-किशोर देशपांडे
डॉ. युवाल नोआ हरारी यांनी ‘सेपियन्स’ नावाने मानवजातीचा जो संक्षिप्त इतिहास लिहिला आहे, त्यातील प्रमुख टप्प्यांची ओळख आपण या लेखमालेतून करून घेत आहोत. आपली सेपियन्स ही प्रजाती ‘होमो’ कुळातील अनेक प्रजातींपैकी एक होती आणि नियांडरथल्स, इरेक्टस वगैरे नावांनी ओळखले जाणारे इतर मानवप्राणी देखील आपल्या पूर्वजांसोबतच लाखो वर्षे पृथ्वीवर वावरत होते. असा हा इतिहासपूर्व वृत्तांत आपण मागील लेखांकात पाहिला.
तसे पाहता, सेपियन्सपेक्षा अधिक मोठा व दणकट आकार असलेले इतर अनेक प्राणी होते व आहेत. नियांडरथल मानवाचा देहसुद्धा सेपियन्सपेक्षा अधिक मोठा व मजबूत असायचा. त्यामुळे, केवळ शारीरिक शक्तीच्या बळावर सेपियन्स पृथ्वीचे सम्राट होऊ शकत नव्हते. ते मोठ्या मेंदूमुळे पृथ्वी काबीज करू शकले असेही म्हणता येत नाही. कारण, नियांडरथल मानवाचा मेंदू सेपियन्सपेक्षा मोठा होता. परंतु, उत्क्रांतीच्या प्रवासात एक वेळ अशी आली की सेपियन्स मानवांच्या मेंदूतून तंतूंचे जाळे एका विशिष्ट पद्धतीने विणले गेले. त्यामुळे त्यांच्या आकलनशक्तीने एकदमच मोठी झेप घेतली. या झेप घेण्याला ‘संज्ञानात्मक क्रांती’ (Cognitive Revolution) असे म्हणतात. भोवतालच्या परिस्थितीबाबत अधिक समग्रतेने जाण येणे व त्याबरोबरच, आपल्याला समजलेली माहिती इतर मानवांपर्यंत अधिक तपशीलवार कळवता येणे या आकलन शक्तीमुळे सेपियन्स मानवांना शक्य झाले.
प्राण्यांचा एखादा कळप पाणवठ्याकडे निघाला असता, समोर टेहळणी करायला गेलेला त्या कळपातील सदस्य “पाणवठ्यावर सिंह आहे” इतकी माहिती मागून येणाऱ्या कळपाला देऊ शकत असे. परंतु सिंह नेमका कुठे आहे, तो नुकताच आला की पाणी पिऊन परतत आहे, तिथे इतर प्राण्यांचे कळप दिसतात का, सिंह भुकेला दिसतो का इत्यादी तपशील फक्त सेपियन्स मानवच आपल्या कळपातील इतर सदस्यांना तपशीलवार देऊ शकत असे. मेंदूतील तंतूंच्या विशिष्ट रचनेमुळेच त्याला ते शक्य झाले.
हेही वाचा-मानवजातीचे प्रश्नांकित भविष्य!–https://bit.ly/30chGhS
कळपाने राहणारे प्राणी, एकमेकांसोबतच्या निकट संबंधांमुळे एकत्र राहू शकतात. आकलनाच्या मर्यादेमुळे, सेपियन्सखेरीज इतर मानवी-प्रजातींच्या अथवा महावानरांच्या कळपाची सदस्यसंख्या फारच मर्यादित राहिली. कळपातले सदस्य जरी सहकार्याने वावरत असले तरीही, आपल्याच प्रजातीमधील अनोळखी कळपांसोबत सहकार्य करणे त्यांना शक्य होत नसे. परिचयाच्या व माहितीच्या अभावामुळे, दोन कळप एकमेकांशी शत्रुवत वागत असत. परंतु आकलनशक्ती भरपूर वाढल्यामुळे, सेपियन्स मानवांच्या कळपाची सदस्यसंख्या देखील मोठी होऊ शकली. माहितीचे आदान-प्रदान करण्याच्या ओघात भाषेचा विकास होत गेला आणि गप्पा मारणे, भोवतालच्या जगाविषयी व माणसांविषयी अधिकाधिक माहिती मिळवणे हा आपल्या पूर्वजांचा छंद झाला. गैरहजर सदस्याविषयी कळपातले इतर लोकं जास्त चवीने एकमेकांशी बोलतात. त्यामुळे, साधारणतः प्रत्येक सदस्याबाबत इतर सर्व सदस्यांना आवश्यक ती माहिती मिळून जाते. चुगल्या करण्याची आवड मानवांना आजही आहे. पुढारी, अधिकारी, कारकून, शिक्षक व वैज्ञानिक हे सगळे फावल्या वेळात गैरहजर सहकाऱ्याची एकमेकांजवळ चुगली करताना आढळतात. परंतु त्यामुळे, आपापल्या टोळीतल्या वेगवेगळ्या सदस्यांची क्षमता व उणीवा यांचे टोळीतील प्रमुख सदस्यांना बऱ्यापैकी आकलन होते. मग सहकार्याने काम करण्यासाठी ते त्या-त्या सदस्यांच्या क्षमतांचा योग्य वापर करून घेऊ शकतात.
सध्या हयात असलेल्या सस्तन प्राण्यांमध्ये, मानवाच्या सर्वांत जवळचा महा-वानर म्हणजे चिंपांझी होय. प्राणीवर्तन-शास्त्राच्या (Ethology) अभ्यासकांनी या चिंपांझी वानरांच्या कळपांचे सूक्ष्म व प्रदीर्घ निरीक्षण केले आहे. त्यानुसार, चिंपांझी वानरांचा एक कळप सामान्यतः वीस ते पन्नास सदस्यांपेक्षा मोठा नसतो. कळपाच्या पुढारीपणासाठी जेव्हा त्यातील दोन नरांमध्ये स्पर्धा होते, त्यावेळी केवळ मारामारीने निकाल लागत नसून मानवाप्रमाणेच त्या प्रतिस्पर्धी चिंपांझी नरांना कळपातील जास्तीतजास्त सदस्यांचा पाठिंबा मिळवावा लागतो. त्यासाठी, इतर सदस्यांशी घनिष्ठ संबंध प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करणे, मिठ्या मारणे, पाठीवर थाप मारणे, छोट्या वानरांचे मुके घेणे इत्यादी प्रकार चिंपांझी पुढाऱ्यांनाही करावे लागतात. आकलन-क्रांतीमुळे, प्राचीन सेपियन्स मानवांच्या कळपाची संख्या मात्र शे-दीडशे पर्यंत वाढू शकली. आजच्या युगातदेखील, कोणताही एक मनुष्य सामान्यतः जास्तीतजास्त दीडशे लोकांना प्रत्यक्ष व बऱ्यापैकी ओळखू शकतो. मानवाच्या कळपाची सदस्यसंख्या वाढण्यामागे गावगप्पा व चुगल्या या माध्यमांचा मोठा हातभार आहे.
आकलन-क्रांतीचा आणखी एक परिणाम झाला. आपल्या भोवतालच्या प्रत्यक्षात दिसणाऱ्या व जाणवणाऱ्या जगाविषयी तर माणसे एकमेकांशी गप्पा करू शकत होतेच, परंतु न दिसणाऱ्या व न जाणवणाऱ्या गोष्टींची कल्पना करूनदेखील ते गप्पा करू लागले. यातूनच मिथकांचा, दंतकथांचा व कल्पित-वास्तवांचा जन्म झाला आणि ठोस अस्तित्व नसलेल्या कल्पितांवर देखील मानव विश्वास ठेऊ लागले.
हळूहळू, सेपियन्स मानवांच्या वेगवेगळ्या टोळ्या एकमेकांशी संपर्क साधून काही बाबतीत सहकार्य करू लागल्या. समान दंतकथा व श्रद्धा प्रचलित झाल्यामुळे तसे सहकार्य त्यांना शक्य झाले. आदिमानवांनी अशी काही भव्य स्मारके उभारली आहेत, जी अनेक जमातींच्या एकत्रित सहकार्याशिवाय उभारणे अशक्य होते. मानवांच्या अनेक टोळ्या सोबतीने मिळून, मोठ्याल्या प्राण्यांच्या शिकारीसुद्धा यशस्वीरीत्या करू शकल्या. पाच-पाचशे सेपियन्स मानव एकत्र चाल करून आल्यावर, पन्नास-साठ सदस्यसंख्येच्या नियांडरथल मानव-टोळीचा अथवा हत्तीपेक्षाही मोठ्या आकाराच्या अजस्त्र प्राण्याचा टिकाव लागणे कठीणच होते. गुंतागुंतीची व्यूहरचना करून योजनाबद्ध-रीत्या ती अंमलात आणणे केवळ सेपियन्स मानवांनाच शक्य होते. मेंदूतील तंतूंच्या विशिष्ट जैविक रचनेमुळे झालेल्या आकलन-क्रांतीचा तो परिणाम होता.
अर्थात, जैविक रचनेच्या काही अंगभूत मर्यादा आहेतच. परंतु, मानवाला प्राप्त झालेल्या आकलनशक्तीमध्ये कल्पकतेचाही समावेश होता आणि कल्पकतेला मात्र तशी मर्यादा नव्हती. असे म्हणता येईल की, मेंदूतील विशिष्ट जैविक रचनेने माणसाला असे एक मैदान प्राप्त करून दिले ज्या मैदानात मानवजात कल्पकतेच्या बळावर असंख्य प्रकारचे खेळ खेळू शकली. म्हणूनच, मानवी उत्क्रांतीचा इतिहास केवळ मानवाच्या जैविक रचनेच्या संदर्भात तपासता येत नाही. तसे करणे म्हणजे क्रिकेट, हॉकी, फूटबॉल, कबड्डी इत्यादि खेळ समजून घेण्यासाठी फक्त मैदानांचाच अभ्यास करणे होय.
हेही वाचा–मानवजात ‘अव्दितीय’ आहे का?https://bit.ly/2Sqw15U
कल्पकतेमुळे मानवाने अनेक कल्पित-वास्तवांना जन्म दिला असे वर म्हटले आहे. उदाहरणार्थ, ‘कंपनी’ हेसुद्धा एक कल्पित वास्तवच आहे. समजा एक कंपनी मोटार गाड्यांची निर्मिती करत असली तर कंपनीचे कार्यालय, तिचे संचालक, समभागधारक, कारखाना, निर्माण झालेल्या मोटार गाड्या हे सर्व आपण ठोस स्वरूपात पाहू शकतो. परंतु, कार्यालय व कारखाना जळाला, सर्व मोटारगाड्या नष्ट झाल्या, सर्व संचालक व समभागधारक मृत पावले, तरीसुद्धा ‘कंपनी’चे अस्तित्व कायम राहतेच. नवे समभागधारक, नवे संचालक, नवा कारखाना व नव्या मोटरगाड्या त्या कंपनीत येऊ शकतात. परंतु कंपनीला भौतिक अस्तित्व नसते. तिचे अस्तित्व केवळ मानवांच्या मनात असते. भौतिक अस्तित्व नसूनही या कंपनी नावाच्या कल्पित वास्तवामुळे हजारो समभागधारकांचा फायदा होतो, शेकडो कामगारांना रोजगार मिळतो, कंपनीने निर्माण केलेल्या मोटर वाहनातून लाखो प्रवाशांची वाहतूक होऊ शकते व त्या सर्वांचे जीवन अधिक सुसह्य होते. एका कल्पित वास्तवावर विश्वास ठेवण्याचा इतका परिणाम आपण प्रत्यक्ष पाहतो.
सुमारे सत्तर हजार वर्षांपूर्वी सुरू झालेली ही आकलन-विषयक उत्क्रांतीची प्रक्रिया, अंदाजे बारा हजार वर्षांपूर्वी कृषीक्रांती मध्ये व सुमारे पाचशे वर्षांपूर्वी औद्योगिक क्रांतीमध्ये परिणत झाली. कृषीक्रांती-पूर्वीच्या काळात आपले सेपियन्स मानवी-समूह भटक्या, अन्नशोधक व शिकारी टोळ्यांच्या स्वरूपात पृथ्वीच्या वेगवेगळ्या खंडांमध्ये स्थलांतरित होत होते. कृषी क्रांतीमुळे ते स्थिरावले आणि गावांची व नगरांची निर्मिती होत गेली. त्याबाबत पुढील लेखांकात माहिती घेऊ.
(डॉ. युवाल नोवा हरारी यांच्या ‘सेपियन्स’ या ग्रंथाच्या आधारे)
(लेखक नामवंत विधीज्ञ व सामाजिक घडामोडींचे अभ्यासक आहेत)
9881574954
डॉ. युवाल नोआ हरारी- नक्की ऐका