ए जिंदगी,
गले लगा ले
हम ने भी,
तेरे हर एक गम को
गले से लगाया है,
हैं ना ?
कमल हसनचा प्रश्न जिंदगीला !
श्रीदेवी सोबत हिरव्यागार गवतातून फिरताना…बाजूलाच असलेले शांत, हालचाल न करणारे पाणी !
श्रीदेवी खोड्या करत चाललेली…
कमल हसन तिला सावरत चाललेला…
पक्ष्यांचे थवे आभाळात एका लयीत विहरताना…
गुलजा़रचे शब्द…
इलाया राजाचं संगीत
आणि
सुरेश ईश्वरा वाडकरचा आवाज !
ही सगळीच सिंफनी दाटून टाकते मला !
श्रीदेवी पतंग उडवत उड्या मारतेय…
कमल हसन आंघोळ करुन नुसताच कमरेला टॉवेल लावून येतो. हातातले ओले कपडे झटकतो… श्रीदेवी पलंगावर लोळतीय… कमल हसन तिच्या अंगावर ते ओले कपडे झटकून पाण्याचे तुषार उडवतो… ती दचकते… धसमुसळेपणा करते… कमल हसनला मारते देखील… अतिशय कातर करुन सोडणारी निरागसता…कमल हसन तिला अगदी लहान मुलीसारखं कुशीत घेतो…श्रीदेवी सारखी सुंदरता मिठीत पण कमल हसनचे डोळे ते नाही सांगत… ते फार वेगळंच बोलून जातात…
काटा येतोय अंगावर… त्या डोळ्यातून तो तिच्याबद्दल जे सांगतो ते बघून !
मस्तपैकी केस विंचरतोय कमल हसन तिचे ! केस कंगव्यात अडकतात… तिला दुखतं… ती विव्हळते… कमल्या सांभाळतो तिला… आंजारुन गोंजारुन तयार करतो तिला !
खुर्चीत बसलेलं ते छोटुकलं कुत्रं कसं मस्त बघतं ना श्रीदेवीकडं !
ऐ जिंदगी गले लगा ले !
कमल हसन फरशी पुसतोय…ही बया पुसलेल्या फरशीवर पाय उमटवते…
तो रागानं बघतो तिच्याकडं… ती घाबरुन… आपलं सगळं शरीर आक्रसून घेत दोन्ही पाय वर घेऊन एका खुर्चीत बंद होऊन बसते ! सुन्नाट होते ती डोळ्यांतून !
सुपर्ब !
कमल हसन झाडाखाली बसलाय पेपर वाचत…त्याच्या लक्षात येतं ही बया कुठं दिसत नाही ते ! पेपर बाजूला ठेवून बघतो, तर ही बया मस्तपैकी गाढवाच्या पाठीवर बसून आपल्याच भावविश्वात दंग होऊन याच्याकडे बघून हसतेय !
ऐ जिंदगी गले लगा ले !
कमाल आहे हे सगळं बघायला !
परत कमल हसनचे डोळेच…
आईशप्पथ !
कळ आणतात ते जोराची…
तीच कळ हा आपला गुलजा़रबाबा मात्र शब्दांत मांडतो !
हम ने बहाने से,
छुप के जमाने से,
पलकों के पर्दे में,
घर भर लिया…
तेरा सहारा मिल गया हैं जिंदगी…
कमल हसन तिला गाढवावरुन उतरवतोय…लै चिडतंय… ती पण चिडते…
दोन्ही पाय आपटून आपला राग व्यक्त करते ! कमल हसनला दगड मारते…
ऐ जिंदगी गले लगा ले !
नंतरचा शॉट तर अफलातून…
तिला आपल्या पाठीवर बसवून कमल हसन तिला फिरायला नेतंय…
बाजूला चकाकणारं पाणी !
ऐ जिंदगी गले लगा ले !
कमल हसन आणि ती झाडाखाली उभे…
तिच्या हातात तेच ते छोटंस कुत्रं…
अतिशय निरागसपणे खेळतेय…
कमल हसन तोंडातून सिगारेटचा धूर सोडल्यासारखी वाफ सोडतं
ती पण तसंच करते…
ऐ जिंदगी गले लगा ले !
कमल हसन तिला शिकवत असतंय…
ती चुकते… हाताला थुंकी लावून ती पाटी पुसायला लागते… कमल हसन तिला कापडानं पाटी पुसून दाखवत असतो… ती बया अतिसुंदर नितळपणे तो थुंकी लावलेला तळवा
कमल्याच्या पांढऱ्या शर्टच्या बाहीला पुसत असते ! कमल हसन रागानं बघतंय… ती जीभ बाहेर काढून… चुकले असं म्हणते आणि हाईट म्हणजे आपल्या परकरानं ती बाही स्वच्छ करायला लागते !
ऐ जिंदगी गले लगा ले !
किती मस्त तिच्या मागं मागं फिरत तिला जेवण भरवतो कमल हसन !
अडगुलं मडगुलं सोन्याचं कडबुलं हेच आठवतं !
छोटा सा साया था,
आँखों में आया था
हम ने दो बूंदों से,
मन भर लिया,
हम को किनारा मिल गया हैं जिंदगी…
संध्याकाळच्या वेळेला…
दोघंच त्या पाण्याच्या खजिन्याजवळ..
मावळतीची किरणं… अंधारणाऱ्या सावल्या या दोघांच्याच…
ऐ जिंदगी गले लगा ले !
हमको किनारा मिल गया हैं जिंदगी…
अफलातून सिंफनी सगळ्यांचीच !
सदमाचा शेवट तर काळीज हलवून जातो नै !
रेल्वे स्टेशन !
कुंद वातावरण…
प्लॕटफॉर्मवर रेल्वे थांबलेली…
खिडकीजवळ श्रीदेवी बसलेली…
धावत पळत कमल हसन येतो…
त्याला खिडकीतून बाहेर बघणारी श्रीदेवी दिसते…
तो तीला हांक मारतो…
ती अनोळखी नजरेने त्याच्याकडे बघते…
तो अंगविक्षेप करुन तिला आठवून द्यायचा प्रयत्न करतो…
ती अनोळखी नजरेने मान फिरवून घेते…
रेल्वेची शिट्टी वाजते…
सिग्नल मिळतो…
इंजिनचा फास्सफुस्सं आवाज येतो… ती आवाजाची गती वाढत असताना रेल्वेची चाके फिरु लागतात… प्लॕटफॉर्मची संगत सुटत जाते…
ती खिडकीतून कमलच्या वेगवेगळ्या हांवभावांकडे अनोळखी नजरेने बघत असते… कमल हसन कासावीस होऊन तिला आठवून द्यायचा प्रयत्न करत असतो… रेल्वेचा शेवटचा डबा प्लॕटफॉर्म सोडून स्टेशनच्याबाहेर निघून जातो….
हताश कमल हसन आतल्या आत फुटत राहतो !
अंगभर शहारा…
आवंढा दाटून तसाच अडकतो घशात…
डोळ्यांतून येणारं पाणी तिथेच तसंच गोठलेलं…
आयला, हे असलं काही बघितलं,
अनुभवलं,
समजून घेतलं,
आणि बाणासारखं गच्च रुतून बसलं काळजात की नक्कीच ओठातून गुलजा़रबाबाचे शब्द येतातच…
हमको किनारा मिल गया हैं जिंदगी…
ऐ जिंदगी गले लगा ले …!!!
हा पिक्चर खरंच श्रीदेवीचा !
आणि हा पिक्चर बघितल्यावरच श्रीदेवी मनात बसली… नाहीतर याआधी फक्त ‘नयनों में सपना गर्ल’ वाटत होती.
नंतर ती भावली बच्चनसोबत ‘खुदा गवाह’ मधे ! पश्तूनी सौंदर्य खूपच खुलून दिसले तिचे
अप्रतिम !
चाँदनी आणि लम्हे विसरुन चालणारच नाही…
पण माझ्या दृष्टीने टॉपला सदमा !
तेलगू ‘क्षणा क्षणम्’ राम गोपाल वर्माचा १९९२ चा पिक्चर ! तेलगू कळत नसताना सिकंदराबादमधे परमेश्वरी टॉकीजला बघितलेला.
अप्रतिम ॲक्टिंग तेवढेच समजले होते… त्या वर्षीचा उत्कृष्ठ अभिनेत्री – तेलगू हा फिल्म फेअर पूरस्कार मिळाला होता तिला !
श्रीदेवीबद्दल मी एवढेच म्हणेन की पिक्चर आवडले नाहीत तरी श्रीदेवी आवडायची त्या पिक्चरमधली मग तो हिम्मतवाला असो की मवाली असो की तोहफा असो की मास्टरजी असो की नगीना असो !
जाता जाता परवा रात्री रैना बिती जाये मधे लागलेले तिचे जाँबाज मधले गाणे आठवले आणि श्रीदेवी आपली स्वतःची ताजगी घेऊन आली…
हर किसी को नही मिलता
यहाँ प्यार जिंदगी में…
खूश नसीब