अजित पवारांचा सर्जिकल स्ट्राईक

– प्रवीण बर्दापूरकर
म्हाला शिकवलेली राजकीय पत्रकार आणि भाष्यकारानं पाळावयाची पथ्ये-

= राजकारणात दोन अधिक दोन चार असं कधीच नसतं आणि अंतिम ध्येय सत्ता संपादन असतं . त्यामुळे एखादी राजकीय घटना किंवा कृती पूर्ण होईपर्यंत भाष्य करु नये , भाकितं व्यक्त करु नयेत , भाविष्य वर्तवू नये तर फक्त बातमी द्यावी .

= त्याचा किमान कांही नेत्यांशी थेट संपर्क असावा म्हणजे नेमकी माहिती मिळते मात्र मिळणारी प्रत्येक माहिती बातमी नसते .

= शरद पवार जे बोलतात ते करत नाहीत आणि जे बोलत नाहीत ते सर्वात आधी करतात .

= शिवाय दिवाळी संपल्यावर देवेंद्र फडणवीस यांच्याशी झालेला माझा संवाद जशाचा तसा देतो कारण तो एसएमएसद्वारे झालेला आहे आणि अजून डिलीट केलेला नाही –

प्रश्न- तुमच्या म्हणण्याप्रमाणे राज्यात भाजप सरकार येणार कधी ? This is strictly between you and me .

देवेंद्र फडणवीस – May take a month .

प्रश्न- बाप रे ! इतका दुरावा निर्माण झालेला आहे ?

देवेंद्र फडणवीस यांनी प्रश्नाच्या उत्तरादाखल ओठ बंद असलेल्या दोन प्रतिमा पाठवल्या !

अनेकांचे गैरसमज झाले तरी ही पथ्ये आणि हा संवाद यामुळे सरकार स्थापन झाल्याशिवाय कोणतंही भाष्य न करण्याचं टाळलं , त्यामुळे मी तोंडघशी पडलो नाही .

आज सकाळी भाजप आणि अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या एका गटाने महाराष्ट्रात सरकार स्थापन केलेलं आहे . देवेंद्र फडणवीस सलग दुसऱ्यांदा राज्याचे मुख्यमंत्री आणि अजित पवार तिसऱ्यांदा उपमुख्यमंत्री झालेले आहेत . या दोघांनी रात्रीतून बहुमताचा दावा केला , तो राज्यपालांनी मान्य केला , राष्ट्रपती राजवट उठवली गेली आणि शपथविधीही पार पडला…हे सगळं इतक्या वेगात आणि एका रात्रीत घडलं की ते एक स्वप्न वाटावं . हा वेग भारतीय क्रिकेट संघातील सध्या सुरु असलेल्या बांगला देश विरुद्धच्या कसोटी सामन्यात ५ गडी बाद करणाऱ्या वेगवान गोलंदाज इशांत शर्मा याच्या गोलंदाजीच्या वेगाला लाजवणारा आणि म्हणूनच आश्चर्यचकित करणारा ठरला ! महाराष्ट्राच्या राजकारणात झालेला हा मोठा भूकंप आहे आणि त्याचे पडसाद दीर्घकाळ उमटत राहणार आहेत .

वर उल्लेख केलेल्या पथ्यांचा विचार केला तर पहिली बाब म्हणजे हे सरकार स्थापन होण्याबाबतच्या बातम्यांच्या संदर्भात माध्यमे चक्क तोंडावर आपटली आहेत आणि एकूणच माध्यमांच्या विश्वासार्हतेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आलेला आहे . यातून पाहिलं म्हणजे, शिवसेनेचे खासदार संजय राऊत याना चाणक्य/शिल्पकार ठरवण्याची माध्यमांची ‘old man in hurry for…सारखी घाई ( पुन्हा एकदा ) अंगलट आलेली आहे . दुसरं म्हणजे नेमकी बातमी शोधण्यापेक्षा तथाकथित सूत्रांच्या हवाल्यांनं नको पतंगबाजी करण्यात , भाकितं करण्यात आणि भविष्य वर्तवण्यात विशेषत: प्रकाश वृत्त वाहिन्या गुंतल्या आणि तोंडघशी पडल्या पण यातून कोणताही धडा ही माध्यमे घेणार नाहीत आणि यापुढेही त्यांचं वागणं असंच पिसाटल्यासारखं सुरु राहणार , असाच आजवरचा अनुभव आहे .

शरद पवार राजकारणी म्हणून बेभरवशाचे आहेत हे पुन्हा एकदा सिद्ध झालं . अजित पवार यांच्या बंडानं सर्वात मोठी नामुष्की शरद पवार यांच्याच वाट्याला आलेली आहे . राष्ट्रवादीच्या गोटात कांही तरी वेगळं शिजतं आहे याचा वास घेण्यात माध्यमही साफ अयशस्वी ठरली . आम्हाला विरोधी पक्षात बसण्याचा कौल मिळाला आहे असं ते जेव्हा म्हणाले तेव्हाच मनात पाल चुकचुकली की ‘दया, कुछ तो गडबड हैं’ . मग शरद पवार यांनी राज्यात राष्ट्रवादी , कॉंग्रेस आणि शिवसेनेची मोट बांधण्याचा प्रयत्न सुरु केला तरी धोरण मात्र आस्ते कदम ठेवलं . पवार यांच्या सरकार स्थापन करण्याच्या संदर्भातल्या हालचाली आणि वक्तव्ये परस्पर विरोधी होती ( ती पवार भक्त पत्रकारांना नेहेमीप्रमाण चाणक्य नीती वाटली आणि दररोज पवार भक्तीची एक तरी कमेंट टाकल्याशिवाय त्यांचा घास घशात उतरेनासा झाला ! ) ‘सरकार स्थापनेसाठी भाजपला पाठिंबा देण्याच्या अजित पवार यांच्या निर्णयाला राष्ट्रवादी कॉंग्रेसचा पाठिंबा नाही’ असं ट्वीट शरद पवार यांनी केलं आहे . शरद पवार यांनी हे ट्वीट केलंय ते सकाळी ७ वाजून ५७ मिनिटांनी ( या वेळेबाबत पवार भक्त वेगवेगळी स्पष्टीकरणं देतील आणि वाद घालतीलच ! ) आणि नव्या सरकारचा शपथविधी झाला सकाळी ८ वाजता ! या ट्वीटमधे ‘बिटवीन द लाईन्स’ वाचण्यासारखं कांही आहे . नूतन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भाजपला पाठिंबा देण्याच्या कृतीला राष्ट्रवादी कॉंग्रेसचा पाठिंबा नाही हे खरं पण , शरद पवार यांना हा निर्णय माहिती असण्याबाबत मात्र ‘सूचक मौन’ पाळण्यात आलेलं आहे . ट्वीटची वेळ आणि हे सूचक मौन लक्षात घेता अजित पवार यांच्या या निर्णयाबाबत शरद पवार अनभिज्ञ होते किंवा आहेत असं मुळीच म्हणता येणार नाही .

यावरुन शरद पवार यांनी १९७८साली कॉंग्रेसचे वसंतदादा पाटील यांच्या नेतृत्वा खालील सरकार पाडण्याच्या कृतीची आठवण झाली . त्यावेळी शरद पवार यांचे राजकीय गुरु आणि गॉड फादर यशवंतराव चव्हाण यांचाही वसंतदादा सरकार पडण्याच्या कृतीला पाठिंबा नव्हता पण , शरद पवार यांच्या वसंतदादा पाटील यांचं सरकार कृतीबद्दल यशवंतराव अनभिज्ञ मात्र मुळीच नव्हते . अगदी तस्सच यावेळी घडलं आहे . महाराष्ट्राच्या राजकारणात ते सरकार पाडण्याची कृती शरद पवार यांनी वसंतदादा पाटील यांच्या पाठीत खंजीर खुपसला म्हणून गाजली होती . अजित पवार यांच्या भाजपला पाठिंबा देण्याच्या या २०१९ मधील कृतीलाही ‘काकाच्या पाठीत पुतण्यानं खंजीर खुपसला’ असं संबोधता येईल . मात्र , त्यासंदर्भात काका अनभिज्ञ होते असं मात्र मुळीच म्हणता येणार नाही . अजित पवार यांच्या या कृतीनं खंजीर खुपसण्याचं एक आवर्तन पूर्ण झालेलं आहे , असंही तर म्हणता येईल . शिवाय खंजीर म्हणजे , आमदारांच्या सह्यांचं पत्र राष्ट्रवादी कॉंग्रेसनंच अजित पवार यांच्या हाती सोपवलेलं होतं हेही विसरता येणार नाही . आणखी एक म्हणजे , वसंतदादा पाटील यांचं सरकार पाडण्याच्या म्हणजे शरद पवार यांच्या त्या कृतीचं जे समर्थन करतात त्यांनी अजित पवार यांच्या कृतीला विरोध करणं हा निव्वळ दुटप्पीपणा आहे .

अजित पवार यांच्या निर्णयातून अनेक पेच निर्माण होणार आहेत ; दूरगामी परिणाम होणार आहेत . विधानसभेवर विजयी झालेले जे सदस्य राष्ट्रवादी कॉंग्रेसमधून फुटले आहेत त्यांच्याबाबत पक्षांतर बंदीच्या कायद्याच्या अनुषंगानं कीस काढला जाणार आहे , कोर्ट कचेऱ्या होणार आहेत आणि त्यात बराच वेळ जाणार आहे . नवीन सरकारलाही स्थैर्यासाठी खूप मोठी कसरत करावी लागणार आहे . या सरकारचा खरा कस विधानसभेचा अध्यक्ष निवडतांना लागणार आहे . विधानसभा अध्यक्षाची निवड करण्यात जर भाजप आणि अजित पवार गट यशस्वी झाला तर मग मात्र पहिली लढाई जिंकून मैदान बऱ्याच अंशी साफ होईल अन्यथा ३० नोव्हेंबर नंतर हे सरकार अस्तित्वात नसेल हे नक्की .

राज्यात सरकार स्थापनेच्या शिवसेना , कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीच्या मनसुब्यांना अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी सुरुंग लावलेला आहे एवढाच या घटनेचे परिणाम सीमीत नाहीत . या निर्णयामुळे हे तीनही पक्ष आणि त्यांच्या नेत्यांवर ‘सर्जिकल स्ट्राईक’ झालेला आहे . हे नेते सत्ता मिळवण्यासाठी किती उतावीळ झालेले आहेत हेच समोर आलेलं आहे . त्यातही शिवसेनेची अवस्था तर ‘गाढव गेलं आणि ब्रम्हचर्यही गेलं’ अशी झालेली आहे . आजवरच्या राजकीय जीवनात शिवसेनेची इतकी नामुष्की आणि पीछेहाट कधीच झालेली नव्हती . भाजपची साथ सोडण्याचा निर्णय हा केवळ हट्ट आहे , त्यात समंजसपणा नाही . आधी आपली ताकद वाढवावी आणि मगच युती तोडावी मात्र कॉंग्रेस सोबत जाऊ नये अशी भूमिका सेनेच्या अनेक ज्येष्ठ नेत्यांची असल्याचं त्यांच्याशी बोलतांना जाणवलं होतं . पण , संजय राऊत नावाचा ‘एच.एम.व्ही’ वारु वेगात दौडत निघालेला होता . वेगावर नियंत्रण नाही ठेवलं की अपघात होतो हेच या वारुनं दाखवून दिलंय .

सरकार स्थापनेबाबत दोन आठवड्यापूर्वीच्या लेखात म्हटलं होतं , राजकारण्यांच्या या वागण्याचं मुळीच आश्चर्य नाहीये कारण सर्वपक्षीय राजकारणी केवळ सत्तेचाच विचार करतात आणि ती मिळवण्यासाठी राजकीय विचार , तत्व , निष्ठा , साधन शुचिता , नैतिकता खुंटीला टांगून कोलांट उड्या मारत असतात ; लोकशाही वाचवणं , धर्मांध शक्तीला विरोध , अमुक तमुकच्या हितासाठी , निवडणुकीतील आश्वासने ही धूळफेक असते , असा गेल्या चाळीस वर्षांच्या पत्रकारितेत असंख्य वेळा आलेला अनुभव आहे . भारतीय जनता पक्ष आणि अजित पवार गटाचं वागणं काय किंवा शिवसेना-कॉंग्रेस-राष्ट्रवादी एकत्र येणं काय त्या म्हणण्याचं समर्थन करणारं आहे . सरकार स्थापनेचा जो कांही खेळ एका रात्रीतून झाला त्यामुळे देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार महाराष्ट्राच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी आलेले आहेत . ते या केंद्रस्थानी राहतात की बहुमताची लढाई हरतात हे ३० नोव्हेंबर नंतरच स्पष्ट होणार आहे .

-(लेखक जेष्ठय संपादक व राजकीय विश्लेषक आहेत)
9822055799

Previous articleइस दिल-ए-तबाह को, किसीं…..
Next article95000 करोड़ के आरोपी को मोदी ने बना दिया महाराष्ट्र का उप मुख्यमंत्री
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here