कोण होते वेरियर एल्विन?

 

-किशोर देशपांडे    

  लॉकडाऊनच्या काळात मिलिंद चंपानेरकर याने जेव्हा मला ‘Savaging the Civilized’  हे रामचंद्र गुहा यांनी लिहिलेले वेरियर एल्विनचे चरित्र वाचण्याची जोरदार शिफारस केली, तेव्हा पहिला प्रश्न हाच पडला ‘कोण हा एल्विन आणि गुहासारख्या मोठ्या इतिहासकाराला त्याचे चरित्र का लिहावेसे वाटले?’ पुस्तक वाचता वाचता मात्र मला या प्रश्नांचीच लाज वाटत राहिली.

  वेरियर एल्विन (१९०२-१९६४) हा एका ब्रिटिश कर्मठ ख्रिश्चन कुटुंबातील मोठा मुलगा. त्याचे वडील बिशपच्या हुद्द्यावर होते. वेरियरच्या बालपणीच, आफ्रिकेतल्या (त्यांच्या मते) असंस्कृत, धर्महीन व गरीब प्रजेची सेवा करून त्यांच्या आत्म्यांना नरकात जाण्यापासून वाचविण्याच्या खटपटीत दुर्धर आजार होऊन ते मरण पावले. आईची आणि वेरियरची सुद्धा अशीच इच्छा होती की त्याने वडिलांचा कित्ता गिरवून धर्मोपदेशक व्हावे आणि ‘चर्च ऑफ इंग्लंड’मध्ये मोठ्या पदावर जावे.

  ऑक्सफर्ड विद्यापीठात धर्मशास्त्र व इंग्रजी साहित्याचा अभ्यास करणारा वेरियर हा ना.सी.फडक्यांच्या कादंबरी मधील नायकासारखा उंचपुरा, तगडा, देखणा, स्कॉलर, उत्कृष्ट खेळाडू, कवी आणि वक्तादेखील होता. पण तिसऱ्या जगातल्या गरीबांची सेवा करून येशूचा संदेश त्यांच्यापर्यंत पोहोचविण्याच्या प्रबळ इच्छेपोटी, तो वयाच्या सव्वीसाव्या वर्षी पाद्री बनून भारतात आला आणि पुण्याच्या ख्रिस्त सेवा संघात दाखल झाला. वेरियरला महात्मा गांधींमध्ये येशूचा अंश जाणवला आणि तो त्यांचा भक्त बनला. इंग्रज असूनही, भारतीय स्वातंत्र्याच्या मागणीचे जोरदार समर्थन करून तो कॉंग्रेसचा प्रवक्ता बनला. धर्म-परिवर्तनाला गांधींच्या असलेल्या विरोधामागील कारणे पटून, आपण धर्म-प्रचारासाठी अथवा धर्म-परिवर्तनासाठी कोणतेही प्रयत्न करणार नाही असे चर्चच्या वरिष्ठांना त्याने ठामपणे सांगितले. धर्मप्रसार न करता नुसतीच सेवा करणाऱ्या पाद्र्यांचे चर्चमध्ये स्थान नव्हते. त्यामुळे, यथावकाश वेरियर एल्विन आणि ख्रिश्चन चर्च यांनी एकमेकांपासून फारकत घेतली.

  मध्य प्रांतातील मंडला जिल्ह्यात, करंजिया गावामध्ये वेरियरने आपले घर केले. तो सर्व भाग गोंड आदिवासींचा होता. तेथे त्याने ‘गोंड सेवा मंडळ’ ही संस्था स्थापन करून, शिक्षण आणि स्वास्थ्य सेवेव्दारे आदिवासींमध्ये काम सुरु केले. शामराव हिवाळे हा त्याचा मित्र मुख्यतः संस्थेचे काम सांभाळत असे. मेरी नावाची एक ब्रिटिश तरुणी त्यांच्या आश्रमात आली आणि वेरियर तिच्या प्रेमात पडला. पित्यासमान असलेल्या महात्मा गांधीची त्या दोघांनी विवाहासाठी अनुमती मागितली. पण गांधींनी त्यांना लग्न न करता ब्रम्हचर्य पाळून गरीबांची सेवा करण्याचा उपदेश काहीशा कठोर शब्दांत केला. त्यामुळे मेरी निघून गेली. मात्र त्याच वेळी गांधींचा मुलगा देवदास याचा विवाह होऊन तो पत्नीसह सुखात असल्याचे वेरियरने पाहिले आणि त्याला ती गांधींची दांभिकता वाटून वेरियर गांधींपासूनही बराच दुरावला.

  नंतर मात्र वेरियरने स्वतःला विविध आदिवासी जमातींच्या अभ्यासाच्या कामी झोकून दिले. तो त्या जमातींमध्ये त्यांचेसोबत राहायचा, त्यांचेच अन्न खायचा, त्यांचेच पाणी व दारू प्यायचा, त्यांच्या नाच-गाण्यात सहभागी व्हायचा. इतकेच काय, एका ‘कोसी’ नावाच्या गोंड मुलीशी तिच्या जमातीच्या रिवाजानुसार त्याने विवाहदेखील केला. त्याचवेळी एल्विन त्यांच्या चालीरीती, परंपरा, पोशाख, खाद्य, निवास, विवाह, गोंदणकला, चित्रकला, शिकारीची पद्धत, लैंगिक संबंध, मालमत्तेचे वारसाविषयक नियम इत्यादींचे सूक्ष्म निरीक्षण करून तपशीलवार नोंदी घ्यायचा. कदाचित वेरियर हा जगातला पहिलाच मानववंश-शास्त्राचा सहभागी अभ्यासक असावा. सुमारे वीस वर्षे त्याने या पद्धतीने मध्य-भारतातल्या तसेच उत्तर-पूर्व भारतातील असंख्य जमातींचा अभ्यास करून जे ग्रंथ लिहिले, त्यामुळे त्याला जागतिक कीर्ती मिळाली आणि फादर एल्विनचे रूपांतर डॉ. एल्विनमध्ये झाले.

 एकीकडे चर्चच्या आक्रमक धोरणाला विरोध करताना, डॉ. वेरियर एल्विन यांनी आदिवासींना ‘मुख्य’(!) प्रवाहात आणू पाहणाऱ्या सनातनी हिंदूंचा व सोवळ्या कॉंग्रेसचा देखील विरोध केला. आदिवासींचा ‘उद्धार’ हा शब्दप्रयोग त्यांना मान्य नव्हता. उलट, हिंदू समाजाने शिकावे असे खूप काही आदिवासींच्या चालीरीतींमध्ये आहे असे डॉ.एल्विन यांचे मत होते. विवाहापूर्वीच्या लैंगिक संबंधांना मुक्त वाव असल्यामुळे, आदिवासी युवक-युवती अधिक आनंदी व मनाने निरोगी राहतात असे त्यांचे निरीक्षण होते. आदिवासींमध्ये स्त्रिया अर्धनग्न असूनही बलात्काराचे प्रमाण ‘शून्य’ टक्के आढळते. प्रेमभावनेत ‘सेक्स’ला स्थान नाही अशी गांधींसह बहुतांश समाजधुरिणांची धारणा होती. तर सेक्समुळे प्रेमाला अधिक ‘सखोल’ अर्थ प्राप्त होतो असे डॉ. एल्विन आदिवासींसोबतच्या अनुभवातून  मानायचे. ‘घोटूल’ ही आदिवासींची सामुदायिक संस्था डॉ.एल्विन यांनीच सर्वप्रथम जगाच्या नजरेस आणली.

  व्यापारी वृत्तीच्या इंग्रज राज्यकर्त्यांचे लक्ष भारतातल्या घनदाट जंगलांमधील नैसर्गिक साधन-संपत्तीकडे जाताच, त्याचे ‘दोहन’ करण्यासाठी वन-कायदा अस्तित्वात आणून आदिवासींच्या शतकानुशतकांच्या स्वच्छंद वावरावर सरकारने बंधने आणली. फळे व कंदमुळे, छोटे-छोटे प्राणी आणि पक्षी, तसेच अगदी गरजेपुरते फिरत्या शेतीमधून घेतलेले धान्य, हा आदिवासींचा आहार होता आणि सर्व जंगलातच त्यांचा विहार होता. परंतु सरकारने त्यांना फिरती शेती (shifting cultivation) बंद करून एकाजागी स्थिर होण्यास ‘बाध्य’ केले. त्यामुळे त्यांची पूर्वापारची जीवनशैली विस्कटून गेली. गांधी आणि कॉंग्रेसचा दारूबंदीचा आग्रह आदिवासींच्या जीवनशैलीशी पूर्णतः विसंगत होता. त्यामुळेच डॉ.एल्विन यांनी आदिवासी भागात दारूबंदीला विरोध दर्शविला. डॉ.एल्विन ज्या काळात आदिवासींसोबत राहिले तो अशा परिवर्तनाचा काळ होता. गांधी आणि कॉंग्रेस यांच्या दृष्टीने हिंदू-मुस्लिम ऐक्य आणि देशाचे स्वातंत्र्य हे महत्वाचे विषय होते. अस्पृश्यांना व इतर दलित जातींना न्याय मिळावा म्हणून झगडणारे असे डॉ.आंबेडकर यांच्यासारखे नेतेही होते. पण लोकसंख्येच्या सुमारे अकरा-बारा टक्के असणाऱ्या, आणि डोंगर-दऱ्यांमध्ये विखुरलेल्या व आधुनिक संस्कृतीपासून फटकून राहणाऱ्या आदिवासींचा मात्र कोणीही वजनदार नेता नव्हता. डॉ. वेरियर एल्विन या जन्माने ब्रिटिश माणसाला ही जबाबदारी घ्यावी लागली व त्यांच्यासाठी केवळ ब्रिटिशच नव्हे तर स्वतंत्र भारतातील शासनाशीही झगडावे लागले.

  सुदैवाची बाब ही होती की पंतप्रधान नेहरू आणि डॉ.एल्विन हे एकमेकांचे प्रशंसक होते. नेहरूंनी स्वातंत्र्यानंतर डॉ.एल्विन यांची नेमणूक आसामच्या राज्यपालांचे ‘राजकीय सल्लागार’ म्हणून केली आणि संपूर्ण ‘नेफा’ (सध्याचा अरुणाचल प्रदेश) प्रशासनाची जबाबदारी त्यांच्यावर सोपविली. डॉ. वेरियर एल्विन हे उत्तम प्रशासक म्हणून सिद्ध झालेत आणि त्यांनी अरुणाचल मधील विविध जनजातींचा (त्यांचे आपापले वैशिष्ट्य कायम राखत) लोकशाही पद्धतीने कसा विकास साधता येईल याचे उत्तम मॉडेल तयार केले. त्यासाठी ते वयाच्या पन्नाशीनंतर देखील, शेकडो मैल दऱ्या-खोऱ्यांत धोके पत्करून पायी फिरले. अखेर प्रकृतीने साथ सोडली आणि दीर्घ आजारानंतर डॉ. वेरियर एल्विन १९६४ साली मरण पावले. त्यांच्या इच्छेनुसार शिलॉंग येथे त्यांच्या प्रेताचे दहन करण्यात आले आणि रक्षेचे विसर्जन तेथील नदीत केले गेले. भारताचे नागरिकत्व त्यांनी आधीच घेतले होते.

  असा हा ऑक्सफर्डचा स्कॉलर, कट्टर धर्मोपदेशक, गांधीभक्त, स्वातंत्र्य-चळवळीचा एक शिलेदार, आदिवासींचा खरा हितचिंतक आणि सख्खा मित्र, जगविख्यात मानववंश-शास्त्राचा अभ्यासक, वर्डस्वर्थ ते वूडहाउस यांच्या साहित्याचा चाहता, कवी, प्रेमळ पती, उत्तम प्रशासक व स्वतःच्या मस्तीत जगणारा कलंदर आपल्या देशात होऊन गेला याची माहिती फार लोकांना नाही. वास्तविक डॉ.एल्विन यांना १९६१ साली पद्मभूषण पुरस्कार देखील मिळाला होता. रामचंद्र गुहा यांनी अतिशय खुमासदार शैलीत लिहिलेले त्यांचे चरित्र वाचकाला निश्चितच खिळवून ठेवते.

(लेखक नामवंत विधीज्ञ व सामाजिक घडामोडींचे अभ्यासक आहेत)

9881574954 

 

Previous articleउकळ चाटून दुष्काळ हटतो का?
Next article  ‘हिंदू’च्या निमित्ताने…
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here