ्रॉईडचं या संदर्भातलं लिखाण महत्त्वाचं आहे. माणूस स्वप्रेमात बुडाल्यावर कसा वागायला लागतो याचे दाखले त्यानं दिले आहेत. सोशल मीडियाच्या संदर्भात ते अनेकदा दिसून येतं. आपल्याला सातत्यानं कुणाच्या तरी इमेल्स याव्या असं वाटणं, आपल्या फेसबुक आणि व्हॉट्सअॅपच्या गोतावळ्यामध्ये सतत हलचल सुरू राहावी असं वाटणं ही सगळी या अस्थिरतेची आणि स्वप्रेमाची लक्षणं आहेत. सतत आपल्याला सुखद वाटतील अशा प्रकारच्या संवेदनांचा शोध घेण्याची मानसिकता यातून असंख्य लोकांना भेडसवून सोडताना दिसते. सातत्यानं आपल्या मोबाईलवरच्या निरनिराळ्या अॅलर्ट्सकडे लक्ष लावून बसलेलं असणं, सगळी अॅप्स वारंवार उघडून बघणं, कुणाचं काहीच आलेलं नसेल तर स्वत:हून काहीतरी पोस्ट करणं या गोष्टी अनेक लोक आपल्या आजूबाजूला करताना दिसतात. कहर म्हणजे या बाह्य गोष्टी नसून आपल्या शरीराला जोडले गेलेले अवयवच असावेत अशा प्रकारची मानसिकता या लोकांमध्ये दिसते असं मनोवैज्ञानिक म्हणतात!
आपल्या “अलोन टुगेदर” या पुस्तकात शेरी टर्कलनं मांडलेलं एक मत इथे खूप महत्त्वाचं आहे. सोशल मीडियावर जे लोक खूपच जास्त “कनेक्टेड” असतात त्या लोकांना प्रत्यक्षात खूप एकाकी वाटत असतं. कदाचित आपल्याला आतून जे जाणवतं तेच झाकण्यासाठी हे लोक सोशल मीडियावर जास्तीत जास्त सक्रिय राहण्याचा प्रयत्न करत असावेत. असे लोक फेसबुकवर वारंवार पोस्ट्स टाकणं, व्हॉट्सअॅपवर लोकांकडून प्रतिक्रिया किंवा उत्तरं मिळावीत यासाठीची संभाषणं सुरू करणं असे प्रकार करताना दिसतात. वैयक्तिक आयुष्यात काही कारणामुळे निराशा किंवा उपेक्षा पदरी आलेल्या कित्येक तरुण मुली इन्स्टाग्रॅमवर आपली छायाचित्रं टाकताना दिसतात. आपल्याला मुलांकडून प्रतिक्रिया मिळाव्यात, आपल्याला त्यांनी महत्त्व द्यावं यासाठीची ही केविलवाणी धडपड असते. इतरांच्या छायाचित्रांना जास्त प्रतिक्रिया मिळाल्या की त्यामुळे या मुलींची चिडचिड होते. त्या आणखी धाडसी छायाचित्रं टाकण्याच्या मार्गाला लागतात. तुलना आणि ईर्ष्या यांना खतपाणी घालण्यासाठी सोशल मीडियासारखं दुसरं माध्यम नाही! अनेक सर्वेक्षणांमधून हे दिसूनही आलेलं आहे. सोशल मीडियाच्या वापरामुळे लोक इतरांविषयी जळफळाटाची भावना बाळगतात हे निर्विवाद आहे.
समाजात अजिबात महत्त्व किंवा मान्यता नसलेले अनेक जण असतात. अशा लोकांना सोशल मीडियाचा मोठा आधार निर्माण झाला आहे. ते वेगवेगळ्या ग्रूप्समध्ये सामील होऊ शकतात. फेसबुकवर आपले फोटोबिटो टाकू शकतात. यामुळे आपल्याला कुणी विचारत नाही किंवा आपल्याला काहीच किंमत नाही अशी भावना ते स्वत:पुरती तरी पुसून टाकू शकतात. भले फेसबुकवरच्या त्यांच्या पोस्टला इतर कुणी लाईक करत नसल्यामुळे ते स्वत:च ती पोस्ट लाईक करत असतील! एकूणच स्वत:च्याच पोस्टला स्वत: लाईक करणं हीच एक मोठी गंमत आहे. अनेक भारतीय लोक हे सातत्यानं करताना दिसतात. यामागे फक्त नार्सिसिझम आहे का अजूनही काही हे मानसशास्त्रज्ञांनी खरं म्हणजे आपल्याला सांगायला हवं.
सोशल मीडियामुळे एकच एक प्रकारची विचारसरणी आपल्या मनात रुजायला लागते हे अनेक जणांना खूप उशिरा कळतं. मुळात आपल्या विचारसरणीशी जुळणार्या लोकांच्याच संपर्कात आपण सोशल मीडियावर वारंवार यायला लागतो. आपलं सोशल मीडियावरचं विस्तारणारं वर्तुळसुद्धा याच विचारसरणीशी घट्ट बांधल्या गेलेल्या लोकांशी आपलं आभासी नातं जोडत राहतं. साहजिकच आपले सोशल मीडियावरचे मित्र हे एकसुरी विचारसरणीचे असतात. आपण आपोआपच दुसरं काही वाचत नाही किंवा त्याविषयी चर्चा होत नाही. ठरावीक प्रकारच्या गोष्टी सातत्यानं या माध्यमांमधून आपल्या मनावर आदळत राहतात. क्लिष्ट प्रश्नांची अत्यंत सोपी उत्तरं काही लोक देत असल्यामुळे त्यांना “तज्ज्ञ” म्हटलं जाण्याची सुरुवात होते. असे असंख्य तज्ज्ञ असंख्य ग्रूप्समध्ये धुमाकूळ घालायला लागतात. आपलं माहिती मिळवण्याचं मुख्य आणि कदाचित एकमेव साधन सोशल मीडिया असलं; तर झालंच. एका विशिष्ट विचारसरणीपलीकडे आपण जाऊच शकत नाही. कुठलीही आकडेवारी वाटेल तशी आपल्यासमोर सादर करून विकास कसा झाला आहे हे नाचवलं जातं. त्याची दुसरी बाजू तपासण्याची तसदी घेण्याचा प्रश्नच नसतो. कारण ही माहिती म्हणजेच अंतिम सत्य असतं.
या सगळ्यामुळे अनेक जणांच्या मनात “फियर ऑफ मिसिंग आऊट (फोमो)”चा नवा विकार रुजला आहे. म्हणजेच आपण सोशल मीडिया आणि एकूणच इंटरनेट यांच्यापासून लांब असतानाच्या काळात तिथे नेमकं काय घडलेलं असेल याची उत्कंठा लागून राहणं आणि आपण काहीतरी महत्त्वाचं गमावलं आहे याची भीती सतावत राहणं. यामुळे आपण कुठेही असलो तरी आपल्या मोबाईलमध्ये डोकं खुपसून बसलेले असंख्य लोक आपल्याला दिसतात. खास कुणाला तरी भेटायला म्हणून गेलेलं असतानाही लोक आपल्या मोबाईलमधल्या “अॅलर्ट्स” बंद करत नाहीत. साहजिकच संभाषणात व्यत्यय येत राहतो. त्याची बरेचदा काही खंतही वाटत नाही. नाटक, चित्रपट, भाषण सुरू असताना सार्वजनिक ठिकाणी लोक मोठमोठ्यांदा आपल्या मोबाईलवर बोलतात. त्यांच्या मोबाईलच्या पडद्यावरच्या नुसत्या उजेडामुळे इतर लोकांना त्रास होतो. अनेक भारतीय लोकांना आपल्या या वागण्याची अजिबात खंत वाटत नाही. तिथेही व्हॉट्सअॅप उघडून त्यांचं महत्त्वाचं संदेशवहन सुरू राहतं.
व्हॉट्सअॅपला तर असंख्य भारतीय लोक दूषणं देतात. “मला या व्हॉट्सअॅपचा जाम कंटाळा आला आहे” असं म्हणणारे खूप लोक वारंवार भेटतात. गंमत म्हणजे असं असूनही ते व्हॉट्सअॅप वापरतच राहतात. यामागे मुख्यत्वे “फोमो”च असतो. कदाचित स्वत:च्या मनाला फसवून उगीचच वरवर “मला हे सगळं खरं म्हणजे आवडत नाही” असं म्हणायचं; पण प्रत्यक्षात मात्र या सवयीतून सुटका होणं अशक्य असल्याचं आतून मान्य करायचं असाही हा प्रकार असावा. तसंच अनेक जण इतरांच्या व्हॉट्सअॅप वापराविषयी तक्रार करत असले तरी स्वत:ही काही अंशी तेच करतात. “गुड मॉर्निंग”, “गुड नाईट” या व्हॉट्सअॅपवरच्या भारतीय संदेशांचा तर खुद्द व्हॉट्सअॅप कंपनीलाच वैताग आला आहे! या संदेशांमुळे व्हॉट्सअॅप अनेकदा खूप सावकाशीनं चालतं असं कंपनी म्हणते! भारतीय लोक अशा प्रकारे जागतिक पातळीवरच्या संदेशवहन व्यवस्थेवर आपला ठसा उमटवत आहेत. मेसेजेस फॉरवर्ड करत राहणं हा तर बर्याच जणांचा जन्मसिद्ध हक्कच असतो. तसंच असंख्य ग्रूप्सवर एकच संदेश पाठवणं आणि अनेक जण त्यामधल्या अनेक ग्रूप्सवर असल्यामुळे त्यांचा तळतळाट सहन करणं याचे भोगही त्यांना भोगावे लागतात. ज्या व्यक्तीचा वाढदिवस असेल त्याच्या अभिष्टचिंतनासाठी त्या दिवशी एक नवा ग्रूप तयार केला जातो! एकमेकाविषयीचं एवढं प्रेम जगात इतरत्र कुठेही नसेल. फुलांचे मोठमोठे गुच्छ, असंख्य कविता, मोबाईलच्या पडद्यावर इकडून तिकडे पळणार्या चित्रविचित्र आकृत्या यांचं थैमान सुरू असतं. प्रत्यक्ष शुभेच्छा मात्र “एचबीडी” अशा शक्य तितक्या कमी अक्षरांमध्ये दिल्या जातात. बहुतेक वेळा तर काहीच टाईप केलं जात नाही; नुसत्या “कट-पेस्ट”वर भागतं.
अनेक लोकांना मानसिक आजार, निद्रानाश, ताणतणाव यांचा सामना सोशल मीडियामुळे करावा लागत असल्याचं चित्र ठळकपणे दिसायला लागलं आहे. कित्येक जणांना निद्रानाशाचा विकार जडला आहे. रात्री न झोपता किंवा झोपेत मध्येच उठून सोशल मीडियावर काय घडलं हे कित्येक लोक तपासतात. अनेक जण दिवसभर थकल्यासारखे असतात. त्यांची झोप अपुरी असते किंवा सातत्यानं मन सोशल मीडियाच्या विश्वात रममाण झालेलं असल्यामुळे त्यांचं मन स्थिरावलेलं नसतं. सातत्यानं ते आपल्या मुख्य कामाऐवजी त्या विश्वातच असतात. शारीरिक व्यायाम करण्यासाठीचा उत्साह आणि त्यासाठीचा वेळ बर्याच जणांकडे नसण्याचं कारण सोशल मीडियाला चिकटून बसण्याचं असतं. यामुळे असंख्य आजार आणि लहान मुलांमध्येही स्थूलतेसकट असंख्य समस्या हे चित्र अगदी छोट्या गावांमध्येही आढळतं आहे. अगदी पाचवी-सहावीमधलीही मुलंमुली सर्रास फेसबुक, व्हॉट्सअॅप, इन्स्टाग्रॅमवर वावरताना दिसायला लागली आहेत.
“सायबर बुलिंग” हा भयानक प्रकारही आपल्याकडे वाढीला लागलेला आहे. सोशल मीडियाचा वापर करून सुरुवातीला ओळख निर्माण करणं आणि हळूहळू या ओळखीचा वापर धमक्या देण्यासाठी करणं ही नवी गुन्हेगारी शाखा आता नवी आव्हानं निर्माण करताना दिसते. यात फेसबुकवरून पैसे मागणं, फसवणूक करणं, लग्नाची खोटी आश्वासनं देणं, व्यावसायिक फसवणूक करणं असे असंख्य प्रकार अक्षरश: दररोज घडताना दिसतात. याला “ब्ल्यू व्हेल” आणि इतर भयंकर गेम्सची साथ मिळाली की काय घडू शकतं हे आपण अलीकडेच अनुभवलेलं आहे. अनेक तरुणी अनोळखी लोकांच्या सोशल मीडियावरच्या गोड बोलण्याला फसून आपलं सर्वस्व गमावून बसलेल्या आहेत. काहींवर विश्वासानं आपली खाजगी माहिती, छायाचित्रं, व्हीडिओ अशा गोष्टी भामट्यांच्या हवाली करून पस्तावण्याची वेळ आलेली आहे. याखेरीज प्रत्यक्ष आयुष्यातलं “रॅगिंग” इंटरनेटवरूनही होण्याची असंख्य उदाहरणं आता दिसायला लागली आहेत. म्हणजेच शाळेत एखाद्या मुलाला सातत्यानं घालून पाडून बोलणार्यांचा “दादा” वर्ग आता सोशल नेटवर्किंगवरूनही त्या मुलाला अक्षरश: जगणं नकोसं करून सोडतो. यातून मुलांनी आत्महत्या करण्यापर्यंतच्या करूण घटना भारतात अनेक शहरांमध्ये घडायला लागल्या आहेत. मुळात मुलांच्या हाती अजाणत्या वयात स्मार्टफोन देण्याची चूक केल्यामुळे हे घडल्याचं भारतीय पालकांना खूप उशिरा आणि वेळ हातून निघून गेल्यावर समजतं आहे.
बंगलोरच्या तंत्रज्ञानाविषयीच्या व्यसनांपासून मुक्ती मिळवण्यासाठीच्या केंद्रामध्ये नव्या रुग्णांसाठी जागा शिल्लक नसल्याचं विदारक सत्य आपण स्वीकारलं आहे. इतरही मानसोपचार केंद्रांमध्ये अशीच परिस्थिती आहे. घरोघरी सोशल मीडिया, मोबाईल यांच्या वापरावरून ताणतणाव आहेत. अनेक घरांमध्ये परिस्थिती गंभीर होत चालली आहे. मुलांचे या संदर्भातले हट्ट आणि त्याच तंत्रज्ञानाच्या वापरामध्ये अडकलेली मोठ्या माणसांची पिढी यांचं दुश्चक्र कोण आणि कसं मोडणार हे असंख्य भारतीय कुटुंबांना समजत नसल्याचं दृश्य भयावह आहे. कुटुंबातल्या एकमेकांनी इतरांचं “लास्ट सीन” चेक करायचं, इतरांचे फोन चोरून बघायचे, एकमेकांच्या सोशल मीडियाच्या वापराविषयी संशय घ्यायचा ही आदर्श कुटुंबपद्धती म्हणायची का?
एकमेकांचं “स्टेटस” चेक करण्यात व्हॉट्सअॅपवाले तासनतास घालवतात. आपल्या स्टेटसला सगळ्यांनी ओंजारलं गोंजारलं पाहिजे अशी अपेक्षा असल्यामुळे आपणही इतरांच्या स्टेटसचं कौतुक करायचं अशी एक पद्धत आता रुजली आहे. प्रत्यक्षात दुसर्याचं स्टेटस बघून “ई – किती जाड झाली आहे?”, “बाप रे – असे कपडे घालून कुणी फोटो काढतं का?”, “कुठून तरी ढापलंय हे!”, “किती कुरूप?” अशा प्रतिक्रिया मनात उमटलेल्या असतात. तोंडातून त्या बाहेरही पडतात. टाईप करताना मात्र “अप्रतिम”, “छान”, “सुरेख” किंवा नुसतेच अंगठे असा दुतोंडी प्रकार असतो. आपल्या स्टेटसविषयी इतर लोकही असंच करत असतील अशी अपराधी भावना मनात असूनसुद्धा ती दाबून टाकून हा प्रवास सुरू राहतो.
आपले खायचे आणि दाखवायचे दात वेगळे असतात अशा अर्थाची एक म्हण आहे. इंटरनेट आणि सोशल मीडिया या माध्यमांवर तर हे तंतोतंत खरं आहे. प्रत्यक्ष आयुष्यात अत्यंत सभ्यपणे वावरणारे आणि अनेक बाबतींमध्ये जवळपास उपदेशी सूर असणारे अनेक लोक या माध्यमांवर आपल्या खर्या रूपात वावरतात. अशा आभासी जगात काही ठिकाणी ते आपली ओळख दाखवून असभ्यपणे वावरतात तर काही ठिकाणी ते बनावट आयडी वगैरे तयार करून वावरतात. आपल्या मूळ संकल्पनांना काहीही करून चिकटून राहणं, आपण आणि विरोधक असे गट उभे करून सातत्यानं भांडत राहणं, वाटेल त्या थराला जाऊन विरोधकांवर टीका करणं अशा अनेक गोष्टींचं त्यांना काहीही वाटत नाही. अनेकदा प्रत्यक्ष आयुष्यातले चांगले संबंध सोशल मीडियावरच्या अशा प्रकारांमुळे बिघडत चालल्याची उदाहरणं दिसायला लागली आहेत. नातेवाइकांमध्ये तसंच मित्रांमध्ये राजकीय, सामाजिक अशा गोष्टींवरून होत असलेल्या वादांमुळे विनाकारणच कटुता वाढत चालली आहे. ज्या गोष्टी न बोलता आपण प्रत्यक्ष आयुष्यात टाळतो त्या सोशल मीडियावर खोदून खोदून काढल्या जातात आणि यामुळे दुरावा वाढतो असं वारंवार दिसायला लागलं आहे. आपल्याला वाटत असलेला एखादा माणूस प्रत्यक्षात एकदम वेगळा आणि भलताच असल्याचंही कित्येकदा जाणवतं आहे. लोकांनी स्वत:भोवती निर्माण केलेला बुरखा लोक स्वत:च सोशल मीडियावर टराटरा फाडून टाकत असल्याचं धक्कादायक दृश्य बघायला मिळतं आहे. खायचे आणि दाखवायचे दात सोशल मीडियावर एकच असल्याचं मोठ्या प्रमाणावर दिसायला लागलं आहे.
लोकांचे मेंदू साफसूफ करून आपल्याला हवी ती विचारसरणी रुजवण्यासाठी सोशल मीडियासारखं दुसरं चांगलं माध्यम नाही याची राजकारण्यांना पुरेपूर जाणीव आहे. साहजिकच पारंपारिक माध्यमं पूर्णपणे टाळणं, त्यांची विश्वासार्हता संपुष्टात येईल यासाठी त्यांना विकत घेणं किंवा संपवून टाकणं, सतत प्रचारकी थाटात आपला खोटारडेपणा बिंबवत राहणं ही निवडणूक जिंकण्याची आता कला झाली आहे. खोटारडेपणा पसरवत राहण्यासाठी सोशल मीडियावर भल्यामोठ्या टीम्स उभ्या करणं आणि त्यांच्याकरवी लोकांवर प्रभाव टाकणं हा राजकारण्यांच्या हातचा मळ झाला आहे. हेच तंत्र विद्वेश आणि अफवा पसरवून सामूहिक हत्या घडवून आणणार्यांनीही यशस्वीपणे वापरलं आहे.
म्हणूनच “सोशल मीडिया” हे केव्हाच “अॅंटि सोशल” झालेलं आहे. “न्यूज” जशी “फेक न्यूज” झाली आहे; तसंच!
(लेखक सोशल मीडिया , माहिती तंत्रज्ञान या विषयावर संशोधनात्मक लेखन करतात . त्यांची अनेक पुस्तकं प्रकाशित झाली आहेत)
akahate@gmail.com)