अशोक थोरात :चैतन्याच्या चार गोष्टी

+++
हे आहेत अमरावतीचे अशोक थोरात.
वाटत नाही हा चेहरा कुठंतरी पाहिलाय कधी?न झाकणा-या माणसाची ही मुखवटा नसलेली मुद्रा.असो.मस्त मनसोक्त कवी.जगण्यातली जिंदादिली जिवापाड जपणारा माणूस.माणसाची कविता त्याचं निखळ,निरंतर व्यंग हाताशी ठेवून लिहिणारा सर्जक.व्यंगाचीच निघाली गोष्ट.तर हा बहाद्दर नाही झाकत स्वतःचं व्यंग वरपांगी शब्दांनी.हा गडी होता बारूकसा.तेव्हा अंगावरून गेलं वारं.आणि हातापायांनी दिला दगा.कमरेपासून पायांचं अवसान गेलं किंचित करपून.तेव्हापासून गडी चालायला लागला फेटकत.हातांना आणि जिभेलाही सोडेल तो लकवा कसला.हे सगळं घडूनही काहीच बिघडवू न देण्याच्या अटीवर जगला हा गडी.जगला असा की भल्याभल्यांनाही पडावा पेच.आतून बाहेरून भरलेला शिगोशिग आत्मविश्वास पांघरून घातला गड्यानं साठीचा प्रवास पायथा.
+++
अमरावतीच्या शासकीय महाविद्यालयात मराठीचा अध्यापक म्हणून सगळ्या अपंगत्वावर मग्रुरीनं मात करीत जगला जातीवंत कलावंतासारखा.साहित्य आणि जवळपास सगळ्याच कलांचं काळीज कातून घेत राहिला कलंदरासारखा.तसा हा एका अर्थानं कलंदरच.जगण्याचा प्रवाह नितळपणातूनच नितांत सुंदर होत असतो ही  धारणा धरून ठेवताना लोक काय म्हणतील या धास्तीनं कधीच धास्तावला नाही गडी.उंची जेमतेम,शरीरयष्टी किरकोळ.तरीही वागणं जगणं बहाद्दरासारखं.एक मात्र खरं.नाहीच पडू दिलं या माणसानं मनाच्या मखरात फाटक्या,कुजक्या  मतलबाचं बियाणं.नाहीच होऊ दिली दलदलीला जीव लावणारी जातीपातीची रोगीट उगवण.हा माणूस वरून जितका नेक आहे त्याच्या दसपट आतल्या नेकीचा प्रवाह नवाकोरा ठेवणारा.कोणाविषयी कपटबुध्दी नाही.करपट वासाच्या आरबट गोष्टी नाहीत.कोणाच्या अपरोक्ष टिंगलटवाळी करणं कधीच नाही मानवलं .इतका हा मनानं आणि विचारानंही स्वच्छ माणूस.मैत्रभाव कसा जपावा.गुणदोषासकट एखाद्याला कसं स्विकारावं ते ही शिकावं याच माणसाकडून.बुध्द बुध्द म्हणून आपण भटकतो भलत्याच भौगोलिक प्रदेशात.खरा बुध्द असतो अशाच एखाद्या अशोकाच्या अंतःकरणात आपल्या अलौकिकतेसह.अन्यथा काठोकाठ ओसंडून वाहणारी करुणा दिसलीच नसती अशा अभावग्रस्त अंगणात.
+++
अशोक थोरात हा केवळ मुलांना मराठी शिकवणारा मास्तर नाही.प्रचंड वाचन.वाचन-चिंतनातून चिरेबंद होत गेलेल्या धारणा.वागणं आणि जगणं यांचा अन्वयार्थ थोर करणारी वस्तुनिष्ठ वृत्ती.विचाराच्या ठिकाणी विचार आणि भावनेच्या ठिकाणी भावना याचं नीट आकलन बांधता येईल इतकी आरोग्यदायी वर्तणूक.माणूस हा सगळ्यात मोठा.माणूस उभा राहिला पाहिजे हा अट्टहास.माणूस कसा रचता येईल.रचलेला माणूस कसा टिकवता येईल या ध्यासानं धोपट झालेली जिगरबाज विचारधारा.
आपल्या स्वार्थासाठी व्यवस्थेनं जागोजाग उभे केलेले अडसर उध्वस्त करणं,त्यांची तालेवारी तासून काढणं ह्या गोष्टी सर्जक म्हणून त्यांनी नेहमीच तातडीच्या मानलेल्या. ल्हाचर माणसाच्या जगण्यातील विसंगती  टिपताना कधीच दमली नाही या माणसाची लेखणी.चार ओळीत चारधाम करण्याची कुवत कमावलेली त्यांची कविता आहे.त्यांच्या कवितेच्या दोन तीन ओळीच खडबडून जाग आणतात.’अरे व्वा. हे तर मलाच सांगायचं होतं’असा अस्फूट उद्गार वाचक-श्रोत्यांच्या बाजुनं कमावतात.विनोदाच्याअंगानं वास्तवाला उघडं करण्याचं आरकाट सामर्थ्य अशोकरावांच्या कवितेत आहे जरूर.
या कवीचं सादरीकरणही अफलातून.हा माणूस कलंडत कलंडत मंचावर उभा राहिला की लोक बघत रहाणार.’मित्रहो,काय बघताय माझ्याकडं.हे बघा त्या बाप्प्यानं मला किती ठिकाणी वाकडं केलं.आता तो माझं काय वाकडं करणार?’असं म्हणून भात्यातलं अस्त्र काढणार.प्रेयसीच्या पालखीत बसवणार.गोड गंमतीच्या गप्पा करत करत आधी श्रोत्यांची करंगळी अन् पुढे मग चक्क मान पकडणार.तेवढंच हसायचं आणि तेवढंच अंतर्मुख व्हायचं. अशी किमया करणारी कविता लिहिली अशोक थोरातांनी.महाराष्ट्रभर फिरत राहिला हा कवी कवितेच्या प्रेमापोटी.आपण अपंग,दिव्यांग वगैरे आहोत या जाणिवेचं जोखड कधीच जोजवलं नाही या माणसानं हयातीत.मैत्रभाव जीवापाड जपणारा,अनुभवांची भरमसाठ समृध्दी लाभलेला हा प्रतिभावंत गप्पागोष्टी करण्यातही तेवढाच तरबेज.
+++
अशोक थोरात अमरावती सोडून आता पुण्यात स्थायीक झालेत.
तिकडे पार बाणेरच्या पुढं.सुसगावच्या परिसरात त्यांचा थोरला मुलगा आशयचा प्रशस्त फ्लॅट.तिथं छान रमलेत अशोकराव.उत्तमोत्तम पुस्तकांचं वाचन.मोजकंच पण मौलिक स्वरूपाचं लेखन.सामाजिक व्यंगावर नेमकं बोट ठेवावं त्यांनीच.
आता ही चारच ओळीची कविता बघा.
‘तू मंदिरात जाऊन ये
मी इथे चपला सांभाळतो
पाहिजेल तर बायका न्याहाळतो
तुला बाहेर आल्यावर कळेल
आतला माणूस माझ्या पेक्षाही चालू होता’
विखारी वर्तमान ओरबाडून काढावा याच कवीनं.नेमकेपणानं.
माणूस हेरण्यात ही हस्ती भलतीच पटाईत.माणूस एकदा जरी भेटला तरी त्याची भक्तीमान ठिकाणं ओळखावी त्यांनीच.
+++
परिवर्तनाच्या गप्पा मारणारे गावगन्ना गडी दिसतात गावोगाव.ते कधीच आतून साजरा करीत नाहीत परिवर्तनाचा उत्सव.मंच वगैरे संबोधून व्यासपीठाला खूप झटतातही.परिवर्तनासाठी हवी असते मनातून वाहणारी निरागस,नितळ विचारधारा.नसतो तिला मानवत मतलबी वारा.नसते ती विरविरीत आणि वरपांगी.भूमिकेशी घट्ट असते ती बांधलेली.बघायची असेल अशी इमानदार,नेक विचारधारा त्यानं जरूर डोकावून पाहावं अशोक थोरात नावाच्या नाममुद्रेकडं.आतून शिगोशिग वाहणारी करूणा आणि विवेकशील विचारांची वहिवाट या माणसानं कधीच नाही होऊ दिली वजा.या दोनच टोकांवर वंदनीय होऊन विराजित असतो बुध्दप्रदेश!सकळ समष्टीशी जोडून असतो मैत्रभाव.हा मैत्रभाव या कवीमनाच्या माणसात नांदायला आलेला दिसतो दमदारपणानं.म्हणून हा महानुभाव कधीच किरकोळ होऊन कथत नाही जातीपातीच्या,गटातटाच्या, द्वेषमत्सराच्या गोष्टी.हे सगळं ओलांडून आलाय तो खूप पुढं.तशी जातीपातीची अस्तरं डकवून नाहीच डोकावता येत मानव्याच्या महत्तम मांडवात.नाही सांगत हा माणूस आपल्या आशय नावाच्या मुलाची  कर्तबगारी मरतुकड्या मूडमध्ये.नाही ठेवत लपवून लेकाच्या आंतरजातीय विवाहाची वजनदार गोष्ट.लेकीपेक्षाही माया लावतो सून म्हणून आलेल्या परक्याच्या लेकराला.
आता आजोबाच्या भूमिकेत अडीच वर्षाच्या रेयांशला बसतात आजी-आजोबा खेळवत.
थोरात वहिनी.खूप म्हणजे खूपच दमदार माऊली.थोरातांसारख्या कवीची कारकीर्द कणखर करण्यात त्यांचा मोलाचा वाटा.धाकटा संकेतही असतो पुण्यातच.तोही एमटेक्.वगैरे झालेला.बाकी सगळं उत्तम.
+++
एक लेखक,कवी म्हणून या माणसाची समज खूपच भारी.वाटेवरच्या भुलभुलैय्या जागांना तो जरूर करतो जेरबंद.बेगडी,दांभिक जागांना जरूर तेव्हा गच्ची धरून हाकलायलाच हवं.याचा आग्रह धरून बसतो हक्कानं.अशोक थोरात या कवीची अल्पाक्षरी कविता कथते जरूर हे सारं पण कुथत मात्र नाही.त्यामुळे निच-यानंतरची प्रसन्नता जरूर दिसते त्यांच्या कवितेत.एक कवितासंग्रह एवढाच परिचय आता नाही पुरणार या कवीला.आमच्या सारख्या कैक मित्रांचा आग्रह आहे जरूर.खूप अंतरानं येणारी त्यांची कविता कसदार असलीच पाहिजे हे सांगायला नाही कोणा ज्योतिषाची गरज.
+++
अशोक थोरात यांच्या अकथ गोष्टी अनेक आहेत आमच्या गाठीशी.हा माणूस सगळ्याच गोष्टी करतो मनापासून.लपवून छपवून ठेवण्याचं तंत्र कधीच नाही मानवलं या गड्याला.कवी लोकनाथ यशवंत असो वा मंगेश बनसोड हा जोडत राहणार माणसांचा उत्तम प्रदेश.भरत दौंडकर, राजेंद्र वाघ हे पुण्यातलं प्रातिनिधिक गणगोत.गणेश अभिमाने सारखा नव्यानं सहवासात आलेला पत्रकार.खूप नोंदवता येतील इथं नावं.
+++
आपल्या चालण्याच्या,बोलण्याच्या गतीला अडवून ठेवलंय हटवादी नियतीनं. याचं निमिषमात्र दु:ख नाही.
ओठांवरचं खळाळतं हसू कधीच थकू द्यायचं नाही याचा हेकेखोर निर्धार.म्हणून अशोकरावांचा सहवास सदोदित चैतन्यदायी. नित्य,निखळ आनंददायी.चैतन्याच्या चार गोष्टी सांगणारा.आम्हालाही भरपूर लाभलेला.सात वर्षे एकत्र काम केलं आम्ही एका शासकीय मंडळावर.साहित्य संस्कृती मंडळावर होते ते.तेथे मात्र नव्हतो आम्ही.पण तेथेही नाही राहिलं नाव त्यांचं झाकून.
+++
अशोकरावांचा सहा मे हा जन्मदिवस.बहुधा मे-जून-जुलै या दोनतीन महिन्यातले जन्मदिवस जन्माला घातलेले असतात शाळेतल्या शिक्षकांनीच!ते असो काहीही.आम्हाला गवसलं निमित्त! त्याच निमित्तानं झालं हे लिहून..

*जगदीश कदम,*
*नांदेड*

Previous articleरविषकुमार: विकाऊ पत्रकारांच्या गर्दीतील आशेचा किरण
Next articleपेट्रोल दरवाढीचे तर्क आणि तथ्य!
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.

1 COMMENT

  1. आदरणीय थोरात सरांविषयीचा हा अप्रतिम लेख आहे. सगळ्या प्रतिकूलतेवर मात करत इतरांना लाजवेल अस भन्नाट आयुष्य सर जगताहेत. त्यांच्या निकटच्या एका सहृदाने सरांचे काढलेले हे शब्दचित्र आहे. ज्यांचा ज्यांचा सरांशी संबंध आला त्या सगळ्यांना त्यांनी आपल्या जिंदादिल व्यक्तिमत्त्वाने भारावून टाकले आहे. मीसुद्धा त्यापैकीच एक. सरांचा सहवास लाभला आणि त्यासोबतच अनुभवांचा मोठा खजिनासुद्धा ! शान से जिनेवाले थोरात सर को सलाम !

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here