Home ताजे वृत्त मेळघाट भ्रमंती : तुकईथडची हडळ

मेळघाट भ्रमंती : तुकईथडची हडळ

 -अशोक मानकर  
अकोला ते खांडवा रेल्वेमार्गावर अकोटपासून ६७ किमी अंतरावर तुकईथड नावाचं स्थानक आहे.
माझं जन्मगाव अकोट तालुक्यात आहे. अकोलखेड नावाचं.
माझ्या लहानपणी या गावात ज्या पारावरच्या गप्पा असत त्या अत्यंत चित्तवेधक राहत आणि यात अधूनमधून भुताखेतांचे विषय असत.
यातलीच एक मला अजूनही आठवणारी गोष्ट म्हणजे तुकईथडच्या हडळीची कर्म कहाणी.
साधारणतः पन्नासेक वर्षांपूर्वी तुकईथडनजिक रेल्वे लाईन वर एक बाई रेल्वेखाली कटून मरण पावली होती.
ती कोण होती, कुठली होती, तिनं जीव दिला होता, की कुणी ढकललं होतं, का ती रेल्वेतून पडली होती याबद्दल काहीच माहिती नव्हती.
पण अपघाती मृत्यू आल्यामुळे ती भूत (हडळ) बनली.
बनली आणि तुकईथडच्या आसपास रानोमाळ भटकू लागली.
बाई गोरीपान नि दिसायला खूप सुंदर होती.
तुकईथडच्या लगतच्या गावात एक मांत्रिक राहत होता.
ही हडळ एके दिवशी त्याच्या दृष्टीस पडली.
मांत्रिक असल्यामुळे त्यानं क्षणात ओळखलं, ही हडळ आहे.
पण तिच्या आरसपानी सौंदर्यानं तो एवढा घायाळ आणि मोहीत झाला, की हडळ असली तरी लग्न करेन तर हिच्याशीच असा त्यानं निर्धार केला.
तो तिच्या मागे पुढे फिरत तिचं मन जिंकण्याचा प्रयत्न करू लागला.
खूप प्रयत्न झाल्यावर गालात हसत तिनं त्याला कौल दिला.
दोघांचं प्रेम फुलू लागलं.
बहरू लागलं.
एके दिवशी मांत्रिकानं तिच्यासमोर प्रस्ताव मांडला. “आपण लग्न करू आणि संसार थाटू.”
हडळ विचारात पडली. कारण तिला कायम मानवी योनीत राहणं शक्य नव्हतं.
पण याचं आपल्यावर मनोभावे प्रेम आहे हे पाहून तिनं होकार दिला आणि विचार केला, की काही दिवस याचे सोबत राहू आणि मग अलगद निघून जाऊ.
दोघांनी रितसर लग्न केलं.
संसार सुरू झाला.
सगळं व्यवस्थित सुरू होतं
अधूनमधून हडळ मध्यरात्री अचानक उठायची बाहेरून फिरून यायची.
मांत्रिकाच्या हे लक्षात आलं.
न जाणो, ही आपल्याला सोडून गेली तर?
आपण तिचा विरह सहन करूच शकणार नाही. या जाणिवेनं तो अस्वस्थ झाला.
पण मांत्रिक शेवटी मांत्रिक होता.
त्याला एक से एक टोणके माहीत होते.
त्यानं एके रात्री तिच्या डोक्यातलं हातात आलेलं केस मुठीत दाबून ठेवलं आणि सकाळी उठल्यावर तिच्या नकळत एका कुपीत बंदिस्त केलं.
ही कुपी कुणाच्या नजरेस पडणार नाही अशा ठिकाणी गाडून ठेवली.
दरम्यान दोघांचा सुखाचा संसार सुरू होताच.
विशेष म्हणजे त्यांच्या संसारवेलीवर एक मुलगा आणि एक मुलगी अशी दोन अपत्ये झाली.
नंतर काय झालं कुणास ठाऊक.
हडळ एके रात्री बाहेर गेली.
पण परत काही आली नाही.
दोन दिवस उलटले.
मांत्रिकाला याची कल्पना होतीच.
तो तिच्या परतीची वाट पाहत बसला.
झालंही तसंच.
तिसऱ्या दिवशी ती परत आली.
मांत्रिक काहीच बोलला नाही.
ती ही बोलली नाही आणि काही झालंच नाही अशा थाटात ते पुन्हा एकमेकांत रममाण झाले.
मांत्रिक हा मांत्रिक होता हे जेवढं खरं होतं, तेवढंच हे पण सत्य होतं, की हडळ पण जातिवंत हडळ होती. शिवाय ती नारी होती.
तिनं यथास्थित कारण पुढे केलं. माझ्या डोक्यात कसंतरीच होत आहे.
कारण माझं एक केस हरवलं आहे.
मांत्रिक तिच्यासोबत ते शोधण्याचं नाटक करू लागला.
हडळ कमी नव्हती.
ती त्याच्या इतकी मागं लागली, की एवढं शोधूनही सापडत नाही, तर ते तुम्ही तर कुठं दडवून ठेवलं नाही ना?
असेल तर द्या ना. आणि मी का तुम्हाला सोडून जाणार आहे का?
अखेर तिच्या याचनेला मांत्रिक बळी पडला.
त्यानं केस परत केलं.
हडळ आनंदित झाली.
आणि त्याच रात्री ती जी निघून गेली ती परत आलीच नाही.
मांत्रिकाला पच्छाताप झाला.
तो शोक करत बसला.
नंतर काहीच दिवसात त्यांची ती दोन लहान मुलेही रात्रीची बेपत्ता झाली.
ती पण परतली नाहीत.
मांत्रिक आता भ्रमिष्टासारखा वागू लागला.
पुढे त्याला वेड लागलं आणि यातच त्याचा अंत झाला.
अशा तऱ्हेनं हे कुटुंब तर संपलं पण ती हडळ आणि तिची मुले तुकईथड ते पोपटखेड पर्यंतच्या जंगलात कोणेकांना दिसू लागली.
पोपटखेड माझ्या गावापासून अगदी जवळ आहे. या दोहोंच्या मध्ये तेव्हा सागाचं घनदाट जंगल होतं.
आमच्या गावातला गोपाळा गुराखी या जंगलात गुरं चारायला न्यायचा.
या गोपाळाला ही मायलेकरे अधूनमधून दिसत असत.
गोपाळा ही गोष्ट खूप सुंदर पद्धतीनं रंगवून सांगायचा.
गोपाळाचा माझ्यावर विशेष लोभ होता.
मी म्हणेल तेव्हा तो ही गोष्ट मला सांगत असे.
गोपाळा आता हयात नाही. त्याला जाऊन पंधरा एक वर्षे झाली.
पण गावात आता गोपाळासारखी माणसे नाहीत.
सगळं कसं ओस पडल्यासारखं झालं आहे.
(अशोक मानकर नामवंत कथा लेखक आहेत)
8087105357
Previous articleजनानखान्यांचे अद्भुत विश्व!
Next articleUntold stories of Melghat : एकटी राहिलेली ब्रिटिश लेडी
Team Media Watch
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Don`t copy text!