कुछ रिश्तो का नमक दुरी होता है…

©सानिया भालेराव

सफल प्रेमाच्या असफल गोष्टी – ७

ताटातूट नेमकी कशी झाली याचा विचार ती करत होती.. काही नाती खाड्कन तोडून टाकता येतात. करकरीत सफरचंदाचे दोन भाग केल्या सारखं सोपं असतं ते.. पण काही नाती विचित्र असतात. त्यांच्या नशिबात तुटणं सुद्धा नसतं. कारण तुटण्यासाठी पहिलं ते असणं महत्वाचं. अस्तित्व मान्य होणं गरजेचं. ज्या नात्याला ना आगा असतो ना पिच्छा.. अशी नाती सर्व नात्यांच्या जातीकुळांत अस्पृश्य समजली जातात. खरं बघायला गेलं तर ती असतात सगळ्यात जास्त पवित्र.. खरी.. कारण अशा नात्यानं हाव नसते त्यांचं अस्तित्व सिद्ध करण्याची. व्यवहाराच्या, तर्काच्या पलीकडची असतात ती. पण ज्याला मान्यता नसते ते सगळं कुचकामी असतं.. जगरहाटी आहे ही. कितीही ठरवलं तरीही जे नियतीच्या मनात असतं तेच होतं. काही नात्यांच्या नशिबात विरहच असतो.. न संपणारा, जाळणारा, अस्वस्थ करणारा..

“तेरे बदलने के बावसफ भी तुझ को चाहा है
यह एतराफ़ भी शामिल मेरे गुनाहों में है”

तू बदललास असं असूनही केवळ तुझ्यावरच प्रेम करत राहिले… हा अपराध देखील मी स्वीकार केला आहे…

परवीन शाकिरची गझल ती ऐकत होती.. कोण केंव्हा कसं बदलेलं हे आपल्या हातात असतं का? आपण केलं प्रेम.. खरंतर दोघांनी पण केलं.. तितकंच समरसून.. वेड्या सारखं.. सगळं काही विसरून.. आपण सगळं झुगारून द्यायला तयार झालो होतो.. पण जेवढं आपण प्रेम करतो तेवढंच आणि तसंच त्यानेही करावं असं आपलं गृहीतक चुकलं मात्र..दोन अधिक दोन फक्त गणितात होतात.. प्रेमात नाही.. प्रेमात गुणाकाराच्या जागी वजाबाकी होऊ शकते हे आपल्याला माहित नव्हतंच.. पण कळलं.. प्रेम सगळं शिकवतं.. भागाकार आणि वजाबाकी समजली ती आता कायमचीच..

यह सोचती हूँ कैसे भूलूंगी अब उसे
एक शख्स वो जो मुझ को भुला कर चला गया

तिच्या विचारांचं चक्र या ओळींनी एकदम गोठलं. विसरणं इतकं अवघड का असावं? आपण हजार एक गोष्टी विसरत असतो.. भाजी आणताना नेमकी हिरवी मिर्ची आणायची राहून जाते.. कडीपत्ता तर हमखास विसरतो आपण.. कधी कधी शंभरदा घोकून येताना दूध आणायचं विसरतो.. मित्रांनी फोन केला असेल तर कॉल बॅक करणं विसरून जातो.. हजार गोष्टी विसरायला होतात.. पण पण मग ज्या विसरून जाव्याश्या वाटतात त्याच गोष्टी का नाही विसरत आपण.. मध्यन्तरी एका सेमिनारमध्ये आपण नको असलेल्या आठवणी इरेज करू शकतो यावर भाषण ऐकताना तिला एक वाक्य आठवलं .. ‘You can erase someone from your mind getting them out of your heart is another story’.. तिच्या आवडत्या ‘इटर्नल सनशाईन ऑफ स्पॉटलेस माईंड’ या चित्रपटातलं…

एखादं नातं, एखादं माणूस ज्याच्यावर आपण जीवापाड प्रेम केलं त्याला असं पुसून टाकता येतं? शेवटी नातं म्हणजे असतं तरी काय? दोघांनी मिळून उभारलेल्या आठवणी असतात त्या! त्या नात्यामध्ये घालवलेले उत्कट क्षण, अनुभवलेलं प्रेम हीच जमापुंजी असते नाही का? तिला नेहेमी वाटायचं की आपल्या आधीच्या पिढ्या मानसिकरित्या फार इव्हॉल्व्हड होत्या. त्यांच्या काळी हे असं फोटो काढणं, व्हिडीओ रेकॉर्ड करणं फारसं नव्हतं. रात्री शांतपणे बिछान्यावर पडून एखाद्या नाजूक फुलाचा हळुवार वास घ्यावा तसं हे लोक आपलं नातं अलगदपणे मनाच्या पापुद्रयातून उलगडत असतील. एक एक पापुद्रा बाजूला सारताना रात्रीच्या नीरव शांततेत मग ते नातं, ती व्यक्ती अलवारपणे वर येईल आणि मनात गडद प्रेमाचा रंग चढत जाईल.. आपलं माणूस आठवायला त्यांना ना कोण्या फोटोची गरज ना व्हिडिओची.. आमची पिढी त्यामानाने फार इमोशनली इन्सिक्युअर आहे. सगळे क्षण फोटोत पकडण्याची त्यांना सवय. मला तर कित्येकदा वाटतं की हे फोटो आणि व्हिडीओ म्हणजेच आठवणी असं समीकरण झालं आहे आपलं. उद्या जर माझ्याकडे असलेला सगळा डेटा उडाला..फोटो, व्हिडीओ डिलीट झाले तर माझ्या आठवणी गायब होतील का? ते क्षण जे मी जगले ते विस्मरणात जातील का? हे प्रेम.. या आठवणी.. ज्यांच्यामुळे कित्येक रात्री बैचेन होऊन काढल्या आहेत.. त्या परत मिळतील का? तिने ते सुद्धा करून पाहिलं पण पाटी कोरी झाली नाही.. तो तिच्या आत मुरून गेला होता.. . आता बाहेर काढणं अशक्य होतं त्याला.. मग तिने हळूहळू तो नसताना त्याच्याबरोबर राहण्याची सवय करून घेतली..

एव्हाना परवीनची गझल संपली होती. संध्याकाळ होत आली होती. ती उठली. बाल्कनीमध्ये आली. सुट्टीच्या दिवशी तिथे बसून गाणी ऐकायला तिला फार आवडायचं. खालचं कॉफी शॉप, बाजूला गार्डन.. तिला ही जागा फार आवडायची.. तिथे येऊन मावळणाऱ्या सूर्याकडे एकटक बघत बसली होती.. तिने मोबाईल उघडला. एक फोटो वर आला.. तो फोटो तिने बघितला.. एकदा.. दहादा.. हजारदा.. त्या दोघांचा फोटो.. ती सुंदर दिसत होतीच.. पण तो.. त्याने बाजूने हलकेच पकडून, तिला जसं जवळ घेतलं होतं ना..त्याच्या ओठावर ते मंद हसू, त्याच्या डोळ्यातले ते भाव.. ते काही केल्या तिला विसरता येत नव्हते.. हे असे भाव त्याच्या डोळ्यात कधी माझ्यासाठी आले होते? येतील?? तिच्या मनात विचार येऊन गेला. तिला हसू आलं. एव्हाना पाणी साचल्यामुळे तिला सगळं धूसर दिसायला लागलं होतं.. मोबाईल बाजूला ठेवून दिला..तिने गाणं लावलं.. ‘कुछ रिश्तो का नमक दुरी होता है.. ना मिलना जरुरी होता है’.

तो कधी पासून तीची वाट बघत बसला होता.. आज तिने का उशीर केला असा विचार करत असतानाच त्याला ती दिसली.. इतक्या दुरूनही ती किती मोहक दिसत होती. तिचं ते सूर्याकडे बघणं, गाणी ऐकत शांत बसणं.. हे सगळं तो नेहेमी डोळे भरून बघत असायचा.. त्या शिवाय त्याचा विकेंड सार्थकी लागायचा नाही.. त्याची पाचवी कॉफी एव्हाना संपली होती. इथून जाऊ नये असं लाख वाटत असूनही त्याने आवरतं घेतलं. डायरी उचलताना एक पान मुडपून ठेवलेलं त्याला दिसलं.. ते उघडून पाहिलं त्याने.. फराजचा शेर होता तिथे..

वो मुझ से बिछड़ कर खुश है तो उसे खुश रहने दो “फ़राज़ “
मुझ से मिल कर उस का उदास होना मुझे अच्छा नहीं लगता…

ते वाचून त्याने उगाचंच हसण्याचा निरर्थक प्रयत्न केला. तिच्याकडे परत बघण्याची सुद्धा ताकद त्याच्यामध्ये नव्हती आता.. तो तसाच उठला.. पाय आणि मन खेचत चालायला लागला..

(-लेखिका संशोधिका असून पाणी प्रदूषण या विषयात त्या काम करतात . त्यांची स्वतःची या विषयात काम करणारी ‘इकोसोल’ नावाची कंपनी आहे . वेगवेगळ्या भाषेतील पुस्तकं वाचणे, चित्रपट बघणे व त्यावर लिहिणे ही  त्यांची आवड आहे .)

[email protected]

……………………………………………………………………………………………………

हे सुद्धा नक्की वाचा –

सुगंधाचा प्रवास सोपा नाहीये!– http://bit.ly/2Y62z66

कुछ दर्द कलेजे से लगाने के लिए हैं… http://bit.ly/2W9rbdN

बे-मोहब्बत ख़ुदा नहीं मिलता….  http://bit.ly/2DpsbCS

दिल धडकने का सबब याद आया   http://bit.ly/2D28ktu     

कुछ लोग बिखर कर भी तमाशा नहीं होते   http://bit.ly/2X9YRIa

 

Previous articleकाँग्रेस राष्ट्रवादी आत्मघातकी वळणावर
Next articleफडणवीसांना प्रचंड अहंकार व भंपक साथीदार भोवलेत!
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here