आमचे येथे नॅच्युरल सीझर करून मिळेल!!!!

-डॉ. शंतनू अभ्यंकर, वाई

आठवड्याभरापूर्वीचीच गोष्ट. मी अगदी मनातून खट्टू झालो. खुदाईखिन्नता पार वेढून राहिली मला. इतका निराश, इतका हताश, इतका हतवीर्य मी कधी झालो नव्हतो. आपण अगदी लल्लूपंजू आहोत असे वाटायला लागले. तसा मी बऱ्या मनोवृत्तीचा माणूस आहे. सुखदु:खे (जमेल तितकं) समे कृत्वा वगैरे. पण काही और घडलं आणि मी खचलोच.

त्याचं झालं असं की एक पेशंट माझ्याकडे आली. प्रेग्नंसीमुळे तिला बरीच दुखणी जडली होती. बीपी वाढलं होतं, थायरॉईड बिघडलं होतं, शुगर तर झोके घेत होती. आधीची तीन सीझर. मी आधीचे पेपर बघितले. रिपोर्टसचा अभ्यास करता करता डोळ्याच्या कडेने मी तिच्या हालचाली निरखत होतो. एकूणच एक अस्वस्थता जाणवत होती. तिच्या देहबोलीतून मला वाटलं, ‘डॉक्टर, तुम्हीच नॉर्मलच डिलिव्हरी करणारच असाल तरच तुमच्याकडेच डिलिव्हरी’; असा काहीतरी ‘च’कारांत प्रस्ताव ही माझ्यापुढे ठेवणार. असा प्रस्ताव आला असता तर माझं काम सोपं होतं. हे शक्य नाही, असं नम्रपणे सांगायचं आणि ही बया आणि बला टाळायची.

पण घडलं भलतंच. त्या बाईनी मला सांगितलं की एकूणच नेचर, म्हणजे निसर्ग, या प्रकारावर तिचा भलताच विश्वास आहे. जगात जे काही घडतं ते निसर्ग नियमानुसारच घडतं अशी तिची पक्की खात्री होती. तीन वेळा सिझर करावं लागलं एवढं वगळता तिच्या आयुष्यात अनैसर्गिक असं काही घडलं नव्हतं. किंबहूना आत्यंतिक काळजी घेऊन तिनी ते घडूच दिलं नव्हतं.

तेव्हा तिचं म्हणणं असं की सिझर तर मी करावंच, पण ते शक्यतो ‘नॅच्युरल’ करावं! हे ऐकून मी हतबुद्ध, गतप्रभ, दिग्.मूढ वगैरे वगैरे झालो. सीझर करण्याच्या विविध पद्धती मला माहीत होत्या पण ‘नॅच्युरल सीझर’ ही भानगड मला अवगत नव्हती. तसं मी तिला स्पष्टपणे सांगितलं. त्यावर ‘नॅच्युरल’ म्हणजे ‘कृत्रिम उपकरणे किंवा औषधे न वापरता केलेले सीझर’, अशी व्याख्या तिने मला ऐकवली.

यावर सर्वच उपकरणे कृत्रिम असतात. अणकुचीदार दगडाने पोट फाडण्याची मला प्रॅक्टिस नाही, असं मी प्रामाणिकपणे कबूल केलं. तिनी मला तात्काळ माफ करून टाकलं. तेवढं उपकरणांचं चालेल म्हणाली. पण मी औषधोपचार करणार त्यात कोणतेही ‘स्टिरॉइड’ नसावेत, ‘हॉर्मोन’ नसावेत आणि ‘केमिकल’ तर अजिबात नसावेत; असा एक नवाच पेच तिने टाकला.

आता संभाषण रंगात आलं होतं. मलाही आता वैताग जावून चक्क मज्जा वाटायला लागली होती. मी तिला म्हणालो, ‘असं आहे की, सर्व हॉरमोन हे केमिकलच असतात पण सारेच स्टीरॉईड नसतात. हां, पण काही हॉरमोन स्टीरॉईड असतात. तसेच सर्व स्टीरॉईड हे हॉरमोन नसतात पण केमिकल असतात. त्यातही काही स्टीरॉईड हॉरमोन असतात. आणि हॉरमोन, स्टीरॉईड असो वा नसो अथवा स्टीरॉईड, हॉरमोन असो वा नसो; काहीही असलं तरी स्टीरॉईड आणि हॉरमोन, हे दोन्ही केमिकलच असतात!!!’

ती आता संपूर्ण गारद झाली होती. मग अचानक माझ्या जिभेवर पुलं नाचू लागले. ‘आयुष्यात मला भावलेलं एक गुज तुम्हाला सांगतो.’ अशी अत्यंत गंभीर सुरवात करत मी म्हटलं, ‘अहो, तुम्ही ‘बाईसारख्या बाई’ आहात आणि मी ‘पुरुषासारखा पुरुष’ आहे हे त्या स्टीरॉईड हॉरमोनमुळेच बरं का!!’

माझ्या या सरबत्तीचा चांगलाच परिणाम झाला. आपणच केलेल्या लोकरीच्या गुंत्याकडे मांजरीनी स्तब्ध होऊन पहावं तसा तिचा चेहरा झाला. आता मिशांवरून पंजा फिरवावा का पंज्यावरून मिशा; असा प्रश्न पडलेल्या मांजरीसारखी ती दिसू लागली. शेवटी, ‘ते जाऊ दे हो डॉक्टर, तुम्ही ते नॅच्युरलचं तेवढं बघा ना.’ एवढंच ती पुटपुटली.

पुराणातील आणि लोककथांतील नायकांपुढे नाही का, अशक्य पेच निर्माण केले जातात आणि त्यातून दैवयोगे त्यांची सुटका होते; त्याचीच मला आठवण झाली. मी तपासून तिला आठवड्याभराने यायला सांगितलं आणि अक्षरशः दोन्ही हातांनी डोकं खाजवायला बसलो.

नॅच्युरल सिझर कसे करायचे, याचा विचार करता करता मी मनातल्या मनात सीझरची उजळणी करायला लागलो. सर्व प्रथम पेशंटला दिले जाते इंजेक्शन अॅट्रोपीन. अॅट्रोपा बेलाडोना या झाडापासून मिळणारे हे द्रव्य. म्हणजे माझ्याकडे जे इंजेक्शन येतं ते काही झाडाच्या रसापासून बनवलेलं नसतं. पण मूळचा स्त्रोत तोच. त्यामुळे अॅट्रोपीन या पेशंटला चालायला हरकत नव्हती म्हणजे निदान माझी तरी हरकत नव्हती. मग त्वचा साफ करण्यासाठी आयोडीन. हे तर नॅच्युरलच झालं की. नंतर स्पिरीट; म्हणजे दारू, म्हणजे सोमरस, म्हणजेही नॅच्युरल! आणि हो नुसतंच नॅच्युरल नाही; चक्क हर्बल सुद्धा!!

मग भूल देण्यासाठी झायलोकेन वापरलं जातं. हे मात्र कारखान्यात बनवले जातं. याला नॅच्युरल पर्याय म्हणजे डोक्यात हातोडा घालून बेशुद्ध करणे आणि तेवढ्या वेळात सिझर उरकणे! पर्याय नॅच्युरल जरी असला तरी मान्य होण्यासारखा नसणार, असं आपलं मी समजलो.

बाकी पोट उघडून मूल बाहेर काढताच पेशंटला पिटोसीन आणि मिथार्जिन इंजेक्शन दिलं जातं. पिटोसीन हा एक हॉरमोन आहे. त्या बाईंच्या उपासाला हा चालणार का? पण हा तर शरीरातच निर्माण होतो. डिलिव्हरी होताच त्या बाईंच्या मेंदूतून सर्वदूर पसरणारच आहे तो. तेंव्हा त्यात माझी थोडी भर घालायला काहीच हरकत नसावी. मिथार्जिन हे देखील नॅच्युरल आणि हो, हर्बल औषध आहे. म्हणजे त्याची निर्मिती एका बुरशीपासून केली जाते. शिवाय मी अँटिबायोटिक देणार पेनिसिलीन. हे तर त्या प्रसिद्ध बुरशीपासून निर्माण झालेलं. तेंव्हा हे ही हर्बलच. याबद्दलही आक्षेप असायचे कारण नाही.

थोडं सुद्धा डोकं न चालवता हे कोडं आपोआपच सुटत चाललं होतं. मी हरखून जात होतो.

पुढे उघडलेले पोट शिवण्यासाठी कॅटगट हा प्राणीज धागा वापरता येईल आणि त्वचा शिवण्यासाठी सुताचा दोरा वापरला तरी चालतो. एरवी कॅटगट आणि सुतापेक्षा नवे, चांगले पर्याय मी वापरत असतो; पण ह्या केसमध्ये खास जुने वापरायची माझी तयारी होती.

ऑपरेशननंतर वेदनाशामक म्हणून काही औषधे नॅच्युरल नसल्याने मला बाद करावी लागली. पण अॅस्पिरिन हे विलोच्या खोडापासून बनलेले औषध. फॉर्ट्विन म्हणजे गांजाचा चुलतभाऊ. अर्थात हे नॅच्युरल, हर्बल आणि वर अध्यात्मिकसुद्धा असल्याने पेशंटची यालाही काही हरकत असण्याची शक्यता नव्हती.

राहता राहिलं सलाईन. सलाईन म्हणजे मिठाचं पाणी. अगदीच नॅच्युरल की हो हे.

सरतेशेवटी माझ्या असं लक्षात आलं की भूल देणे, सिझर करणे, भूल उतरणे, पुढे काही तास पेशंटची प्रकृती स्थिर आहे ना हे पाहणे, या सगळ्या दरम्यान मी शरीरातील अनेक गोष्टींचं संतुलन साधत असतो. म्हणजे इनपुट आणि आउटपुट, रक्तस्राव आणि रक्त भरणे, ऑक्सिजन आणि कार्बन डाय-ऑक्साइड, पाणी आणि क्षार; असं बरंच काही. त्यामुळे माझं हे ‘संतुलन सिझरही’ होतं!!

शिवाय सिझर करताना बाळ, बाळा भोवतीचे पाणी, वार आणि मेम्ब्रेन असं सगळं मी काढून घेणार. यातला थोडा जरी भाग आत राहिला तर पेशंटला काही त्रास होऊ शकतो. त्यामुळे ‘प्रॉटडक्ट्स ऑफ कन्सेप्शन’चे समूळ निराकरण करणे, ही एक महत्त्वाची पायरी आहे. गर्भवस्था संपुष्टात आल्यामुळे, डायबेटीस, ब्लडप्रेशर वगैरे गर्भधारणेशी संबंधित सारे आजारही, समूळ बरे होणार होते!!!

थोडक्यात मी जे करत होतो ते नॅच्युरल तर होतंच पण हर्बलही होतं. हर्बल तर होतंच पण संतुलितही होतं. संतुलित तर होतच पण समूळही होतं… आणि इतकं सगळं होतं तर त्याला होलीस्टिक म्हणायला हरकत ती कसली?

अचानक कोडं सुटलं. मी तात्काळ फ्लेक्स बोर्डवाल्याला फोन केला. म्हटलं, “दवाखान्याबाहेर एक बोर्ड लावायचा आहे, घे मजकूर; ‘आमचे येथे नॅच्युरल सीझर करून मिळेल.’ थांब, थांब. ‘आमचे येथे नॅच्युरल, हर्बल, संतुलित, समूळ तसेच हॉलिस्टीक सीझर करून मिळेल!!!!!’”

शेवटी काय, मला विशेष किंवा वेगळं काहीच करायचं नव्हतं, पाटीवर काय लिहायचं एवढाच तर प्रश्न होता.

(पूर्वप्रसिद्धी: लोकसत्ता, चतुरंग पुरवणी)
Previous articleमूर्तिमंत साधे गणपतराव
Next articleलोकमान्य टिळक ते क्रांतिकारक गांधी!
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here