
आणि प्रकाश व वायूतही एकात्म म्हणावे असे काय असते? निर्मितीचे हे मूळच जर असे परस्परभिन्न असेल आणि समानधर्मी नसेल, तर तिने निर्माण केलेली सृष्टी व मानवही तसा कसा असेल? सृष्टीची अनेक रूपे आपण पाहतो, तशी ती माणसांचीही पाहतो. पण एकच माणूस त्याच्या पुरता तरी एक वा एकात्म असतो काय? की, ती अनेकांची गर्दी असते? व्यक्ती किती रूपांत, स्वभावात आणि वर्तनात प्रगट होते? त्यातले एक प्रगटन दुसऱ्यासारखे असते काय? बहुधा नसते. एखादी व्यक्ती कधी तरी अशी वागते व बोलते की, ती मुळातली हीच काय, असा प्रश्न संबंधितांना पडतो. या स्थितीचे मूळ केवळ संस्कारात आहे की निर्मितीच्या प्रक्रियेतच ते दडले आहे? (पंचमहाभूतांचा सिद्धांत डोळ्यांसमोर ठेवून केलेले हे विवेचन आहे, हे अर्थातच वाचकांच्या लक्षात यावे.) माणसांच्या जीवनातला समाजधर्म, व्यक्तिधर्म आणि त्यांच्या वाट्याला अटळपणे येणारे एकाकीपण यांचा संबंध या प्रकाराशी जोडता येईल काय? साधे आजचे मानसशास्त्र वा समाजशास्त्र या प्रश्नाचे उत्तर देऊ शकणार नाही. ही शास्त्रे पुढचे वास्तव पाहतात आणि स्वीकारतात. त्याच्या विश्लेषणात वा मूळ कार्यकारणभावात जात नाहीत. आपणही त्यात शिरण्याचे फारसे कारण नाही. येथे अनुभवाला येणाऱ्या व त्यापायी दुःखी (वा अपवादाने सुखी) होणाऱ्या व्यक्तींच्या मनोभूमिकांचा विचार करायचा आहे. मात्र अंधारच जाचक होतो. तहानेने व्याकूळ व्हावे लागते. वाऱ्यावाचून आपण हवालदिल होतो. आणि पृथ्वी? ती तर दर क्षणी नवी रूपे दाखविते, सुखविते आणि दुखवीतदेखील असते.