कमीनापण कहा से लाओगे?

-डॉ. तीर्थराज कापगते
सातव्या वर्गाची सहामाही परीक्षा होती. हिंदीच्या पेपरमध्ये एक गुण कमी मिळाला म्हणून मी मॅडमशी हुज्जत घालून उत्तरपत्रिका पुन्हा तपासून देण्याचा आग्रह धरला. शेवटी तो एक गुण वाढला. मी एखाद्या विजयी वीरासारखा उत्तरपत्रिका आनंदाने मिरवत बाकावर परतलो. लाल कौलारू छताच्या शाळेतील माझ्या जिवाएवढी ती लहानशी वर्गखोली. एवढ्याशा प्रगतिपुस्तकाएवढे माझे ते इवलेसे जग. त्या जगात यशस्वी होण्याची साधीसोपी व्याख्या शिकवली जायची. संधीकडे निकोप मनाने पाहणे, तिचे सोने करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करणे, आवडीनिवडींची जोपासना करणे आणि क्षमतांचे संवर्धन करत पुढे जाणे, अशा जीवनमूल्यांची बीजे नकळत मनामध्ये रुजवली गेली.
तेव्हा असा जागतिकीकरणाचा रेटा सुरू झाला नव्हता. गांधींनी शिकवलेला जीवनव्यवहारांमधील साधनसुचितेचा प्रभाव ओसरला नव्हता. ‘गांधी अभी चलता नहीं’, असे लोक सहजपणे उद्‌गारत नव्हते. आजच्यासारखे स्वार्थी चढाओढीचे आणि जीवघेण्या स्पर्धेचे युग सर्वसामान्यांना खुणावत नव्हते. मुलांना प्रामाणिकपणे प्रयत्न करायला शिकवावे की चलाखीने यश मिळवायला लावावे अशी पालकांची द्विधा मनःस्थिती नसायची. श्रीमंत शिक्षण संस्था, कोचिंग क्लासेस आणि त्यावरील यशस्वी विद्याथ्यांच्या छायाचित्रांच्या जाहिरातींचे फलक त्यांना विचलित करीत नव्हते. शिक्षणाचे बाजारीकरण झाले नव्हते. ट्युशन फीस आणि डोनेशनच्या प्रचंड आकड्यांचा खेळ सुरू व्हायला होता. पॅकेजची भाषा ऐकू येत नव्हती. फाइव्ह स्टार संस्कृती रुळायची होती. आमदार-खासदारांसाठी राखीव असलेल्या सीटवर बसून आमदार आमच्यासोबत एसटीतून प्रवास करायचे. पुढे जाताना दोन्ही हात वल्हवत बाजूच्या लोकांना मागे ढकलायचे हे यशाचे आजचे तत्त्वज्ञान सार्वत्रिक झाले नव्हते.
पुढे पुढे सत्ता आणि पैसा समाजाच्या केंद्रस्थानी आले. आपली भूमिका स्पष्टपणे मांडणारे नेते दुर्लक्षित होऊ लागले. राजकारण्यांना खोटे बोलण्याचा मानसिक विकार जडत गेला. जनतेसाठी प्रामाणिकपणे कामे करण्यापेक्षा खोटी आश्वासने, जातीय किंवा धार्मिक द्वेष पसरवून सत्ता मिळवणारे पुढे आले. नंतर जिंकणेच महत्त्वाचे आहे ही सामाजिक मानसिकता बळावत गेली. त्यासाठी वापरलेली साधने नैतिक की अनैतिक हा प्रश्न मागे पडला. युद्धात आणि प्रेमात सर्व क्षम्य असते हा न्याय राजकारणालाही लागू झाला. गैरमागांकडे दुर्लक्ष होत गेले. जिंकणाऱ्याला चतुर समजले जावू लागले. त्यांच्या सल्लागारांच्या कुटनीतीचे कौतुक होऊ लागले.
लोक सत्यापेक्षा स्वतःला सत्तेच्या बाजूने करून घेतात. हीच प्रवृत्ती पुढे समाजात पसरत जाते. राजकीय पक्ष किंवा व्यक्ती कसेही करून जिंकली, की तत्काळ त्याच्याभोवती समर्थक, लाभार्थी, संधिसाधू आणि कौतुक करणाऱ्यांची वारेमाप गर्दी दिसू लागते. यश मिळवायला कोणताही मार्ग चालतो. परिणामी, प्रामाणिकपणा, सत्य आणि नैतिक मूल्ये दुय्यम ठरत जातात. राजकारणापुरती ही मानसिकता मर्यादित न राहता ती वरून खाली झिरपत प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रवेश करते. व्यवसाय, शिक्षण, सोशल मीडिया आणि दैनंदिन जीवनातही या शॉर्टकट किवा क्विक-फिक्स संस्कृतीचा खोलवर प्रभाव पडत जातो.
कुटीलपणाने तात्पुरते यश मिळेलही, पण विश्वास, सन्मान आणि प्रतिष्ठा ही फक्त प्रामाणिक लोकांनाच मिळते. त्यांचेच यश हे दीर्घकाळ टिकते, हा भाबडा समज हळूहळू मागे पडत गेला. यश हे नैतिकतेवर नाही तर डावपेचांवर अवलंबून आहे; ज्यात जिंकणाऱ्याला स्वतःच्या वाईटपणाचाही अभिमान वाटू लागतो. जिंकण्याची खरी ताकद धूर्तपणात आहे, अशी वृत्ती अधिकाधिक बळावू लागली.
प्रामाणिकपणे लढणे आणि कपटीपणे जिंकणे यात फरक आहे. एखाद्याशी सरळ भिडायला हिंमत लागते हे खरे आहे, पण यशस्वी होण्यासाठी फसवणूक आणि कपटबुद्धी अशा त्याहूनही वेगळ्याच गुणांची गरज असते. जिंकण्यासाठी माणूस किती खाली जाऊ शकतो याची पदोपदी जाणीव व्हावी असा हा काळ आहे. हे गुण प्रत्येकाकडे असतीलच असे नाही. येत्या काही दशकात जग आजच्यापेक्षाही अधिक गुंतागुंतीचे होईल हे सांगताना आपली न्यायाची धारणाच कालबाह्य झाली असल्याची शक्यता आहे, असे युवाल नोआ हरारी म्हणतो.
समकालीन सामाजिक वास्तव टिपण्याचे चित्रपट हे प्रभावी माध्यम आहे. कलात्मक नसलेल्या चित्रपटातील एखादा संवादही लक्ष वेधून खूप काही सांगून जातो. प्रसिद्ध भारतीय चित्रपट दिग्दर्शक राजकुमार संतोषी यांना १९९९मध्ये ‘चायना गेट’ साठी संवादलेखनाचा सर्वोत्तम फिल्मफेअर पुरस्कार मिळाला होता. त्यात डाकू जगिराच्या तोंडी एक संवाद आहे. खलनायकाचा हा संवाद आजच्या युगाचा जिंकण्याचा धर्म झाला आहे : हमसे लड़ने की हिम्मत तो जुटा लोगे लेकिन कमीनापन कहाँ से लाओगे?
8657049507
Previous articleचमत्कार, सिद्धी आणि अंधश्रद्धा
Team Media Watch
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here