– निशिकांत भालेराव
फेसबुक हे गतिमान, अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचणारे आणि नेमका प्रभाव पाडणारे माध्यम आहे. अनेकांना याचा चांगला, सकारात्मक अनुभव आला असणार. गेल्या आठवड्यात प्रसिद्ध , उपेक्षित पण काहीसे विक्षिप्त कलावंत केकी मूस यांच्याविषयी एक पोस्ट मी फेसबुकवर शेअर केली होती. आपण सारेच चार महिन्यापासून लॉकडाऊन मध्ये आहोत, त्या निमित्ताने केकी यांनी १९५० पासून ४० वर्षे घराचा उंबरठा न ओलांडणे हे मला फारच रिलेट झाले होते. मी जेव्हा १९८८ ला त्यांना भेटलो होतो तेव्हाच्या आठवणी लिहून त्यांच्या अमूल्य कलाकृती वाड्यातच पडलेल्या पाहिल्याने त्यांचे चांगले जतन व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त केली होती. या पोस्टला प्रचंड प्रतिसाद मिळाला. २०० जणांनी ती शेअर केली. एकहजारापेक्षा अधिक वाचकांनी कमेंट केल्या. तितक्याच लाईक मिळाल्या. ‘मीडिया वॉच’ सारख्या वेब पोर्टलने ती उचलून धरल्याने १० हजारावर लोकांपर्यंत ती पोस्ट गेली.अनेक जाणकारांचे फोन आलेत.अनेकांनी आपलासुदधा केकी बरोबर कसा संबंध आला, ते कळवले. बहुतेकांना केकी यांच्या कलाकृती चांगल्या पद्धतीने जतन व्हाव्यात, उत्तम असे म्युझिअम साकारावे, सरकारने जबाबदारी उचलावी, काही संस्थांनी पुढाकार घेऊन चाळीसगावचे केकी यांचे स्मारक जागतिक कीर्तीचे बनवावे , अशी इच्छा व्यक्त केली. काहींनी योगदान देण्याचीही तयारी दाखवली. या सर्वांचे मनापासून आभार. एका चांगल्या प्रकल्पात अनेकांना हातभार लावायची इच्छा आहे.अनेक वाचकांना केकी मूस माहितीच नव्हते. अशा वाचकांना त्यांचे आयुष्य, जगणे विलक्षण वाटून गेले. काही मंडळींनी गेल्या १५ वर्षात केकी यांच्या ट्रस्टने फार काही केले नाही. त्यांना ते जमत नाही, चाळीसगावसारख्या ठिकाणी हे काम होऊ शकत नाही, वगैरे प्रतिक्रिया दिल्या . या सर्व प्रतिक्रियांमध्ये एक गोष्ट समान होती ती म्हणजे, केकी यांच्या कलाकृतींचे जतन चांगल्या पद्धतीने व्हावे आणि सरकार काही करत नसेल तर समाजाने त्यासाठी योगदान द्यावे.
आज केकी यांच्या निधनानंतर म्हणजे गेल्या ३० वर्षात या महान कलावंताच्या अजरामर कलाकृतींची कशी उपेक्षा होतेय आणि आपणच हा सांस्कृतिक वारसा कसा नष्ट होऊ देत आहोत, हे सांगणे गरजेचे आहे. केकी १९८९ मध्ये गेले. त्यांनी जाण्यापूर्वी केकी मूस ट्रस्ट स्थापन केला, ज्यात शेवटच्या काही वर्षात केकी यांच्याजवळ आणि त्यांना मदत करणारे सदस्य झाले.चाळीसगाव हे तसे चांगले गाव. विशेषतः सार्वजनिक कामास मदत करण्याची गावाची इच्छा असते. प्रारंभी काही कलाशिक्षक, काही जाणकार येऊन जायचे. ट्रस्टच्या अपेक्षा निर्माण व्हायच्या पण गाडी पुढे जायची नाही. काही हवशे गवशे सरळ घुसून छायाचित्राच्या कॉप्या करून नेऊ लागले. ट्रस्टीने आपल्या क्षमतेप्रमाणे केकी यांच्या वाड्याभोवतालचे अतिक्रमणे काढणे,वाद मिटवणे, पैसे कसे उभे करायचे, कलाकृतींचे जतन कसे करायचे याचे नियोजन केले. मधल्या काळात काही ट्रस्टी बदलले. या काळात Intach या वारसा आणि सांस्कृतिक कला जतन करणाऱ्या प्रसिद्ध संस्थेचे काही सदस्य चाळीसगावला आले. वाड्यात गेले. त्यांनी ट्रस्टीला आश्वासने दिली.ट्रस्टीनी विश्वास ठेवला. गम्मत बघा Intach या पुपूल जयकर यांच्या संस्थेच्या त्या माणसांनी केकी मूस यांच्या काही कलाकृती आणि सामान (नेमके किती ते माहीत नाही) नेले. त्या माणसांना ज्याने इथे आणले त्यांच्याकडे ट्रस्टीने तगादा लावला की केकी यांचे नेलेले सामान परत द्या. खूप दिवस झाले कोणी दादच देईना.खरे तर जगप्रसिद्ध अशा कलावंताच्या वस्तू वा कलाकृती दाबून ठेवणे,उचलून नेणे हा मोठा गुन्हा आहे. पण तो घडलाय. आता ट्रस्टने त्या माणसांना कायदेशीर नोटीस पाठवली आहे.
केकी यांची माझी भेट झाली तेव्हा १९८८-८९ ला त्यांच्या वाड्यात त्यांनी मांडून ठेवलेल्या कलाकृतीत When I Shed My Tears या आत्मचरित्राचे हस्तलिखित होतेच. त्याची अनेकांना माहिती होती. आज या हस्तलिखितांचे ३५० पानेच तिथे आहेत. काही भाग गायब आहे. कोणीतरी पाहायला आलेल्यांनी नेला, असे सांगितले जाते. अगदीच संताप आणणारी गोष्ट आहे. लक्षात घ्या… आपण महान कलाकारांची त्यांच्या जिवंतपणीच अवहेलना नाही करत,तर गेल्यानंतरही त्यांच्या कलाकृती म्हणजे ‘बाप का माल’ समजून त्याची दुर्दशा करतो. ५ वर्षांपूर्वी ट्रस्टचे सचिव कमलाकर सामंत यांनी काही गोष्टी मनावर घेतल्या. त्यामुळे वाडा कम म्युझियम च्या हद्दीत असलेली अतिक्रमणे निघाली. बाजूला असलेल्या एकामोठ्या खड्ड्याचा वाड्याला धोका होता. तो खड्डा बुजला. ट्रस्टच्या बैठका सुरू झाल्या. आपणच वारसा जतन करायचा असे ट्रस्टने ठरवले. टाटा ट्रस्ट आणि भवरलाल जैन फाउंडेशनकडे प्रस्ताव गेले. त्यांनी इच्छा दर्शवली. भेटी झाल्या. टाटांनी सांगितले, आम्ही NCPA ला सारे नेतो. जैन यांनी जळगावला जैन हिल्सवर नेऊन जतन करण्याचा मनोदय बोलून दाखवला. सचिव कमलाकर सामंत यांना आणि अन्य सदस्यांना ते मंजूर नव्हते. ते म्हणाले, बाबाजीने ५० वर्षे ज्या वाड्यात राहून कलेची उपासना केली त्या चाळीसगावच्या वाड्याला स्थानमहात्म्य असल्याने केकी यांचे स्मारक इथेच व्हायला हवे. त्यामुळे टाटा आणि जैन ट्रस्टचा कलाकृती संवर्धन आणि वारसा जतन यातील रस संपला.
नक्की वाचा-४० वर्षांचा विजनवास…महान छायाचित्रकार केकी मूस यांची चटका लावणारी कहाणी–https://bit.ly/2Bwqu9j
२०१८ मध्ये स्थानिक आमदार उन्मेष पाटील यांनी (आज ते खासदार आहेत) जिल्हा नियोजन मंडळात केकी मूस म्युझियम आणि कलाकृती वारसा जतन करण्यासाठी ३ कोटी २८ लाख रुपयांचा एक प्रस्ताव मांडला. सार्वजनिक बांधकाम खात्याने २ कोटी ५८ लाखाचा अंदाजित खर्च सांगितला. भाजपा-शिवसेनेच्या युती सरकारने १ कोटी रुपये मंजूर केले. केकी यांचा Reembraant Retreat हा वाडा ११० वर्षांपूर्वीचा असल्याने तो जीर्ण झाला आहे. आतील कपाटे जुनी झालीत आहेत. जाळे जळमटे यांच्यापासून अमूल्य कलाकृती वाचवणे हे मोठेच आव्हान ट्रस्टीसमोर असल्याने त्यांनी अत्याधुनिक तीन मजली नव्या इमारतीचा संकल्प सोडला आणि १ कोटी रुपायातून बांधकाम सुरू झाले. काम जसे पुढे जाईल, तसे उरलेले बजेट मंजूर होईल अशी अपेक्षा होती. पण पुढे निधी आला नाही. १ कोटी रुपायातून १६६५ चौरस फूट बांधकाम असलेली तीन मजली कलादालनाची इमारत आज अर्धवट अवस्थेत आहे. केकी मूस आर्ट ट्रस्टचे सचिव कमलाकर सावंत यांनी ५ महिन्यांपूर्वी ‘सामना’ चे भुसावळ प्रतिनिधी बोठे यांच्यासह मुख्यमंत्री उद्धव आणि पर्यटन विकास मंत्री आदित्य ठाकरे यांची भेट घेऊन त्यांना निधीसाठी विनंती केली.आपले दुर्दैव की त्यांनी फार उत्साह दाखवला नाही .पर्यटन विकासमध्ये वारसा संवर्धन आणि कलेचे जतन बसत नाही म्हणे . नंतर लॉक डाऊन सुरू झाला.
मागील आठवड्यात फेसबुक पोस्टमुळे काही कलारसिकांनी कमलाकर सावंत यांना फोन करून परिस्थिती जाणून घेतली. मदतीची तयारी दर्शवली. मी कमलाकर सामंत यांच्याशी बोललो तेव्हा ते म्हणाले, साधारण रखडलेले बांधकाम पूर्ण करण्यासाठी १५ लाख रुपये लागतील. शिवाय कलाकृतींचे Digitisation, Preservation, Curative Method,Replica बनवणे यासाठी १० लाख रुपये लागतील. आम्ही आज ना उद्या देणगीदार मिळवूच आणि चांगले कलादालन उभे करू,असे त्यांनी निर्धाराने सांगितले. कलारसिकांनी मला केव्हाही या नंबरवर फोन केला तर मी सगळी माहिती देईन आणि निधीसाठी त्यांच्याबरोबर कोणाकडेही यायला, प्रस्ताव द्यायला तयार आहे, असेही त्यांनी सांगितले. (सावंत यांचा संपर्क क्रमांक +91 7887831462)
माझा प्रश्न हा आहे की, एवढ्या महान कलावंताचा अमूल्य ठेवा जतन करण्यासाठी ,सांस्कृतिक वारसा संवर्धनासाठी कोणतीच यंत्रणा पुढे का येऊ नये?
केकींच्या अजरामर कलाकृतींना घेऊन जावे , आत्मचरित्राची पाने गायब करावी, त्यांच्या अनेक अनमोल कलाकृती आजही कपाटात जागा नसल्याने पडून आहेत. हा संपूर्ण प्रकारच अतिशय उद्वेगजनक आहे . आता मदार कलारसिकांवरच आहे. चाळीसगावात केकी यांचे दर्जेदार कलादालन होण्यासाठी त्यांनीच आता पुढाकार घ्यायला हवा.
(लेखक जेष्ठय पत्रकार आहेत)
9881098156
[email protected]
केकी मूस यांचे कलादालन