कारावासातून कारावासाकडे

जवाहरलाल नेहरू विशेष लेखमाला – भाग ७

साभार – साप्ताहिक साधना

– सुरेश द्वादशीवार

 

१९२१ हे वर्ष गांधीजींनी त्यांच्या सहकार्‍यांसोबत सार्‍या देशात अहिंसा, स्वदेशी, चरखा आणि भंगीमुक्तीसारख्या योजनांचा प्रचार करण्यात घालविले. नेहरूही अनेकजागी त्यांच्यासोबत होते. या देशात स्वातंत्र्य येईल ते याच जनतेच्या प्रयत्नातून. शहरी बैठकी व त्यातील चर्चा यातून ते येणार नाहीत. देश बळकट करायचा आणि स्वातंत्र्यासाठी सिद्ध करायचा तर ग्रामीण भागातला शेतकरीच त्याच्या सार्‍या अडचणींवर मात करून उभा होणे गरजेचे आहे ही बाब याच काळात त्यांच्या मनात आणखी रुजविली. ते गांधीजींकडे अधिकाधिक आकृष्ट होत गेले. त्यांच्या भाषणातली धर्मवचने त्यांना आवडायची नाहीत मात्र फळाची आशा न धरता कर्म करीत राहण्याची गीतेतली शिकवण जेव्हा गांधीजी लोकांना समजावीत तेव्हा नेहरू भारावत आणि गांधीजींच्या आत्मसामर्थ्याची त्यांची जाण आणखी दृढ होत जाई. गांधीजींची रामराज्य ही कल्पनाही त्यांना प्रथम बुचकळ्यात टाकत असे. पण गांधी त्याचा अर्थ कल्याणकारी राज्य असा करतात हे लक्षात घेऊन तेही मग त्या संकल्पनेचा उच्चार करू लागले. चरखा हे स्वराज्याचे साधन होऊ शकेल असे त्यांना  प्रथम वाटले नाही. पण देशातील लाखो माणसे व स्त्रिया जेव्हा चरखा चालवू लागल्या आणि खादीची दुकाने ग्राहकांनी भरलेली दिसू लागली तेव्हा चरख्यासारख्या साध्या गोष्टीला राष्ट्राचे प्रतीक बनविण्याचे गांधींचे सामर्थ्यही त्यांच्या लक्षात आले. गांधीजींची साधने साधी होती. पण त्यात सामर्थ्य ओतण्याचे त्यांचे बळ फार मोठे होते… याचा साक्षात्कार पुढे नेहरूंएवढाच सार्‍या देशाला मिठाच्या सत्याग्रहाच्या वेळी झालाही.

असहकाराच्या चळवळीला जसजसा जोर चढत गेला तसतसे सरकारचे अत्याचार वाढत गेले. प्रथम सर्व काँग्रेस नेत्यांच्या हालचालींवर व प्रवासावर सरकारने बंदी आणली. वायव्य सरहद्द प्रांतात खान अब्दुल गफ्फार खान ऊर्फ सरहद्द गांधी यांना त्यांच्या भाषणाखातर अटक झाली. गांधींनी देशाला हा अन्याय शांततेने सहन करायला सांगितले. मात्र त्यांचा असहकाराचा संदेश विलक्षण परिणामकारक ठरला. शेकडो सरकारी कर्मचार्‍यांनी त्यांच्या नोकर्‍या सोडल्या. वकिलांनी व्यवसाय बंद केले. विद्यार्थ्यांनी इंग्रजी शाळांमधून आपली नावे काढून घेतली. असहकाराच्या या आंदोलनामुळे देश बेकायदा बनेल अशी भीती टागोरांना वाटली व ती त्यांनी गांधींना कळविली. गांधींचे त्याला उत्तर होते ‘यातून देशभक्त घडतील’… १९२१ च्या जुलैमध्ये काँग्रेसने विदेशी मालावर बहिष्कार घालण्याचे देशाला आवाहन केले. यावेळी मुंबईत झालेल्या विदेशी कापडांच्या होळीच्यावेळी गांधीजी स्वत: हजरही राहिले.

दुर्दैवाने याच सुमारास, ऑगस्ट महिन्यात केरळात मोपल्यांनी बंड केले. या बंडात तेथे राहणारे अरब वंशाचे लोक अग्रभागी होते. ब्रिटीशांचे राज्य गेल्याची अफवा त्या बंडाला कारण ठरली आणि तीत अनेक हिंदू व्यापार्‍यांचा व सावकारांचा बळी गेला. सरकारने हे बंड कठोरपणे शमविले. मात्र त्याने हिंदू-मुस्लिम ऐक्याच्या मोहिमेलाच तडा गेला. १९२४ मध्ये तुर्कस्थानच्या मुस्तफा केमाल पाशाने खिलाफतच रद्द केली तेव्हा तिच्यासोबतच या मोहिमेचीही समाप्ती झाली.

त्याआधी १० मे १९२१ या दिवशी नेहरूंच्या बहिणीचा, विजयालक्ष्मींचा (सरूप) विवाह रणजीत पंडित या तरुण वकिलाशी झाला. संस्कृतसह जगातील अनेक भाषांवर अधिकार असलेल्या या रणजीत पंडितांनीच कल्हणाने काश्मिरच्या इतिहासावर लिहिलेल्या मराजतरंगिणीफ या काव्यग्रंथाचा इंग्रजी अनुवाद केला. त्याला नेहरूंनी लिहिलेली प्रस्तावना भाषेच्या अभ्यासकांनी वाचलीच पाहिजे एवढ्या काव्यमय उंचीवर जाणारी आहे. दरम्यान काँग्रेस नेत्यांच्या अटकेचे सत्रही देशात सुरू होते. अली बंधूंना अटक झाली. नेहरूंवर पकडवॉरंट निघाले.

अशा धगधगत्या काळातच इंग्लंडच्या राजसत्तेला आपल्या राजपुत्राला, प्रिन्स ऑफ वेल्सला, भारताच्या सदिच्छा भेटीवर पाठविण्याची बुद्धी झाली. त्याची भेट भारतात सौहार्द निर्माण करील असा सरकारचा अंदाज होता. तो खोटा ठरला. काँग्रेस पक्षाने, राजपुत्राचा अपमान न करता त्याच्या सर्व कार्यक्रमांवर बहिष्कार घालण्याचा कार्यक्रम घोषित केला. मात्र राजपुत्राचे आगमन मुंबईत होताच त्या शहरात सरकारविरोधी दंगली उसळल्या. त्यात ५० जण पोलिसांच्या गोळ्यांना बळी पडले. ४०० वर लोकांना अटक झाली व त्या घटनेचे लोण सार्‍या देशात पसरत गेले. या प्रकाराचे प्रायश्चित्त म्हणून गांधीजींनी उपोषण आरंभले. देशातल्या दंगली त्यामुळे तात्काळ शमल्या आणि २२ नोव्हेंबरला गांधीजींनी ते उपोषण मागे घेतले.

मात्र सविनय कायदेभंगाच्या चळवळीने देशातले वातावरण तापतेच ठेवले. सारे जीवन, व्यवहार ठप्प झाले. बाजार, शाळा, आणि सरकारी कार्यालये एवढेच नव्हे तर लोकांनी आपापली घरेहीे बंद केली. राजपुत्राचे स्वागत मग अशा बंद भारताने केले… सरकारने काँँग्रेस आणि खिलाफत या दोन्ही संघटनांवर १९ नोव्हेंबरला बंदी घातली. काँग्रेसचे तेव्हाचे अध्यक्ष देशबंधू दास यांच्यासह अनेकांना तुरुंगात टाकले गेले. देशबंधूंनी यावेळी देशाला दिलेला संदेश होता ‘सारा देशच तुरुंग झाला आहे. मात्र त्यातही काँग्रेसचे आंदोलन सुरू राहिले पाहिजे. माझ्या अटकेने वा मृत्यूने या कार्यावर कोणताही परिणाम होऊ नये’. पंजाब, उत्तरप्रदेश, बिहार या सर्व प्रांतात मग अटकसत्र सुरू झाले. सरकारने उत्तरप्रदेशची सगळी काँग्रेस कमिटीच सामूहिकरीत्या तुरुंगात टाकली.

नेहरूंना व मोतीलालजींना सहा महिन्यांच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली गेली. तुरुंगातून त्या दोघांनीही जनतेला उद्देशून लिहिले, ‘स्वराज्य मिळेपर्यंत आताचा असहकाराचा अहिंसात्मक लढा अखंड चालू द्या.’ डिसेंबर २१ ते जानेवारी २२ या काळात मग सरकारनेही आपली सूडमोहीम राबविली. तीत ३० हजारांवर लोकांना अटक करून तुरुंगात डांबले गेले.

तुरुंगातले नेहरूंचे आयुष्य कमालीचे शिस्तबद्ध होते. सकाळी उठताच आपली राहण्याची जागा स्वच्छ करणे, आपले व वडिलांचे कपडे धुणे, व्यायाम, वृत्तपत्रांचे वाचन, सूत कताई आणि चर्चा. तुरुंगात असताना नेहरूंनी अनेक छंद जोपासले होते. त्यातला एक बागकामाचा. आपल्या सहकार्‍यांसह तुरुंगातल्या छोट्याशा आवारात ते भाज्या पिकवत. त्यासाठी विहिरीचे पाणी मोटेने ओढून त्यांना पाणी देत. दुसरा त्यांचा छंद वाचनाचा आणि तिसरा जमिनीवर एखादे अंथरुण टाकून नुसतेच आकाश न्याहाळण्याचा. एका कारावासात त्यांनी सूत कताईच्या जोडीला विणकाम शिकून घेतले. ‘मी आता वस्त्र-स्वयंपूर्णता मिळविली आहे’ असे त्यावेळी त्यांनी लिहून ठेवले. (आफ्रिकेच्या कारावासात असताना गांधीजींनी कातडे कमावण्याचे व चपला शिवण्याची कला अवगत केली होती त्याची येथे आठवण व्हावी.)

(लेखक नामवंत विचारवंत , वक्ते व लोकमतच्या नागपूर आवृत्तीचे संपादक आहेत)

9822471646

Previous articleभावनाताई व माणिकरावांसमोर पक्षांतर्गत गटबाजीचे आव्हान
Next articleमोदींचे भक्त आणि तर्क
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.

2 COMMENTS

  1. जबरदस्त अविनाश जी..तुमचे लिखाण सतत हटके असते..मी त्याची फार दिवाणी आहे…तुमचे होली च्या रात्रीचे सोशल मिडिया मधीलसर्जिकल स्ट्राईक हे भाषण अप्रतिम मांडणी होती..मला खुप दिवसानंतर काही प्रभावित करणारं असं मिलाल…!???????? प्रा.नूतन मालवी वर्धा

    • धन्यवाद नूतन जी. तुम्ही होळीच्या दिवशी होत्या का ?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here